photo

Sunday, May 3, 2009

सुविधा हव्याशा आणि नकोशा! 11 Jan 2008,

आपल्या कम्प्युटरमध्ये सर्व सोयी या अद्ययावत असाव्यात, असे वाटण्यात गैर नाही. मात्र ते करताना कम्प्युटरची क्षमता विचारात घ्यायला हवी. .

.........

कम्प्युटर शिकताना जे काही अडथळे जाणवतात ते म्हणजे त्यातील काही कठीण वाटणाऱ्या संज्ञा. प्रत्यक्षात त्या समजून घेतल्या की काहीच प्रश्न जाणवत नाहीत. काही फाइल एक्स्टेन्शन्सबद्दल आपण मागच्यावेळेस पाहिले. आता काही शब्दांबद्दल. अॅक्टिवएक्स हा शब्द आपल्या कानावर आला असेल. ते ऑप्शन ऑन असेल तर कम्प्युटरमध्ये व्हायरस शिरतो वगेरे काही प्रमाणात दिशाभूल करणारी माहितीही कदाचित आपल्या पाहण्यात आली असेल. हे अॅक्टिवएक्स म्हणजे वेब ब्राऊझरसारख्या अॅप्लिकेशनसाठी लागणाऱ्या अतिरिक्त सोयीसुविधा. थोडक्यात ते अॅप्लिकेशन अधिक चांगल्या गतीने व अधिक सोयींसह चालावे म्हणून डाऊनलोड केलेले जास्तीचे सॉफ्टवेअर. ते तुम्हाला मुद्दाम डाऊनलोड करावे लागत नाही. बरेचसे आपोआप होत असते. तुम्हाला करावे लागलेच, तर फार कमी वेळा स्वत:हून करावे लागते. पण एखाद्या अॅप्लिकेशनला खरोखरच या अतिरिक्त सुविधा हव्या आहेत का, याचा विचार तुम्हीच करायचा आहे.


उगाच जास्त डाऊनलोड करून मूळ ब्राऊझरची गंमत घालविण्यात काहीच अर्थ नाही. ब्राऊझरमध्ये किमान मूलभूत सोयी असतातच. त्यात मुद्दाम वाढ करण्याची काहीच गरज नसते. पण एकदा एक अॅप्लिकेशन डाऊनलोड केले की ते अद्ययावत असावे असा आपला प्रयत्न असतो. ती हाव काही सुटत नाही. इथे मी अॅप्लिकेशन हा शब्द वापरला आहे. हे अॅप्लिकेशन म्हणजे कम्प्युटरमध्ये लोड केलेला एक विशिष्ट प्रोग्राम. तो विशिष्ट कामासाठीच उपयोगी येतो. उदा. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे फक्त वर्ड प्रोसेसिंगसाठीच म्हणजे मजकूर टाइप करण्यासाठीच उपयोगी येते. यात इतरही बऱ्याच सुविधा आहेत; पण मूळ उपयोग मजकूर टाइप करणे हाच आहे. दुसरे उदाहरण फोटोशॉपचे देता येईल. फोटोंवर सर्व प्रकारचे संस्कार करण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरले जाते. जितके ते अॅडव्हान्स तितके ते चांगले हे उघड असले तरी आपल्या कम्प्युटरची क्षमता पाहूनच ते डाऊनलोड करावे. 'अंथरूण पाहून पाय पसरावे' या धतीर्वर 'कम्प्युटरची क्षमता पाहून सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे' असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वेब ब्राऊझर म्हणजे वेगवेगळे अॅप्लिकेशन आहे. प्रत्येक अँटिव्हायरस, प्रत्येक प्रोग्राम हे एक वेगळे अॅप्लिकेशन आहे.हे सगळे अपडेटेड असावे असे वाटत असले तरी तो मोह आवरा.

कम्प्युटरच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक तेवढेच अपडेट आपोआप डाऊनलोड होतील अशी व्यवस्था करा. साधारणपणे प्रत्येक ब्राऊझरच्या टूल्स-ऑप्शन्समध्ये हा पर्याय उपलब्ध असतो. ब्राऊझर अपडेट आपोआप व्हायला हवा की तो अपडेट करायचा आहे का अशी विचारणा समोर यायला हवी हे तुम्ही ठरवा. ब्राऊझरच नव्हे तर कोणतीही अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करताना नवे व्हर्जन आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का आणि असले तरी ते पेलण्याची शक्ती कम्प्युटरमध्ये आहे का याचा विचार करा. अॅक्टिवएक्स, अॅप्लिकेशननंतर याच पठडीतला एक शब्द म्हणजे अॅडइन. नावाप्रमाणेच उपलब्ध अॅप्लिकेशनमध्ये जादा सुविधा देणारी ही संज्ञा आहे. पण अॅक्टिवएक्सपेक्षा वेगळी. ब्राऊझरमध्ये कोणत्या अतिरिक्त सोयी हव्यात ते तुम्ही ठरवू शकता. त्या आपोआप डाऊनलोड होत नाहीत. तुम्ही इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल, तर टूल्स व नंतर मॅनेज अॅडऑन्सवर क्लिक करा. कोणते अॅडऑन्स म्हणजे कोणत्या सुविधा ब्राऊझरबरोबर फ्री आहेत ते कळेल. अधिक सॉफ्टवेअर हवे असेल तर ते डाऊनलोड करू शकता. उदा. तुम्हाला स्क्रीनवर डिजिटल अथवा अॅनालॉग (काट्यांचे) घड्याळ हवे असेल तर ते मिळवू शकता. एखाद्या शहराचे तापमान हवे असेल ते मिळवू शकता किंवा एखाद्या साइटवरच्या बातम्या तुमच्या समोर हजर व्हाव्यात असे फर्मानही तुम्ही सोडू शकता. हे अॅडऑन तुम्ही कितीही डाऊनलोड करू शकता.

पण एक लक्षात ठेवा; जितके जास्त अॅडऑन्स, तितका ब्राऊझर ओपन व्हायला व चालायला जास्त वेळ. म्हणून मोह आवरून किमान आवश्यक तेवढेच अॅडऑन डाऊनलोड करा. हे अॅडऑन स्वत: मायक्रोसॉफ्टचेच असतील असे नाही. तशी स्पष्ट सूचना तुम्हाला मिळेल. हे वेगळ्या अर्थाने 'अनधिकृत' सॉफ्टवेअर असते. ते डाऊनलोड करायचे आहे की नाही हे तुम्हाला काळजीपूर्वक ठरवावे लागेल.

No comments: