photo

Wednesday, July 30, 2008

फण्डा इंग्रजीचा

एमबीएसाठी कॅटची तयारी करताना इंग्रजी व्होकॅब्युलरीचाही सराव करावा लागतो. त्यासाठी अवांतर वाचनाबरोबरच विविध शब्द लक्षात ठेवणं आवश्यक असतं. इंग्रजीमध्ये टागेर्ट स्कोअर करताना व्होकलायझेशन, रिग्रेशनची योग्य पद्धत आत्मसात करून व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी वर्ड लिस्ट आणि फ्लॅश कार्डसारख्या सोप्या युक्त्या वापरता येतील.

* मनोधारणा/आवड ( mindset/interest )

आपल्यापैकी जवळजवळ सगळेच जण ४०० शब्द प्रति मिनिट, या वेगाने वाचतो. फरक एवढाच की हा वेग आपल्या आवडी-निवडीच्या विषयांबरोबर समप्रमाणात असतो. आणि आपल्या आवडीचे विषय हे खूपच थोडे असतात. 'कॅट'मध्ये एका विशिष्ट विषयावरचेच उतारे येतील, असं समजणं चुकीचं आहे. समाजशास्त्रापासून ( social science ) ते विज्ञानापर्यंत, अर्थशास्त्रापासून ( economics ) ते इंजिनीअरिंगपर्यंत थोडक्यात जगातल्या कुठल्याही विषयाशी संबंधित, वेगवेगळी पार्श्वभूमी असणारे पाच किंवा त्यापेक्षा जास्त उतारे परीक्षेमध्ये असतात.

तर पहिला अडथळा कोणता? तर काही विषयांबरोबर आपण करत असलेला पक्षपातीपणा. ज्या विषयांमध्ये रस नसतो ते वाचताना आपला वाचनाचा वेग मंदावतो. त्यामुळे आपण जे काही वाचत आहोत त्यामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. वाचनाचा वेग राखण्यासाठी चिकित्सकपणा आणि वाचनाची तीव्र इच्छा असणं गरजेचं आहे.

याचा श्रीगणेशा करण्यासाठी काय करता येऊ शकेल? तर आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राव्यतिरिक्त इतर विषयांशी संबंधित कमीतकमी एक लेख तरी प्रत्येक आठवड्याला वाचावा. त्या विषयाच्या मुळाशी घेऊन जाणारी पुस्तकं किंवा लेख वाचण्यास सुरुवात केली तर वाचन खूप सोपं होईल.

* व्होकलायझेशन ( vocalization)

व्होकलायझेशन म्हणजे मोठ्याने वाचणं. वाचताना जिभेची होणारी हालचाल हा व्होकलायझेशनचाच एक भाग आहे. व्होकालायझेशनमुळे लक्षात येतं की तुमच्या बोलण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तुम्ही वाचू शकत नाही आणि म्हणूनच मोठ्याने वाचणं ताबडतोब थांबवा. व्होकलायझेशन थांबवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तोंड बंद ठेवणं. वाचताना दातांमध्ये पेन्सिल ठेवा म्हणजे तुम्ही मोठ्याने वाचणार नाही.

* परागती ( regression)

अनेकदा काही ओळी वाचल्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्याला हे नीटसं कळलं नाहीय आणि आपण ते पुन्हा एकदा वाचतो किंवा उताऱ्यावरचे प्रश्न सोडवताना आपण त्या उताऱ्याकडे परत गेलोय आणि आपलं उत्तर निश्चित केलंय? यालाच रिग्रेशन म्हणतात. रिग्रेशनमुळे आपण तो उतारा दीड वेळा वाचतो आणि म्हणून आपला वाचताना वेग दोन तृतीयांश पटीने मंदावतो. एखादी ओळ न समजणं, पुन्हा वाचणं हे ताबडतोब आणि जाणीवपूर्वक थांबवलं पाहिजे. एखाद्या वाक्यामुळे उताऱ्याबद्दल काहीच कल्पना येत नाहीय, असं फार अभावानेच घडतं. एखादं वाक्य कळलं नाही तरी वाचणं थांबवू नका. तर्काने त्या वाक्याचं अर्थ कळण्याची शक्यता खूप असते.

घटनात्मक प्रश्नांची उत्तरं शोधताना पुन्हा उतरा बघणं ठीक आहे कारण ती घटना कुठे आहे हे तुम्हाला अचूक माहीत असतं आणि ते वेळखाऊ नसतं. पण तुम्हाला तुमच्या उत्तराबद्दल पूर्ण खात्री असल्यास पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी उतारा वाचू नका.

तर्कशास्त्रावरच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा उतारा वाचणं टाळलं पाहिजे. बरेचदा तो विशिष्ट भाग पुन्हा वाचूनही प्रश्न सुटत नाही.

* शब्दसंपत्ती ( vocabulary)

स्पर्धात्मक एमबीए प्रवेश परीक्षा पास होण्यासाठी शब्दांचा उत्तम खजीना तुमच्याकडे असणं पूर्वापेक्षित असतं. चांगल्या आणि दांगड्या वाचनाच्या सवयीची परिणिती. भरपूर शब्दांचा संग्रह गाठीशी असण्यात होते. म्हणूनच शब्दसंपत्ती वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रमुख म्हणजे वाचन.

शब्दसंचय वाढणं ही संथ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. प्रथम तुम्ही तुमची व्होकेब्युलरी किती आहे ते बघा. स्वत:च्या व्होकॅब्युलरीची परीक्षा घ्या. रीडर्स डायजेस्टमध्ये अशा टेस्ट्स असतात. किंवा मग कोणत्याही word list ३० शब्द उचला आणि तुम्हाला त्यापैकी किती माहीत आहेत हे बघा.

जर का तुम्हाला १८ पेक्षा जास्त शब्द माहीत असतील तर सरळ word list पाठ करायला सुरुवात करा. केण्ट मटेरिअल सोबत अशा word list मिळतात. आजकाल बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत जी तुमची व्होकॅब्युलरी वाढवायला मदत करतात. एकाच वेळी ५० शब्द करण्याच्या प्रयत्नात वेळ वाया घालवू नका. कारण दुसऱ्या दिवशी त्यापैकी जास्तीत जास्त अर्धे शब्द तुम्हाला आठवतील.

याशिवाय word list कधीही क्रमाने पाठ करू नका. कारण तशी पाठ करताना, याच्या पुढचा शब्द म्हणजे हा, वरून अमक्या नंबरच्या या शब्दाचा हा अर्थ. अशाप्रकारे ती लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. आणि जेव्हा तोच शब्द उताऱ्यांमध्ये येतो तेव्हा तो आठवण जिकिरीचं होतं.

word list वापरताना १०-१५ शब्द कसेही निवडा आणि त्याची flash cards बनवा. म्हणजे एका बाजूला तो शब्द आणि त्याच्या उलट्या बाजूला त्याचा अर्थ. जिथे तुम्ही जाल तिथे ही कार्ड्स तुमच्या सोबत असू द्या. दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी ही कार्ड्स नजरेखालून घाला. दुसऱ्या दिवशी नवीन कार्ड्स बनवा.

जुन्या कार्ड्सची उजळणी करा आणि नवीन पाठ करा. तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन लिस्ट्सची उजळणी करा आणि नवीन यादी पाठ करा. चौथ्या दिवशी पहिली यादी सोडून बाकीच्या याद्यांची उजळणी करा आणि नवीन यादी करा. तुम्ही एका वेळी तीन याद्यांचा अभ्यास करत असणार, दोन आधीच्या आणि एक नवीन. प्रत्येक यादी तुम्ही दिवसातून तीन वेळा असं तीन दिवस करत असणार. शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रक्रिया संथ असली तरी पुष्कळ फायद्याची आहे.

No comments: