photo

Sunday, May 3, 2009

फाईल कन्व्हर्जन 4 Apr 2008,

फाइल्स कन्व्हर्ट कशा करायच्या हा प्रश्ान् अनेकांना सतावत असतो. परंतु त्यानं कावून जाण्याचं कारण नाही. असं कन्व्हर्जन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ते कोणते, त्याचाच वेध...

.....

पीडीएफ फाइलमधला मजकूर काढून डॉक फाइलमध्ये कन्व्हर्ट करता येईल का, असे एका वाचकाने विचारले आहे. त्याच्या कार्यालयात त्याला पीडीएफ फाइलमधला मजकूर वर्डमध्ये उतरवून काढण्याचे काम दिले होते. साहजिकच त्याला खूप वेळ लागत असे. एवढा वेळ घालविण्यापेक्षा हे काम पटकन होईल का असा त्याचा सवाल होता. त्याचे उत्तर होय असे आहे. असे पीडीएफ कन्व्हर्टर इंटरनेटवरून फुकटात किंवा काही पैसे मोजून डाऊनलोड करता येतात. इंटरनेटवर 'पीडीएफ कन्व्हर्टर' असा सर्च दिला की ही साधने क्षणार्धात तुमच्या पुढे हजर होतात. मी स्वत: काही फाइल्स अशा करून पाहिल्या. त्या व्यवस्थित झाल्या.

पीडीएफचाच विषय आहे तर एका चांगल्या पीडीएफ प्रोग्रामचा उल्लेख करायला हवा. अडोब रिडरमध्ये पीडीएफ बनते, पण बऱ्याच वेळेस ती ओपन होत नाही. किंवा होताना कम्प्युटर हँग होतो, मग दोनचार मिनिटांनी कम्प्युटर चालायला लागतो. मी अडोब रिडर माझ्या कम्प्युटरमधून काढून टाकला आणि फॉक्सिट रिडर लोड केला. पीडीएफच्या कोणत्याही फाइल्स या फॉक्सीटमध्ये पटकन ओपन होतात. इंटरनेटवर जाऊन 'फॉक्सिट रिडर' असा सर्च द्या. तुमच्यापुढे फॉक्सिट सॉफ्टवेअरचे पान ओपन होईल. सध्या २.२ क्रमांकाची व्हर्जन उपलब्ध आहे. त्यातील पहिल्याच परिच्छेदातील 'डाऊनलोड' या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला चार पर्याय दिले जातील. त्यातील कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. सुमारे २.१३ एमबी ते ३.५६ एमबीपर्यंतची ही फाईल (वेगवेगळ्या लिंकवरून वेगवगळ्या साइझची पॅकेजेस असतात) डेस्कटॉपवर डाऊनलोड करा. नंतर त्यावर डबलक्लिक करून फॉक्सिट मशीनवर स्थिरस्थावर होऊ द्या. तुमच्या मशीनमधली कोणतीही पीडीएफ फाइल कशी पटकन उघडेल ते पाहा.

याच लिंकवर तुम्हाला काही झिप फाइल्स दिसतील. या काय किंवा अन्य झिप फाइल्स म्हणजे काय? कपड्यांनी भरलेली बॅग नजरेपुढे आणा. तशीच अनेक सुट्या फाइल्स एका मोठ्या फाइलमध्ये बंद केल्यावर होते ती झिप फाइल असे समजा. झिप फाइलचे विशिष्ट चिन्ह असते. ती फाइल उघडून त्यातील फाइली सुट्या करायला काही प्राोग्राम्स उपलब्ध आहेत. विनझिप, विनरार वगैरे. काही पैसे भरून; तर काही फुकटात. त्यातील एखादा प्रोग्राम तुम्हाला आधी डाऊनलोड करावा लागेल. मग केव्हाही कोणतीही झिप फाइल तुम्ही उलगडू शकाल. मग मेलवरून कोणी अशी फाईल पाठवली तर काय करायचे असा प्रश्ान् पडणार नाही. ती फाइल सिलेक्ट करून राइट क्लिक करा. वरच्या भागातच 'ओपन विथ विनझिप' (किंवा तुम्ही जो प्रोग्राम डाऊनलोड केला असेल तो) असे दिसेल. त्यावर क्लिक करा. मग त्या झिपच्या अंतरंगात काय दडलंय ते तुम्हाला दिसेल. समजा त्यात दहा फाइल्स आहेत. त्या सगळ्या एकदम सिलेक्ट करा. वरती एक्स्ट्रॅक्ट नावाचे बटण असेल. त्यावर क्लिक करा. या दहा फाइल्स तुम्हाला कुठे सेव्ह करायच्या आहेत असे तुम्हाला विचारण्यात येईल. मग आवश्यकतेनुसार फाइल सेव्ह करा. तुम्हाला दहापैकी चार फाइल एका फोल्डरमध्ये व बाकीच्या दुसऱ्यात असेही करता येईल.

झिप फाइलचा उलट्या मार्गानेही उपयोग असतो. दोन तीन फाइलची मिळून एक झिप फाइल करायची असेल, तर सगळ्या फाइल सिलेक्ट करा, राइट क्लिक करून 'सेंड टू'वर जा व पुढे 'कम्प्रेस्ड फोल्डर' असे म्हणा; की सगळ्या फाइलची एकच झिप फाइल तयार होईल. यात महत्त्वाचा भाग असा की मूळ फाइल्सपेक्षा झिप फाइलचा आकार छोटा असतो. त्यामुळे अशा स्वतंत्र फाइल्स मेलवरून पाठवत बसण्यापेक्षा एकच झिप फाइल पाठवणे सोपे जाते.

सध्याचा जमाना मोबाइलचा आहे. नुसते फोन करणे वा एसएमएस करणे एवढ्यापुरता हा मोबाइल मर्यादित राहिलेला नाही. त्यात पहिली सुधारणा म्हणजे एफएम रेडिओ आला. आता तर एकदोन जीबीचे मेमरी कार्ड टाकले की भरपूर गाणी ऐकता येतात. रेल्वे डब्यातून असे अनेक मोबाइल एकाचवेळी वेगवेगळी गाणी म्हणत असलेले तुमच्या लक्षात येतच असतील. तुमच्याकडे सीडीमध्ये सेव्ह केलेली गाणी हजारोंच्या संख्येत असतील; पण ती मोबाइलमध्ये कशी लोड करणार? गाणी आधी कम्प्युटरमध्ये लोड करून मग डाटा केबलने मोबाइलमध्ये, असे याचे उत्तर आहे का? होय आणि नाहीही!. याचे कारण सीडीमधून मोबाइलमध्ये गाणी एमपी३ फॉरमॅटमध्ये टाकावी लागतात. सीडीतली गाणी त्या फॉरमॅटमध्ये नसली तर? काळजी करू नका. इंटरनेटवरून आयट्यून्स हा प्रोग्राम डाऊनलोड करा. तो वजनदार म्हणजे सुमारे ५५ एमबीचा आहे. ब्रॉडबँड नसले तर तो डाऊनलोड करायला बराच वेळ लागेल. पण झाला की गंमत येईल.

तुमच्या सीडीवरची गाणी (कोणत्याही फॉरमॅटची असली तरी) कम्प्युटरवर एका फोल्डरवर सेव्ह करा. मग आयट्यून्स ओपन करा. 'फाइल'मध्ये जाऊन खाली 'इम्पोर्ट'वर क्लिक करा. सीडीवरची गाणी जेथे सेव्ह केली आहेत तेथे जा. ताबडतोब प्रत्येक गाणे एमपी३ वा एमपी४ फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट होईल. मग ती कन्व्हर्ट झालेली गाणी मोबाइलच्या डाटाकेबलच्या मदतीने मोबाइलमध्ये घाला. झाले काम!

अपडेट राहा! 21 Mar 2008,

आपला कम्प्युटर अपडेट राहावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण नेमके कोणते प्रोग्राम्स अपडेट करावेत ते कळत नाही. म्हणून 'ऑटोमॅटिक अपडेट्स'चा पर्याय ओके केलेले अधिक चांगले....

आपला कम्प्युटर सुरक्षित असावा असे प्रत्येकाला वाटते. तसेच तो अद्ययावत असावा असेही वाटते. तो अद्ययावत असणे यातच तो सुरक्षित आहे असे अपेक्षित आहे. अद्ययावत असण्याचा फायदा असा की प्रत्येक सॉफ्टवेअर अपटूडेट आहे आणि त्याद्वारे मिळत असलेल्या सुविधा कम्प्युटर स्वीकारत आहे. पण कोणकोणते अपडेट्स आपण डाऊनलोड करावेत हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला प्रत्येक प्रोग्राम अपटूडेट असावासे वाटते. तसे वाटणे चूक नाही, पण आपल्या मशीनची रचना, त्यांच्या प्रोग्रामचा आवाका हे पाहून मगच अपडेट डाऊनलोड करावेत.

सध्या विंडोज व्हिस्ता बाजारात आला आहे. तो एक्सपीसारखा लोकप्रिय झाला नसला तरी त्याबद्दल लोकांमध्ये सुप्त आकर्षण आहेच. दुसऱ्याने नवे कपडे घातले की आपल्याला स्वत:चे कपडे जुनाट वाटायला लागतात, तसाच हा प्रकार आहे. म्हणूनच व्हिस्ताच्या वेगवेगळ्या थीम्स मोहून टाकतात. पण तुमच्या मशीनवर व्हिस्ता सिस्टिम बसवलेली नसेल तर या थीम्सचा काहीच उपयोग नाही. तुमचा एक्सपीचा कम्प्युटर व्हिस्तासारखा दिसावा म्हणून मायक्रोसॉफ्टने काही फ्री प्रोग्राम्स जरूर आणले आहेत. पण त्यात मजा नाही. म्हणून एक्सपी असेल तर त्यात सुख माना.

आता एक्सपी मशीन अपडेट ठेवायचे असेल आणि कोणते अपडेट घ्यावेत हे माहीत नसेल तर इंटरनेट एक्प्लोरर ओपन करून 'विंडोज अपडेट'वर क्लिक करा. (टूल्सवर क्लिक करून मग विंडोज अपडेट). मग कम्प्युटर अद्ययावत आहे की नाही याची तपासणी मायक्रोसॉफ्ट करते. मग तुमच्यापुढे दोन ऑप्शन्स ठेवले जातात. एक्सप्रेस आणि कस्टम. पहिल्या ऑप्शनमध्ये कम्प्युटरसाठी जेवढे आवश्यक असतात, तेवढेच अपडेट्स सुचविले जातात. दुसऱ्या ऑप्शनमध्ये आवश्यक, अनावश्यक असे सगळेच अपडेट्स दिलेले असतात. साहजिकच या दोनपैकी एक्स्प्रेसवर क्लिक करा. मग मशीनचे स्कॅनिंग होईल व आवश्यक असेच अपडेट्स डाऊनलोड करायचे सुचविले जाईल. तेवढेच अपडेट्स अगदी डोळे झाकून डाऊनलोड करा. की विंडोजमधील महत्त्वाचे सगळे प्रोग्राम्स आपोआप अपडेट होतील.

हे अपडेट आपोआप होत राहिले तर? तीही सोय विंडोजमध्ये आहे. त्यासाठी डेस्कटॉपवरील 'माय कम्प्युटर' आयकॉनवर राइट क्लिक करा. मग शेवटी प्रॉपटीर्जवर जा. त्यावर क्लिक केल्यावर 'सिस्टिम प्रॉपटीर्ज' अशा नावाचा बॉक्स दिसेल. त्यात 'ऑटोमॅटिक अपडेट्स' असा उल्लेख असणारा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा. मग जी विंडो येईल, त्यात 'ऑटोमॅटिक अपडेट्स- रिकमेंडेड' असा उल्लेख असेल तो सिलेक्ट करा आणि विंडो क्लोज करा. विंडोज सिस्टिमचे जे जे अपडेट्स असतील ते आपोआप मिळत जातील.

एक लक्षात घ्या की फक्त विंडोज प्रोग्राम वा फाइल अपडेट होईल. तुमचा अँटिव्हायरस वा अन्य फाइल्स अपडेट होणार नाहीत. अँटिव्हायरसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'ऑटोमॅटिकली डाऊनलोड अपडेट्स' यावर होकाराथीर् क्लिक करावे लागेल. मगच तुमचे इंटरनेट चालू असल्यावर तो आपोआप अपडेट होत राहील. शक्यतो रोजच्या वापरातले प्रोग्राम्स आपोआप अपडेट होत राहतील असेच पाहा. त्यासाठी प्रत्येकाच्या सेटिंगमध्ये 'ऑटोमॅटिक अपडेट्स'चा टॅब सिलेक्ट करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एखाद्या प्रोग्रामबद्दल माहिती नसेल आणि त्याचा अपडेट खरोखरच आवश्यक आहे का हे माहीत नसेल, तर मात्र तुमच्या इंजिनीअरची मदत घ्या.

सध्या विंडोज एक्स्पीमध्ये सव्हिर्स पॅक दोन उपलब्ध आहे. याचाच अर्थ मूळ विंडोज एक्सपीमध्ये आतापर्यंत दोनदा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता तिसरा पॅक लवकरच येत आहे. त्याविषयी पुढील आठवड्यात.

आता एक दुरुस्ती. मी मागच्या लेखात मराठी फाँटबद्दल लिहिताना त्या मजकुराची पीडीएफ करताना फाँट हरवतो व भलताच मजकूर तयार होतो, असे म्हटले होते. डॉ. प्रसाद वायंगणकर (मालवण) आणि उदय सावंत या 'म. टा.'च्या दोन वाचकांनी माझी चूक दुरुस्त केेली आहे. मजकुराचा प्रिंट स्क्रीन घ्यायचा व ते मशीनमधल्या पेंटमध्ये पेस्ट करायचे की त्याची आपल्याला चित्ररूपातील फाइल करता येते. ती दुसऱ्या माणसाला पाठविली तर तो विशिष्ट फाँट मशीनमध्ये नसूनही पलीकडच्याला तो मराठीतला मजकूर व्यवस्थित वाचता येतो. या दोघांच्याही मते पीडीएफ फाइल करतानाही काही विशिष्ट सेटिंग्ज केली तर मराठी फाँट व्यवस्थित राहतो.

गोष्टी युक्तीच्या चार! 14 Mar 2008,

फाइल उघडणं किंवा फाँट पाठवणं या व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. त्या कशा करायच्या याचं इंगित समजलं की अनेक गोष्टी सोप्या होतात...

...

मध्यंतरी काही वाचकांनी मेल पाठवून विशिष्ट प्रकारच्या फाइल्स ओपन होत नाहीत, त्या कोणत्या प्रकारच्या आहेत तेही कळत नाहीत, असे कळविले आहे. फाइलच्या एक्स्टेन्शनबद्दल मी मागे लिहिले होते. आपली फाइल कोणती आहे आणि ती आपल्या कम्प्युटरवर असलेल्या कोणत्या प्रोग्राममध्ये उघडेल याची माहिती असली की हा प्रश्न येणार नाही. उदा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कोणती फाइल ओपन होईल यावर काही निर्बंध आहेत. तिथे फोटोशॉपची फाइल कशी ओपन होईल? तेच चित्राचे. कोणती फाइल कोठे ओपन होईल याचे काही नियम आहेत. एका वाचकाने मेलवर आलेल्या फाइल्स सेव्ह होतात पण ओपन होत नाहीत असे का, असे विचारले होते. याचे कारण ज्या प्रोग्राममध्ये ती फाइल तयार करण्यात आली होती तो प्रोग्राम या वाचकाच्या कम्प्युटरमध्ये लोड केलेला नव्हता. म्हणून ती फाइल उघडली गेली नाही.

फाइल कोणत्या पद्धतीची आहे वा कोणत्या प्रोग्राममध्ये तयार करण्यात आली आहे ते फाइलनेमवर सिंगल क्लिक करून समजू शकते. वर्डमध्ये केलेल्या फाइल असतात त्यांचे एक्स्टेन्शन (फाइलनेमनंतर डॉट दिल्यावर पुढे जे शब्द असतात ते. उदा. आयफेल.आरटीएफ) दिसते. इथे आरटीएफ म्हणजेच 'रिच टेक्स्ट फॉरमॅट' हे एक्स्टेन्शन आहे. ते 'डॉक' असू शकते, टेक्स्ट असू शकते, वेबपेज म्हणूनही ते सेव्ह करता येते. या सगळ्या फाइल्स फक्त वर्डमध्येच उघडू शकतात. त्याचे एक्स्टेन्शन क्यूएक्सडी असेल तर ती क्वार्क एक्स्प्रेस प्रोग्राममधली फाइल आहे, ती वर्डमध्ये ओपन होणार नाही. त्याचप्रमाणे वर्डची फाइल क्वार्कमध्ये ओपन होणार नाही. म्हणूनच आपल्याला कोणती फाइल मेलवरून आली आहे ते तपासून पाहाणे गरजेचे ठरते. तो प्रोग्राम तुमच्याकडे नसला तर ती फाईल ओपन करण्यात वेळ घालवू नका.

नाशिकहून एका वाचकाने फाँटचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांना मित्रांना कम्प्युटरवरून पत्रे पाठविण्याची आवड आहे. पण त्या मित्राकडे त्यांचा फाँट नसला तर त्याला ते वाचताच येत नाही. अशा वेळेस काय करावे असे त्यांनी विचारले आहे. जर ठराविक लोकांना तो मजकूर पाठविला जात असेल तर त्या पत्राबरोबर एकदा तो ज्या फाँटमध्ये आहे तो फाँटही पाठवून देता येईल. मित्राने त्याच्या मशीनमध्ये फाँट लोड केला की त्या फाँटमधला कोणताही मजकूर त्याला वाचता येईल. पण हे झाले मित्राच्या घरच्या कम्प्युटरचे. त्यावर तो ते पत्र वाचू शकेल. पण तो बाहेरगावी गेला आणि तिथे मेल ओपन केला तर तिथे कसा वाचता येईल? म्हणूनच त्या पत्राची इपीएस वा जेपीजी फाइल करणे हा उपाय ठरतो. त्या पत्राचे चित्रात रूपांतर होते आणि ते जगातल्या कोणत्याही कम्प्युटरवर ओपन केले तरी वाचता येते. परंतु, इपीएस वा जेपीजी बनविण्यासाठी फोटोशॉपची गरज लागते. ते बहुतेकांकडे नसते. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही.

या मजकुराची पीडीएफ फाइल बनवायची हा तिसरा उपाय आहे. त्यासाठी नेटवर बरेच प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. ते पारखून डाऊनलोड करायला हरकत नाही. पण मला वाटतं (मी चुकत असलो तर चूक दुरुस्त करा) मराठी मजकुराची पीडीएफ करताना फाँट बदलतात व मजकूर अजिबात वाचता येत नाही. हा प्रश्न इंग्रजी फाँटमध्ये येत नाही. त्याच्या फाइल्स तुम्ही सहज घरच्या घरी पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करू शकता. थोडक्यात, मित्राला एकदा स्वत:चा फाँट पाठवणे हा सोपा व सर्वांना जमणारा मार्ग त्यावर आहे.

हा फाँट लोड कसा करायचा? तुमच्या मशीनमध्ये 'फाँट्स' नावाचा फोल्डर असतो. (त्यासाठी 'स्टार्ट'वर क्किक करा, नंतर कंट्रोल पॅनलवर आणि नंतर फाँटस् फोल्डरवर). त्या फोल्डरमध्ये फाँट सेव्ह केला की झाले असे वाटेल. बरोबर आहे पण तो वेगळ्या मार्गाने लोड करावा लागतो. मेलवरून आलेला फाँट तुम्ही कुठे सेव्ह केलाय ते लक्षात ठेवा. मग फाँट्स फोल्डर ओपन करा. 'फाइल'वर क्लिक करून 'इन्स्टॉल न्यू फाँट'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. तिथे नेटवर्कच्या बाजूला 'ड्राइव्हज' असे शब्द दिसतील. त्याखालील बॉक्समध्ये, तुम्ही ज्या फोल्डरमध्ये फाँट सेव्ह केला असेल ती लिंक आणा. (उदा. सी ड्राइव्हमध्ये माय डॉक्युमेंट फोल्डर आणि त्यात पर्सनल फोल्डरमध्ये सेव्ह केलेला फाँट) ती आणली की तो फाँट वरच्या रिकाम्या बॉक्समध्ये दिसायला लागेल. तो वा ते फाँट दिसायला लागल्यावर बाजूला 'सिलेक्ट ऑल'वर क्लिक करा व मग ओके म्हणा. तो फाँट तुमच्या मशीनमध्ये कायमच्या वस्तीसाठी आला असं समजा.

काहीवेळेस एखादा फाँट 'करप्ट' होतो, वापरण्याजोगा राहात नाही. तो वापरला तर मशीन बंद पडते वा विचित्र चालते. अशावेळा तो फाँट पुन्हा याच फोल्डरमध्ये लोड करायला लागतो. पण त्यापूवीर् जुना फाँट पूर्णपणे डीलीट करावा लागतो. तसे केल्यावर मशीन पुन्हा सुरू करा आणि मगच नव्याने फाँट लोड करा. मग तो नीट शहाण्या मुलसारखा चालेल.

सोपे एक्सेल 29 Feb 2008,

आपल्या कामाचे नेमके स्वरूप आणि गरजा लक्षात घेऊन करावयाच्या गोष्टी अधिकाधिक सोप्या आणि आकर्षक करता येतात. तशा सोई कम्प्युटरमध्ये असतात. त्या जाणून घेतल्या की 'रंग बरसे' अशीच अवस्था होते...

मायक्रोसॉफ्ट वर्डइतकेच दुसरे लोकप्रिय साधन म्हणजे 'मायक्रोसॉफ्ट एक्सेल'. वेगवेगळे चार्ट बनवायला याचा फार उपयोग होतो. पण यात इतरही गमतीजमती करता येतात. मागे एका वाचकाने यात मराठी टाइप करता येते का असे विचारले होते. याचे उत्तर होकाराथीर् आहे. जे फाँट तुम्ही कम्प्युटरमध्ये लोड केलेले असतील, त्या फाँटमध्ये तुम्हाला एक्सेलमध्ये मजकूर टाइप करता येईल. एकाच फाइलमध्ये वेगवेगळ्या फाँटमध्ये मजकूर हवा असेल तर यात अधिकच गंमत करता येईल.

मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ब्लँक फाइल ओपन करा. तुम्हाला समजा एखाद्या वर्गातील मुलांना प्रत्येक विषयात किती गुण मिळाले आहेत त्याचे टेबल करायचे आहे. पहिल्या उभ्या कॉलमात मुलाचे नाव लिहा. पहिल्या आडव्या कॉलमात विषय लिहा. प्रत्येक मुलाचे विषयवार मार्क लिहिणे सोपे जाईल व एकाच दृष्टिक्षेपात सर्वांचे मार्क दिसतील. कोणती मुले मागे पडत आहेत व कोणाला चांगले मार्क आहेत तेही कळेल. हे अर्थात तुमच्या मुलाची पहिलीपासूनची शैक्षणिक प्रगती लिहिण्यासाठीही तुमच्या उपयोगी पडू शकेल.

पहिला उभा कॉलम सिलेक्ट करा. अगदी वर 'फॉरमॅट'वर क्लिक करा. नंतर फाँटवर क्लिक करा. तुमच्या कम्प्युटरमध्ये जे फाँट लोड केलेले आहेत, ते दिसतील. त्यातील कोणता मराठी फाँट हवा आहे तो निवडा. बाजूच्या कॉलमात फाँट स्टाइल निवडा. म्हणजे फाँट साधा हवा, इटॅलिक हवा, बोल्ड हवा की बोल्ड आणि इटॅलिक दोन्ही हवा ते निवडा. ते निवडून झाल्यावर फाँट किती आकाराचा हवा ते निवडा. समजा मुलांची नावे मराठीत, पण पुढचे मार्कांचे आकडे इंग्रजीत लिहायचे असले तर? हरकत नाही. मार्कांचा उभा सेल म्हणजे ओळ निवडा आणि पुन्हा हीच पद्धत अवलंबून फाँट निवडा आणि ओके करा.

असे एकाच फाइलमध्ये वेगवेगळे फाँट असले तर मजकूर टाइप करायला अडचण होते. म्हणून एका फाँटचा मजकूर एकदाच ऑपरेट करावा. म्हणजेच एकदा सगळ्या मुलांची नावे मराठीतून टाइप करून घेतली की मग दुसऱ्या सेलमध्ये इंग्रजीतून मार्क टाइप करावेत. नापास झालेल्या मुलांच्या मार्कांना लाल रंग देण्याचीही यात सोय आहे. फॉरमॅटमध्ये फाँट साइझच्या खालीच कलर अशी सोय आहे. तीत हा रंग बदलू शकता.

या रंगाचा वापर आणखी वेगळ्या पद्धतीनेही करता येईल. समजा तुम्हाला पहिल्या उभ्या ओळीला अथवा एकाच उभ्या वा आडव्या ओळीला पूर्ण रंग द्यायचा असेल तर? उदा. एखाद्या मुलाच्या मार्कांची बेरीज ज्या कॉलमात असेल, तो कॉलम रंगीत केला तर सोपे जाईल. त्यासाठी जो कॉलम रंगीत करायचा आहे, तो सिलेक्ट करा. पुन्हा फॉरमॅट सेल्समध्ये जा. तेथे पॅटर्नवर क्लिक करा. तुमच्यासमोर रंगांचे पॅलेट दिसेल. त्यातला आवश्यक रंग निवडा. ओके म्हणा. संपूर्ण कागदावर एकच रंग हवा असेल, तर सगळा मजकूर एकदम सिलेक्ट करा. पण वेगवेगळ्या ओळींना वेगवेगळा रंग हवा असेल तर? तसेही करू शकता. ते दिसायला कसे दिसेल ते पाहून मग ठरवा.

समजा एका आडव्या सेलला हिरवा, दुसऱ्या आडव्या सेलला पिवळा, परत खालच्या सेलला हिरवा मग पिवळा असे रंग द्यायचे असतील तर? प्रत्येक ओळ वेगवेगळी रंगवत बसण्यापेक्षा पहिली ओळ सिलेक्ट करा. मग कीबोर्डवरची 'कंट्रोल'ची की दाबून ठेवा व तिसरी, पाचवी, सातवी अशा ओळी सिलेक्ट करा. मग फॉरमॅट सेलमध्ये जाऊन योग्य तो रंग एकदाच द्या. आपोआप सगळ्या ओळी त्या रंगात होतील. हेच पिवळ्या रंगासाठी करा. या रंगाचा पॅटर्न कोणता हवा तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल.

सगळ्या वर्गाचे मार्क तर मांडून झाले; आता प्रत्येकाची टोटल करत बसणार की काय? तुम्हाला ज्या ओळीतील मार्कांची बेरीज हवी असेल ती निवडा. फाइलच्या वरती फाइल, एडिट, व्ह्यूच्याच ओळीच्या खाली वेगवेगळ्या चिन्हांचा टूलबार असतो. त्यातल्या इंग्रजी 'इ' आकाराच्या चिन्हावर क्लिक करा. बेरीज क्षणार्धात तुमच्या समोर हजर होते.

कम्प्युटर माणसाला आळशी बनवतो ते असे!

नेटस्केप ठोकणार इंटरनेटला रामराम 28 Feb 2008,

कॅलिफोर्निया
येत्या १ मार्चपासून इंटरनेटचा एक अध्याय इतिहासाजमा होणार आहे. एकेकाळी नेटिझन्सची फेवरेट चॉइस असलेला मात्र सध्या मागे पडलेला नेटस्केप ब्राउझर मार्च महिन्यापासून इंटरनेटला रामराम ठोकणार आहे. नेटस्केप बंद होणार अशी अफवा गेल्या वर्षीच उठली होती. मात्र आता एओएल म्हणजे अमेरिका ऑनलाइनने तशी अधिकृत घोषणा केली आहे.

नेटस्केप नेविगेटर- वर्जन नाइन आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण १ मार्चपासून नेटस्केपला एओएल सपोर्ट करणार नाही. त्याऐवजी फायरफॉक्स वापरावा असे एओएलने जगभरातील नेटक-यांना सूचवले आहे. पण तुम्हाला नेटस्केपची आठवण कायम राहावी असे वाटत असेल तर फायरफॉक्सवर नेटस्केप ही थीम उपलब्ध आहे असेही एओएलने स्पष्ट केले आहे.

१९९८ मध्ये एओएलने नेटस्केप खरेदी केले होते. जवळपास दशकभर नेटस्केपने इंटरनेटवर अधिराज्य गाजवले. १९९० च्या दशकात म्हणजे इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात नेटिझन्ससाठी नेटस्केपचे फार महत्त्व होते. पण नंतर इंटरनेट एक्सप्लोरर आणि फायरफॉक्सच्या ब्राउझर युद्धात नेटस्केप मागे पडले , आणि जवळपास संपल्यात जमा झाले होते.

आज ब्राउझरच्या बाजारात त्याचा फक्त ०.६१ टक्के हिस्सा उरला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर , फायरफॉक्स , सफारी , ऑपेरा हे ब्राउझर आज आघाडीवर आहेत. त्यामुळे नेटस्केप बंद होण्याच्या बातमीने नेटयुजर्सचा जुन्या आणवणींचा कप्पा उघडला गेला आहे.

वर्डवरचा सुबक लेआऊट! 22 Feb 2008,

नियतकालिक आकर्षक करण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध असतात. त्यांचा योग्य वापर करून आपण आपले काम नजर खिळवून ठेवणारे करू शकतो...

......

तुम्ही एखाद्या कंपनीचा अहवाल पाहिला असेल. एका पानावर फक्त हेडिंग, दुसऱ्या पानावर दोन कॉलमात चालविलेला मजकूर, लगेच पुढचे दोन परिच्छेद सिंगल कॉलमात नंतर एखादा बॉक्स आयटम अशा अनेक गमतीजमती त्यात केलेल्या असतात. हेतू हा की आकडेवारीचे खेळ असणाऱ्या या वाषिर्क अहवालात आकर्षकपणा यावा, तो चांगला दिसावा, आपल्याला ज्या गोष्टी जनतेपुढे आणायच्या आहेत त्याच पुढे याव्यात आणि ज्या लपवून ठेवायच्या आहेत पण कायद्याने देणे बंधनकारक आहे, अशा गोष्टी लहान टायपात द्याव्यात वगैरे गोष्टी फार सफाईने हाताळल्या जातात. हा गुळगुळीत कागदावरचा अहवाल पाहिल्यावर त्यासाठी कोणते महागडे सॉफ्टवेअर वापरण्यात आले असेल, ते आणणे आपल्याला जमणार नाही अशी तुमची समजूत झाली असेल. ती चुकीची आहे हेच मला सांगायचे आहे. काही वेळेस हायफाय चित्रे टाकण्यासाठी वा अधिक साइजचे ग्राफ टाकण्यासाठी वेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतोही. पण साधारणपणे कम्प्युटरवर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना बरेच काही करता येते.

कंपनीचा अहवाल वगैरे फार पुढची बाब झाली. आपण शाळेचे मासिक पाहू या. मासिकाचे मुख्य नाव, पुढे अनुक्रमणिका, विषयवार लेख वा वर्गवार (तुकडीवार) लेख यांची मांडणी फार छान करता येते. काही शाळांमध्ये हस्तलिखितांची पद्धत असते. सुबक अक्षरात आणि चांगले नक्षीकाम करून मासिक सजविणे यात आनंद असतो खरा; पण कधीतरी कम्प्युटरची मदत घेऊन पाहा.

तुम्ही वर्डमध्ये एखादी गोष्ट टाइप करा. त्याला योग्य ते हेडिंग द्या. अशा प्रत्येक वर्गाच्या मुलांकडून अनेक गोष्टी आल्या असतील. त्याचा स्वतंत्र विभाग तुम्हाला करावासा वाटला तर पहिल्या कथेच्या सुरुवातीला 'कथा विभाग' असे टाइप करा. त्याचा पॉईंटसाइझ व फाँट तुमच्या आवडीनुसार निवडा. (अवंती बोल्ड फाँट कसा दिसेल?). हेडिंग टाइप केल्यावर ते पानाच्या बरोबर मध्ये (सेंटरला) आणा. त्यासाठी वर्डच्या टूलबारमध्ये बी, आय, यू अशा अक्षरांच्या नंतर असणाऱ्या आयकॉन्सनंतरच्या चिन्हांचा वापर करा. हेडिंग सेंटरला आल्यावर एंटर मारा. कर्सर हेडिंगच्या खाली मध्यभागी येईल.

पुन्हा वर्डच्या टूलबारमध्ये जा. 'इन्सर्ट' ऑप्शनवर क्लिक करून 'ब्रेक'वर क्लिक करा. तेथे दोन विभाग असतील. 'ब्रेक टाइप्स' आणि 'सेक्शन ब्रेक टाइप्स'. यातला दुसरा निवडा. त्यातील पहिल्याच 'नेक्स्ट पेज'वर क्लिक करा आणि ओके म्हणा. हेडिंगखालचा सारा मजकूर पुढच्या पानावर जाईल. पहिल्या पानावर केवळ 'कथाविभाग' एवढेच हेडिंग राहील. तुम्हाला या हेडिंगखाली 'इयत्ता आठवी ते दहावी' वगैरे काही टाइप करायचे असेल तरी देऊ शकता. फक्त आता सांगितलेल्या क्रमात बदल एवढाच करायचा की हेडिंगऐवजी 'इयत्ता आठवी ते दहावी' या ओळीखाली कर्सर आणायचा व नंतर एंटर मारायचे. मग मुख्य हेडिंग व पूरक माहितीचे हेडिंग याचा फाँटसाइझ तुम्ही हवा तो द्या. वेगवेगळे फाँट द्या अथवा त्याखाली एखादे चित्र टाकायचे असेल तरी टाका.

चित्र टाकायचे असेल व ते वर्गातील मुलांचे लाइव्ह चित्रच हवे असेल तर ते आधी कम्प्युटरमध्ये लोड करावे लागेल. ते लोड असले तर वर्ड फाइलमध्ये पुन्हा 'इन्सर्ट'वर क्लिक करा, मग 'पिक्चर'वर क्लिक करा, नंतर 'फ्रॉम फाइल'वर जा. चित्र कुठे सेव्ह केले आहे तो फोल्डर उघडा व चित्राच्या फाइलवर क्लिक करा.

पहिले पान तर झाले. पुढच्या पानावर वेगवेगळ्या कॉलम साइझमध्ये मजकूर हवा असेल तर काय कराल? वेगवेगळ्या फाँटमध्ये, वेगवेगळ्या आकारात तो देणे सोपे आहे. पण मधलाच मजकूर वेगळ्या कॉलमात देता येईल? तेही सोपेच आहे. दुसऱ्या वा पुढच्या कोणत्याही पानावरचा मजकूर समजा दोन कॉलमात चालवला आहे, तो पानाच्या मध्येच तीन कॉलमांत हवा आहे, पण पुढचा परिच्छेद परत दोन कॉलमांत हवा आहे, तर? जो मजकूर वेगळ्या कॉलमसाइझमध्ये हवा आहे तो सिलेक्ट करा. टूलबारमधील 'फॉरमॅट'मध्ये जाऊन 'कॉलम'वर क्लिक करा. तुम्हाला तो परिच्छेद किती कॉलमात हवा आहे त्याप्रमाणे कॉलमसाइझ निवडा. आणि ओके म्हणा. झाला वेगळा कॉलमसाइझ. एकाच पानावर वेगवेगळ्या साइझमध्ये मजकूर पाहून गंमत वाटते.

शब्द मोजा! 15 Feb 2008,

गेल्या काही लेखांत आपण काही संज्ञांची माहिती करून घेत आहोत. आज मायक्रोसॉफ्ट वर्डशी संबंधित असलेले काही शब्द.

........

* वर्डआर्ट : कलात्मक अक्षर असा याचा शब्दश: अर्थ घेतला तरी चालेल. तुम्ही एखादे पत्र टाइप करत आहात वा ग्रीटिंग तयार करत आहात. त्यातील काही मजकूर ठळकपणे व वेगळा दिसावा असे तुम्हाला वाटत असेल तर या वर्डआर्टचा उपयोग करा. वर्डमध्ये 'व्ह्यू'वर क्लिक करून नंतर 'टूलबार'वर क्लिक करा. अगदी तळाशी वर्डआर्ट असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. लगेचच एक छोटासा टूलबार वर्डच्या तळाशी दिसेल. तुम्हाला जो शब्द वेगळ्या स्वरूपात हवा आहे तो सिलेक्ट करा आणि या टूलबारमधील इंग्रजी 'ए' आद्याक्षरावर क्लिक करा. त्याबरोबर तुम्हाला तीस पर्याय दिसतील. 'वर्डआर्ट' हीच अक्षरे वेगवेगळ्या पद्धतीने केलेली दिसतील. त्यातील तुम्ही वर्डमधला सिलेक्ट केलेला शब्द 'वर्डआर्ट'मधल्या कोणत्या स्टाईलने हवा आहे ते पाहून त्यावर क्लिक करा. ते अक्षर वा शब्द लगेचच त्यात बदलेल व पूवीर्पेक्षा अधिक आकर्षक दिसेल. अर्थात हा प्रकार नियमित पत्रापेक्षा ग्रीटिंग बनवायला अधिक उपयोगी आहे. कोणा खास व्यक्तीला खास पत्र पाठवायचे असेल तर भाग वेगळा. पण या वर्डआर्टची मजाच वेगळी आहे.

* वर्डकाऊंट : हा भाग सर्वांच्याच सोयीचा आहे. तुम्ही मराठीत वा कोणत्याही भाषेत मजकूर टाइप करत असाल आणि आपण नेमके किती शब्द टाइप केले आहेत ते जाणून घ्यायचे असेल तर ही सुविधा तुमच्या सेवेला हजर आहे. पुन्हा वर्डमध्ये 'व्ह्यू'वर क्लिक करून नंतर 'टूलबार'वर क्लिक करा. शेवटून दुसरे ऑप्शन या वर्डकाऊंटचे दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तळाला 'रिकाऊंट' असा टूलबार दिसेल. तेथे 'क्लिक रिकाऊंट टु व्ह्यू' असे शब्द दिसतील. त्यावर क्लिक केल्यास मजकुराचे किती शब्द झाले आहेत, किती ओळी झाल्या आहेत, किती परिच्छेद आहेत याची पूर्ण माहिती दिसेल. काही प्रोग्राममध्ये मजकुराचे शब्द आपोआप दिसत राहतील अशी व्यवस्था केलेली असते. वर्डमध्ये मात्र प्रत्येक वेळेस क्लिक करावे लागते. तरीही ही अत्यंत उपयोगी सुविधा आहे.

* ऑटोटेक्स्ट : एखाद्या फाइलमध्ये काही शब्द पुन:पुन्हा वापरायचे असतील तर ते परत परत टाइप करण्याची गरज नाही. ते तुम्ही 'ऑटोटेक्स्ट'मध्ये सेव्ह करून ठेवू शकता. समजा 'कम्प्युटराइझ्ड' किंवा यापेक्षाही कठीण शब्द तुम्हाला मजकुरात पुन:पुन्हा वापरायचा असेल, तर हा शब्द एकदाच वापरून सिलेक्ट करा. मग वर्डमध्ये वरती 'इन्सर्ट-ऑटोटेक्स्ट-न्यू'वर क्लिक करा. तिथे इंग्रजीतून तोच शब्द टाइप करा. तो ओके करा. पुन्हा हा शब्द जेव्हा टाइप करायचा असेल तेव्हा टूलबारखाली 'ऑल एंट्रीज' नावाने नवा टूलबार असेल त्यावर क्लिक करून त्याखालील 'नॉर्मल'वर क्लिक करा. तिथे तुम्हाला इंग्रजीतून टाइप केलेला शब्द दिसेल. तो सिलेक्ट करा. तुम्ही मूलत: सेव्ह केलेला मराठी शब्दच तिथे उमटेल. असे कितीही शब्द तुम्ही ऑटोटेक्स्टमध्ये सेव्ह करू शकता. फक्त 'ऑल एंट्रीज', मग 'नॉर्मल' आणि तो सेव्ह केलेला शब्द यावर क्लिक केलेत की झाले काम. यापेक्षा मूळ शब्द टाइप केलेला लवकर होईल असा विचार तुमच्या मनात आलाय का? तो काढून टाका. टाइप करायला अवघड असे शब्द यात घातलेत तरच फायदा होईल. लहानसहान व सोपे शब्द घालायला गेलात तर ते मात्र वेळखाऊपणाचे होईल.

तुम्ही मजकूर इंग्रजीतून टाइप करत असाल तर हा 'ऑटोटेक्स्ट' प्रकार अधिक सोयीचा आहे. कारण वेगवेगळ्या संदर्भातले शब्द इथे बाय डिफॉल्टच सेव्ह केलेले आहेत. त्याचीही व्यवस्थित वर्गवारी केलेली आहे. हे एकदा करून पाहाच.

डिफ्रॅगमेण्टची किमया 8 Feb 2008,

चित्र कसे वापरायचे, फाइल कशी पाठवायची, कम्प्युटरमधल्या प्रोसेसरचा वेग किती अशा अनेक गोष्टी सांगणारे शब्द आपल्या कानावर पडत असतात. त्यांचा अर्थ जाणून घेणं काम हलकं होण्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यकच आहे...

.....

आपण कम्प्युटर वापरताना लागणाऱ्या काही शब्दांविषयी माहिती घेत आहोत. आपल्या रोजच्या परिचयातले शब्द अधिक जाणून घेतले तर बरेच काही सांगून जातात.

क्लिपार्ट : ही एक वेगवेगळ्या चित्रांची लायब्ररीच म्हणायला हवी. साधे वर्ड डॉक्युमेंट वापरताना अथवा एखादे प्रेझेंटेशन करताना यातील चित्रे वापरली तर ते काम अधिक आकर्षक व परिणामकारक होते. ज्या विषयावर तुमचा मजकूर असेल त्या विषयाशी संबंधित असणारे चित्र टाकले तर त्याचा प्रभाव पडतो. त्यासाठी फाइल, एडिट, व्ह्यूच्याच ओळीत असणाऱ्या इन्सर्टवर क्लिक करा. खाली 'पिक्चर' असे दिसेल. त्याच्या उजव्या बाजूला बाण दिसेल. त्यावर क्लिक केल्यास क्लिपार्ट असे दिसेल. तेथे गेल्यावर तुम्हाला हवे ते चित्र मजकुरात घेता येईल. फक्त क्लिपार्टच नाही तर तेथे अनेक पर्याय उपलब्ध असलेले दिसतील. फ्रॉम फाइल, ऑटोशेप्स, चार्ट वगैरे. यातील काहीही तुम्ही घेऊ शकता. क्लिपार्ट यांत्रिक दिसतात. त्यापेक्षा खरा फोटो घालायचा असला तर फ्रॉम फाइलवर क्लिक करून फोटो घ्या. 'पिक्चर' मेन्यूतील सगळे पर्याय एकदा ट्राय करून पाहा आणि बघा तुमच्या मजकुराला कशी वेगळी गंमत येते ती. कम्प्युटरमध्ये वर्डबरोबर क्लिपार्ट लोड केलेले असतातच. पण इंटरनेटवरूनही ते तुम्ही घेऊ शकता. ते घेताना मात्र काळजी घ्या. याचे कारण काही वेळा त्याचे कॉपीराइट्स असतात. त्याचा भंग केलात तर पंचाईत होईल. पण एकंदरित हे क्लिपार्ट प्रकरण गमतीशीर आहे.

क्लॉक स्पीड : नावात क्लॉक असले तरी त्याचा घड्याळाशी काहीच संबंध नाही. तुमच्या कम्प्युटरमधल्या प्रोसेसरचा वेग किती आहे ते सांगणारा हा शब्द आहे. तो पूवीर् मेगाहर्टझ व आता गिगाहर्टझमध्ये मोजला जातो. एक गिगाहर्टझ म्हणजे एक हजार मेगाहर्टझ. पूवीर् सातशे मेगाहर्टझचे कम्प्युटर असायचे. आता गेमिंग, डिझायनिंग व इतर असंख्य कारणांसाठी कम्प्युटरचा वापर होत असल्याने त्यांना हा स्पीड पुरत नाही. मग प्रोसेसर अधिक क्षमतेचे लागतात. ज्याला इंटरनेट वापरायचे नाही आणि केवळ मायक्रोसॉफ्ट वर्ड हेच ज्याचे जग आहे त्यालाच आता मेगाहर्टझमधला कम्प्युटर चालेल.

कम्प्रेशन : कम्प्युटरमधली जागा वाचविण्यासाठी केलेली ही युक्ती. फाइलचा आकार छोटा करायचा व कमी जागेत अधिक फाइल ठेवायच्या हा त्याचा हेतू. शिवाय एखादा फोटो वा मोठी फाइल इंटरनेटवरून कोणाला पाठवायची असेल तर ती कम्प्रेस करणे गरजेचे ठरते. लहान आकाराची फाइल पटकन जाते. समजा डेस्कटॉपवर एखादी फाइल आहे. तिचा साइझ काही एमबी आहे. तिच्यावर राइट क्लिक करा आणि नंतर 'सेंड टू'वर क्लिक करा. पुढे 'कम्प्रेस्ड (झिप्ड) फोल्डर'वर क्लिक करा. त्या फाइलची वा फोल्डरची लहान आवृत्ती तयार व्हायला सुरुवात होईल. ती पूर्ण झाली की तिचा फाइल साइझ आधीपेक्षा कमी होईल. मग ती नेटवरून पाठवायला अधिक सोपी जाईल. अर्थात या झिप फाइलचा साइझही खूप मोठा असला तरी प्रश्न येईल. त्यामुळे झिप फाइल झाली की ती लवकर जातेच असे नाही. ही झिप फाइल आपण मेलवरून पाठविली तर पलीकडच्याला ती अनझिप करावी लागेल. त्यासाठी 'विनझिप' या प्रोग्रामचा आधार घ्यावा लागेल. हा इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेता येतो.

सीपीयू : सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. थोडक्यात, कम्प्युटरचा मॉनिटर बाजूला काढला तर जो मोठा बॉक्स उरतो तो म्हणजे सीपीयू. कम्प्युटरचा सर्वात महत्त्वाचा भाग. यातच हार्ड डिस्क बसविलेली असते, यातच मदरबोर्ड बसविलेला असतो. यातच सीडीरॉम बसविलेला असतो आणि यातच यूएसबी ड्राइव्हही असतो. हे सीपीयू धुळीमुळे खराब होण्याची शक्यता असते. आत धूळ गेली की काही वेळा कम्प्युटर काम करेनासा होतो. त्याच्या 'रॅम'वर धूळ साठली की गडबड होते. म्हणून हा भाग जपावा लागतो.

डीडीआर : डबल डाटा रेट मेमरी. 'रॅम'ची ताजी आवृत्ती. आधी प्रत्येक कम्प्युटरला एसडीरॅम बसवायचे. आता डीडीआर बसवतात. आधीच्या कार्डापेक्षा दुप्पट मेमरी या कार्डाची असते. त्यामुळे कम्प्युटर अर्थातच फास्ट चालतो. आता ग्राफिक कार्डांचा जमाना असल्याने डीडीआरच लागते.

डिफ्रॅगमेंट अथवा डिफ्रॅग : भरकटलेल्या महितीला तिची जागा दाखविणारी ही सुविधा आहे. कम्प्युटर नवीन असतो तेव्हा प्रश्न नसतो. तो वेगाने चालतो. पण आपण तो जसजसा वापरायला लागतो तसतसे त्याची क्षमता कमीकमी होते. आपण काही फाइल नव्याने करतो, नको असणाऱ्या काढून टाकतो. अशी काढ-घाल करताना कम्प्युटरच्या मेमरीमध्ये काही उणिवा राहतात. प्रत्येेक फाइल कुठे सेव्ह होणार हे ठरलेले असते. त्यासाठी मेमरीत विशिष्ट जागा असते. त्या कोडमध्ये न जाता सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. एक ते दहा आकडे घ्या. त्यात समजा एक ते तीन, पाच ते सात आणि दहा या क्रमांकावर फाइल आहेत आणि चार, आठ, नऊ या जागा रिकाम्या आहेत. फाइल ओपन होताना तीनवरून पाचवर येताना, सातवरून दहावर जाताना वेळ लागेल. कारण कम्प्युटर प्रत्येकवेळा पुढची लिंक शोधत राहील. त्याऐवजी एक ते सात या सलग आकड्यांवर फाइल सेव्ह झाली तर पटकन होईल. अशी सलग फाइल निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच डिफ्रॅगमेंट. ती जपून करावी लागते. ती करायची असेल तर सर्व अॅप्लिकेशन्स बंद करून केवळ डेस्कटॉप ओपन ठेवा. त्यावरच्या माय कम्प्युटरवर क्लिक करा. तुमच्या मशीनमधले ड्राइव्ह उदा. सी, डी, एफ (जे काही तुम्ही नाव दिलेले असेल ते). यातील सी ड्राइव्हवर क्लिक करा. राइट क्लिक करून प्रॉपटीर्जमध्ये जा. जनरल टॅबनंतर टूल्स नावाचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. त्यातील पहिल्याच 'चेक नाऊ'वर क्लिक करा. दोन ऑप्शन दिसतील. त्यातील दुसऱ्या खालच्या ऑप्शनवर क्लिक करा व स्टार्ट म्हणा. कम्प्युटरमध्ये काही दोष आहेत का ते चेक होते. ती प्रक्रिया झाली की परत टूल्सवर जाऊन 'चेक नाऊ'च्या खाली असणाऱ्या डिफ्रॅगमेंटवर क्लिक करा. पुन्हा तुम्हाला सगळे ड्राइव्ह दिसतील. त्यातील 'सी'वर क्लिक करा आणि ओके म्हणा की सगळ्या फाइल एकत्रित आणण्याचे काम सुरू होईल. ते पूर्ण झाले की मशीन बंद करून पुन्हा सुरू करावे. ते आधीपेक्षा फास्ट झालेले दिसेल. हे काम साधारणपणे दोन महिन्यांत एकदा करावे. हे डिफ्रॅगमेंटेशन चालू असताना वर्ड, मेसेंजर, इंटरनेट अथवा कोणताही प्रोग्राम चालू असता कामा नये. ही खबरदारी घ्यायलाच हवी.

डिफ्रॅगमेण्टची किमया 8 Feb 2008,



चित्र कसे वापरायचे, फाइल कशी पाठवायची, कम्प्युटरमधल्या प्रोसेसरचा वेग किती अशा अनेक गोष्टी सांगणारे शब्द आपल्या कानावर पडत असतात. त्यांचा अर्थ जाणून घेणं काम हलकं होण्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यकच आहे...

.....

आपण कम्प्युटर वापरताना लागणाऱ्या काही शब्दांविषयी माहिती घेत आहोत. आपल्या रोजच्या परिचयातले शब्द अधिक जाणून घेतले तर बरेच काही सांगून जातात.

क्लिपार्ट : ही एक वेगवेगळ्या चित्रांची लायब्ररीच म्हणायला हवी. साधे वर्ड डॉक्युमेंट वापरताना अथवा एखादे प्रेझेंटेशन करताना यातील चित्रे वापरली तर ते काम अधिक आकर्षक व परिणामकारक होते. ज्या विषयावर तुमचा मजकूर असेल त्या विषयाशी संबंधित असणारे चित्र टाकले तर त्याचा प्रभाव पडतो. त्यासाठी फाइल, एडिट, व्ह्यूच्याच ओळीत असणाऱ्या इन्सर्टवर क्लिक करा. खाली 'पिक्चर' असे दिसेल. त्याच्या उजव्या बाजूला बाण दिसेल. त्यावर क्लिक केल्यास क्लिपार्ट असे दिसेल. तेथे गेल्यावर तुम्हाला हवे ते चित्र मजकुरात घेता येईल. फक्त क्लिपार्टच नाही तर तेथे अनेक पर्याय उपलब्ध असलेले दिसतील. फ्रॉम फाइल, ऑटोशेप्स, चार्ट वगैरे. यातील काहीही तुम्ही घेऊ शकता. क्लिपार्ट यांत्रिक दिसतात. त्यापेक्षा खरा फोटो घालायचा असला तर फ्रॉम फाइलवर क्लिक करून फोटो घ्या. 'पिक्चर' मेन्यूतील सगळे पर्याय एकदा ट्राय करून पाहा आणि बघा तुमच्या मजकुराला कशी वेगळी गंमत येते ती. कम्प्युटरमध्ये वर्डबरोबर क्लिपार्ट लोड केलेले असतातच. पण इंटरनेटवरूनही ते तुम्ही घेऊ शकता. ते घेताना मात्र काळजी घ्या. याचे कारण काही वेळा त्याचे कॉपीराइट्स असतात. त्याचा भंग केलात तर पंचाईत होईल. पण एकंदरित हे क्लिपार्ट प्रकरण गमतीशीर आहे.

क्लॉक स्पीड : नावात क्लॉक असले तरी त्याचा घड्याळाशी काहीच संबंध नाही. तुमच्या कम्प्युटरमधल्या प्रोसेसरचा वेग किती आहे ते सांगणारा हा शब्द आहे. तो पूवीर् मेगाहर्टझ व आता गिगाहर्टझमध्ये मोजला जातो. एक गिगाहर्टझ म्हणजे एक हजार मेगाहर्टझ. पूवीर् सातशे मेगाहर्टझचे कम्प्युटर असायचे. आता गेमिंग, डिझायनिंग व इतर असंख्य कारणांसाठी कम्प्युटरचा वापर होत असल्याने त्यांना हा स्पीड पुरत नाही. मग प्रोसेसर अधिक क्षमतेचे लागतात. ज्याला इंटरनेट वापरायचे नाही आणि केवळ मायक्रोसॉफ्ट वर्ड हेच ज्याचे जग आहे त्यालाच आता मेगाहर्टझमधला कम्प्युटर चालेल.

कम्प्रेशन : कम्प्युटरमधली जागा वाचविण्यासाठी केलेली ही युक्ती. फाइलचा आकार छोटा करायचा व कमी जागेत अधिक फाइल ठेवायच्या हा त्याचा हेतू. शिवाय एखादा फोटो वा मोठी फाइल इंटरनेटवरून कोणाला पाठवायची असेल तर ती कम्प्रेस करणे गरजेचे ठरते. लहान आकाराची फाइल पटकन जाते. समजा डेस्कटॉपवर एखादी फाइल आहे. तिचा साइझ काही एमबी आहे. तिच्यावर राइट क्लिक करा आणि नंतर 'सेंड टू'वर क्लिक करा. पुढे 'कम्प्रेस्ड (झिप्ड) फोल्डर'वर क्लिक करा. त्या फाइलची वा फोल्डरची लहान आवृत्ती तयार व्हायला सुरुवात होईल. ती पूर्ण झाली की तिचा फाइल साइझ आधीपेक्षा कमी होईल. मग ती नेटवरून पाठवायला अधिक सोपी जाईल. अर्थात या झिप फाइलचा साइझही खूप मोठा असला तरी प्रश्न येईल. त्यामुळे झिप फाइल झाली की ती लवकर जातेच असे नाही. ही झिप फाइल आपण मेलवरून पाठविली तर पलीकडच्याला ती अनझिप करावी लागेल. त्यासाठी 'विनझिप' या प्रोग्रामचा आधार घ्यावा लागेल. हा इंटरनेटवरून डाऊनलोड करून घेता येतो.

सीपीयू : सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. थोडक्यात, कम्प्युटरचा मॉनिटर बाजूला काढला तर जो मोठा बॉक्स उरतो तो म्हणजे सीपीयू. कम्प्युटरचा सर्वात महत्त्वाचा भाग. यातच हार्ड डिस्क बसविलेली असते, यातच मदरबोर्ड बसविलेला असतो. यातच सीडीरॉम बसविलेला असतो आणि यातच यूएसबी ड्राइव्हही असतो. हे सीपीयू धुळीमुळे खराब होण्याची शक्यता असते. आत धूळ गेली की काही वेळा कम्प्युटर काम करेनासा होतो. त्याच्या 'रॅम'वर धूळ साठली की गडबड होते. म्हणून हा भाग जपावा लागतो.

डीडीआर : डबल डाटा रेट मेमरी. 'रॅम'ची ताजी आवृत्ती. आधी प्रत्येक कम्प्युटरला एसडीरॅम बसवायचे. आता डीडीआर बसवतात. आधीच्या कार्डापेक्षा दुप्पट मेमरी या कार्डाची असते. त्यामुळे कम्प्युटर अर्थातच फास्ट चालतो. आता ग्राफिक कार्डांचा जमाना असल्याने डीडीआरच लागते.

डिफ्रॅगमेंट अथवा डिफ्रॅग : भरकटलेल्या महितीला तिची जागा दाखविणारी ही सुविधा आहे. कम्प्युटर नवीन असतो तेव्हा प्रश्न नसतो. तो वेगाने चालतो. पण आपण तो जसजसा वापरायला लागतो तसतसे त्याची क्षमता कमीकमी होते. आपण काही फाइल नव्याने करतो, नको असणाऱ्या काढून टाकतो. अशी काढ-घाल करताना कम्प्युटरच्या मेमरीमध्ये काही उणिवा राहतात. प्रत्येेक फाइल कुठे सेव्ह होणार हे ठरलेले असते. त्यासाठी मेमरीत विशिष्ट जागा असते. त्या कोडमध्ये न जाता सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. एक ते दहा आकडे घ्या. त्यात समजा एक ते तीन, पाच ते सात आणि दहा या क्रमांकावर फाइल आहेत आणि चार, आठ, नऊ या जागा रिकाम्या आहेत. फाइल ओपन होताना तीनवरून पाचवर येताना, सातवरून दहावर जाताना वेळ लागेल. कारण कम्प्युटर प्रत्येकवेळा पुढची लिंक शोधत राहील. त्याऐवजी एक ते सात या सलग आकड्यांवर फाइल सेव्ह झाली तर पटकन होईल. अशी सलग फाइल निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच डिफ्रॅगमेंट. ती जपून करावी लागते. ती करायची असेल तर सर्व अॅप्लिकेशन्स बंद करून केवळ डेस्कटॉप ओपन ठेवा. त्यावरच्या माय कम्प्युटरवर क्लिक करा. तुमच्या मशीनमधले ड्राइव्ह उदा. सी, डी, एफ (जे काही तुम्ही नाव दिलेले असेल ते). यातील सी ड्राइव्हवर क्लिक करा. राइट क्लिक करून प्रॉपटीर्जमध्ये जा. जनरल टॅबनंतर टूल्स नावाचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा. त्यातील पहिल्याच 'चेक नाऊ'वर क्लिक करा. दोन ऑप्शन दिसतील. त्यातील दुसऱ्या खालच्या ऑप्शनवर क्लिक करा व स्टार्ट म्हणा. कम्प्युटरमध्ये काही दोष आहेत का ते चेक होते. ती प्रक्रिया झाली की परत टूल्सवर जाऊन 'चेक नाऊ'च्या खाली असणाऱ्या डिफ्रॅगमेंटवर क्लिक करा. पुन्हा तुम्हाला सगळे ड्राइव्ह दिसतील. त्यातील 'सी'वर क्लिक करा आणि ओके म्हणा की सगळ्या फाइल एकत्रित आणण्याचे काम सुरू होईल. ते पूर्ण झाले की मशीन बंद करून पुन्हा सुरू करावे. ते आधीपेक्षा फास्ट झालेले दिसेल. हे काम साधारणपणे दोन महिन्यांत एकदा करावे. हे डिफ्रॅगमेंटेशन चालू असताना वर्ड, मेसेंजर, इंटरनेट अथवा कोणताही प्रोग्राम चालू असता कामा नये. ही खबरदारी घ्यायलाच हवी.

बूट, बाइट आणि ब्राऊजर! 1 Feb 2008,

पुन: पुन्हा कम्प्युटर वापरून काही शब्द परिचयाचे होतात. परंतु त्यांचा अर्थ जाणून घेतला तर काम करणे सोपे होऊन जातेच; पण अनेकवेळा ते आनंददायीही ठरते!

कम्प्युटरवर काम करताना वा त्याचा अभ्यास करताना काही शब्द आपण पाहतो. ते अगदी सोपे वाटतात. अगदी रोजच्या संभाषणातही आपण ते वापरतो. त्यातील काही शब्द कम्प्युटरपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. उदा. ब्लूटूथ. हा शब्द कम्प्युटरपेक्षा मोबाइलसाठी आजकाल जास्त वापरला जातो. हे असे तंत्रज्ञान आहे की त्यामुळे कम्प्युटर, प्रिंटर, फोन यांच्यात वायरलेस संपर्क होऊ शकतो. नवीन येणाऱ्या मोबाइलमध्ये हे तंत्रज्ञान असतेच. तसाच कम्प्युटरबाबतचा आणखी एक सवयीचा शब्द म्हणजे 'बॉडी टेक्स्ट'. याचा अर्थ तुम्ही फाइलमध्ये ऑपरेट करत असलेला मजकूर. त्यात शीर्षक आणि तळटीपांचा मात्र समावेश नसतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड नीट समजून घेतलेत तर हे बॉडी टेक्स्ट तुम्ही वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने सजवू शकता. (त्याबद्दल नंतर कधीतरी).

' बूट' हा असाच एक शब्द. कम्प्युटर बूट झाला का, हे बूटिंग करताना काही प्रश्न उद्भवला का असे विचारले जाते. कम्प्युटर सुरू केल्यावर तो स्वत:च स्वत:चे चेकिंग करतो, विंडोजसह सगळे प्रोग्राम्स नीट सुरू होत आहेत ना हे पाहतो आणि 'स्टार्ट अप' फोल्डरमधले म्हणजे कम्प्युटर सुरू होताना तुम्हाला कायकाय लोड होताना हवे आहे त्या यादीप्रमाणे सगळे लोड होत आहे ना हे पाहणे म्हणजे कम्प्युटर बूट होणे. हे यंत्र सुरू करताना काहीवेळा नीट सुरू होत नाही किंवा प्रक्रिया सुरू झाल्यावर मध्येच बंद पडते वा कमालीचे स्लो होते. त्याची असंख्य कारणे आहेत. मशीनमध्ये व्हायरस शिरलाय का, विंडोज सिस्टिम करप्ट झाली आहे का, आधी जेव्हा वापरला असेल तेव्हा मशीन योग्य प्रकारे बंद केले आहे का, 'बूट' होताना लागणाऱ्या यंत्रणेतील एखादी फाइल गहाळ झाली आहे का (म्हणजे चुकून डीलिट झाली आहे का) वगैरे अनेक बाबी त्यात महत्त्वाच्या असतात. किंवा सर्वसाधारण चूक म्हणजे 'स्टार्ट अप' फोल्डरमध्ये जर असंख्य प्रोग्रामची नोंद असेल तर कम्प्युटर सुरू होताना तो प्रत्येक प्रोग्राम ओपन होत राहतो आणि आपल्याला ते सारे ओपन होईपर्यंत पाहात बसावे लागते. म्हणून 'स्टार्ट अप'मध्ये अगदी किमान प्रोग्राम असावेत. (तुम्ही स्टार्टवर क्लिक करून नंतर ऑल प्रोग्राम्सवर क्लिक करा. त्यात स्टार्ट अप असा मेन्यू दिसेल. तो पाहा. त्यात जितके प्रोग्राम जास्त, तितका कम्प्युटर सुरू होताना वेळ जास्त लागेल. म्हणून त्यात अगदी कमीत कमी प्रोग्राम्स हवेत. फक्त मायक्रोसॉफ्ट ऑफीस हा एकच प्रोग्राम असला तरी बास. पण तुम्हाला सगळे मेसेंजर सुरू व्हायला हवे असतील, इंटरनेट एक्स्प्लोरर अथवा फायरफॉक्स सुरू व्हायला हवे असतील अथवा वर्डही हवे असेल तर.. .. बेस्ट ऑफ लक!

' ब्राऊजर' हा असाच अतिपरिचित प्रश्न. इंटरनेटवरील वेबसाइट पाहण्यासाठी लागणारा प्रोग्राम. 'इंटरनेट एक्स्प्लोरर', 'फायरफॉक्स' आणि 'नेटस्केप नॅव्हिगेटर' हे तीन सर्वात लोकप्रिय ब्राऊजर आहेत. मी तरी फायरफॉक्सला प्राधान्य देतो. तो अगदी फास्ट आहे, व्हायरस रोखण्याच्या दृष्टीने सोयीचा आहे आणि मुख्य म्हणजे यूजर फ्रेंडली आहे. तो 'आपला' वाटतो, निदान मला तरी.

आता ब्रॉडबँडचा स्पीड दोन एमबीपीएस आहे असे आपण वाचतो. हे एमबीपीएस म्हणजे दोन मेगाबाइट्स प्रतिसेकंद. यातही बाइट्स म्हणजे कम्प्युटरच्या भाषेत माहितीचे एक अक्षर (वन कॅरेक्टर) स्टोअर करायला लागणारी जागा. हे एक बाइट झाले. असे १०२४ बाइट्स म्हणजे एक किलोबाइट (केबी). असे १०२४ केबी म्हणजे एक मेगाबाइट (एमबी). मोडेमचा स्पीड दोन एमबीपीएस आहे म्हणजे प्रतिसेकंदाला दोन मेगाबाइट इतका डाटा ट्रान्स्फर होतो. एखादी फाइल, फोटो वा कोणताही प्रोग्राम अमुक इतक्या एमबीचा आहे, म्हणजे तितक्या बाइट्सच्या क्षमतेचा आहे. तुम्हाला एखादा प्रोग्राम डाऊनलोड करायचा असेल तर विचारले जाते की ही फाइल समजा १२.५ एमबीची आहे, ती डाऊनलोड करायची आहे का? कम्प्युटरला ब्रॉडबँड जोडलेले नसेल व साधे कनेक्शन असेल तर ही फाइल डाऊनलोड व्हायला खूप वेळ लागेल. ब्रॉडबँड असेल तर लवकर होईल. प्रतिसेकंद बाइट्स डाऊनलोड होण्याचा वेग जेवढा जास्त तेवढे बरे!

कम्प्युटरचा वापर आता इंटरनेटसाठी जास्त होत असला तरी अजूनही बहुतांश लोक मजकूर ऑपरेट करण्यासाठीच वापरतात. आपली सारी महत्त्वाची माहिती त्यात लोड करून ठेवतात. पण समजा ही माहिती तुम्हाला दुसरीकडे न्यायची आहे आणि इंटरनेट उपलब्ध नाही तर काय कराल? पूवीर् फ्लॉपीतून हा मजकूर नेता यायचा. आता फ्लॉपीचा जमाना गेला आणि सीडीचा आला. मजकूर सीडीवर घ्यायचा व न्यायचा असे सुरू झाले. सीडीवर मजकूर कॉपी केला, पण त्यावर सेव्ह मात्र होत नाही असे कधी आढळले का? असे होते; कारण नुसता सीडी ड्राइव्ह असून उपयोगी नाही, कम्प्युटरमध्ये 'सीडी रायटर'ची गरज असते. हे सीडी रॉमचे उपकरण असे आहे की त्यात मजकूर सीडीवर सेव्ह होतो. ती सीडी नंतर तुम्ही कोठेही जाऊन पाहू शकता. (मराठी मजकूर असेल तर ज्या मशीनमध्ये मजकुराचा फाँट असेल तेथेच ती ओपन करता येईल.) या सीडीही दोन प्रकारच्या असतात. एक रिरायटेबल आणि दुसरी साधी. पहिली साधारण २५ रुपयांना मिळते, दुसरी आठ ते दहा रुपयांना. पहिल्या सीडीत आधीचा मजकूर पुसून टाकून दुसरा मजकूर लोड करता येतो. दुसरी सीडी एकदा भरली की त्यात आधीच्या फाइल्स काढून नव्या टाकणे वगैरे काहीही बदल करता येत नाही. आपण स्वस्त म्हणून सर्रास दहा रुपयांच्या सीडी घेतो. एकदम मोठा पॅक घेतला तर आणखी स्वस्त मिळतो. पण सीडी फूल झाल्यावर यातला डाटा आपण बदलू शकत नाही. डाटा बदलायची गरज नसल्यास मात्र ही सीडी चांगली. आता सीडी रायटर बसविणेही हळूहळू मागे पडत आहे. कारण आता डीव्हीडीचा जमाना आलाय. त्यामुळे डीव्हीडी रायटर बसविणेच पसंत केले जाते. एका डीव्हीडीत सीडीपेक्षा कितीतरी अधिक मजकूर वा फाइल्स मावतात. त्यामुळे डीव्हीडीला पसंती दिली जाते. सीडी रायटर असला तर त्यावर डीव्हीडी पाहता येते, पण डीव्हीडीतील फाइलमध्ये काहीही बदल करता येत नाही.

'अवतार'आणि 'बेटा' 25 Jan 2008,

नियमितपणे कम्प्युटर वापरायचा, म्हणजे काही शब्दांच्या मागे दडलेले अर्थ माहीत असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे आपले काम सोपे होतेच; पण ते अधिक सोपेसुद्धा होते. कामात सफाई येते. मुख्य म्हणजे मनातला गोंधळ पूर्णपणे जातो.

....

आपण काही कठीण वाटणाऱ्या शब्दांविषयी माहिती करून घेत आहोत. त्यातील काहींचा हा थोडक्यात परिचय.

ऑटोकरेक्ट : नावावरूनच याची कल्पना येते. ही सोय प्रामुख्याने इंग्रजी टायपिंगसाठी आहे. कम्प्युटरमध्ये इंग्रजी डिक्शनरी लोड केलेली असते. तुम्ही चुकीचे स्पेलिंग टाईप केले की ते आपोआप बरोबर होते. टूल्स-ऑटोकरेक्ट आणि टूल्स-ऑप्शन्स-स्पेलिंग अँड ग्रामर येथे जाऊन तुम्ही योग्य ती सेंटिंग केलीत की ही सोय उपलब्ध होईल. मराठी टायपिंगसाठी मात्र याचा उपयोग नाही.

ऑटोप्ले : कम्प्युटरमधील सीडीरॉममध्ये एखादी सीडी घातली की त्यातील मजकूर वा फोटोच्या फाइल्स लगेच दिसण्यासाठी हे ऑप्शन ऑन करायला लागते. ते ऑन नसेल तर डेस्कटॉपवरील 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा व नंतर सीडीरॉमच्या ड्राइव्हवर क्लिक करून संबंधित फोल्डर ओपन करा. सीडीत नेमका काय मजकूर आहे ते माहीत नसेल, तर ऑटोप्ले फंक्शन ऑन नसलेलेच बरे. अन्यथा एखादा प्रोग्राम अचानक ओपन होईल आणि त्यात व्हायरस असला तर मशीनचा सत्यानाश होईल.

ऑटोसम : हे फंक्शन मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये वापरले जाते. तुम्ही समजा काही आकडे एकाखाली एक टाईप केलेत आणि त्याची बेरीज हवी असेल तर एक्सेलमधील 'ऑटोसम' या खुणेवर क्लिक करा. कितीही मोठे आकडे असले, तरी क्षणार्धात त्याची बेरीज तुमच्यासमोर येईल. एक्सेलमध्ये इंग्रजी 'इ' अक्षरासारखे एक चिन्ह दिसेल. तेच ऑटोसमचे चिन्ह. त्यावर क्लिक करा की झाली बेरीज. एक्सेलच्या अनेक फायद्यांपैकी हा एक महत्त्वाचा फायदा आहे.

अवतार : हा शब्द कम्प्युटरच्या परिभाषेत कसा काय? तुम्ही चॅटिंग करत आहात अथवा गेम खेळत आहात असे समजा. तसे करताना तुम्हाला स्वत:चा फोटो द्यायचा नसेल व एखाद्या कार्टूनचा वा कोणत्याही चित्राचा वापर करायचा असेल, तर तुम्ही करू शकता. हे चित्र अक्षरश: कोणतेही असू शकते. नेटवरची तुमची ही प्रतिमा म्हणजे तुमचा अवतार. हे रूप सतत बदलू शकता, प्रोफाइलमध्ये ताजेपणा आणू शकता. त्यासाठी मला वाटतं काही ईमेलसेवा वेगवेगळे अवतार निवडण्याची सोयही करून देतात. स्वत:चे चित्र लपविण्यापेक्षा वेगवेगळ्या चित्रांनी ताजेपणा आणणे हा खरा उद्देश असतो.

बॅकअप : मी बॅकअपविषयी आधीही लिहिले होतेच. तुमच्या कम्प्युटरमधील कोणत्याही फाइलची कॉपी दुसऱ्या फोल्डरमध्ये किंवा ड्राइव्हमध्ये सेव्ह करून ठेवण्याला 'बॅकअप' म्हणतात. मग ते कम्प्युटरमधीलच हार्डडिस्कवर असेल, बाहेरच्या स्वतंत्र हार्डडिस्कवर असेल वा पेनड्राइव्हवर असेल किंवा अगदी जीमेलवर मिळणाऱ्या जीड्राइव्हवर असेल. कुठेतरी तुमची मूळ फाइल सेव्ह करून ठेवली की तो झाला बॅकअप. एखाद्या कागदाची फोटोकॉपी काढून ठेवण्यासारखाच हा प्रकार आहे. फक्त फोटोकॉपीवरची शाई काही काळानंतर उडून जाते, कम्प्युटरमध्ये तसे काही होत नाही.

बँडविड्थ : सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कम्प्युटरमधून इंटरनेटवरून एका वेळी पाठविण्यात येणाऱ्या माहितीचे प्रमाण म्हणजे बँडविड्थ. तुम्ही मोडेम वापरून इंटरनेटचा वापर करत असाल आणि ते ५६ केबीपीएसचे मोडेम असेल तर त्याचा अर्थ एका सेकंदाला माहितीचे ५६००० बिट्स (कण?) ट्रान्सफर होत असतात. मोडेमची क्षमता जेवढी जास्त, तेवढा अधिक जास्त डाटा ट्रान्स्फर होत असतो. म्हणजेच कम्प्युटर अधिक वेगाने चालतो. एमटीएनएल आणि बीएसएनएल या दोन्हीच्या ब्रॉडबँडवर दोन एमबीपीएस वेगाने डाटा ट्रान्स्फर होतो. म्हणजेच प्रतिसेकंद दोन मेगाबाइट्स इतका डाटा जातो.

बेटा : नावाप्रमाणेच अर्थ आहे 'बच्चा'. म्हणजेच एखाद्या सॉफ्टवेअरची टेस्ट कॉपी अथवा पूर्णपणे विकसित न झालेले सॉफ्टवेअर. असे सॉफ्टवेअर तज्ज्ञांच्या टेस्टिंगसाठी असते व सर्वसाधारणपणे तुमच्या-माझ्यासारख्यांनी ते डाऊनलोड करण्याचे काहीच कारण नाही. ते करूही नये. कारण ते 'स्टेबल' सॉफ्टवेअर नसते. म्हणजेच ते डाऊनलोड केल्यावर कम्प्युटर हँग होण्याची वा बंद पडण्याची शक्यता असते. उदा. फायरफॉक्स ब्राऊझर. सध्या त्याची २.०.०.११ ही व्हर्जन उपलब्ध आहे. पण ३.२ ही लेटेस्ट 'बेटा' व्हर्जनही नेटवर उपलब्ध आहे. नवे व ताजे सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये हवे हे ठीक आहे; पण ते सुरक्षित नसेल तर काय उपयोग? नवीन व्हर्जनमध्ये अधिक सुविधा असतात हे खरे; पण त्यासाठी घाई करण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे शक्यतो बेटा व्हर्जन डाऊनलोड करण्याचे टाळा. त्याचप्रमाणे एवढ्यात फायरफॉक्सची ३.२ व्हर्जन डाऊनलोड करायच्या भानगडीत पडू नका. एक पथ्य पाळा. ब्राऊझरच्या वरच्या बाजूला सर्वात उजवीकडे 'हेल्प' अशी अक्षरे असतील. त्यावर क्लिक करून त्याच ओळीत खाली 'चेक फॉर अपडेट्स' असे म्हटले असेल. त्यावर क्लिक करा. जर स्टेबल व्हर्जन उपलब्ध असेल तर ब्राऊझर अपडेट होईल वा तुम्हाला अपडेट करण्याची विनंती करील. उगाच 'बेटा'च्या भानगडीत पडू नका.

बिटमॅप : फोटोच्या फाइल ज्या फॉरमॅटमध्ये सेव्ह करता येतात त्यातला एक प्रकार. बिटमॅप फोटोंचे एक्स्टेन्शन बीएमपी असे दिसते. उदा. सचिन.बीएमपी वगैरे. असंख्य बारीक बिंदूंनी (पिक्सेल्स) हा फोटो बनलेला असतो. स्कॅन केलेला फोटो बऱ्याचवेळा या फॉरमॅटमध्ये सेव्ह केला जातो. पण त्याची साइझ खूप मोठी असल्याने जेपीजी वा अन्य फॉरमॅटमध्येही तो सेव्ह करता येतो.

मोठी फाइल पाठवा पटकन 18 Jan 2008,

.......
कम्प्युटर वापरताना त्यामधील काही कठीण वाटणा-या संज्ञांची आपण ओळख करून घेत आहोत. गेल्या वेळेस आपण अॅक्टिवएक्स, अॅडइन आणि अॅप्लिकेशन याची माहिती घेतली. कम्प्युटरविषयी माहिती वाचताना आपण 'अॅनिमेटेड जिफ' हा शब्द ऐकला असेल. 'जिफ' म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉरमॅट. ग्राफिक चित्रे स्टोअर करून ठेवण्याची ही पद्धत आहे. ती साधारणपणे वेबसाइटस्वर वापरली जाते. तुम्ही टीव्हीवर कार्टूनमालिका पाहात असाल, तर चित्रे कशी भराभर हलतात ते तुम्हाला कळेल. असंख्य चित्रे एकापाठोपाठ जोडून ही चित्रांची मालिकाच केलेली असते. पाहताना आपल्या ते लक्षातही येत नाही. तसेच वेबसाइटवरही केले जाते. अशी अनेक चित्रे भराभर दाखविली की त्याला अॅनिमेटेड जिफ म्हणतात.

अॅपलेट हा असाच सतत कानावर पडणारा शब्द. याचा अर्थ विंडोज सिस्टिममधला एक उपयोगी प्रोग्राम. उदा. कॅलक्युलेटर, स्कॅनडिस्क वगैरे. या गोष्टी काम करताना सतत लागत नाहीत; पण तरी त्याचा उपयोग असतो.

सध्या बऱ्याचशा घरांत ब्रॉडबँड घेतलेले असते. त्यावर इंटरनेट अतिशय वेगाने चालू शकते. या संदर्भात आपण एडीएसएल हा शब्द ऐकला असेल. ब्रॉडबँडसाठी जो मोडेम बसविलेला असतो त्यावरही एडीएसएल असा शब्द तुम्हाला दिसेल. याचा लाँगफॉर्म 'असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाइन' असा आहे. हे असे तंत्रज्ञान आहे की त्याद्वारे साध्या टेलिफोन लाइनची क्षमता दसपट वाढून (५६के मोडेमच्या) इंटरनेट अतिशय वेगाने चालते. पूवीर् एखादे पेज ओपन व्हायला वा एखादी फाइल डाऊनलोड करायला प्रचंड वेळ लागायचा. आता ते काम पटकन होऊ शकते.

' अटॅचमेंट' हा शब्द तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या ओळखीचा आहे. तुम्ही एखादी फाइल 'वर्ड'मध्ये ऑपरेट केलीत आणि ती तुम्हाला मेलवरून कोणाला पाठवायची असेल तर ती अटॅच करून पाठवतात. म्हणजेच तुमच्या मेलला जोडून पाठवतात. मेल पाठवताना अटॅच फाईल असा टॅग दिसेल. त्यावर क्लिक करून तुमची फाइल सिलेक्ट करू शकता. ज्याला तो ईमेल मिळेल त्याला ती अटॅचमेंट ओपन करावी लागेल. ही अटॅचमेंट किती साइझची असावी याला काही मर्यादा आहेत. कोणती मेलसेवा वापरली जाते, त्यावर हे अवलंबून आहे. काही मेलमध्ये दोन एमबीपर्यंतच फाइल पाठवता येते. काही ठिकाणी चार एमबी अशी सोय आहे. पण आता एकएक फाइल अटॅच करायला वेळ कोणाकडे आहे? मग एकदम सगळ्या फोटोंची एक झिप फाइल तयार करा (सगळे फोटो सिलेक्ट करा आणि राइट क्लिक करून 'सेंड टू' लिंकवर क्लिक करा, त्यात कम्प्रेस्ड झिप फोल्डरवर जा आणि ओके म्हणा. की झिप फोल्डर तयार होईल. तुम्ही विनझिप डाऊनलोड केलेले असेल तर याच मार्गाने जाऊन विनझिपवर क्लिक करा व मग अॅड टू झिप फाइल असे म्हणा. या झिप फाइलला वेगळे नाव द्या.) आणि द्या पाठवून. अर्थात त्या झिप फाइलची साइझ मेलला झेपेल एवढीच असली पाहिजे. अन्यथा ही अटॅचमेंट जाणारच नाही. गूगलटॉकचा वापर केला तर कितीही मोठी फाइल पटकन पाठवता येते. गूगलटॉक हे प्रामुख्याने चॅटिंगसाठी वापरले जाते. पण एखाद्याशी चॅटिंग करत असाल आणि त्याला एखादा वा बरेच फोटो पाठवायचे असतील तर माऊस कर्सरने तो फोटो पकडून गूगलटॉकच्या बॉक्समध्ये सोडून द्यायचा. तो पलीकडच्याला लगेचच मिळेल. तो पलीकडच्याच्या एका फोल्डरमध्ये जाईल. तिथून ओपन करावा लागेल. हा फोल्डर कुठे आहे ते माहीत नसेल तर जो फोटो अटॅचमेंट म्हणून आला आहे तो 'सर्च' करावा, म्हणजे तो कुठे सेव्ह झाला आहे ते कळेल. बऱ्याच ईमेलसेवांनी आपली मेल साठवून ठेवण्याची क्षमता अलीकडे वाढवली आहे. इंडियाटाइम्स, जीमेल, हॉटमेल, रिडिफमेल आदिंनी ती भरपूर वाढविली आहे. तशाच पद्धतीने अटॅचमेंट पाठविण्याच्या क्षमतेतही वाढ होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

ऑटो-प्ले हा आणखी एक ओळखीचा शब्द. एखादी सीडी कम्प्युटरच्या सीडीरॉम ड्राइव्हमध्ये घातली की तिच्यातील फाइल्स स्क्रीनवर आपोआप दिसायला लागतात. त्या फाइल्स कशात ओपन करायच्या आहेत ते विचारले जाते. त्यालाच 'ऑटो-प्ले' म्हणतात. ती ओपन करण्यासाठी माय कम्प्युटरमध्ये जायचे, सीडीरॉमच्या ड्राइव्हवर क्लिक करायचे हा सगळा त्रास वाचतो.

अशाच काही शब्दांविषयीची माहिती पुढील आठवड्यात.

सुविधा हव्याशा आणि नकोशा! 11 Jan 2008,

आपल्या कम्प्युटरमध्ये सर्व सोयी या अद्ययावत असाव्यात, असे वाटण्यात गैर नाही. मात्र ते करताना कम्प्युटरची क्षमता विचारात घ्यायला हवी. .

.........

कम्प्युटर शिकताना जे काही अडथळे जाणवतात ते म्हणजे त्यातील काही कठीण वाटणाऱ्या संज्ञा. प्रत्यक्षात त्या समजून घेतल्या की काहीच प्रश्न जाणवत नाहीत. काही फाइल एक्स्टेन्शन्सबद्दल आपण मागच्यावेळेस पाहिले. आता काही शब्दांबद्दल. अॅक्टिवएक्स हा शब्द आपल्या कानावर आला असेल. ते ऑप्शन ऑन असेल तर कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो वगेरे काही प्रमाणात दिशाभूल करणारी माहितीही कदाचित आपल्या पाहण्यात आली असेल. हे अॅक्टिवएक्स म्हणजे वेब ब्राऊझरसारख्या अॅप्लिकेशनसाठी लागणाऱ्या अतिरिक्त सोयीसुविधा. थोडक्यात ते अॅप्लिकेशन अधिक चांगल्या गतीने व अधिक सोयींसह चालावे म्हणून डाऊनलोड केलेले जास्तीचे सॉफ्टवेअर. ते तुम्हाला मुद्दाम डाऊनलोड करावे लागत नाही. बरेचसे आपोआप होत असते. तुम्हाला करावे लागलेच, तर फार कमी वेळा स्वत:हून करावे लागते. पण एखाद्या अॅप्लिकेशनला खरोखरच या अतिरिक्त सुविधा हव्या आहेत का, याचा विचार तुम्हीच करायचा आहे.


उगाच जास्त डाऊनलोड करून मूळ ब्राऊझरची गंमत घालविण्यात काहीच अर्थ नाही. ब्राऊझरमध्ये किमान मूलभूत सोयी असतातच. त्यात मुद्दाम वाढ करण्याची काहीच गरज नसते. पण एकदा एक अॅप्लिकेशन डाऊनलोड केले की ते अद्ययावत असावे असा आपला प्रयत्न असतो. ती हाव काही सुटत नाही. इथे मी अॅप्लिकेशन हा शब्द वापरला आहे. हे अॅप्लिकेशन म्हणजे कम्प्युटरमध्ये लोड केलेला एक विशिष्ट प्रोग्राम. तो विशिष्ट कामासाठीच उपयोगी येतो. उदा. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे फक्त वर्ड प्रोसेसिंगसाठीच म्हणजे मजकूर टाइप करण्यासाठीच उपयोगी येते. यात इतरही बऱ्याच सुविधा आहेत; पण मूळ उपयोग मजकूर टाइप करणे हाच आहे. दुसरे उदाहरण फोटोशॉपचे देता येईल. फोटोंवर सर्व प्रकारचे संस्कार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरले जाते. जितके ते अॅडव्हान्स तितके ते चांगले हे उघड असले तरी आपल्या कम्प्युटरची क्षमता पाहूनच ते डाऊनलोड करावे. 'अंथरूण पाहून पाय पसरावे' या धतीर्वर 'कम्प्युटरची क्षमता पाहून सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे' असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेब ब्राऊझर म्हणजे वेगवेगळे अॅप्लिकेशन आहे. प्रत्येक अँटिव्हायरस, प्रत्येक प्रोग्राम हे एक वेगळे अॅप्लिकेशन आहे.हे सगळे अपडेटेड असावे असे वाटत असले तरी तो मोह आवरा.

कम्प्युटरच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेवढेच अपडेट आपोआप डाऊनलोड होतील अशी व्यवस्था करा. साधारणपणे प्रत्येक ब्राऊझरच्या टूल्स-ऑप्शन्समध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. ब्राऊझर अपडेट आपोआप व्हायला हवा की तो अपडेट करायचा आहे का अशी विचारणा समोर यायला हवी हे तुम्ही ठरवा. ब्राऊझरच नव्हे तर कोणतीही अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करताना नवे व्हर्जन आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का आणि असले तरी ते पेलण्याची शक्ती कम्प्युटरमध्ये आहे का याचा विचार करा. अॅक्टिवएक्स, अॅप्लिकेशननंतर याच पठडीतला एक शब्द म्हणजे अॅडइन. नावाप्रमाणेच उपलब्ध अॅप्लिकेशनमध्ये जादा सुविधा देणारी ही संज्ञा आहे. पण अॅक्टिवएक्सपेक्षा वेगळी. ब्राऊझरमध्ये कोणत्या अतिरिक्त सोयी हव्यात ते तुम्ही ठरवू शकता. त्या आपोआप डाऊनलोड होत नाहीत. तुम्ही इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल, तर टूल्स व नंतर मॅनेज अॅडऑन्सवर क्लिक करा. कोणते अॅडऑन्स म्हणजे कोणत्या सुविधा ब्राऊझरबरोबर फ्री आहेत ते कळेल. अधिक सॉफ्टवेअर हवे असेल तर ते डाऊनलोड करू शकता. उदा. तुम्हाला स्क्रीनवर डिजिटल अथवा अॅनालॉग (काट्यांचे) घड्याळ हवे असेल तर ते मिळवू शकता. एखाद्या शहराचे तापमान हवे असेल ते मिळवू शकता किंवा एखाद्या साइटवरच्या बातम्या तुमच्या समोर हजर व्हाव्यात असे फर्मानही तुम्ही सोडू शकता. हे अॅडऑन तुम्ही कितीही डाऊनलोड करू शकता.

पण एक लक्षात ठेवा; जितके जास्त अॅडऑन्स, तितका ब्राऊझर ओपन व्हायला व चालायला जास्त वेळ. म्हणून मोह आवरून किमान आवश्यक तेवढेच अॅडऑन डाऊनलोड करा. हे अॅडऑन स्वत: मायक्रोसॉफ्टचेच असतील असे नाही. तशी स्पष्ट सूचना तुम्हाला मिळेल. हे वेगळ्या अर्थाने 'अनधिकृत' सॉफ्टवेअर असते. ते डाऊनलोड करायचे आहे की नाही हे तुम्हाला काळजीपूर्वक ठरवावे लागेल.

डॉक की आरटीएफ? 21 Dec 2007,

एक्स्टेंशन म्हणजे फाइलचा प्रकार. ती डॉक फाइल आहे की आरटीएफ आहे की जेपीजी आहे की टिफ फाइल आहे हे या एक्स्टेंशनवरून कळते. ही एक्स्टेंशन्स खूपच महत्त्वाची असतात.

.........

कम्प्युटर शिकण्यास बरेचजण उत्सुक असतात. पण तो आपल्याला येईल का, चुकीच्या कमांड दिल्या तर काय गोंधळ होईल, कम्प्युटर बिघडला तर काय होईल अशा भीतीने ही मंडळी कम्प्युटरच्या वाटेलाच जात नाहीत. मग 'हाताने लिहिण्यातली मजा कम्प्युटरवर ऑपरेट करण्यात नाही', अशी भाषा ते बोलायला लागतात. पण एकदा का या यंत्राची नीट ओळख झाली की मग हा सारा प्रकार अगदीच सोपा वाटायला लागतो. कम्प्युटर शिकताना आणखी एक अडचण जाणवते आणि ती म्हणजे त्यातील काही कठीण शब्द. पण त्याचा अर्थ समजून घेतला की त्याचीही अडचण वाटत नाही. उदा. फाइलचे एक्स्टेंशन द्या असे म्हटले की नेमके काय करायचे ते कळत नाही. एक्स्टेंशन म्हणजे फाइलचा प्रकार. ती डॉक फाइल आहे की आरटीएफ आहे की जेपीजी आहे की टिफ फाइल आहे हे या एक्स्टेंशनवरून कळते. ही एक्स्टेंशन खूपच महत्त्वाची असतात.

मागे एका वाचकाने मला ईमेल पाठवून त्याची समस्या मांडली होती. त्यांनी मित्राकडून मेलवर आलेले फोटो कम्प्युटरमधल्या एका विशिष्ट फोल्डरमध्ये डाऊनलोड करून घेतले होते. पण नंतर तो फोल्डर उघडल्यावर त्यात एकही फोटो दिसेना. आपण फोटो सेव्ह तर केले; पण प्रत्यक्षात दिसत मात्र नाहीत, असे का हा त्याचा प्रश्न होता. याचे कारण हे फोटो सेव्ह करताना त्याला योग्य ते एक्स्टेंशन दिले गेले नाही. फोटो सेव्ह करताना जेपीजी वा टिफ वा बीएमपी अशा प्रकारचे एक्स्टेंशन द्यावे लागते. तसे न केल्यास फोटो 'अनरिडेबल' म्हणजे थोडक्यात निरुपयोगी होतो. समजा तुम्हाला सचिन नावाचा फोटो डाऊनलोड करायचा आहे. तो केवळ सचिन या नावाने करून चालणार नाही. सचिन डॉट जेपीजी किंवा सचिन डॉट टिफ अथवा सचिन डॉट बीएमपी अशा नावाने सेव्ह करावा लागेल. मगच ती फाइल दिसेल. हे जेपीजी, टिफ आणि बीएमपी हे फाइलचे प्रकार झाले. प्रत्येक फॉरमॅटचे महत्त्व वेगळे आहे. पण साधारणत: जेपीजी नावाने त्या फाइल सेव्ह केलेल्या चांगल्या. फोटो स्कॅन करून ठीकठाक केल्यावर त्याला टिफचे एक्स्टेंशन दिले जाते. काही यंत्रणांमध्ये बीएमपी फाइल उपयोगी नसतात. त्या जेपीजीच कराव्या लागतात.

जे फोटोंचे, तेच मजकुराच्या फाइलचे. ही फाइल तुम्हाला डॉक फाइल हवी की आरटीएफ हवी की टेक्स्ट फाइल हवी ते ठरवा आणि कम्प्युटरमध्ये डिफॉल्ट सेटिंग करून घ्या. यातील डॉक फाइल सर्वांच्या परिचयाची आहे. डिफॉल्ट फाइल डॉकच असते. पण आरटीएफ म्हणजेच 'रिच टेक्स्ट फॉरमॅट'चे महत्त्व अलीकडच्या काळात वाढले आहे. अशा अर्थाने की, आज मराठीत अनेक प्रकारची सॉफ्टवेअर आहेत. आपल्याकडे त्यापैकी एकच सॉफ्टवेअर (उदा. श्री लिपी) असेल; पण दुसऱ्याकडे दुसरे (उदा. आकृती) सॉफ्टवेअर असेल तर त्याला ते आपल्याकडच्या लिपीत कन्व्हर्ट करता आले पाहिजे. कन्व्हर्ट करायचे असेल तर त्यासाठी पहिल्या माणसाने त्याला आरटीएफ फाइल पाठवणे अत्यावश्यक असते. चुकून डॉक फाइल पाठवली तर ती दुसऱ्या लिपीत नीट कन्व्हर्ट न होण्याचा धोका असतो.

वर्डमध्ये प्रत्येक फाइल कोणत्या फॉरमॅटमध्ये सेव्ह व्हावी, हे आपण ठरवू शकतो. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा, टूल्स-ऑप्शनवर क्लिक करा, नंतर ऑप्शन्समध्ये जाऊन सेव्ह मेन्यूवर क्लिक करा. तेथे खालच्या बाजूला 'डिफॉल्ट फॉरमॅट'मध्ये 'सेव्ह वर्ड फाइल अॅज' असा उल्लेख असेल. त्यापुढे 'रिच टेक्स्ट फॉरमॅट'वर क्लिक करा. म्हणजे नंतरची प्रत्येक फाइल याच फॉरमॅटमध्ये सेव्ह होईल. मजकूर कोणाला पाठवायचा नसल्यास डॉक फाइल असली तर काहीच बिघडणार नाही. 'सेव्ह वर्ड फाइल अॅज'मध्ये असंख्य ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, पण त्यामुळे चक्रावून जाऊ नका. केवळ आरटीएफवर क्लिक करा आणि निश्चिंत राहा.

एखाद्या फाइलचे एक्स्टेंशन काय आहे ते कळल्यावर ती कोणत्या प्रोग्राममध्ये ओपन होईल ते कळते. किंवा ओपन करायची नसली तरी ती कशातली फाइल आहे ते कळते. उदा. सचिन डॉट क्यूएक्सडी म्हणजे ही क्वार्क एक्स्प्रेस सॉफ्टवेअरमधली फाइल आहे. वर्तमानपत्रांची पाने ज्या सॉफ्टवेअरमध्ये लागतात, त्यापैकी हे एक आहे. ते आपल्या घरी सर्वसाधारणपणे नसते. त्यातील फाइल कोणी पाठवली तर ती ओपन होणे कठीणच. वर्तमानपत्रे आणखी एक सॉफ्टवेअर वापरतात; ते म्हणजे पेजमेकर. त्याचे नाव सचिन डॉट पीपी५ अशा पद्धतीचे असते. ती फक्त पेजमेकरमध्येच ओपन होते. ती क्वार्कमध्ये ओपन होणार नाही, वर्डमध्ये तर अजिबात नाही.

थोडक्यात, ही एक्स्टेंशन्स खूपच महत्त्वाची असतात. ती एक्स्टेशन्स आणि अन्य काही कठीण भासणारे शब्द यांविषयी पुढच्या आठवड्यात.

वर्डमधील ऑप्शन्स 14 Dec 2007,

कम्प्युटरवर मराठीमध्ये टाइप करावयाचे असेल, तर वेगळी काळजी घ्यावी लागते. तशी ती घेतली की साऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात!


- अशोक पानवलकर

मायक्रोसॉफ्ट वर्डविषयी माहिती घेताना टूल्स-ऑप्शन्स हा मेन्यू महत्त्वाचा आहे हे आपण पाहिले. यातीलच व्ह्यू, जनरल, एडिटनंतर आणखी एक महत्त्वाचा मेन्यू म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामर. यातील कशावरच क्लिक करणे गरजेचे नाही. मी आतापर्यंत वर्डविषयी जे जे लिहिले ते फक्त मराठी टापयिंगविषयी लागू होते. इंग्रजी टाइप करायचे असेल तर या प्रत्येक मेन्यूमधली सेटिंग्ज पूर्णपणे वेगवेगळी लागतात. त्यामुळे ज्यांना केवळ मराठी टाइप करायचे असेल, त्यांनीच ही सेटिंग्ज करावीत.

इंग्रजी टाइप करताना मराठीसाठी अनक्लिक केलेल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिक कराव्या लागतील. त्या आपापल्या सोयीने करून घ्याव्यात. टूल्स-ऑप्शन्सप्रमाणेच टूल्स-ऑटोकरेक्ट ऑप्शन्स हा मेन्यूही महत्त्वाचा आहे. विशेषत: मराठी टायपिंगसाठी. मागे उल्लेख केल्याप्रमाणे 'ठ'च्या जागी अन्य अक्षरे येत असली तर इथे 'ऑटोफॉरमॅट अॅज यू टाइप' या विभागात 'रिप्लेस अॅज यू टाइप'मधील सर्व ठिकाणी अनक्लिक करा. दुसऱ्या स्मार्ट टॅग्ज सेक्शनमध्येही सर्वकाही अनक्लिक करा. ऑटो फॉरमॅटमध्येही रिप्लेस विभागात सगळे अनक्लिक करा. मराठीतील दुसऱ्या अक्षरांबरोबरच अन्य काही प्रश्नही सुटतील. काहीवेळा मराठी टाइप करताना प्रत्येक ओळीखाली लाल रेषा येतात. त्या कशा घालवायच्या असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर टूल्स-ऑप्शन्स आणि टूल्स-ऑटोकरेक्ट ऑप्शन्समध्ये आहे. गरज नसलेली बहुतेक सेटिंग्ज अनक्लिक केली की या लाल लाइन्स जातात.

टाइप करताना फाँट कोणता वापरायचा असा विचार मनात येतो. तुमच्या मराठी सॉफ्टवेअरमध्ये किती फाँट्स बसवलेले आहेत, ते कम्प्युटरला सूट होतात का हे पाहिले पाहिजे. मुळात टाइप करताना डोळ्याला सुखद असा फाँट वापरावा. कम्प्युटरवर सतत काम करणे ही एक डोकेदुखी असते. त्यात एखादा बटबटीत फाँट वापरत असाल तर आणखी वैताग. म्हणून सर्व फाँट कसे दिसतात ते पाहा आणि डोळ्याला रुचेल तोच घ्या. तरीही काहीवेळा काही समस्या येण्याची शक्यता असते.

माझ्या मित्राचा अनुभव सांगण्यासारखा आहे. (कोणा तज्ज्ञांना याबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी सर्वांसाठी माहिती द्यायला काहीच हरकत नाही.) तो त्याचा कम्प्युटर कितीही तास वापरू शकत होता. पण मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडून त्यात मराठी टाइप करायला सुरुवात केली की पाच-सात मिनिटांत कम्प्युटर बंद पडून आपोआप पुन्हा सुरू होत असे. यावर काहीच उपाय लागू होईना. वर्ड करप्ट झाले असेल असे समजून ते पूर्णपणे नव्याने इन्स्टॉल करून घेतले तरी प्रश्न कायम राहिला. मराठी सॉफ्टवेअर करप्ट झाले असेल असे वाटून तेही आधी काढून टाकून पुन्हा इन्स्टॉल केले. प्रश्न कायम. शेवटी पूर्ण कम्प्युटर फॉरमॅट करून घेतला व जुने सॉफ्टवेअर पुन्हा लोड केले. तरी प्रश्न तसाच. सर्व प्रकारचे मायक्रोसॉफ्ट अपडेट्स केल्यावरही गुंता सुटत नव्हता. अखेर कुठेतरी वाचल्यावरून त्याने डिफॉल्ट फाँट बदलला. त्यानंतर त्याचे मशीन असे बंद होणे थांबले. त्यावरून त्याने असा अर्थ काढला की एक विशिष्ट फाँट मशीनमधील कुठल्यातरी सॉफ्टवेअरला त्रासदायक ठरत होता आणि तो बदलल्याबरोबर प्रश्न सुटला. पुन्हा त्याच विशिष्ट फाँटमध्ये काम केल्यास पुन्हा कम्प्युटर बंद पडतो. याचा अर्थ फाँट खराब आहे वा तो इतर सॉफ्टवेअरला चालत नाही असा अर्थ त्याने काढला.

हा नियम प्रत्येकाला लागू करता येईलच असे नाही. कारण प्रत्येकाच्या मशीनमधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असते. पण असा प्रश्न कोणाला येत असेल, तर हा मार्ग स्वीकारून पाहायला हरकत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पॅकेजमधील एखादाच फाँट करप्ट होऊ शकतो. त्या सॉफ्टवेअरची मूळ सीडी तुमच्याकडे असली तर तो पुन्हा लोड करा. मात्र त्याआधी तो फाँट पूर्णपणे अनइन्स्टॉल करायला हवा. नाही तर तो लोडच होणार नाही. चुकून झालाच तरी तोही करप्टच होईल.

ऑप्शन्स! 7 Dec 2007,

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य प्रकारे वापर करून आपण आपले काम अधिकाधिक चांगल्या प्रकारे करू शकतो...

.....

मायक्रोसॉफ्ट वर्डचे सेटिंग करताना टूल्स ऑप्शन्समध्ये व्ह्यू आणि जनरलनंतर महत्त्वाचा मेन्यू म्हणजे एडिट. यात तुमचे वर्ड डॉक्युमेंट कसे व कोणत्या स्वरूपात सेव्ह होणार ते ठरते. त्यातील एडिटींग ऑप्शन्समधील पहिले दोन ऑप्शन निवडा. पहिल्या ऑप्शनच्या मदतीनेे (टायपिंग रिप्लेसेस सिलेक्शन) तुम्हाला समजा टाइप केलेल्या मजकुरातील काही शब्द बदलायचे आहेत. ते शब्द नेमके सिलेक्ट करा आणि त्या जागी दुसरे शब्द टाइप करा. हे ऑप्शन निवडले नसेल तर नको असलेल्या शब्दांच्या आधी नवे शब्द टाइप होतील आणि जुने तसेच राहतील. ते स्वतंत्रपणे डीलिट करावे लागतील. दुसरे ड्रॅग अँड ड्रॉप ऑप्शन गमतीचे आहे. तुम्हाला मजकुरातील वाक्य वा शब्द त्याच फाइलमध्ये दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असेल तर तेवढा भाग सिलेक्ट करा आणि माऊसवर लेफ्ट क्लिकद्वारे तो मजकूर पकडून दुसरीकडे नेऊन ठेवा. कट पेस्ट या प्रकाराला हा उत्तम पर्याय आहे. हे ऑप्शन सिलेक्ट केले नसले तरी तुम्हाला कट पेस्ट वा कॉपी पेस्ट करता येतेच. तिसरी की आहे ती 'यूज द इन्सर्ट की फॉर पेस्ट'. तुम्ही मजकुरातले वाक्य सिलेक्ट करा. कंट्रोल सी करून कॉपी करा आणि मग माऊसचा कर्सर ते वाक्य जिथे न्यायचे असेल तिथे न्या आणि कीबोर्डवरची इन्सर्ट की दाबा. मग तो मजकूर तेथे पेस्ट होईल. ही गंमत वाटत असली तरी यात तोटा असा की जिथून हा मजकूर कॉपी केला आहे, तिथे तो कायम राहतो. तो डिलीट होत नाही. कॉपीऐवजी कट करून मग इन्सर्ट केलेले केव्हाही चांगले.

टूल्स - ऑप्शन्स - एडिट भागातच आणखी दोन ऑप्शन्स महत्त्वाचे आहेत. जेव्हा एखादा शब्द आपण बदलायला जातो, तेव्हा तो सिलेक्ट करून नवा टाइप करतो. पण शब्दातील एखादेच अक्षर बदलायचे असेल तर? तर 'ऑटोमॅटिकली सिलेक्ट एंटायर वर्ड' हे ऑप्शन सिलेक्ट करू नका. म्हणजे एखादा शब्द सिलेक्ट करून तो बदलणे शक्य होईल. हे ऑप्शन सिलेक्ट असले तरी कर्सर एखाद्या शब्दातील अक्षरापाशी नेऊन बॅकस्पेसने डीलिट करता येतेच हा भाग वेगळा. याच भागात 'कीप ट्रॅक ऑफ फॉरमॅटिंग' असे एक ऑप्शन आहे, समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारचाच मजकूर नेहमी टाइप करत असाल तर (म्हणजे कामाचे स्वरूप एकसुरी असले तर) तो कशा पद्धतीने टाइप व्हावा ते तुम्ही ठरवू शकता. एकदा ते ठरविले की वर्डमधील तुमच्या पुढच्या सर्व फाइल्स तशाच प्रकारे फॉरमॅट होत राहतील. तुमच्याऐवजी कम्प्युटरवर दुसरे कोणी बसले तरी प्रश्न नाही. फॉरमॅटिंग कायम राहील.

टॅल्स- ऑप्शन्समध्ये दुसरा मेन्यू म्हणजे प्रिंट. हा मात्र आपल्या सोयीने सिलेक्ट करावा. साधारणपणे घरात ए-४ साइझचे प्रिंटआऊट देणारे प्रिंटर असतात. त्यापेक्षा मोठ्या कागदावर प्रिंट करायची सोय असेल तर प्रिंटरनुसार त्यातील ऑप्शन्स सिलेक्ट करावी लागतील. प्रिंटनंतर महत्त्वाचा मेन्यू म्हणजे सेव्ह. तुमचे डॉक्युमेंट कसे सेव्ह व्हावे ते इथे ठरते. अलाऊ फास्ट सेव्हज आणि अलाऊ बॅकग्राऊंड सेव्हज असे दोन ऑप्शन क्लिक करा. तुम्ही मजकूर टाइप करत असतानाच तो (तुम्ही ऑप्शनमध्ये म्हटलेल्या) ठराविक मिनिटांनी सेव्ह होत राहील. कोणताही मजकूर टाइप करताना तो दर काही मिनिटांनी कंट्रोल एस की दाबून आपण सेव्ह करायची सवय लावून घेतली पाहिजे. पण काही कारणांनी आपण ते सेव्ह करायला विसरलो, तर ही दोन ऑप्शन्स मदतीला येतात आणि डॉक्युमेंट आपोआप सेव्ह होते.

' सेव्ह ऑटोरिकव्हर इन्फो'वर क्लिक केल्यावर किती मिनिटांनी ते डॉक्युमेंट सेव्ह करायचे हे ठरते. पाच मिनिटे हा काळ पुरेसा आहे. परंतु एखाद्याला त्यापेक्षा कमी काळ हवा असेल तर तसे करायला काहीच हरकर नाही. पण पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ मात्र नसावा. तसेच एक मिनिटही नसावे. कारण सतत ते डॉक्युमेंट सेव्ह होत राहील आणि तुम्हाला कामच करता येणार नाही. 'सेव्ह'मधला उपयोगी ऑप्शन म्हणजे 'सेव्ह वर्ड फाइल अॅज'. कोणाला डॉक फाइल म्हणून सेव्ह करायची असेल तर तसे करू शकता. कोणाला टेक्स्ट फाइल हवी असेल तर त्यावर क्लिक करू शकता. याशिवाय बरेच ऑप्शन्स आहेत. पण मी सुचवेन की 'रिच टेक्स्ट फॉरमॅट' म्हणजेच आरटीएफमध्ये तुम्ही सेव्ह करा. तुम्ही मराठीत टाइप करत असाल आणि तो मजकूर तुम्हाला कोणा बाहेरच्या माणसाला पाठवायचा असला तर हा फॉरमॅट उपयोगी पडतो. संबंधित व्यक्ती आपल्या हव्या त्या फॉरमॅटमध्ये ते कन्व्हर्ट करू शकते. डॉक फाइल पाठविली तर कन्व्हर्ट होत नाही. घरच्या घरी मजकूर हवा असेल तरी आरटीएफचा पर्याय चांगलाच आहे.

क्लिक-अनक्लिक 29 Nov 2007,

आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवर काम करताना वर्डचे सेटिंग काय करत आहोत यावर काम कसे चालते हे ठरते. बऱ्याच वाचकांनी मराठी सॉफ्टवेअर वापरताना 'ठ'च्या जागी दुसरे अक्षर उमटते, स्पेसबार मारल्यावर आधी मारलेले अक्षर बदलते, परिच्छेद नीट होत नाहीत, सतत कोणत्या ना कोणत्या सूचना पॉपअप होत राहतात अशा प्रकारच्या त्रुटी नजरेस आणल्या आहेत. हे सगळे आपल्याला दुरुस्त करता येते. त्यासाठी कोणा तंत्रज्ञाची गरज नाही. फाइल, एडिट, व्ह्यूच्या रांगेत टूल्स नावाचे अत्यंत महत्त्वाचे नाव दिसेल. यात ही सारी गुपिते दडलेली आहेत. याचा वापर करताना काळजीपूर्वक करायला हवा. पण एकदा ते कळले की तुम्ही सुलभतेने मराठी सॉफ्टवेअर वापरू शकाल.

प्रथम टूल्सवर जाऊन सर्वात तळाच्या ऑप्शन्सवर क्लिक करा. व्ह्यू, जनरल, एडिट, प्रिंट, सिक्युरिटी असे अनेक विभाग असणारी विंडो ओपन होईल. यातील 'व्ह्यू'वर क्लिक करा. कदाचित बाय डिफॉल्ट तुम्हाला हीच विंडो दिसेल. यातला पहिलाच 'शो' हा विभाग महत्त्वाचा आहे. वर्ड सुरू केल्यावर काय काय दिसावे हे यात ठरवता येते. 'स्टार्ट अप पेन'वर क्लिक असल्यास वर्डमध्ये उजव्या बाजूला एक विंडो ओपन होईल. त्यात तुम्ही आधी कोणत्या कोणत्या फाइल्सवर काम केले आहे ते दिसेल. साधारणपणे शेवटच्या पाच (हा आकडा तुम्ही ठरवू शकता) फाइल्स दिसतील. त्यातली कोणतीही ओपन करू शकता. हायलाइट, बुकमार्क यांची आपल्याला साधारणपणे काहीच गरज नसते. त्यावर क्लिक नसले तरी चालेल. स्टेटस बार, स्क्रीन टिप्स उपयोगी असतात. त्यामुळे त्या क्लिक हव्यात. स्मार्ट टॅग्जवर अजिबात क्लिक नसावी. 'ठ'च्या जागी दुसरे शब्द येण्याला कारणीभूत असलेला हा पर्याय आहे. या स्मार्ट टॅग्जचीच लिंक टुल्स - ऑटो करेक्ट ऑप्शन्समध्ये आहे. त्यातील स्मार्ट टॅग्जवर क्लिक केल्यास लेबल टेक्स्ट विथ स्मार्ट टॅग्ज असे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करू नका. म्हणजे त्या बॉक्समधली सगळी ऑप्शन्स अनक्लिक होतील. या ऑटो करेक्ट ऑप्शन्समध्ये अन्य सोयीही आहेत. पण तूर्तास टुल्स-ऑप्शन्स यातील सोयी पाहू या.

यातील व्ह्यू - शोमध्ये स्मार्ट टॅग्जच्या खाली फारतर व्हटिर्कल रूलरवर क्लिक करा. अन्य कशाहीवर क्लिक करण्याची गरज नाही. या 'शो'च्या खाली फॉरमॅटिंग मार्कस् असे ऑप्शन असेल. त्यातील एकाही ऑप्शनवर क्लिक नको. अन्यथा मजकूर टाइप करताना आपल्याला वेगवेगळी चिन्हे दिसतील. परिच्छेद करताना, टॅब मारल्यास, स्पेस दिल्यास शब्दांच्या मध्ये वेगवेगळी चिन्हे दिसतील. ती फार त्रासदायक दिसतात. आपण कोणतीही वेगळी की दाबली नाही तरी ही चिन्हे कोठून आली हे कळत नाही आणि अक्षरश: वेड लागायची पाळी येते. म्हणून फॉरमॅटिंग मार्कस्वर क्लिक नको. नंतर प्रिंट ऑप्शन्स, वेब लेआऊट अशी ऑप्शन्स दिसतील. त्यातील कशावर क्लिक करायचे ते गरजेनुसार ठरवा. यात 'रॅप टू विंडो' असे ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यास मजकूर पानाच्या सर्व बाजूंना लागून येतो.

टूल्स - ऑप्शन्स - जनरलवर क्लिक केल्यास त्यावरची ऑप्शन्सही गरजेनुसार क्लिक करता येतात. मजकूर ऑपरेट करताना व्हाइट बॅकग्राऊंडवर काळ्या अक्षरात टाइप करायचे की गर्द निळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या अक्षरात टाइप करायचे ते आवडीनुसार ठरवा. निळी बॅकग्राऊंड हवी असेल तर 'ब्लू बॅकग्राऊंड, व्हाइट टेक्स्ट'वर क्लिक करा. पण डोळ्याला त्रास होत असेल तर मात्र हे अनक्लिकच असलेले चांगले. यातच रिसेंटली यूज्ड फाइल लिस्ट असे ऑप्शन आहे. त्यासमोर आधीच्या किती फाइल्स दिसाव्यात त्याचा आकडा ठरविता येईल. हा आकडा दहा असू शकतो वा तीनही. ते गरजेनुसार ठरवा. समजा सहा आकडा दिलात तर 'फाइल'वर क्लिक केल्यास तळाला वर्डमध्ये ऑपरेट करत असलेल्या फाइलसह आधी ऑपरेट केलेल्या सहा फाइल्स दिसतील. गंमत म्हणजे एकावर एक अशा सगळ्या फाइल्स तुम्ही ओपन करू शकता. तसे करताना तुमची ताजी फाइल सुरक्षित राहाते. आधीच्या एखाद्या फाइलमधून मजकूर कॉपी-पेस्ट करायचा असेल तर ते फायदेशीर ठरते. 'जनरल'मध्ये अन्य कोणत्याही बाबीवर क्लिक नसेल तर फारसे काही बिघडत नाही.

हे क्लिक-अनक्लिक झाल्यावर मायक्रोसॉफ्ट वर्ड क्लोज करून नव्याने सुरू करावे लागेल. अन्यथा एखाद्या ऑप्शनवर क्लिक केल्यास ताबडतोब तसा बदल होणार नाही. म्हणून एकदा सर्व ऑप्शन्स क्लिक वा अनक्लिक करून घ्यावीत आणि मगच वर्ड नव्याने ओपन करावे.

'वर्ड'ची महती 23 Nov 2007,

मागच्या आठवड्यात आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड
आणि ओपन ऑफिस यांची प्राथमिक तुलना केली होती . याचा पुढचा टप्पा गाठण्याआधीच बुधवारी हॉटमेलचे जनक सबीर भाटिया यांनी ' लाइव्ह डॉक्युमेंटस ' ची घोषणा करून आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे . नावाप्रमाणेच ही डॉक्युमेंटस ' लाइव्ह ' आहेत . तुम्ही तुमच्या मशीनवर एखादे डॉक्युमेंट तयार केले आणि ते निवडक लोकांना बघता यावे अशी सोय केली , तर ते डॉक्युमेंट ही निवडक मंडळी पाहू शकतील . तुम्ही त्यात बदल केले की लगेच दुसऱ्या लोकांनाही कळतील . या डॉक्युमेंटवर दुसऱ्या कोणी काही कॉमेंट केली तर ती लगेच तुम्हाला दिसेल आणि मुख्य म्हणजे तुम्हीही लगेच उत्तर देऊ शकाल . म्हणजे हे ' चॅटिंग ऑन डॉक्युमेंटस् ' झाले आहे .

मायक्रोसॉफ्ट ' ऑफिस २००७ ' या मायक्रोसॉफ्टच्या सर्वात ताज्या प्रॉडक्टला टक्कर देण्यासाठी भाटिया यांनी आपले नवे प्रॉडक्ट आणले आहे . यातल्या सोयी ' ऑफिस २००७ ' अथवा ' गुगल डॉक्स ' व ' स्प्रेडशीट्स ' यांतही नाहीत असा त्यांचा दावा आहे . सध्या हे सारे फुकटात डाऊनलोड करता येत असले , तरी फार काळ तसे ठेवणे त्यांना परवडणारे नाही . तरी वैयक्तिक वापरासाठी फुकट व कार्यालयीन वापरासाठी हवे असेल तर माफक किंमतीत देण्याचा त्यांचा विचार आत्तातरी दिसतो . ' ऑफिस २००७ ' विकत घ्यायचे तर ४०० डॉलर खर्च करावे लागतात . त्या तुलनेत हे खूपच स्वस्तात मिळेल असे म्हणायला हरकत नाही .

ओपन ऑफिसमध्ये केवळ वर्डला पर्याय नाही , तर अन्य सोयीही आहेत . त्या शिकून घेतल्या की त्याचा नीट उपयोग करता येईल . यात ओपन ऑफिस बेस , कॅल्क , ड्रॉ , मॅथ आणि नेहमीचा रायटर असे पर्याय मिळतील . नावाप्रमाणेच यात सुविधा आहेत . मॅथमध्ये गणिते मांडण्याच्या दृष्टीने सोय आहे , कॅल्क म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे , ड्रॉमध्ये प्रेझेंटेशनच्या सोयीसाठी वेगवेगळी डॉक्युमेंट्स तयार करता येतील . इम्प्रेसमध्येही प्रेझेंटेशनसाठी डॉक्युमेंट तयार करताना त्यात इक्सेल वा विविध चार्ट तसेच अन्य चित्रे टाकण्याची सोय आहे . सुरुवातीला हे सारे वर्डइतके सोपे वाटत नाही ; पण सवय झाली तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसकडे तुम्ही पुन्हा वळणार नाही .

ऑफिसमध्येही एक्सेल , इन्फोपाथ , आऊटलूक आणि पॉवरपॉईंट अशा सुविधा आहेतच . आजकाल शाळेतही मुलांना पॉवरपॉईंटची मदत घेऊन प्रेझेंटेशन करायला सांगतात . त्यामुळे याची गरज आज सर्व पातळ्यांवर भासत आहे . अर्थात ओपन ऑफिस असो की मायक्रोसॉफ्ट ऑफिस असो , कार्यालय वा स्वत : च्या उद्योगधंद्यासाठी काम करायचे असेल तरच वर्डशिवाय इतर अॅप्लिकेशन्सची गरज भासते . तुम्हाआम्हाला या वर्डमधील सोप्या गोष्टी समजून घेतल्या तरी पुरे .

वर्ड २००३ ( सध्या बहुतेकांकडे हीच व्हर्जन असण्याची शक्यता आहे . वर्ड २००७ फारच कमी लोकांकडे असेल ) ओपन केल्यावर आडव्या कॉलमात फाइल , एडिट , व्ह्यू , इन्सर्ट , फॉरमॅट , टूल्स , टेबल , विंडो आणि हेल्प अशी ऑप्शन्स दिसतील . ' फाइल ' वर क्लिक केल्यावर नवे डॉक्युमेंट ओपन करता येते . तसेच आधीचे ओपन करून त्यात बदल करता येतील . सेव्हअॅजवर क्लिक केले तर आधी दुसऱ्या नावाने सेव्ह केलेली फाईल नव्या नावाने सेव्ह करता येईल . समजा एखाद्या फाइलमधला मजकूर बदलायचा आहे , पण त्याचवेळी मूळ मजकूर कायम राहावा असे वाटत असेल तर मूळ फाइल सेव्हअॅज करून घ्यायची . म्हणजे नवीन फाइल तयार होते . त्याला नाव मात्र आधीच्या फाइलपेक्षा वेगळे द्यायला हवे . नाहीतर आधीच्याच फाइलवर ती ओव्हरराइट होईल . नवे नावही आधीच्याशी सुसंगत असे द्या . उदा . इंडिया असे फाइलनेम असले तर सुधारणा करण्यासाठी इंडिया न्यू असे नाव द्या . अशा सगळ्या न्यू नावाच्या फाइल्स करेक्टेड आहेत हे लगेच लक्षात येईल .

' फाइल ' मेन्यूमध्येच परमिशन नावाचा उल्लेख दिसेल . तो अगदी महत्त्वाचा आहे . तुम्ही घरी कम्प्युटर वापरत असाल आणि त्याच कम्प्युटरवर घरातले अन्य लोकही काम करत असतील तर याचा उपयोग होईल . तुम्ही तयार केलेले डॉक्युमेंट अन्य कोणी पाहू नये यासाठी त्याला पासवर्ड देण्याची सोय आहे . तो फक्त तुम्हालाच माहीत असल्याने ते डॉक्युमेंट अन्य कोणालाही ओपन करता येणार नाही . मात्र त्यासाठी तुम्हाला ' इन्फरमेशन राइट मॅनेजमेंट ' नावाची ऑफिस २००३ची फाइल डाऊनलोड करावी लागेल . ( परमिशनवर क्लिक केल्यावर याचा मार्ग दिसेलच ) मग पासवर्ड देता येईल . जी डॉक्युमेंट्स सर्वांसाठी उपलब्ध ठेवायची असतील तिला पासवर्ड द्यायचा नाही .

सेव्ह अथवा सेव्हअॅज करताना तुम्हाला ती फाइल कुठे सेव्ह करायची आहे हे विचारण्यात येईल . तुमच्या मशीनमध्ये योग्य ते फोल्डर केलेले असले तर त्या - त्या फोल्डरमध्ये त्या - त्या विषयाची फाइल सेव्ह करता येईल . हा वेगळा विषय आहे . त्यावर नंतर कधीतरी .

वर्ड की ओपन ऑफिस? 16 Nov 2007, 0

मराठी सॉफ्टवेअर कोणते वापरावयाचे , असा प्रश्न अनेकांना पडतो . परंतु सोय आणि कामाचे स्वरूप पाहून याबाबतचा निर्णय घेणे योग्य ठरते .

.....

घरी कम्प्युटर आहे पण इंटरनेट नाही असे क्वचित होते . ब - याच लोकांना इंटरनेटपेक्षा मायक्रोसॉफ्ट वर्डवर काम करणे अधिक गरजेचे असते . तुमच्या कम्प्युटरमध्ये कोणता ऑफिस पॅक बसविलेला आहे त्यावर त्याचे काम किती वेगाने होते वा किती अधिक सुलभतेने होते हे ठरते . ' वर्ड ६ ' हे व्हर्जन ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे ऑफिस २००३ वा आत्ताचे ' ऑफिस २००७ ' यापेक्षा खूपच कमी सुविधा असतील हे उघडच आहे . तरी मराठी अथवा इंग्रजी मजकूर टाइप करण्यासाठी अजून तरी मायक्रोसॉफ्ट वर्डचाच वापर मोठ्या प्रमाणात होतो . नाही म्हणायला वर्डशी स्पर्धा करण्यासाठी अॅबिवर्ड , ओपन ऑफिस रायटर ( निर्माते सन मायक्रोसिस्टिम्स ) अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे . मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या पॅकमध्येच वर्डचा समावेश होतो . पण हा पॅक ओरिजिनल स्वरूपात खरेदी करायचा तर १५ ते १७ हजार रुपये मोजावे लागतात . अॅबिवर्ड आणि ओपन ऑफिस फुकटात डाऊनलोड करता येतात . ओपन ऑफिसमध्ये वर्डपेक्षा अधिक सुविधाही आहेत . परंतु यातील काही सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरशी क्लॅश होण्याची शक्यता असते . म्हणून शक्यतो एकच सॉफ्टवेअर वापरावे . अधिक सुविधांमुळे ओपन ऑफिस पॅक वापरणे खूप सोयीचे आहे यात शंकाच नाही . यामुळे अलीकडे ब - याच लोकांनी ते डाऊनलोड केलेले आहे .

तुमच्याकडे वर्ड असेल वा ओपन ऑफिस ; त्यात मराठी सॉफ्टवेअर कोणते वापरायचे असा नेहमीच प्रश्न पडतो . कोणाला ' श्री ' लिपी हवी असते तर कोणाला ' आकृती ' त काम करायचे असते . कोणाला इंटरनेटवर मिळणारे फुकटातले फाँट डाऊनलोड करायचे असतात , तर कोणाला ' एपीएस ' सारखे बहुगुणी सॉफ्टवेअर वापरणे सोयीचे वाटते . फुकटातले फाँट वैविध्यपूर्ण असतात हे खरे आहे , पण ते वापरताना काही बंधने येऊ शकतात . ते फाँट वापरताना कोणता कीबोर्ड वापरायचा यावर निर्बंध येऊ शकतात . म्हणून ' श्री ' अथवा ' आकृती ' किंवा ' एपीएस ' यांसारखे सॉफ्टवेअर उपयोगी पडू शकते . ही तीनही सॉफ्टवेअर बाहेर विकत मिळू शकतात . थोडा खर्च झाला तरी ती विकतच घेतलेली चांगली . कारण पायरेटेड सॉफ्टवेअरमध्ये फाँट करप्ट होण्याचा व त्यामुळे संपूर्ण मशीनला धोका पोचण्याचा धोका असतो . प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही फाँट वेगळे असतात . ते त्या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्य असते . डोळ्याला कोणता बरा दिसतो ते पाहून तो वापरावा . ' एपीएस ' मध्ये अधिक सोयी आहेत . त्यात ' आकृती ' आणि ' श्री ' लिपीचे कीबोर्ड वापरण्याची सोय आहे आणि ' इंडिका ' सॉफ्टवेअरमधील देवयानी कीबोर्डही वापरता येतो . या सॉफ्टवेअरचे वैशिष्ट्य असे की ' श्री ' अथवा ' आकृती ' किंवा ' एपीएस ' मध्ये ऑपरेट केलेला कोणताही मजकूर दुसऱ्या लिपीत हस्तांतरित करण्याची सोय असलेला कन्व्हर्टर यात उपलब्ध आहे . म्हणजे तुम्ही मजकूर एपीएसमध्ये केलात व तो तुम्हाला कोणाला तरी ' श्री ' लिपीमध्ये पाठवायचा आहे तर तो कन्व्हर्ट करून पाठवता येतो . तरीही मराठी सॉफ्टवेअर वापरताना स्वत : ची सोय पाहूनच काम करायला हवे . ज्यांना फक्त स्वत : पुरतेच काम करायचे आहे आणि ज्यांना दुस - यांना मजकूर पाठवायचा नाही त्यांना किमान फाँट बसवून घेतले तरी चालू शकतील .

मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल वा दुसरा कोणताही प्रोग्राम , त्याचे शॉर्टकट्स समजून घेतले तर भराभर काम करता येते . ' कंट्रोल एन ' की दाबली की नवे डॉक्युमेंट ओपन होते . ' कंट्रोल ओ ' केल्यावर आधी ऑपरेट केलेले एखादे डॉक्युमेंट ओपन करता येते . ' कंट्रोल डब्ल्यू ' केल्यावर डॉक्युमेंट बंद होते , पण वर्ड चालू राहाते . ' कंट्रोल एस ' केल्यावर ते डॉक्युमेंट सेव्ह होते . ' कंट्रोल पी ' म्हटल्यावर ते प्रिंटरला पाठवता येते . ' आल्ट एफ ४ ' वापरल्यावर डॉक्युमेंट व वर्ड दोन्ही बंद होते . एखादा शब्द चुकीचा टाइप केला तर ' कंट्रोल झेड ' करा . किंवा तोच शब्द वा कृती परत हवी असेल तर ' कंट्रोल वाय ' करा . हे सगळे शॉर्टकट्स तुम्हाला नेटवर उपलब्ध होऊ शकतील . गूगलला एमएस वर्ड शॉर्टकट्स असा सर्च दिलात तर ते मिळू शकतील . ते वापरायला शिकलात तर काम अधिक वेगाने होईल व माऊसचा वापर खूप कमी करावा लागेल .

हे करून पाहा! 14 Nov 2007,

तुम्ही इंटरनेटसाठी कोणताही ब्राऊजर वापरत
असाल तरी तो ओपन केल्यावर जे पेज दिसते त्याला आपण होम पेज म्हणतो . हे होम पेज प्रत्येकाच्या आवडीनुसार सेट करता येते . समजा तुम्ही ' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' वापरता आहात ( याच्या आधीचे व्हर्जन ६ काहीजण वापरतात ; कारण तो वापरायला अतिशय सुटसुटीत आहे . पण व्हर्जन ७ कम्प्युटरच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक फायद्याचा आहे ) तर त्याच्या ' टूल्स ' वर क्लिक करा , अगदी तळाच्या ' इंटरनेट ऑप्शन्स ' वर क्लिक करा . एक बॉक्स ओपन होईल . त्याच्या पहिल्याच ' जनरल ' टॅबमध्ये सुरुवातीलाच ' होम पेज ' अशी सोय असेल . तुम्हाला जे होम पेज करायचे असेल , त्याचा यूआरएल ( म्हणजे पत्ता ) टाइप केल्यावर ते होमपेज होईल . तुम्ही नंतर जेव्हा जेव्हा ब्राऊजर ओपन कराल , तेव्हा तेव्हा हेच पान दिसेल . पण एका वेळेला अधिक होम पेजेस सेट करता येतात का ? त्याचे उत्तर होय असेच आहे . मात्र हे ' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' मध्येच होऊ शकते .

तुम्ही समजा रिडिफ डॉट कॉम या साइटचे होम पेज केलेले असेल आणि तुम्हाला इंडियाटाइम्स डॉट कॉम हेही होम पेजच व्हावे असे वाटत असेल , तर इंडियाटाइम्सची साइट ओपन करा . तुमच्या टॅब बारच्या बाजूला होम , फीड्स , प्रिंट वगैरे बटन्स असतील . त्यातील ' होम ' च्या बाजूला खालच्या दिशेला जाणारा एक अॅरो असेल . त्याच्यावर क्लिक करा . त्यावर ' अॅड ऑर रिमूव्ह वेबपेज ' अशी लिंक असेल . त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काही पर्याय दिसतील . ' अॅड धिस वेबपेज टू युवर होम पेज टॅब्ज ' हा त्यातला पर्याय निवडा . मग एकाचवेळी दोन होम पेजेस टॅबमध्ये ओपन होतील . त्यासाठी टॅबचे ऑप्शन मात्र ' ऑन ' पाहिजे . ते ऑन नसले , तर टॅब दिसणारच नाहीत . ते ऑन करण्यासाठी काय करावे लागेल ? पुन्हा टूल्स , इंटरनेट ऑप्शन्स , जनरल या मार्गाने जा . त्याच विंडोमध्ये ' टॅब्ज ' असे बटन असेल . त्याच्या बाजूच्या ' सेटिंग्ज ' वर क्लिक करा . सरुवातीलाच ' एनेबल टॅब्ड ब्राऊझिंग ' असे लिहिलेले असेल . त्यावर क्लिक करा . हे टॅब कशा पद्धतीने उघडायला हवेत त्या पर्यायांवरही क्लिक करा . मग ' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' ब्राऊजर पुन्हा सुरू करा ; की तुम्हाला टॅब दिसायला लागतील . याचा मोठा फायदा असा की एकावेळी एक साइट पाहायची , मग ती बंद करायची , अॅड्रेस बारमध्ये जाऊन नवीन यूआरएल टाइप करायचा , ती साइट ओपन झाल्यावर पुन्हा याच पद्धतीने नवीन साइट ओपन करायची हा सारा त्रास वाचतो . एका वेळेला दोन ( वा अधिक ) होम पेज तयार करण्याची सोय फायरफॉक्समध्ये मला दिसली नाही .

' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' मध्येच बऱ्याच सुविधांची भर आपल्याला घालता येते . काही खरोखरच गरजेच्या , तर काही केवळ गमतीच्या . त्यासाठी ' टूल्स ' वर क्लिक करा . मग मॅनेज अॅडऑन्स व नंतर फाईंड मोअर अॅडऑन्सवर क्लिक करा . विविध प्रकारच्या सुविधा तुम्हाला दिसतील . सिक्युरिटी , ब्राऊजर्स , एंटरटेनमेंट , टाइमसेव्हर्स वगैरे वर्गवारी असेल . तूर्त सिक्युरिटी टॅबवर क्लिक करा . तसे केल्यावर विंडोज लाइव्ह टूलबार . विंडोज डिफेंडर वगैरे प्रोग्राम्स दिसतील . त्याखालील तिसरा ' मॅकअॅफी साइट अॅडव्हायजर ' हा अत्यंत उपयोगी प्रोग्राम आहे . तुम्ही जी साइट पाहात आहात ती कितपत सुरक्षित आहे ते हा प्रोग्राम आपल्याला सांगतो . हा अॅडव्हायजर डाऊनलोड केलात की ब्राऊजरच्या वरती उजव्या बाजूला तो विराजमान होतो . त्याचा रंग हिरवा असला तर साइट पूर्णपणे सुरक्षित आहे असे समजा . लाल रंग असला तर साइट ताबडतोब बंद करा . पिवळा असला तर सावध राहा , असा याचा अर्थ .

हा अॅडव्हायझर एखाद्या बाबीवर सर्च करताना जास्त उपयोगी ठरतो . समजा तुम्ही एखाद्या विषयावर सर्च करता आहात तर तुमच्यासमोर अनेक पर्याय हा सर्च देतो . त्यातील नेमकी कोणती लिंक ओपन करावी हे तुम्हाला कळत नाही . अशावेळी हा अॅडव्हायझर मदतीला येतो . जर ती लिंक सुरक्षित असेल , तर त्या लिंकपुढे हिरव्या रंगात एक टिकमार्क असेल . त्यावर कर्सर नेल्यावर त्याचा तपशील दिसेल . ती लिंक कितीजणांनी पाहिली आहे , ती किती सुरक्षित आहे हे कळेल . तुमची खात्री झाली तर त्यावर क्लिक करा . लिंक योग्य नसेल तर त्यावर लाल रंग दिसेल . ती लिंक ओपन करू नका असा स्पष्ट इशारा असेल .

बाकीच्या अॅडऑन्सविषयी नंतर कधीतरी .

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांचं निधन । हृदयविकाराच्या झटक्यानं निधन । प्रा. शेवाळकर ७६ वर्षांचे होते । नेटवरची दिवाळी 14 Nov 2007,

कम्प्युटरच्या जमान्यात ई - कार्डे पाठविण्यास सुरुवात झाली आणि आता तर एसएमएसच्या जमान्यातून अगदी संक्षिप्त स्वरूपात दिवाळीच्या सदिच्छा पाठविता येतात . परंतु कम्प्युटरवरच्या ग्रीटिंग्जची सर त्याला नाही . ती ग्रीटिंग्ज कशी पाठवायची , त्याचाच वेध ...

.....

काल दिवाळीला सुरुवात झाली . आज शुक्रवारी लक्ष्मीपूजन . दिवाळीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देतो . पण काळानुसार ग्रीटिंग कार्ड विकत घेऊन त्यावर तिकिटे लावून पोस्टात टाकण्याचा जमाना केव्हाच मागे पडलाय . इंटरनेट मेलचा उपयोग होत असल्याने पोस्टाद्वारे वैयक्तिक पत्र पाठविण्याचा कंटाळाच येतो . एकंदरच पत्रव्यवहार कमी झाल्याने कम्प्युटरच्या जमान्यात ई - कार्डे पाठविण्यास सुरुवात झाली आणि आता तर एसएमएसच्या जमान्यातून अगदी संक्षिप्त स्वरूपात दिवाळीच्या सदिच्छा पाठविता येतात . यातला एसएमएसचा प्रकार बोकाळला असला , तरी कम्प्युटरवरच्या ग्रीटिंग्जची सर त्याला नाही . शिवाय एकच ग्रीटिंग शेकडो लोकांना एकदम पाठविण्याची सोय असल्याने हा प्रकार अधिक लोकप्रिय झाला , यातही नवल नाही .

ही ग्रीटिंग्ज स्वत : तयार करून पाठविणारे बरेचजण आहेत . जे फोटोशॉप अथवा कोरल ड्रॉ वगैरे अत्याधुनिक प्रोग्राममध्ये पारंगत आहेत , ते अतिशय सुंदर पद्धतीने ही भेटकार्डे तयार करू शकतात . इतर लोक ' पेंट ' मधील ब्रशच्या साह्याने हे कार्ड तयार करतील . पण या तंत्राच्या वाटेला जाण्याचे साहस न करता रेडिमेड ग्रीटिंग्ज पाठविण्याची सोय झाली तर ? तशी सोय आधीपासूनच झाली आहे . त्यातल्या काही साइटचा हा परिचय .

' १२३गीटिंग्ज डॉट कॉम ' ही सध्या अतिशय लोकप्रिय असणारी साइट . येथे दिवाळीची भरपूर ग्रीटिंग्ज उपलब्ध आहेत . तुम्हाला आवडेल ते निवडायचे . त्याखाली काय लिहायचे हे तुम्ही ठरवू शकता . तुम्हाला हवा तो मजकूर लिहून झाला की अंतिम काडं कसे दिसेल ते ' प्रीव्ह्यू ' वर क्लिक करून पाहू शकता . पसंत पडले तर पाठवा अन्यथा काही बदल करायचे असतील तर ते करून कार्ड पाठवून द्या . यातली काही कार्डे फ्लॅश तंत्रावर अवलंबून असतात . म्हणजे समजा कार्डात पणत्या तेवत आहेत असे चित्र असेल , तर फ्लॅशच्या मदतीने त्या प्रत्यक्ष तेवताहेत असे वाटते . तुमच्या मशीनमध्ये अडोब फ्लॉश प्लेअर आहे का ते पाहा . नसल्यास अडोबच्या साइटवरून डाऊनलोड करा . हा फ्लॅश आणि क्विकटाइम या आणखी एका प्रोग्रामच्या मदतीने ही कार्डे अगदी जिवंत होतात . अर्थात ज्या मित्राला हे कार्ड पाठवत आहात , त्याच्याकडेही हे प्रोग्राम असणे आवश्यक आहे . अन्यथा त्याला ते अगदी साधे कार्ड दिसेल .

' लाव्हाकार्डस् डॉट कॉम ' ही आणखी एक ग्रीटिंग्जची साइट आहे . तेथेही तुम्हाला ग्रीटिंग्जची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतील . १२३ग्रीटिंग्जपेक्षा ही साइट अगदी वेगळी आहे आणि ग्रीटिंग्जचे वैविध्यही आहे . यात दिवाळीची विषयवार कार्डे उपलब्ध आहेत . एखाद्याला दिवाळी साजरी करण्यासाठी घरी वा हॉटेलमध्ये बोलावू इच्छित असाल , तर तशी कार्डे मिळतील . मराठी , बंगाली , तामिळ , हिंदी , गुजराती भाषेतून ( पण देवनागरीतून ) कोणाला कार्ड पाठवायचे असेल , तर तीही आहेत . पणत्या आणि झगमगत्या दिव्यांची ग्रीटिंग्ज नको असतील तर सुंदर रांगोळ्यांची काडेर्ही आहेत . गणपती आणि लक्ष्मी यांची चित्रे असणारी कार्डे हवीत ? येथेच मिळतील .

' ईकार्ड४ऑल डॉट कॉम ', ' १२३दिवाळी डॉट कॉम ', ' दिवाळीमेला डॉट कॉम ' या आणखी काही साइटवरही जाता येईल . तेथील ग्रीटिंग्जचे वैविध्य पाहता येईल . दिवाळी सुरू होऊन दोन दिवस झाले ; आता कसल्या शुभेच्छा द्यायच्या , असा विचार करू नका . अजूनही ही ग्रीटिंग्ज पाठवता येतील . ज्या साइटची माहिती येथे दिली आहे त्या साइटवर अर्थातच अन्य विषयांची ग्रीटिंग्जही मिळतात . वाढदिवसापासून ते लग्नापर्यंत , पाडव्यापासून ते दसऱ्यापर्यंत असंख्य विषयांची ग्रीटिंग्ज उपलब्ध आहेत . म्हणजेच या साइट तुम्हाला केवळ दिवाळीपुरत्या नाही , तर वर्षभर उपयोगी पडू शकतात .

या कार्डांशिवाय दिवाळीची मजा अन्य सर्चमधूनही मिळते . गूगलवर व्हीडिओ प्रकारात सर्च दिलात , तर दिवाळीविषयी असंख्य व्हीडिओ पाहायला मिळतील . ज्या साइटवर स्वतऱ्चे व्हीडिओ अपलोड करायची सोय असेल तेथे जाऊन घरातले आनंदाचे क्षणही तुम्ही नोंदवू शकता . बाळाची पहिली दिवाळी , लग्नानंतरची पहिली दिवाळी अथवा कोणत्याही वैयक्तिक दिवाळीचा व्हीडिओ तुम्ही तयार करू शकता . आता डिजिटल कॅमेेरेही सर्वांच्या आवाक्यात आले आहेत . त्यामुळे व्हीडिओ बनवणे ही काही फक्त व्यावसायिक फोटोग्राफरची मक्तेदारी राहिलेली आही . नेटवरच्या सध्याच्या अशा व्हीडिओंची लिंक अर्थातच यूट्यूब वा तत्सम संकेतस्थळांवरची असेल . पण हे व्हीडिओ पाहण्यात गंमत असते . गूगलवरच ग्रुप्स या प्रकारात सर्च दिलात , तर विविध ठिकाणच्या दिवाळीचा आस्वाद घेता येईल .

एकंदर नेटवरची दिवाळी हा कोणत्याही प्रदूषणाशिवाय पाहता येणारा एक आल्हाददायक प्रकार असतो , यात वाद नाही .

आवडीनुसार टूलबार निवडा 12 Nov 2007,

अक्षरश : शेकडो टूलबार आज उपलब्ध आहेत . अनेक सोयी त्यांच्यात आहेत . आपण आपली गरज ओळखून टूलबारची निवड करावी ...
.....
मागच्या वेळेस आपण टूलबारची माहिती घेतली . गूगल , याहू आणि एमएसएन यांचे तीन टूलबार सर्वसाधारणपणे डाऊनलोड केले जातात . त्यांची आपल्याला ब्राऊझर अधिक सुलभतेने वापरण्यासाठी मदत होते . हव्या त्या साइटचे बुकमार्क करून ठेवून ही सुलभता तुम्ही आणू शकता . तसेच लिंक्स टूलबारमध्ये हे बुकमार्क आणून हवी ती साइट पटकन ओपन करू शकता हे खरे ; पण बुकमार्कपेक्षाही जादा सुविधा अतिरिक्त टूलबारमध्ये मिळते .

' सायबरडिफेंडर सेफसर्च टूलबार १ ' या नावाचा एक टूलबार आहे . तुमच्या कम्प्युटरची सुरक्षा या टूलबारच्या हातात तुम्ही देऊ शकता . एखादी बनावट साइट ओपन झाल्यास अथवा तुमचा पासवर्ड कोणी ट्रॅक करत असल्यास वा कम्प्युटरमधल्या कोणत्याही मजकुरात कोणी गडबड करायचा प्रयत्न करत असला तर हा टूलबार तुम्हाला तात्काळ सूचना देतो . मात्र व्हायरस स्कॅन यात नसल्याने ती अपेक्षा ठेवू नका . पण साइट पाहताना पॉपअप होणाऱ्या जाहिराती रोखण्याचे काम तो चोखपणे बजावतो . एखाद्या विषयावर सर्च करायचा असेल तर त्याची सोय आहे आणि ओपन केलेल्या साइटची अधिक माहिती हवी असेल तर तीही मिळते .

' स्टम्बलअपॉन ' टूलबार हा अगदी वेगळा आहे . तुम्ही पाहात असलेल्या साइटच्या संदर्भातच दुसऱ्या साइट पाहायच्या असतील , तर या बटनवर क्लिक करा . अन्य इंटरनेटधारकांनी त्याच विषयात काय साइटस सुचविल्या आहेत तेही यावर पाहता येईल . थोडक्यात , हा परस्परसंवादी टूलबार आहे . जगातल्या चांगल्या साइट्स येथे विषयवार पाहायला मिळतील . तुम्ही तुमच्या आवडीनिवडीही नेटवर देऊ शकता . इतर लोक ते पाहून त्यावर मतप्रदर्शन करू शकतील . एकंदरित ही साइट म्हणजे साइटचा खजिनाच आहे .

खास सर्चसाठी असलेला टूलबार म्हणजे अल्टाव्हिस्टाचा टूलबार . इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये अॅडऑन सुविधेत याचा समावेश करण्यात आला आहे . याचे वैशिष्ट्य म्हणजे २०पेक्षा अधिक सुविधांचा वापर करून आपण कोणत्याही विषयावर सर्च करू शकतो . भाषांतराची सोय असलेला हा बहुधा एकमेव टूलबार असावा . यात संपूर्ण वेबपेज दहा भाषांमध्ये भाषांतरित करण्याची सोय आहे . पॉपअप ब्लॉकर , एरिया झोन्स , एक्स्चेेंज रेट्स आदि सुविधाही यात आहेत . याची लेटेस्ट व्हर्जन सुमारे सव्वालाख लोकांनी डाऊनलोड केली आहे .

सर्चचाच विचार करायचा तर आस्क टूलबार ४ . ० . १ . १ हाही चांगला आहे . आस्क डॉट कॉम या जगप्रसिद्ध साइटचा हा टूलबार . कोणत्याही विषयावरचा सर्च इथे होऊ शकतो . इतर सुविधाही येथे उपलब्ध आहेत . ताज्या बातम्या , शेअरमाकेर्टमधले ताजे भाव , हवामान , डिक्शनरी , नकाशे आदी सोयीही आहेत . जेव्हा आणखी सुविधा अॅड होते तेव्हा ती आपोआप दिसायला लागते . म्हणजेच हा टूलबार आपोआप अपडेट होतो .

' ए - टूलबार ३ . ०१ ' हा टूलबार अगदी वेगळा आहे . यात सुमारे ४५ सुविधा उपलब्ध होतात . यात ताज्या बातम्यांपासून ते डेस्कटॉप सर्चपर्यंत सगळ्यांची सोय आहे . जगभराच्या वेळा सांगणारे घड्याळ आहे , पासवर्ड सेव्ह करण्याची सोय आहे , करन्सी कन्व्हर्टर आहे , भाषांतराची सोय आहे आणि डिक्शनरी पाहायची असेल तर तीही आहे . हा एकदा तरी डाऊनलोड करून पाहा . म्हणजे त्यातली विविधता लक्षात येईल .

तुम्हाला फक्त फोटोच शोधायचे असतील तर ? त्यासाठी ' पिक्चर्स टूलबार २ . ० . ०१ ' आहे . वेगवेगळे फोटो शोधून त्याची वर्गवारी तुम्ही करू शकता . फोटो सेव्ह करतानाच त्याची वेगळी लिंक तयार होते . समजा तुम्हाला सानिया मिर्झा आणि शाहरुख खानचे फोटो डाऊनलोड करायचे आहेत ; पण प्रत्येक खेळाडू वा अभिनेत्याची वेगवेगळी लिंक हवी असेल तर तशी करू शकता .

असेच अक्षरश : शेकडो टूलबार उपलब्ध आहेत . प्रत्येकाच्या स्वत : च्या खास सुविधा असतात . अन्यथा सर्वच टूलबारच्या सर्वच सुविधा काही आपल्या गरजेच्या नसतात . जो आपल्याला खरेच उपयोगी पडणारा आहे , तो डाऊनलोड करावा . समजा तुम्ही जास्त टूलबार डाऊनलोड केलेत तर ब्राऊझरच्या वरच्या भागात खूप गर्दी होते . मग काम करण्यात उलट अडथळेच येतात . यावर एक उपाय आहे . ब्राऊझरच्या वरच्या भागात ' व्ह्यू ' नावाची लिंक असते . त्यावर क्लिक करा . त्याखालीच टूलबार नावाची लिंक असेल . त्यावर माऊसचा कर्सर नेल्यावर उजव्या बाजूला ब्राऊझरमध्ये असलेले सर्व टूलबार दिसतील . जे तुम्हाला दिसायला नको असतील , त्यावर अनक्लिक करा ( म्हणजेच क्लिक असेल ते काढून टाका ) की तो टूलबार ब्राऊझरमध्ये दिसणार नाही . जेव्हा गरज असेल तेव्हा याच मार्गाने जाऊन त्यावर क्लिक करा .

तुम्ही इंटरनेटवर डाऊनलोड डॉट कॉमसारख्या साइटला टूलबार असा सर्च दिलात की हे सारे टूलबार तुमच्यासमोर हजर होतील . त्याची प्रत्येकी वैशिष्ष्ट्ये वाचून कोणता डाऊनलोड करायचा ते ठरवा .

बहुपयोगी टूलबार 12 Nov 2007,

इंटरनेटचा वापर करताना तुम्ही कोणता ब्राऊझर वापरता त्यावर तुम्हाला सर्फिंग किती सोपे जाईल ते अवलंबून असते . ' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' ( आयई ७ ) हा मायक्रोसॉफ्टचा लेटेस्ट ब्राऊझर असला तरी तो वापरायला बऱ्याचजणांना आवडत नाही .
.................
इंटरनेटचा वापर करताना तुम्ही कोणता ब्राऊझर वापरता त्यावर तुम्हाला सर्फिंग किती सोपे जाईल ते अवलंबून असते . ' इंटरनेट एक्स्प्लोरर ७ ' ( आयई ७ ) हा मायक्रोसॉफ्टचा लेटेस्ट ब्राऊझर असला तरी तो वापरायला बऱ्याचजणांना आवडत नाही . एकतर त्याची रचना क्लिष्ट वाटते , विशेषत : ज्यांना ' आयई ६ ' ची सवय झाली आहे त्यांना हा नवा अवतार पसंत पडलेला नाही . कारण ' आयई ६ ' ची रचना अधिक सुटसुटीत व म्हणूनच वापरायला सोपी होती . पर्यायाने फायरफॉक्स ब्राऊझर वापरण्याकडे बहुतेकांचा कल असतो . फायरफॉक्स अधिक फास्ट आहे , व्हायरस व स्पायवेअर रोखण्याच्या दृष्टिने अधिक सुरक्षित आहे आणि ' आयई ७ ' पेक्षा अधिक सोयी त्यात आहेत . पण फक्त ब्राउझर डाऊनलोड केला तर त्यात मजा नाही . त्यासाठी टूलबार नावाची मोठी सोय आपल्यासाठी संबंधित कंपन्यांनी करून ठेवलेली आहे . ' आयई ७ ' वापरत असाल तर ही सोय खूपच उपयोगी पडते . फायरफॉक्समध्ये गेल्यावरही ' टूल्स ' वर क्लिक केल्यास अॅडऑन मिळू शकतात . त्यातली मजा काही वेगळीच आहे .

सर्वसाधारणपणे ' आयई ७ ' हा ब्राऊझर ओपन केला की त्यात काही कॉमन बटन्स दिसतात . उदा . फाइल , एडिट , व्ह्यू , फेवरिट्स , टूल्स आणि हेल्प ही ती बटन्स आहेत . त्याच्याखाली फॉरवर्ड व बॅक जाण्यासाठी बटन असते . बाजूला अॅड्रेस बार व त्या बाजूला सर्चबार असतो . त्याच्या खाली फेवरिट्स ( म्हणजेच बुकमार्कस् ), अॅड टू फेवरिट्स आणि टॅब बार असतो . त्याच्यापुढे होम , फीड्स , प्रिंट वगैरे बटन असतात . या सगळ्याच्या वर लिंक्स नावाचा टूलबार असतो . तो अत्यंत महत्त्वाचा असतो . या लिंक्सची जागा बदलून अगदी वरपर्यंत म्हणजे फाइल , एडिट , व्ह्यू , फेवरिट्स , टूल्स आणि हेल्प या बटनांच्या खाली नेता येते . त्यासाठी ' आयई ७ प्रो ' हा प्रोग्राम डाऊनलोड करावा लागतो . पण त्याविषयी नंतर कधीतरी .

हे तसे पुरेसे आहे . तुमचा लिंक्स टूलबार व्यवस्थित अॅरेंज केलेला असेल तर इंटरनेट वापरायला सोपे जाते . या सगळ्या रचनेत तुम्हाला आणखी काही टूलबार डाऊनलोड करता येतात . गूगल , याहू आणि एमएसएन हे ते तीन मुख्य टूलबार आहेत . त्यांच्यात्यांच्या सेवा ग्राहकांना ताबडतोब उपलब्ध व्हाव्यात म्हणून हे टूलबार आहेत . उदा . गूगल टूलबार डाऊनलोड केला तर गूगलच्या सर्व सेवा तुम्हाला एकाच दृष्टिक्षेपात मिळतात . केवळ गूगलच नव्हे तर इतर असंख्य सुविधा एका नजरेत मिळतात . या टूलबारवर ' अॅड टूलबार बटन्स ' असे एक बटन आहे . ते क्लिक केले की असंख्य लिंक्सचा पर्याय उपलब्ध होतो . ज्या लिंक तुम्हाला हव्या आहेत त्या अॅड केल्या की मुख्य टूलबारमध्येच त्या दिसतात . अन्यथा सर्चची सोय होते , बुकमार्क दिसतात .

पेज रँक नावाची अनोखी सुविधाही आहे . तुम्ही पाहात असलेले पेज किती सुरक्षित आहे , ते किती लोक पाहतात ( म्हणजेच ते किती लोकप्रिय आहे ) वगैरेची माहिती यात कळते . शिवाय याच बटनात ' सिमिलर साइट्स ' म्हणून लिंक आहे . समजा तुम्ही एखादी साइट पाहात आहात आणि त्याच साइटसारख्या अन्य कोणत्या साइट्स उपलब्ध आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर ' सिमिलर साइट्स ' वर क्लिक करा . ताबडतोब तशा साइटची यादी तुमच्यासमोर हजर होईल . मी रिडिफ डॉट कॉम ही साइट ओपन केली आणि मग ' सिमिलर साइट्स ' वर क्लिक केले . ताबडतोब बातम्यांच्या विविध साइट्स समोर आल्या . पण गंमत म्हणजे जेव्हा जीमेल ओपन केले व ' सिमिलर साइट्स ' वर क्लिक केलेे तेव्हा अन्य ईमेल सेवा समोर आल्या नाहीत , तर फक्त गूगलच्याच सेवा दिसल्या .

यापेक्षा वेगळ्या सोयी याहू व एमएसएनच्या टूलबारवर मिळतील . तिन्ही टूलबार एकाचवेळी वापरण्याची काहीच गरज नाही . कारण त्यामुळे ब्राऊझरमध्ये निष्कारण गर्दी होईल . पण तीनही टूलबार वापरून पाहा , त्यातला जो उपयोगी वाटेल तो वापरा . प्रत्येकात काही ना काहीतरी अतिरिक्क्त सोयी आहेतच . याहूच्या टूलबारवर तुमचे मशीन स्पायवेअरसाठी स्कॅन करण्याची सोय आहे . तो फुकटात करता येतो . याहू व एमएसएन टूलबारवरही बातम्या , सर्च आदि मूलभूत सुविधा आहेतच . ज्या टूलबारवर अधिक सोयी आहेत तोच वापरा . याच तीनपैकी एक वापरायला हवेत असे नाही . आणखीही बरेच टूलबार उपलब्ध आहेत . तेही डाऊनलोड करू शकता . त्याविषयी पुढच्या आठवड्यात .

'अॅलर्ट' राहा! 12 Nov 2007,

वेबसाइट सतत अपडेट होत असते . त्यामुळेच चोखंदळ वाचक हाती पेपर किंवा साप्ताहिक असूनही वेबसाइट बघतातच . ज्यांना विशिष्ट विषयावरील बातम्यांतच रस आहे , त्यांच्यासाठीसुद्धा वेबसाइटवर एक सोय असतेच .
......
मागच्या वेळेस आपण बातम्यांच्या जगाची झलक पाहिली . ' वॉल स्ट्रीट जर्नल ' आणि ' न्यूयॉर्क टाइम्स ' ने वाचकांसाठी आपली वेबसाइट खुली करून दिल्याचे आपण पाहिले . त्यांनी हे पाऊल उचलले , मग त्यांचे प्रतिस्पर्धी मागे कसे राहतील ? म्हणूनच या पावलावर पाऊल टाकून ' फायनॅन्शिअल टाइम्स ' नेही आपली वेबसाइट अंशत : फुकट करून देण्याचे ठरविले आहे . आथिर्क विषयातील सर्वात महत्त्वाची साइट म्हणून ही ओळखली जाते . सध्या त्यांचे एक लाख एक हजार सभासद आहेत . वाचकांकडून पैसे घेण्याची प्रथा त्यांनी २००२पासून सुरू केली . अमेरिकेतील वाचकांकडून वर्षाला ११० डॉलर ( सुमारे ४४०० रुपये ) व युरोपीय देशांतील वाचकांकडून १७० ( सुमारे ६८०० रुपये ) डॉलर घेतले जातात . आता वाचकांना काही प्रमाणात फुकटात वेबसाइट पाहता येईल . वाचकाने साइटवरच्या पाच बातम्यांवर क्लिक केले की त्याला नाव रजिस्टर करायला सांगण्यात येईल . मग तो पुढे ३० दिवसांत आणखी २५ बातम्या वा लेख फुकटात वाचू शकेल . नंतर मात्र त्याला पैसे भरावे लागतील . ते भरायचे नसतील तर पहिली बातमी पाहिली तेव्हापासून ३० दिवस थांबावे लागेल . ते पूर्ण झाले की पुन्हा ३० बातम्या वा लेख फुकटात वाचता येतील . हे वाचकांसाठी पूर्ण समाधानकारक नाही हे मान्य . पण अगदी काहीच वाचायला मिळत नव्हते , मग एवढेतरी असे म्हणून वाचक दुधाची तहान ताकावर भागवून नेतील . या ३० क्लिक्स नेमक्या कशावर करायच्या ते काळजीपूर्वक पाहिले की याचा बऱ्यापैकी लाभ उठविता येईल .

आथिर्क व राजकीय विषयाला वाहिलेले ' इकॉनॉमिस्ट ' हे साप्ताहिक मात्र पूर्ण मोफत उपलब्ध नाही . पण बरेचसे लेख पैसे न भरता वाचायला मिळतात . या साप्ताहिकाची वर्गणी भरली की वेबसाइट फुकटात पाहता येते . भारतातल्या काही साप्ताहिकांनी हीच रीत अवलंबली आहे . वेबसाइटवर साप्ताहिकाचा वर्गणीदार क्रमांक दिल्यावर साइट फुकटात वाचता येते . साप्ताहिक हातात असल्यावर वाचक वेबसाइट का पाहतात असा प्रश्न उपस्थित होईल . त्याचे उत्तर असे की वेबसाइटवर अतिरिक्त लेख व बातम्या वाचायला मिळतात . साप्ताहिक अपडेट होत नसते , एकदा अंक आला की पुढच्या अंकाची वाट पाहावी लागते . वेबसाइट कोणत्याही क्षणी अपडेट करता येते . म्हणूनच साप्ताहिकांमध्ये ' वेब ओन्ली आटिर्कल ' अशा नावाने जाहिरातीही असतात . दुसरे असे की अंकात एखादा लेख वा मुलाखत संक्षिप्त स्वरूपात असेल तर वेबसाइटवर तो पूर्ण स्वरूपात वाचता येतो .

वेबसाइटना मिळणाऱ्या जाहिरातींत गेल्या तीन वर्षांत कमालीची वाढ झाली आहे हे या साइट फुकट उपलब्ध करून देण्यामागील उघड गुपित आहे . वेबसाइट ' पेड ' असेल तर वाचक तिकडे वळत नाहीत , असा सर्वसाधारण अनुभव आहे . मग कितीही चांगली वेबसाइट केली तरी त्याचा फायदा होत नाही . जाहिराती कमी होत्या , तेव्हा वाचकांकडून पैसे घेण्यात मतलब होता . आता परिस्थिती बदलल्याने साइटसाठी पैसे घेण्याची प्रथा सगळ्यांनाच बंद करावी लागेल .

ज्यांना जगातल्या सर्वच बातम्यांमध्ये रस असेल त्यांना विविध वर्तमानपत्रांच्या साइटचा उपयोग होतो . पण एखाद्याला अशा कोणत्याही वेबसाइटवर जायचे नसेल पण बातम्या नियमितपणे पाहायच्या असतील तर ? आणि सगळ्या विषयांत जाण्याऐवजी एखाद्याच विषयात रस असेल आणि त्यांच्याच बातम्या वाचण्यात रस असेल तर ? मग या वर्तमानपत्रांची न्यूजलेटर्स आपल्या इनबॉक्समध्ये मागवायची . त्यासाठी रजिस्टर करताना आपल्याला नेमक्या कोणत्या बातम्या हव्या आहेत त्यावर क्लिक करायचे . म्हणजे हव्या त्याच बातम्या वाचायला मिळतील व बातम्यांच्या ढिगाऱ्यातून नेमकी हवी असलेली बातमी शोधण्यात वेळ जाणार नाही . पण काही वृत्तपत्रांच्या न्यूजलेटरमध्ये अधिक चॉईस नाही . ते ज्या बातम्यांची पॅकेजेस देतील , त्याच बातम्या वाचायला लागतात . यावर उपाय काय ?

अशावेळी गूगल आपल्या मदतीला धावून येते . गुगल डॉट कॉम ही साइट ओपन करा . त्यातील न्यूज या लिंकवर क्लिक करा . तुम्हाला ज्या विषयाचा सर्च करायचा असेल , ते टाइप करा . हवे असलेले सर्व रिझल्ट तुमच्यासमोर येतील . पण हे झाले तोपर्यंत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वा लेखांचे . तुम्हाला रोज याच विषयावरील ताज्या बातम्या हव्या असतील तर ? रोज सर्चमध्ये जाण्याची गरज नाही . मगाशी न्यूजवर क्लिक केल्यावर जे रिझल्ट आले असतील त्याच्या सर्वात शेवटी ' गेट द लेटेस्ट न्यूज ऑन ( तुमचा सर्चचा विषय ) गूगल अॅलर्ट ' असा मेसेज येईल . त्यावर क्लिक करा . दुसरी विंडो ओपन होईल . तिथे आवश्यक ते तपशील भरा . सर्चचा विषय , टाइप ( म्हणजे तुम्हाला या विषयावरच्या बातम्याच हव्यात , व्हीडिओच हवाय अथवा ब्लॉगच हवेत . सर्व हवे असले तर ' कॉम्प्रिहेन्सिव्हवर ' क्लिक करा ), हे अॅलर्ट रोज हवेत , संबंधित घटना घडल्यावर हवेत की आठवड्यातून एकदाच हवेत ते स्पष्ट करा , नंतर तुमचा ई - मेल पत्ता द्या . क्रिएट अॅलर्टवर क्लिक करा आणि निर्धास्त राहा . तुम्हाला हव्या असलेल्या बातम्या रोज ( अथवा तुम्हाला आठवड्यातून एकदा हव्या असल्यास तशा ) तुमच्या मेलच्या इनबॉक्समध्ये येउन पडतील . याचा जादा फायदा असा की या विषयावरच्या विविध वर्तमानपत्रांच्या बातम्या तुम्हाला एकत्रित स्वरूपात वाचायला मिळतील . त्यासाठी वेगवेगळे पेपर वाचायला नकोत .

अर्थात हे जग बातम्यांपुरते मर्यादित राहात नाही . ब्लॉग हवे असतील तर ते मिळतात . अक्षरश : काहीही मिळते . म्हणूनच या अॅलर्टना रजिस्टर करून ठेवले की आपले बरेचसे काम होते . सर्चचा विषय वेगवेगळ्या माणसांची प्रोफाइल्स असा असेल तर रोज जगभरात प्रसिद्ध होणारी प्रोफाइल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येउन पडतील . मग रोज नाना विषयातील विविध स्वभावाच्या माणसांची आवश्यक ती माहिती वाचता येईल .

बातम्यांचे जग 12 Nov 2007,

इंटरनेटवर जाऊन पेपर वाचण्याचा ट्रेंड आता निर्माण झाला आहे . वाचकांच्या गरजेतून निर्माण झालेल्या या ट्रेंडचे भान अनेक वर्तमानपत्रांनाही आले आणि त्यांनी आपल्या इंटरनेट एडिशन अधिक रिडर्स फ्रेंडली केल्या .
.....
इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे असे म्हटले जाते ते खरेच आहे . यातला बराचसा स्त्रोत हा सर्च इंजिन हाच असतो . एखादी माहिती नेमकी कोणत्या साइटवरून मिळवायची हे माहीत नसले की सर्च इंजिनचा आधार घ्यावा . आपोआप तुम्हाला त्या लिंकवर नेण्यात येते . पण थेट मूळ लिंकवर जायची सवय लावलीत तर आपला सर्च अधिक सोपा व वेगाने होतो .

तुम्हाला बातम्यांसाठी सर्च द्यायचा असेल , तर सर्च इंजिनचा वापर करण्याऐवजी त्या त्या वर्तमानपत्राच्या साइटवर जाऊन शोध घेतला तर अधिक चांगले होईल . हातात पेपर धरून तो वाचणे यातला आनंद काही वेगळाच असतो हे खरे ; पण नेटवरच पेपर वाचण्याचा ट्रेंड गरजेतून निर्माण झाला आहे . गरज अशा अर्थाने की जादा पेपर घरात घेऊन ते वाचत बसायला कोणालाही वेळ नसतो . अशावेळी सवडीने नेटवर आवश्यक तेवढ्याच बातम्या वाचण्याकडे लोकांचा कल असतो . भारताबाहेरचे मराठीजन महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे मराठी पेपर आवडीने वाचत असतात . त्यांना दुसरा पर्याय नसतो हे एक कारण झाले ; पण ते एकावेळी असंख्य पेपर वाचू शकतात , महत्त्वाचे तेवढेच पाहतात हेही कारण आहे . म्हणूनच वर्तमानपत्रांच्या साइट माहीत असणे आवश्यक आहे . ' महाराष्ट्र टाइम्स ' चीही साइट आहे . तिचा पत्ता : maharashtratimes.com असा आहे . रोज ती साइट काही लाख लोक पाहत असतात , महाराष्ट्रातील वा एकंदरितच देशातील प्रमुख घडामोडींशी आपला संबंध राहील हे पाहात असतात . ही साइट पाहण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत . भारतातल्या कोणत्याच पेपरने वाचकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला नाही .

' टाइम्स ऑफ इंडिया ' सह काही भारतीय पेपरनी ' ई - पेपर ' नावाने सुविधा सुरू केली आहे . त्यात आपल्याला पेपरची पाने जशीच्यातशी दिसतात . ती जणू हातातच पेपर आहे अशा पद्धतीने वाचताही येतात . चेन्नई मुख्य केंद असणाऱ्या ' हिंदू ' दैनिकाने ई - पेपरसाठी पैसे आकारणे सुरू केले आहे . पण बाकीचे ई - पेपर फुकटात वाचायला मिळतात .

परदेशांतील काही वर्तमानपत्रांनी वाचकांना पैसे आकारून साइटला अॅक्सेस ठेवला होता . पैसे न भरणाऱ्या वाचकांना काही बातम्या वाचता येत ; पण महत्त्वाच्या बातम्या अथवा विश्लेषणात्मक लेख मात्र वाचता येत नसत . ' इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून ' आणि ' द न्यूयॉर्क टाइम्स ' या दोन पेपरनी वाचकांकडून वर्षाला २०२८ रुपये घेऊन पूर्ण साइट उपलब्ध करून दिली होती . बाकीच्या वाचकांना ती अंशत : उपलब्ध होती . रोज ' न्यूयॉर्क टाइम्स ' सुमारे आठ लाख लोक पाहतात . त्यापैकी सव्वादोन लाख लोक पैसे भरतात . त्यातून त्यांना सुमारे ४० कोटी रुपये मिळतात . पण गेल्या आठवड्यात त्यांनी या पैशांवर पाणी सोडण्याचे ठरविले आणि साइट वाचकांसाठी फुकटात उपलब्ध करून दिली . अर्थात यातून झालेला तोटा ते साइटवरील जाहिरातींतून भरून काढतील . हा निर्णय त्यांनी का घेतला ? त्यांना असे आढळले की साइट फुकट नसल्याने बरेचसे वाचक थेट या साइटवर येत नाहीत . ते सर्च इंजिनचाच आधार घेतात . तिथून वाचक पेपरची लिंक घेतात . ती लिंक महत्त्वाची असली व फुकटात उपलब्ध नसली तर वाचक त्या पेपरकडे पुन्हा जात नाहीत . म्हणून साइटच मोफत करण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला .

अन्य काही वृत्तपत्रांनी मात्र हा ' फुकट ' चा मार्ग अवलंबलेला नाही . ' द वॉल स्ट्रीट जर्नल ' हे दैनिक नुकतेच रूपर्ट मरडॉक यांनी विकत घेतले आहे . त्यांना वाचकांकडून सुमारे २७५ कोटी रुपये मिळतात . पण आता ते वाचकांना ही साइट मोफत उपलब्ध करून द्यावी का , याचा विचार करताहेत . ' द फिनॅन्शिअल टाइम्स ' हा आथिर्क घडामोडींवरचा पेपर महत्त्वाच्या बातम्यांसाठी वाचकांकडून पैसे घेतो . बाकी बातम्या कोणालाही उपलब्ध असतात . ' द लॉस इंजेलिस टाइम्स ' चे उदाहरण महत्त्वाचे आहे . त्यांनी २००५पासून वाचकांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली . त्याबरोबर वाचक इतक्या कमी वेळा साइटवर जायला लागले की त्यांनी ताबडतोब ही योजना बंद करून साइट सर्वांसाठी उपलब्ध करून दिली .

अर्थात या सर्व पेपरची साईट माहीत असणाऱ्यांच्या गोष्टी . पेपरची साइट माहीत नसेल तर एकदा सर्च इंजिनमध्ये जाऊन सर्च द्या . ती साइट मिळाली की तिचा बुकमार्क करून ठेवा . साधारणपणे पेपरचे नाव व पुढे डॉट कॉम अशी ती साइट असते . पेपरचे नाव मोठे असल्यास त्याचा शॉर्टकट केला जातो . उदाहरणार्थ , आधी उल्लेख केलेल्या इंंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यूनच्या साइटचे नाव iht.com असे आहे . लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या टाइम्स वृत्तपत्राची साइट आहे www.timesonline.co.uk/tol/global/

परदेशांतले हे पेपर वाचून असंख्य नव्या गोष्टी आणि त्या - त्या देशातली विचार करण्याची पद्धत कळते . मुख्य म्हणजे आपल्याकडे एखादी बातमी ज्या पद्धतीने प्रसिद्ध होते , तीच बातमी परदेशांत कशा पद्धतीने दिली जाते हे वाचणे मनोरंजक ठरते . या साइटवरून ' न्यूजलेटर्स ' नावाची अत्यंत उपयुक्त सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे . तेथे तुमचा ई - मेल रजिस्टर केला की रोजच्या रोज महत्त्वाच्या बातम्या तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पडतील . मग त्या पेपरच्या साइटवर मुद्दाम जाण्याची गरज भासणार नाही .

एका साइटचे नाव देतो . तेथे रोज सुमारे ४५० वर्तमानपत्रांची पहिली पाने पाहाता येतील . अगदी फुकटात . www.newseum.org इथे जाऊन पाहा आणि बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पुढे येतात ते . निदान जगभरात पहिले पान किती वेगवेगळ्या प्रकारे तयार होते ते तरी कळेल .

गूगलची भरारी 12 Nov 2007,

दहा वर्षांपूर्वी एका उद्योगपतीने दिलेल्या मदतीमधून लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी ' गूगल ' ची निमिर्ती केली . त्या घटनेला नुकतीच दहा वर्षं झाली . या काळामध्ये गूगलने स्वत : ची अशी एक दुनिया तयार केली आणि तिला विश्वासार्हतेची बैठक मिळवून दिली ...

.............

गेल्या शनिवारी गूगलचे दशक पूर्ण झाले . बरोबर दहा वर्षांपूर्वी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या २४ वर्षांच्या तरुणांनी एका गॅरेजमधून सुरू केलेले हे गूगल आज केवळ दहा वर्षांत मायक्रोसॉफ्टला समर्थ पर्याय म्हणून उभे राहिले आहे . ते सुरू झाले तेव्हा दोन्ही निर्मात्यांची कल्पनाही एवढी पुढे गेली नसेल तितके हे गूगल पुढे गेले आहे . त्याचे वर्चस्व एवढे आहे की जणू दुसरी सर्च इंजिन्स अस्तित्त्वात आहेत याचाच विसर लोकांना पडला आहे . १५ सप्टेंबर १९९७ला गूगल हे नाव रजिस्टर झाले . प्रत्यक्षात कंपनी रजिस्टर झाली ती वर्षभराने म्हणजे सात सप्टेंबर १९९८ रोजी . कंपनीचा दशकपूर्ती सोहळा होईल , तेव्हा ही कंपनी आणखी पुढे गेली असेल . तेव्हा कदाचित गूगल ऑफलाइन ( इंटरनेट चालू नसतानाही गूगल उपलब्ध होईल ) वापरता येईल , त्यांनी बनविलेले मोबाइल फोन बाजारात असतील व त्यावर गूगलचे सर्व सॉफ्टवेअर उपलब्ध असेल . खरे म्हणजे गूगल किती पुढे जाईल याची कल्पना आपण करू शकत नाही .

मुळात गूगलची कल्पना केवळ सर्च इंजिन एवढीच होती . त्यासाठी त्यांना प्रचंड डाटा बँक करावी लागली . जगातल्या प्रत्येक साइटशी संपर्क ठेवून त्यांची पाने प्रत्येक शब्दासह लक्षात ठेवणे त्यासाठी गरजेचे होते . आपण कोणत्याही शब्दांचा सर्च केला की तो शब्द इंटरनेटवर शोधायला काही क्षण लागतात तेव्हा आपल्याला त्याचे रहस्य पटकन कळत नाही . पण आपण सर्चवर क्लिक केल्यापासून ते सर्व रिझल्टस् समोर येईपर्यंतच्या काळात वेगवेगळी प्रक्रिया घडत राहते . तुमचा सर्चवर्ड गूगलच्या र्सव्हरवर पाठविला जातो , तेथील डाटाबँकमध्ये त्या शब्दांना जुळणारे शब्द शोधले जातात व ते र्सव्हरकडे पाठविले जातात . र्सव्हर ते तुमच्या स्क्रीनवर उमटेल अशी व्यवस्था करतो . हे सारे काही क्षणांत घडते . ते किती वेगात घडते ते पाहा . मी न्यूज विभागात जाऊन ' सचिन तेंडुलकर ' असा सर्च दिला . तेव्हा केवळ ० . २६ सेकंदात ३६०९ बातम्या माझ्या समोर आल्या . त्यातल्या बऱ्याचशा बातम्या रिपिट होत्या . म्हणजे नीट सर्च दिला तर कमी बातम्या येऊ शकल्या असत्या . हा शोध बातम्यांच्या महत्त्वानुसार घेता येतो , अथवा तारीखवारही घेता येतो . पण महत्त्वानुसार घेतलेला अधिक चांगला . त्यासाठी ' सॉर्ट बाय रिलेव्हन्स ' वर क्लिक केले असले पाहिजे .

गूगलच्या लोकप्रियतेची चाचपणी केली असता चीन , जपान व रशिया हे तीन देश सोडून सर्व देशांमध्ये बहुतांशपणे गूगलच वापरले जाते असे दिसून आले . तेथील किमान ५० कोटी लोक रोज गूगलचे सर्च इंजिन वापरतात . गूगलच्या इतर सेवा वापरणारे लोक वेगळे . गूगल इतक्या कमी कालावधीत लोकप्रिय होण्याचे कारण काय ? ते लोकांना हव्या असलेल्या जवळपास प्रत्येक सुविधा पुरविण्यात यशस्वी झाले , म्हणून त्यांची भरभराट झाली असेच त्यावरचे उत्तर असेल .

आथिर्क बाजू गूगलने चांगलीच सांभाळली . तीन वर्षांपूर्वी गूगलचा शेअर ८५ डॉलरला विकला जात होता . आज त्याची किंमत ५२५ डॉलरच्या घरात आहे . त्यांची स्टॉक माकेर्ट व्हॅल्यू १६४ अब्ज डॉलर इतकी आहे . ज्या सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांच्या हातात दहा वर्षांपूर्वी एका उद्योगपतीने दहा हजार डॉलर ठेवले व तुमच्या कल्पनेतला उद्योग सुरू करा असे सांगितले त्यांची ही उलाढाल पाहून त्यांच्या उद्यमशीलतेचा गौरव करावासा वाटतो . तो दहा हजार डॉलरचा चेक बँकेत ठेवायचा तर त्यांचे बँकेत खातेच नव्हते . ते या चेकसाठी उघडावे लागले . वैयक्तिक बँक खात्यात तो चेक टाकणे त्यांना मान्य नव्हते आणि कंपनी रजिस्टर नसल्याने कंपनीच्या नावाने खाते उघडले नव्हते . त्यांची सुरूवात अशी ( दुसऱ्यांनी दिलेल्या ) दहा हजार डॉलरनी झाली . ती हजारो पटींनी वाढवून दाखविली .

गूगलने सर्च रिझल्टच्या बाजूला जाहिराती देऊन वेगळीच क्रांती घडवून आणली . या जाहिरातीही तुमच्या सर्चशी संबंधित असल्याने त्याची लोकप्रियता वाढली . सर्च इंजिनच्या पलीकडे जाऊन गूगल खूपच विस्तारले आहे . जीमेल ही मेलसेवाही तितकीच लोकप्रिय आहे . तिच्या यशाने अन्य इमेल सेवा पुरवठादारांना खडबडून जागे व्हावे लागले व त्यांनाही तितक्याच तोडीच्या सेवा द्याव्या लागल्या . असे असले तरी गूगलबद्दल तक्रारी काही कमी नाहीत . तुमची सर्व माहिती गोपनीय राहते असे तुम्हाला वाटत असले तरी ते शक्य नाही . तुम्ही कोणकोणत्या साइट पाहता ते नोंदविले जात असते . अन्य खासगी माहितीही नोंदविली जाते . यातून सुटका नाही . थोडक्यात गूगलच्या दोन्ही बाजू आहेत . त्या तपासल्या तरी चांगल्या बाबी जास्त आहेत हे लक्षात घ्यायला हवे . गूगलवर कोणत्या आधुनिक सेवा आहेत ते पाहायचे असेल तर ब्राऊझरमध्ये गूगल . कॉम टाइप करा . इंग्रजीबरोबरच ते मराठीतही उपलब्ध आहे हे पाहून तुम्हाला आनंद होईल . मात्र ती सुविधा सर्व मशीन्समध्ये असतेच असे नाही , हे लक्षात घ्या . त्यासाठी तुमच्या मशीनमध्ये मराठी फाँट असले आणि सेटिंग्जमध्ये सर्व ते योग्यपणे सेट केलेले असेल , तर मग मजाच येते . या गूगल . कॉमवर जाऊन ' मोअर ' वर क्लिक केले की गूगलची दुनिया खुली होईल .