photo

Wednesday, July 30, 2008

कॉललेटरचा इनबॉक्स

व्हायरसच्या भीतीने काही कंपन्या अँटॅचमेण्ट स्वीकारत नाहीत. अशा वेळी जॉबच्या अँप्लिकेशनमध्ये तपशील कसा द्याल?... इन पर्सन अँप्लिकेशन हा काय प्रकार असतो? असा अर्ज कंपनीत जाऊन करताना कोणती काळजी घ्यावी?... इमेलद्वारे किंवा कम्प्युटरचा उपयोग करून जॉब अँप्लिकेशन करताना उपयोगात आलेल्या नव्या पद्धती आणि त्यासाठी करायची तयारी, यासाठीच या खास टिप्स...

............

नोकरीसाठी पाकिटातून अर्ज पाठवून देण्याची पद्धत आता इतिहासजमा झाली. आता आहे तो कम्प्युटरचा जमाना. त्यावरूनच रेझ्युमे किंवा पूर्ण अर्ज पाठवावा लागतो. यातही वेगवेगळ्या पद्धती रुढ आहेत. त्याची एक झलक 'प्रगती फास्ट' मॅगझिनच्या यापूर्वीच्या अंकात पाहिली. आपण रेझ्युमे कसा तयार करावा आणि तो ऑनलाइन कसा पाठवावा हे पाहिलं. नोकरीसाठी अर्ज देण्याचे आणखी काही प्रकार आहेत. नोकरीसाठी अप्लाय करताना कंपन्यांनी स्वत:च्या वेबसाइटवर सोय केलेली असते. तो फॉर्म भरून पाठवला की झालं. पण त्या शिवाय आणखीही काही मार्ग आहेत.

हा अर्ज तुम्ही संबंधित अधिका-यास (हा नेमका कोण ते आधी माहीत करून घ्या) इमेलने पाठवू शकता. इथे जो मजकूर पाठवायचाय त्याचा निश्चित फॉर्म नसल्याने इमेल तुम्हाला स्वत:लाच तयार करावा लागेल. म्हणून सुरुवातीलाच एक कव्हरिंग लेटर लिहा. हे पत्र लिहिण्याच्याही विशिष्ट पद्धती आहेत. त्या जाणून घ्या. विविध पुस्तकांत अथवा नेटवर याची माहिती मिळू शकेल.

हा इमेल स्वत: पुन:पुन्हा तपासून पाहा. त्यात स्पेलिंगच्या अथवा व्याकरणाच्या कोणत्याही चुका होऊ देऊ नका. कारण तुमचं हे 'फर्स्ट इम्प्रेशन' असतं. हा मजकूरच अतिशय बिनधास्तपणे लिहिलात तर नोकरी विसरून जा. कम्प्युटरमधल्या 'स्पेल चेक'वर विश्वास ठेवू नका. स्वत: सारा मजकूर चेक करा.

मजकूर मुद्देसूद हवा. फार तर तीन लहान परिच्छेद. स्वत:चं वर्णन मोजक्या शब्दांत करायला शिका.

पत्रात स्वत:चं नाव, पत्ता, फोन नंबर आणि इमेल न विसरता द्या. अन्यथा अर्ज चांगला, पण कोणी पाठविला हे कळणारच नाही, असं नको.

इमेलला तुमची सर्टिफिकेट्स अटॅच करा. त्यासाठी आधी त्यांचं स्कॅनिंग करावं लागेल. बहुतेकांच्या घरी ती सुविधा नसते. म्हणून बाहेरून एकदा ही सर्टिफिकेट्स स्कॅन करून घ्या आणि तीनचार ठिकाणी सेव्ह करून ठेवा.

काही कंपन्या अँटॅचमेंटमध्ये व्हायरस असेल म्हणून घाबरतात. अँटॅचमेंट नको असं निश्चित सांगितलं असेल तर इमेलवरच्या तुमच्या पत्त्याच्या खालीच तुमच्या सर्टिफिकेटचा तपशील नीट चार्टच्या स्वरूपात टाइप करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्येच हे चार्ट तयार करता येतात. नुसता एका ओळीत टॅब न देता वगैरे मजकूर देऊ नका.

सा-या मजकुरासाठी साधा फाँट वापरा. उगाच फॅशनेबल वा वेगवेगळे फाँट वापरून इमेल बटबटीत करू नका.

शक्य असेल तर या सा-या मजकुराचा प्रिंटआऊट काढा. तो कसा दिसतोय, शब्द कुठे वरखाली झालेत का, शब्द कुठे विनाकारण तुटतोय का वगैरे गोष्टी परत नजरेत येतील. त्या दुरुस्त करा.

हे सारं झालं, की हा मेल प्रथम स्वत:ला पाठवा. तो ओपन करून पाहा. फाँट व्यवस्थित आहे ना, मेल पाठवताना काही अनावश्यक कन्व्हर्जन झालं नाही ना, एखादं हेडिंग अनावश्यकपणे मोठं दिसतंय का, अथवा मजकुराचा फाँट साइझ बरोबर आहे ना, याची खात्री करून घ्या. मेल सर्वार्थाने ओके असेल तरच संबंधित कंपनीला पाठवा.

अर्जाचा आणखी एक प्रकार म्हणजे 'इन पर्सन' अँप्लिकेशन. स्वत: कंपनीतील संबंधित माणसाला प्रत्यक्ष जाऊन दिलेला अर्ज. तुम्ही कंपनीत जायचं, एचआरच्या अधिका-याला भेटायचं, तुमच्या पात्रतेचा जॉब आहे का ते विचारायचं. असल्यास तेथीलच एखाद्या कम्प्युटरवर मजकूर टाइप करून द्यायचा, असं सर्वसाधारण स्वरूप या 'इन पर्सन' अँप्लिकेशनचं असतं.

तुम्ही प्रत्यक्ष जात असल्याने तुमचे कपडे आकर्षक आणि योग्य ते हवेत हे ओघानं आलंच.. तुमचं प्रथमदर्शी रूप मोहवणारे नसेल तर तुम्हाला काम कधीच मिळणार नाही असं समजा.

अर्ज आयत्या वेळी टाइप करायचा असल्याने (बहुतांश कंपन्या रेडिमेड अर्जच स्वीकारत असल्या तरी) वर इमेल अँप्लिकेशनमध्ये घ्यायची काळजी इथेही घ्या.

हल्ली ब-याच कंपन्यांनी 'ऑन द स्पॉट' मुलाखती सुरू केल्या आहेत. तुम्ही अर्ज घेऊन जायचं, लगेचच तुमची मुलाखतही घेतली जाते. इथे डबल काळजी हवी. अर्ज नीटनेटका तर हवाच, पण मुलाखतीचं तंत्रही नीट जमायला हवं. ही मुलाखत कशी द्यावी हे संबंधित क्षेत्रातल्या लोकांकडून समजून घ्या.

अर्जाचा तिसरा प्रकार म्हणजे 'पार्ट टाइम जॉब'साठी अर्ज. कंपन्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. तिथे असंख्य वेगवेगळे विभाग असतात. त्यात काम करणा-यांची पात्रताही विभागानुसार बदलती असते. या विभागांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या असू शकतात. अलीकडे काही कंपन्यांमध्ये 'कर्मचा-यांच्या सोयीनुसार कामाच्या वेळा' अशी पद्धत आली आहे. म्हणजे असं की, समजा ड्युटी आठ ते चार अशी असेल पण कर्मचा-याला काही घरगुती कारणांमुळे अकरा वाजण्याच्या आत ऑफिसला येणं शक्य नसेल तर त्याने अकरा ते सात अशी ड्युटी करावी, अशी मुभा दिली जाते. अशा प्रकारच्या किती नोक-या आहेत, त्यात आपण फिट बसतो का, आपल्या वेळेनुसार काम करायला कंपनी राजी होईल का वगैरे बाबींचा तपास आधी लावा. मगच नेमक्या माहितीनिशी अर्ज करा.

आधीच्या सर्व अर्जप्रकारातील सर्व अटी इथेही पाळल्या गेल्या पाहिजेत. शिवाय आपण कोणत्या वेळेला नेमके काय काम करू शकतो याचाही तपशील पाहिजे.

ऑल द बेस्ट.

No comments: