photo

Sunday, May 3, 2009

'वर्ड'ची महती 23 Nov 2007,

मागच्या आठवड्यात आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड
आणि ओपन ऑफिस यांची प्राथमिक तुलना केली होती . याचा पुढचा टप्पा गाठण्याआधीच बुधवारी हॉटमेलचे जनक सबीर भाटिया यांनी ' लाइव्ह डॉक्युमेंटस ' ची घोषणा करून आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे . नावाप्रमाणेच ही डॉक्युमेंटस ' लाइव्ह ' आहेत . तुम्ही तुमच्या मशीनवर एखादे डॉक्युमेंट तयार केले आणि ते निवडक लोकांना बघता यावे अशी सोय केली , तर ते डॉक्युमेंट ही निवडक मंडळी पाहू शकतील . तुम्ही त्यात बदल केले की लगेच दुसऱ्या लोकांनाही कळतील . या डॉक्युमेंटवर दुसऱ्या कोणी काही कॉमेंट केली तर ती लगेच तुम्हाला दिसेल आणि मुख्य म्हणजे तुम्हीही लगेच उत्तर देऊ शकाल . म्हणजे हे ' चॅटिंग ऑन डॉक्युमेंटस् ' झाले आहे .

मायक्रोसॉफ्ट ' ऑफिस २००७ ' या मायक्रोसॉफ्टच्या सर्वात ताज्या प्रॉडक्टला टक्कर देण्यासाठी भाटिया यांनी आपले नवे प्रॉडक्ट आणले आहे . यातल्या सोयी ' ऑफिस २००७ ' अथवा ' गुगल डॉक्स ' व ' स्प्रेडशीट्स ' यांतही नाहीत असा त्यांचा दावा आहे . सध्या हे सारे फुकटात डाऊनलोड करता येत असले , तरी फार काळ तसे ठेवणे त्यांना परवडणारे नाही . तरी वैयक्तिक वापरासाठी फुकट व कार्यालयीन वापरासाठी हवे असेल तर माफक किंमतीत देण्याचा त्यांचा विचार आत्तातरी दिसतो . ' ऑफिस २००७ ' विकत घ्यायचे तर ४०० डॉलर खर्च करावे लागतात . त्या तुलनेत हे खूपच स्वस्तात मिळेल असे म्हणायला हरकत नाही .

ओपन ऑफिसमध्ये केवळ वर्डला पर्याय नाही , तर अन्य सोयीही आहेत . त्या शिकून घेतल्या की त्याचा नीट उपयोग करता येईल . यात ओपन ऑफिस बेस , कॅल्क , ड्रॉ , मॅथ आणि नेहमीचा रायटर असे पर्याय मिळतील . नावाप्रमाणेच यात सुविधा आहेत . मॅथमध्ये गणिते मांडण्याच्या दृष्टीने सोय आहे , कॅल्क म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे , ड्रॉमध्ये प्रेझेंटेशनच्या सोयीसाठी वेगवेगळी डॉक्युमेंट्स तयार करता येतील . इम्प्रेसमध्येही प्रेझेंटेशनसाठी डॉक्युमेंट तयार करताना त्यात इक्सेल वा विविध चार्ट तसेच अन्य चित्रे टाकण्याची सोय आहे . सुरुवातीला हे सारे वर्डइतके सोपे वाटत नाही ; पण सवय झाली तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसकडे तुम्ही पुन्हा वळणार नाही .

ऑफिसमध्येही एक्सेल , इन्फोपाथ , आऊटलूक आणि पॉवरपॉईंट अशा सुविधा आहेतच . आजकाल शाळेतही मुलांना पॉवरपॉईंटची मदत घेऊन प्रेझेंटेशन करायला सांगतात . त्यामुळे याची गरज आज सर्व पातळ्यांवर भासत आहे . अर्थात ओपन ऑफिस असो की मायक्रोसॉफ्ट ऑफिस असो , कार्यालय वा स्वत : च्या उद्योगधंद्यासाठी काम करायचे असेल तरच वर्डशिवाय इतर अॅप्लिकेशन्सची गरज भासते . तुम्हाआम्हाला या वर्डमधील सोप्या गोष्टी समजून घेतल्या तरी पुरे .

वर्ड २००३ ( सध्या बहुतेकांकडे हीच व्हर्जन असण्याची शक्यता आहे . वर्ड २००७ फारच कमी लोकांकडे असेल ) ओपन केल्यावर आडव्या कॉलमात फाइल , एडिट , व्ह्यू , इन्सर्ट , फॉरमॅट , टूल्स , टेबल , विंडो आणि हेल्प अशी ऑप्शन्स दिसतील . ' फाइल ' वर क्लिक केल्यावर नवे डॉक्युमेंट ओपन करता येते . तसेच आधीचे ओपन करून त्यात बदल करता येतील . सेव्हअॅजवर क्लिक केले तर आधी दुसऱ्या नावाने सेव्ह केलेली फाईल नव्या नावाने सेव्ह करता येईल . समजा एखाद्या फाइलमधला मजकूर बदलायचा आहे , पण त्याचवेळी मूळ मजकूर कायम राहावा असे वाटत असेल तर मूळ फाइल सेव्हअॅज करून घ्यायची . म्हणजे नवीन फाइल तयार होते . त्याला नाव मात्र आधीच्या फाइलपेक्षा वेगळे द्यायला हवे . नाहीतर आधीच्याच फाइलवर ती ओव्हरराइट होईल . नवे नावही आधीच्याशी सुसंगत असे द्या . उदा . इंडिया असे फाइलनेम असले तर सुधारणा करण्यासाठी इंडिया न्यू असे नाव द्या . अशा सगळ्या न्यू नावाच्या फाइल्स करेक्टेड आहेत हे लगेच लक्षात येईल .

' फाइल ' मेन्यूमध्येच परमिशन नावाचा उल्लेख दिसेल . तो अगदी महत्त्वाचा आहे . तुम्ही घरी कम्प्युटर वापरत असाल आणि त्याच कम्प्युटरवर घरातले अन्य लोकही काम करत असतील तर याचा उपयोग होईल . तुम्ही तयार केलेले डॉक्युमेंट अन्य कोणी पाहू नये यासाठी त्याला पासवर्ड देण्याची सोय आहे . तो फक्त तुम्हालाच माहीत असल्याने ते डॉक्युमेंट अन्य कोणालाही ओपन करता येणार नाही . मात्र त्यासाठी तुम्हाला ' इन्फरमेशन राइट मॅनेजमेंट ' नावाची ऑफिस २००३ची फाइल डाऊनलोड करावी लागेल . ( परमिशनवर क्लिक केल्यावर याचा मार्ग दिसेलच ) मग पासवर्ड देता येईल . जी डॉक्युमेंट्स सर्वांसाठी उपलब्ध ठेवायची असतील तिला पासवर्ड द्यायचा नाही .

सेव्ह अथवा सेव्हअॅज करताना तुम्हाला ती फाइल कुठे सेव्ह करायची आहे हे विचारण्यात येईल . तुमच्या मशीनमध्ये योग्य ते फोल्डर केलेले असले तर त्या - त्या फोल्डरमध्ये त्या - त्या विषयाची फाइल सेव्ह करता येईल . हा वेगळा विषय आहे . त्यावर नंतर कधीतरी .

No comments: