photo

Wednesday, July 30, 2008

ज्ञानकोशांच्या महाजालात!

नोकरीसाठी अर्ज करताना अचूक शब्द वापरणं फार महत्त्वाचं असतं. हे शब्द आणि त्यांच्या विविध अर्थच्छटा सांगण्यासाठी नेटवर तुमच्या मदतीला अनेक एन्सायक्लोपीडिया हजर आहेत. त्यांच्याविषयी:

नोकरीसाठी अर्ज करताना काय शब्द वापरावेत, हे बऱ्याच वेळेला सुचत नाही. बरे, सगळ्यांचे इंग्रजी चांगले असते असे नाही. म्हणजे एखादा इंग्रजी शब्द सुचला, पण तुमच्या अर्जासंदर्भात त्याचा अर्थ नेमका काय आहे हे कसे कळणार? नाहीतर अनेकदा शब्द बरोबर असतो, त्याचे स्पेलिंगही बरोबर असते, पण चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. मग अशावेळेस काय करावे? प्रत्येकाला डिक्शनरी जवळ बाळगणे शक्य नसते. बरं, ती बाळगली तरी तुम्हाला हवे असलेले शब्द त्यात असतीलच; असेही नाही.

यावर उपाय आहे ऑनलाईन एन्सायक्लोपीडियाचा. होय, कम्प्युटरवर काम करतानाच असे एन्सायक्लोपीडिया तुम्ही तपासू शकता. तुम्हाला हवा तो शब्द शोधू शकता, त्याचा नेमका अर्थ समजावून घेऊन मग तो वापरायचा की नाही ते ठरवू शकता. हे एन्सायक्लोपीडिया विषयानुरूपही आहेत वा सगळ्या विषयांतले शब्द एका ठिकाणी असलेलेही आहेत. हे शब्द जर डिक्शनरीत सापडणार असतील तर मग एन्सायक्लोपीडिया कशाला हवा, हा विचार मनातून काढून टाका. कारण एन्सायक्लोपीडियात विस्तारित व सचित्र माहिती पाहायला मिळते. त्यामुळे अर्थही नेमका कळतो.

असे कोणते एन्सायक्लोपीडिया ऑनलाइन मिळतात?

त्यातल्या काहींची ही झलक.

पहिला ब्रिटानिका. इथे बातम्या आहेत, ब्लॉग्ज आहेत, देशविदेशाची तपशीलवार माहिती आहे. शिवाय असंख्य विषयांवरचे ताजे लेख आहेत. तुमची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक ते सारे आहे. पण अर्ज लिहिताना हे सारे पाहण्यासाठी वेळ असतो कुठे? मग तुम्हाला हव्या असलेल्या शब्दाचा फक्त सर्च द्या. त्या शब्दाचे सारे कंगोरे तुमच्यासमोर उलगडतील. संबंधित लिंक्सही मिळतील. म्हणजे ज्याला अधिक खोलात जायचे असेल त्याला जाता येईल.

दुसरा आहे एमएसएन एन्कार्टा एन्सायक्लोपीडिया. ब्रिटानिकापेक्षा याचा लेआऊट वेगळा आहे. याच्या वरच्या भागांत एन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी, अॅटलास, कॉलेज अँड ग्रॅज्युएट स्कूल वगैरे विभाग आहेत. यात तुम्हाला शब्द आणि अर्थ याचा शोध घेणे सोपे जाते. असे विभागवार जायचे नसेल तर ब्रिटानिकासारखे फक्त सर्च द्या, की झाले काम. पण एक लक्षात घ्या, अर्ज लिहिताना शब्दांचा तांत्रिक अर्थ जाणून उपयोग नाही. एन्सायक्लोपीडियातली अधिक माहिती नेहमीच उपयोगी पडेल.

हायबीम एन्सायक्लोपीडिया हा नव्या प्रकारचा मार्गदर्शक आहे. एकच शब्द वेगवेगळ्या डिक्शनऱ्यांमध्ये कसा दिला आहे ते एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर हा एन्सायक्लोपीडिया वापरा. अल्फाबेटिकली एखादा शब्द निवडा. तो किमान दोन डिक्शनरी अथवा एन्सायक्लोपीडियात कसा दिला आहे हे तुम्ही लगेच ताडून पाहू शकाल. एका शब्दाचे अर्थ वेगवेगळे असणे हे फारसे होणार नाही, पण त्या अर्थातील सूक्ष्म फरक मात्र कळू शकतील. शिवाय 'हायबीम'वर वेगवेगळ्या विषयावरचे (रोज एक विषय निवडून) ताजे लेखही पाहायला मिळतील.

मेडलाईन एन्सायक्लोपीडिया हा नावाप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्राबाबतचा ज्ञानकोश आहे. वेगवेगळे आजार, विविध चाचण्या, निदाने, उपचार या संदर्भातील हा एन्सायक्लोपीडिया आहे. या साइटवर शब्दाच्या आद्याक्षरानुसार वैद्यकीय शब्दांचे अर्थ शोधू शकता. आता नोकरीसाठी अर्ज करताना किचकट वैद्यकीय शब्द कशाला लागतील असे विचारू नका. एखाद्या तेल कंपनीत अर्ज करताना ऑइली हेअर, ऑइली स्किन. हेअर ऑइल या शब्दांविषयी अधिक जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच रस असेल. तसेच एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये अर्ज करताना फेशिअल स्वेलिंग, फेस पावडर, फेशिअल ट्रॉमा वगैरेची माहिती उपयुक्त ठरू शकेल. एखाद्या हार्ट हॉस्पिटलमध्ये अप्लाय करताना चेस्ट पेन, चेस्ट एमआरआय वगैरेबद्दल माहिती असलेली बरी. म्हणजे नेमका कोणता शब्द कुठे वापरायचा ते कळेल.

याशिवाय ऑनलाईन अनेक एन्सायक्लोपीडिया मिळू शकतील. नेमके जाणून घ्या आणि मगच अर्ज फायनल करा.

No comments: