photo

Sunday, July 27, 2008

रिटेल...जॉब्सची नवी खाण

महिन्यागणिक रस्तोरस्ती नवं मॉल उभं राहतंय. रिलायन्स, टाटा अशा अनेक बड्या कंपन्या रिटेल दुकानांच्या चेन्स उघडताहेत. या रिटेल बूममध्येच दडल्या आहेत जॉब्सच्या अनेक नव्या संधी. त्याचीच ही माहिती.

................

चकाचक ऑफिस. टकाटक स्टाफ. आरशासारख्या स्वच्छ आणि पॉश टाइल्स. अशा स्वप्नवत ऑफिसात आपणही कधी काम करू, अशी कल्पनाही एकेकाळी न करणारी अनेक तरुण मंडळी या ऑफिसांचा एक भाग झाली आहेत आणि महिन्याकाठी पुरेसे पैसेही कमावत आहेत. झपाट्याने विस्तारत असलेल्या रिटेल क्षेत्रानं असे ड्रीमजॉब प्रत्यक्षात आणले आहेत.

' जॉब'गंगा

एका अर्थी रिटेल क्षेत्राला जॉबगंगाच म्हणावं लागेल. मुंबईत, उपनगरांत अनेक मोक्याच्या जागी टोलेजंग मॉल उभे राहात आहेत. मॉल, सुपरमार्केट कल्चर मुंबईला लागून असलेल्या छोट्या शहरांत, अगदी ग्रामीण भागातही पोहोचलंय आणि उत्साहात स्वीकारलं गेलंय. तिथे धडाधड उभ्या राहणाऱ्या मॉल, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या संधीही वाढताहेत. रिटेलचा हिशोब चौरस फुटांप्रमाणे असतो. सर्वसाधारणपणे ३५० चौफुटांसाठी एक कर्मचारी लागतो. लाइफस्टाइल स्टोअर, हायपरमार्केट याप्रमाणे हा आकडा कमीजास्त होतो.

एकूण रिटेल क्षेत्राचा विचार केला तर तीन स्तरांवर मनुष्यबळ आवश्यक असतं- ऑपरेशन्स, सपोर्ट फंक्शन आणि व्हिज्युअल मर्चंडायजिंग. सपोर्ट फंक्शनमध्ये आयटी, अॅडमिनिस्ट्रेशन, एचआर असे विभाग येतात. त्यांचं काम अन्य कंपन्यांप्रमाणेच असतं. स्टोअर नेमकं केव्हा सुरू करायचं, माणसं केव्हा, किती आणि कोण घ्यायची, मार्केटिंग स्ट्रॅटेजी... असे काही निर्णय हे विभाग घेतात.

मर्चंडायजिंग हा यातला इंटरेस्टिंग भाग आहे. आपल्या ब्रँडकडे ग्राहकांचं लक्ष कसं वेधता येईल आणि ते खिळवून कसं ठेवता येईल याचा आटोकाट प्रयत्न यामध्ये सुरू असतो. मॉल किंवा स्टोअरमध्ये पाऊल टाकल्यापासून प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, वेधक असावी, यावर सगळ्यांचाच कटाक्ष असतो. वस्तू कशा मांडायच्या, किमती कशा लिहायच्या, कुठली उत्पादनं कुठे असावीत... सगळंच कसं नेटकं असावं लागतं. सौंदर्यदृष्टी, कल्पकता, क्रिएटिव्हिटी या सगळ्याचाच मेळ घालून ग्राहकांच्या मनाचा ठाव घेणारी रचना करण्याची जबाबदारी व्हिज्युअल मर्चंडायजिंगवाल्यांची असते.

No comments: