photo

Saturday, July 26, 2008

करिअर ट्रॅक बदलताना...

23rd July 2008.


जॉब होपिंग तसं आपल्याला नवीन नाही. पण, हल्ली एखादा जॉब करत असताना, ते क्षेत्रच सोडून दुसऱ्याच एखाद्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेणारे अनेक जण आजूबाजूला पाहायला मिळतात. काही जण त्या क्षेत्राची बूम ओसरल्यामुळे, तर काही जण कामात न मिळणाऱ्या समाधानामुळे किंवा काही जण इतर क्षेत्रातील आकर्षक संधींमुळे चालू करिअर मध्येच बदलण्याचा निर्णय घेतात. असा निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.


......

एखाद्या क्षेत्राचं शिक्षण घेतलं, म्हणजे त्याच क्षेत्रात करिअर करायला हवं, असं हल्ली अजिबात राहिलेलं नाही. आज आजूबाजूला पाहिलं, तर अशा अनेक व्यक्ती पाहायला मिळतात, ज्यांनी करिअरच्या मध्येच दुसरं क्षेत्र निवडून त्यात बस्तान बसवलं आहे. इंजिनीअरिंग केल्यानंतर एमबीए करणाऱ्यांचीही संख्या भरपूर आहे. आजकाल, तर असा ट्रेण्डच पाहायला मिळतो.

असा ट्रेण्ड सेट होण्यामागचं एक कारण, म्हणजे हल्ली अनेक क्षेत्रं नव्याने उदयाला येत आहेत आणि तेवढ्याच वेगाने ही क्षेत्रं अस्तालाही जात आहेत. त्यामुळे, अर्थातच अशा इण्डस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना दुसरी नोकरी शोधावी लागते. ही नोकरी त्याच क्षेत्रात मिळेल असं नाही. यामुळे अनेकांना स्वत:च्या इच्छेसाठी, नाही तर नाइलाजास्तव दुसऱ्या क्षेत्राकडे वळावं लागतं. काही वेळेस दुसऱ्या क्षेत्रातील आकर्षक पगार, बढतीच्या जलद संधी, त्या क्षेत्राला असणारं ग्लॅमर आदी कारणांमुळे अनेक जण एका क्षेत्रात चांगलं बस्तान बसलेलं असूनही दुसऱ्या क्षेत्राकडे वळण्याचा विचार करतात. काही वेळेस चालू असणाऱ्या जॉब/क्षेत्रात समाधानी नसल्यामुळेही अनेक जण इतर क्षेत्रांकडे वळतात, तर काही जण आपला छंद जोपासण्यासाठी फुलटाइम करिअर सोडून एखाद्या पार्टटाइम किंवा फ्रीलान्स जॉबकडे वळतात आणि दुसऱ्या विषयाचा आपला अभ्यास सुरू करतात. पण हे सगळं करायचं, तर तुमच्याकडे थोडं धैर्य असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारासार विचार करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता.

एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात सेटल होताना सुरुवातीला थोड्या अडचणी येऊ शकतात. नवीन वातावरणात जीव घुसमुटल्यासारखाही वाटू शकतो. याचं कारण म्हणजे आधीच्या ऑफिसमध्ये आपण सेट झालेलो असतो. मात्र, याचा अर्थ असा नाही, की नवीन वातावरणात तुम्ही रूळूच शकत नाही. एकदा का, तुम्ही या नवीन ऑफिसमध्ये सेट झालात, तिथल्या सहकाऱ्यांशी चांगली ओळख झाली, मैत्री झाली, की तुम्ही या नवीन ऑफिसमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायला तयार व्हालच!

करिअरच्या मध्यंतरात असा बदल करण्याची इच्छा अनेकांना असते. पण, काही कारणामुळे ठाम निर्णय घेता येत नाही. तुम्हीही अशाच परिस्थितीत आहात? पण, घाबरू नका. थोडा वेळ घ्या आणि तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसाठी योग्य असा निर्णय घ्या. काही नवीन करण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही, हे लक्षात ठेवा. तुमची इच्छा, आवडनिवड आणि कामाप्रती मिळणारं समाधान लक्षात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा. काही जण पालकांच्या दबावामुळे करिअरसाठी एखाद्या क्षेत्राची निवड करतात, पण कालांतराने अपयश किंवा फ्रस्ट्रेशन येऊ लागल्यावर आपण इथे सुटेबल नाही हे लक्षात येतं. मग, अशा वेळेस कामातून न मिळणाऱ्या समाधानासाठी करिअर बदलण्याचाच पर्याय स्वीकारायला हवा. अन्यथा, होणारी घुसमट त्या व्यक्तीला कायमचं फ्रस्ट्रेट करून ठेवू शकते. तर, काही जण कामातील एकसुरीपणामुळे करिअर बदलण्याचा निर्णय घेतात. कारण काहीही असो, करिअरटॅक बदलताना योग्य त्या सर्व बाबींचा विचार करायला हवाच.

.........

* तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आहात आणि आपण कोणत्या क्षेत्रात नक्की सेट होऊ शकतो, हे जर तुम्हाला माहीत असेल तर त्याप्रमाणे पावलं उचला. सध्याच्या कामात असमाधानी आहात, पण नक्की कोणत्या क्षेत्राची निवड करायची हे माहीत नसल्यास कौन्सिलरची मदत घ्या. करिअर बदलण्याचा निर्णय पक्का झाल्यास विश्वासाने पुढची पावलं उचला. काही वेळेस आत्मविश्वासाच्या अभावी निर्णय घेऊनही अनेक जण स्वत:ला रोखून ठेवतात. मात्र, भिऊन चालणार नाही

* स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा ओळखायला शिका.

* सध्या तुम्ही काम करत असणाऱ्या संस्थेतच तुमच्या इण्टरेस्ट/स्किल्सनुसार काही संधी असतील, तर त्यासंबंधी वरिष्ठांशी बोलून घ्या.

* नवीन क्षेत्रातील जॉब शोधताना त्या जॉबनुसार आपल्या क्षमता विकसित करायला सुरुवात करा.

* नवीन जॉब शोधताना जिथे अर्ज करणार, त्या कंपनीची योग्य ती माहिती करून घ्या.

* महत्त्वाचं म्हणजे, आत्मविश्वास येत नसेल तर सध्या करत असलेला जॉब तसाच सुरू ठेवून तुमच्या इण्टरेस्टचा पार्टटाइम जॉब करा. यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात समाधानी राहू शकता, की नाही याची खातरजमा करता येईल. तसंच जॉबच्या आवश्यकतेनुसार स्किल्स विकसित करता येतील.

No comments: