photo

Sunday, May 3, 2009

'एक खिडकी' योजना 12 Nov 2007,

समजा सगळ्याच मेसेंजरमधील मित्र अगदी एकाच ठिकाणी आपल्याला भेटले तर ती आनंदाची मोठी पर्वणीच ठरेल. ती अनुभवता य
ेणं शक्य आहे. कसं ते माहीत आहे?...
.....................
मागील लेखात मी वेगवेगळ्या मेसेंजरबद्दल लिहिले होते. कोणाशीही 'लाइव्ह' संवाद साधण्याच्या दृष्टीने ते मेसेंजर उपयोगी ठरतात. पण प्रत्येक मेसेंजर वेगवेगळा डाऊनलोड करावा लागतो आणि ज्याच्याशी संवाद साधायचा आहे, त्याच्याकडेही तेच सॉफ्टवेअर असावे लागते. अन्यथा हा संपर्क होऊ शकत नाही. उदा. रिडिफमेलवरचा अॅड्रेस असेल आणि तुम्ही याहूच्या मेसेंजरवरून त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केलात तर काहीच होणार नाही. मग कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड न करता सगळ्या मेसेंजरमधले मित्र एकाच ठिकाणी आपल्याला भेटले तर किती मजा येईल? तशी सोय उपलब्ध आहे. वेबब्राऊझरमध्ये तुम्ही meebo.com असे टाइप करा; की मग चार महत्त्वाचे मेसेंजर एकाच स्क्रीनवर दिसणारा जादुई पडदा दिसायला लागेल.

डाव्या बाजूला एआयएम, याहू, गूगलटॉक आणि एमएसएन अशा चारही मेसेंजरच्या लॉगीन खिडक्या एकदमच दिसतील. पण तेथे घाईने लॉगीन करू नका. उजव्या बाजूच्या बॉक्समध्ये 'मीबो' असे लिहिलेले असेल. तिथे तुम्ही नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी सोपी आहे. तुम्हाला 'मीबो'वर ज्या नावाने ओळखले जावे असे वाटत असेल, ते नाव आयडी म्हणून रजिस्टर करा. तुमचा पासवर्ड टाइप करा. त्याखाली मोकळ्या जागेत तो पासवर्ड पुन्हा टाइप करायला लागेल. नंतर नेक्स्टवर क्लिक करा. तुमचे नाव, वैध ई-मेल, पत्ता, वय आणि स्त्री अथवा पुरुष यावर क्लिक करा की झाले तुमचे मीबोचे अकाऊंट खुले. मग एक मोठी विंडो येईल. डाव्या बाजूला मध्यभागी अकाऊंट्स अशी लिंक असेल. त्यावर क्लिक करा. मग वर म्हटल्याप्रमाणे एक विंडो दिसेल. त्यात एमएसएन, याहू अथवा गूगल यापैकी तुमचे अकाऊंट असणा-या सव्हिर्सवर क्लिक करून त्याचे लॉगीन नेम आणि पासवर्ड टाइप करा. हीच पद्धत सर्व मेसेंजरबाबत वापरा. समजा तुम्ही एमएसएन, याहू आणि गूगल या तिन्हीवर लॉगीन केले तरी मुख्य पडद्यावर अकाउंट्स नावाखाली ही तीनही अकाऊंट दिसतील. तीनही मेसेंजरवर वेगवेगळे मित्र असले तरी हरकत नाही. 'मीबो'चे वैशिष्ट्य असे की तीनही ठिकाणचे मित्रमैत्रिणी तुम्हाला एकाच विंडोमध्ये दिसतील. उदा. एका वेळी एमएसएनवरचे दोन मित्र व गूगलवरचे तीन मित्र ऑनलाइन असले तर या पाचजणांची नावे एकाच विंडोत तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक मेसेंजरची वेगवेगळी विंडो नसते.

हे लॉगीन करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे या मेसेंजरवर तुमचे आधीपासून आकाऊंट असायला हवे. 'मीबो'वर ते क्रिएट करता येत नाही. याहू अथवा गूगल मेसेंजरवर तुमचे आधीपासून अकाऊंट नसेल तर काहीही उपयोग नाही. ते असले तरच या 'एक खिडकी योजने'चा लाभ खऱ्या अर्थाने मिळू शकेल. यातले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एका वेळेस समजा याहूवरील कोणाशी बोलत असाल आणि हॉटमेलवरच्या कोणीतरी लॉगीन केले, तर दोघांशीही एकाच वेळेस गप्पा मारता येतात.

ही विंडो कस्टमाइझही करता येते. तुम्हाला हवे असलेले चित्र डाव्या कोप-यात आणता येते. डावीकडे वेलकम (तुमचे नाव), यू आर लॉग्ड इन अॅज, असे लिहिलेले असेल तिथे डावीकडे टपालाच्या स्टॅम्पच्या आकाराचे एक चित्र असेल. त्यावर क्लिक केले की आणखी काही चित्रे दिसतील. त्यातील एखादे पसंत पडले तर त्यावर क्लिक करून ते निवडा. तुमच्या स्वत:च्या पसंतीचे हवे असेल तर तुमच्या कम्प्युटरमध्ये असणारे चित्र तेथे आणू शकता. फक्त अट एकच की ते ८० केबी इतके लहान पाहिजे. अगदी वरती अकाऊंट्सच्या बाजूला प्रेफरन्सेस आणि मीबोमी अशी दोन बटणे असतात. तेथे जाऊन तुम्ही सारे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता.

मीबोवर आणखी काही (गैर)सोयी आहेत. त्यापासून मुलांना लांब ठेवलेले बरे. तिथे चॅटरूम्स आहेत. तुमची स्वत:ची चॅटरूम करायची सोय आहे. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे लहान मुलांच्या हातात हे द्यावे का याचा विचार करायला हवा.

वेगवेगळे मेसेंजर आपल्याला एका ठिकाणी 'भेटू' शकतात; मग हेच तत्त्व दुसऱ्या बाबतीत का लागू होत नाही? इंटरनेटचा प्रमुख वापर संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी होत असला तरी विविध बाबींचा शोध (सर्च) घेण्यासाठीही मोठा वापर होतो. त्यासाठी गूगल आणि याहू या दोन सर्च इंजिन्सचा जास्त वापर होतो. ही दोन्ही इंजिन्स एकाच वेळी मदतीला आली तर? तसे हवे असेल तर 'जी'चा 'वाय' करा आणि 'वाय'चा 'जी' करा. म्हणजेच gahooyoogle.com टाइप करा आणि गंमत पाहा. एकाच वेळी दोन खिडक्या ओपन होतील आणि दोन्हीकडचे सर्च एकाच वेळी दिसतील. जो तुम्हाला सर्वात उपयोगी आहे तो तुम्ही स्वीकारू शकता.

No comments: