photo

Sunday, May 3, 2009

हवी संगत हॅकर्सची! 12 Nov 2007,

अनेक हॅकर्स चांगल्या कामासाठी तैनात केले जातात. पोलिसांना सायबर गुन्हे शोधताना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल. थोडक्यात, हॅ
कर्स वाईटच असतात असे नाही.
.......
कम्प्युटर जितका सुरक्षित करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तेवढाच किंबहुना तुमच्यापुढे एक पाऊल टाकून तो असुरक्षित करण्याचा प्रयत्न करणारे लोकही या कम्प्युटरविश्वात आहेत. व्हायरस घुसविणे हा एक प्रकार होतोच; पण हॅकिंग नावाची एक गोष्टही वास्तवात आहे. व्हायरस दूर करणे कदाचित एखाद्या शक्तिमान अँटिव्हायरसच्या मदतीने तुम्हाला शक्य होईलही; पण तुमची साइट 'हॅक' केली म्हणजेच त्यात मूलभूत बदल केले तर ते दूर करणे तुमच्यामाझ्यासारख्याला शक्य नसते. अलीकडे वर्तमानपत्रांत अमुकएका साईटवर भलतीच चित्रे वा मजकूर दिसला, अशा आशयाच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. तोच हा प्रकार. आपल्या सरकारच्या महत्त्वाच्या साइटवर घुसखोरी करण्याचे प्रयत्न झाले नसतील असे नाही; पण त्यांना यश मात्र मर्यादित आले. साइटवरची सगळी माहिती बदलता आली नाही, तरी एखादा बॉक्स बदलून संबंधित साइटची बदनामी केल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. प्रसिद्धीमाध्यमांत 'हॅकर'ला म्हणजेच दुसऱ्याच्या साइटवर जाऊन मजकूर बदलणाऱ्या माणसाला व्हिलन म्हणूनच संबोधले गेले आहे. हा माणूस फक्त वाईटच काम करतो, असा एक समज आहे. पण तो साफ चुकीचा आहे.

मायक्रोसॉफ्ट या कंपनीने आताची व्हिस्ता प्रणाली आणली, ती आणण्यापूर्वी अशाच काही लोकांकडे तपासणीसाठी दिली होती. या प्रणालीत काही चुका सापडताहेत का, कमतरता असल्यास त्या कशा दूर करता येतील याची सखोल तपासणी करण्यात आली. त्यांनी 'ऑल क्लिअर' म्हटल्यावरच ती लोकांसाठी खुली करण्यात आली. यात त्यांचा रोल व्हिलनचा नव्हे तर मित्राचा होता. आजही अनेक हॅकर्स चांगल्या कामासाठी तैनात केले जातात. पोलिसांना सायबर गुन्हे शोधताना त्यांचा चांगला उपयोग होऊ शकेल. थोडक्यात, हॅकर्स वाईटच असतात असे नाही.

जगभरात असे असंख्य हॅकर्स आहेत. एवढेच नव्हे तर ते एकत्र येऊन एक परिषदही घेतात आणि त्यांच्या 'धंद्या'तील असंख्य बाबींचा ऊहापोह करतात. ऑस्ट्रेलियात दरवर्षी 'रक्सकॉन' नावाने ही परिषद भरते. जगाच्या कानाकोपऱ्यातून तेथे हॅकर जमतात. 'ना नफा' तत्त्वावर ही परिषद घेतली जाते. ख्रिस स्पेन्सर आणि डेव्हिड मॉरिसन ही त्यांच्या दोन आयोजकांची नावे. पैसा मिळविणे हा परिषदेच्या आयोजनाचा हेतू कधीच नसल्याने नोकरी आणि कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळून वेळ उरल्यास परिषदेसाठी प्रयत्न केला जातो. या वर्षी या दोघांनाही वेळ नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियात ही परिषद होणार नाही. पण हॅकर्सची निराशा होणार नाही, अशी सोय न्यूझीलंडने केली आहे. ऑस्ट्रेलिया परिषद भरवत नाही हे पाहिल्यावर न्यूझीलंडमधले हॅकर्स एकत्र आले. आता ते येत्या नोव्हेंबरमध्ये 'किविकॉन ०७' नावाने जागतिक परिषद भरवत आहेत. नोकरी करत असणाऱ्याला त्यासाठी ५० न्यूझीलंड डॉलर्स भरावे लागतील. नोकरी नसल्यास तीस डॉलर पुरतील.

या हॅकर्सची तीन श्रेणींत वर्गवारी केली जाते. एक कम्प्युटर सिक्युरिटी हॅकर, अॅकॅडमिक हॅकर आणि हॉबी हॅकर असे ते तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात कम्प्युटरची सुरक्षा धोक्यात आणणे हा एकमेव हेतू असतो. हा खरा व्हिलन. दुसऱ्या प्रकारचा हॅकर सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम अत्यंत हुशारीने बनवतो. त्यातल्या त्रुटी शोधणे जवळपास अशक्य होऊन बसते. त्यांचा वापर चांगल्या कारणासाठी अधिक होतो. ते इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी फ्री सॉफ्टवेअर आणि ज्याला ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणतात ते बनवतात. त्याचा सर्वांना फायदाच होतो. तिसरा प्रकार हॉबी हॅकरचा. कम्प्युटर हॅकिंग हा यांचा 'व्यवसाय' नसतो, तरी कम्प्युटर हार्डवेअर वा अन्य इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये बदल घडवून आणणे हे त्यांचे काम. हे बदल सुधारणावादी असतील, नाशवादी नसतील यावर त्यांचा भर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्टीव्ह वोझनियाक नावाच्या कम्प्युटर इंजिनीअरचे. त्याने अॅपल मालिकेतले पहिल्या दोन क्रमांकाचे कम्प्युटर तयार केले. नंतर स्टीव्ह जॉब्ज यांच्या सहकार्याने 'अॅपल कम्प्युटर'ची स्थापना केली. आज या अॅपलचा पसारा खूपच वाढला आहे.

एक शॉर्टकट :

तुम्ही एखाद्या विषयावर सर्च घेत आहात, त्याच्या एका लिंकवरून दुसऱ्या लिंकवर जातजात शेवटी हवा असलेला मजकूर तुम्हाला सापडतो. तोवर अॅड्रेसबारमधली लिंक एवढी मोठी आणि किचकट झालेली असते की ती लक्षात ठेवणे फार कठीण असते किंवा ती लक्षात ठेवून पुन्हा टाइप करणे कठीण जाते. उदा. http://www.cnn.com/2007/WORLD/asiapcf/08/29/taliban.hostages/index.html ही तुलनेने लहान लिंक आहे. पण तीही लक्षात ठेवायची नसेल, तर काय कराल? ती लिंक कॉपी करा, अॅड्रेस बारमध्ये tinyurl.com असे टाइप करा व एंटर की दाबा. तेथे समोरच Enter a long URL to make tiny: असा उल्लेख असलेला रिकामा बॉक्स दिसेल. त्यात ती कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. शेजारी क्लिक करा आणि पाहा काय होते ते. तुमच्या लांबलचक लिंकचे बोन्साय झालेले दिसेल. उदा. वरच्या लिंकचा शॉर्टकट http://tinyurl.com/252pyb असा दिसेल. तेवढाच टाइप करा म्हणजे नेमके हवे असलेले पान ओपन होईल. (तुमच्या भल्यामोठ्या लिंकचा बुकमार्क करून ठेवू शकताच. तो सोपा उपाय आहेच. पण टायनीयूआरएलची गंमत काही वेगळीच.)

No comments: