photo

Wednesday, July 30, 2008

जॉब्जचं बूम!

प्रज्ञा विचारे

भारतात प्रचंड गुंतवणूक, अनेक क्षेत्रांचा विस्तार, हजारो नवे रोजगार असं सगळं अनुकूल चित्र आता साकारत आहे. येत्या पाच वर्षांमध्ये भारतात तब्बल पाच कोटी ८० लाख नवे रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. आता तरुणांसमोर आव्हान आहे ते अशा रोजगारांसाठी सुसज्ज होण्याचं....

भारतात नवनवीन इंजिनीअर कॉलेजं उघडली जात आहेत. इथे अॅडमिशन घेणाऱ्यांची संख्याही वाढतेय आणि त्यायोगाने भारतातील इंजिनीअर्सचीही. मात्र इंजिनीअर झालेल्या प्रत्येकालाच त्याच्या कुवतीचा जॉब मिळतो असे नव्हे. अशा इंजिनीअर पदवीधरांना अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी भारत सरकारच्या कृतिगटाने अशा इंजिनीअर्ससाठी 'फिनिशिंग स्कूल' उभारण्याची सूचना केली आहे. नॅसकॉमने अशा रोजगाराभिमुख विषयांचा मुद्दा उठवला होता. यावर 'फिनिशिंग स्कूल' उभारण्याची आणि उद्योगव्यवस्थेच्या गरजांनुसार कॉलेजांमधील अभ्यासक्रम बदलण्याची सूचना या कृतिगटाने केली आहे. या 'फिनिशिंग स्कूल'मध्ये आणखी कोणत्या गोष्टी असतील, हे अद्याप गुलदस्त्यातच असले तरी सर्वात प्रथम हे 'फिनिशिंग' केवळ आयटी क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवले जाणार आहे.

' जॉब रेट'मध्ये वाढ

डिग्री असूनही लायकीचा जॉब मिळत नाही... प्रत्येक कंपनीला अनुभवीच माणूस हवा आहे... त्यामुळे घरी बसावं लागतंय. असे शेरे आता जुन्या हिंदी चित्रपटांपुरतेच राहिलेत. आता अनुभवाअभावी जॉब नाकारला जातोय, हे फार अभावाने घडतं. इथे फ्रेशर्सनाही तितकीच किंबहुना अधिक मागणी आहे. आपल्या भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर भारतातील रोजगाराच्या संधीमध्ये दरवषीर् २.६२ टक्क्यांची वाढ होतेय. 'नॅशनल सॅम्पल सव्हेर् ऑर्गनायझेशन (एनएसएसओ)च्या सवेर्क्षणाने तसं सांगितलंय. अकराव्या पंचवाषिर्क योजनेनेही याला अनुसरूनच एक भाकीत केलंय. येत्या पाच वर्षांत तब्बल पाच कोटी ८० लाख रोजगार निर्माण होतील. त्यामुळे 'नो व्हेकन्सी'चा बोर्ड पुढील पाच वर्षं तरी कुठल्याच कंपनीबाहेर दिसणार नाही.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात बूम

सध्या अधिकाधिक विस्तारणारं क्षेत्र म्हणून हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचं नाव घेतलं जातं. सध्या भारतात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये सुमारे चार कोटी प्रोफेशनल काम करतात आणि ही वाढ दहा टक्क्के दराने वाढणार असल्याचं भाकीत केलं जातंय. ही वाढ जर अशीच कायम राहिली तर २०१३ पर्यंत जगातील पर्यटनक्षेत्रात सर्वात मोठा तिसरा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल. आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही तशीच वाढ होतेय. सध्या जगभरातले सुमारे २४ कोटी प्रोफेशनल या क्षेत्रात आहेत. एकट्या भारताचं म्हणायला गेलं तर पुढील दहा वर्षांत या क्षेत्रात तब्बल १५ ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात काम करण्यासाठी भविष्यात 'हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल'ची नितांत गरज भासणार आहे.

मॉडर्न डे सेक्रेटरी

बॉसची सेकेटरी म्हणजे फक्त छान दिसायचं, छान रहायचं, थोडं फार इंग्लिश बोलायचं आणि जोडीला स्टेनो आणि टायपिंगचं काम आलं म्हणजे सोने पे सुहागा, असंच म्हटलं जायचं. पण, आता हा समज पार बदललाय. सेक्रेटरीला केवळ स्टेनो किंवा टायपिस्ट होऊन भागत नाही तर त्यासोबत कम्प्युटर ज्ञान, टेलिफोन संभाषण कौशल्य, एचआर स्किल्स आणि कस्टमर सव्हिर्सची कलाही अवगत असली पाहिजे. इतकं ज्ञानकौशल्य येणाऱ्या सेक्रेटरींना दहा ते पंधरा हजार रुपये सहज मिळून जातात. त्याहून अधिक पगार द्यायलाही काही कंपन्या मागेपुढे पाहात नाहीत. त्यांना केवळ चांगल्या सेक्रेटरी हव्या आहेत. चेन्नईमध्ये 'स्टेनोग्राफर गिल्ड' इन्स्टिट्युट चालवणाऱ्या रामास्वामी यांनी अशा सेक्रेटरींना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं सांगितलं. सध्या थोडं फार इंग्लिश बोलणाऱ्यांना बीपीओ आणि कॉल सेंटरमध्ये लगेच जॉब मिळतो. त्यामुळे अनेक कंपन्यांना सेक्रेटरींची वानवा जाणवू लागली आहे. त्यामुळे बीपीओ आणि कॉलसेंटरमध्ये काम करून झोपेची आणि पर्यायाने शरीराची आबाळ नको असणाऱ्यांसाठी हा पर्याय नक्कीच सुखावह ठरेल.

No comments: