photo

Sunday, May 3, 2009

वर्डमधील ऑप्शन्स 14 Dec 2007,

कम्प्युटरवर मराठीमध्ये टाइप करावयाचे असेल, तर वेगळी काळजी घ्यावी लागते. तशी ती घेतली की साऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात!


- अशोक पानवलकर

मायक्रोसॉफ्ट वर्डविषयी माहिती घेताना टूल्स-ऑप्शन्स हा मेन्यू महत्त्वाचा आहे हे आपण पाहिले. यातीलच व्ह्यू, जनरल, एडिटनंतर आणखी एक महत्त्वाचा मेन्यू म्हणजे स्पेलिंग अँड ग्रामर. यातील कशावरच क्लिक करणे गरजेचे नाही. मी आतापर्यंत वर्डविषयी जे जे लिहिले ते फक्त मराठी टापयिंगविषयी लागू होते. इंग्रजी टाइप करायचे असेल तर या प्रत्येक मेन्यूमधली सेटिंग्ज पूर्णपणे वेगवेगळी लागतात. त्यामुळे ज्यांना केवळ मराठी टाइप करायचे असेल, त्यांनीच ही सेटिंग्ज करावीत.

इंग्रजी टाइप करताना मराठीसाठी अनक्लिक केलेल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिक कराव्या लागतील. त्या आपापल्या सोयीने करून घ्याव्यात. टूल्स-ऑप्शन्सप्रमाणेच टूल्स-ऑटोकरेक्ट ऑप्शन्स हा मेन्यूही महत्त्वाचा आहे. विशेषत: मराठी टायपिंगसाठी. मागे उल्लेख केल्याप्रमाणे 'ठ'च्या जागी अन्य अक्षरे येत असली तर इथे 'ऑटोफॉरमॅट अॅज यू टाइप' या विभागात 'रिप्लेस अॅज यू टाइप'मधील सर्व ठिकाणी अनक्लिक करा. दुसऱ्या स्मार्ट टॅग्ज सेक्शनमध्येही सर्वकाही अनक्लिक करा. ऑटो फॉरमॅटमध्येही रिप्लेस विभागात सगळे अनक्लिक करा. मराठीतील दुसऱ्या अक्षरांबरोबरच अन्य काही प्रश्नही सुटतील. काहीवेळा मराठी टाइप करताना प्रत्येक ओळीखाली लाल रेषा येतात. त्या कशा घालवायच्या असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर टूल्स-ऑप्शन्स आणि टूल्स-ऑटोकरेक्ट ऑप्शन्समध्ये आहे. गरज नसलेली बहुतेक सेटिंग्ज अनक्लिक केली की या लाल लाइन्स जातात.

टाइप करताना फाँट कोणता वापरायचा असा विचार मनात येतो. तुमच्या मराठी सॉफ्टवेअरमध्ये किती फाँट्स बसवलेले आहेत, ते कम्प्युटरला सूट होतात का हे पाहिले पाहिजे. मुळात टाइप करताना डोळ्याला सुखद असा फाँट वापरावा. कम्प्युटरवर सतत काम करणे ही एक डोकेदुखी असते. त्यात एखादा बटबटीत फाँट वापरत असाल तर आणखी वैताग. म्हणून सर्व फाँट कसे दिसतात ते पाहा आणि डोळ्याला रुचेल तोच घ्या. तरीही काहीवेळा काही समस्या येण्याची शक्यता असते.

माझ्या मित्राचा अनुभव सांगण्यासारखा आहे. (कोणा तज्ज्ञांना याबाबत अधिक माहिती असल्यास त्यांनी सर्वांसाठी माहिती द्यायला काहीच हरकत नाही.) तो त्याचा कम्प्युटर कितीही तास वापरू शकत होता. पण मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडून त्यात मराठी टाइप करायला सुरुवात केली की पाच-सात मिनिटांत कम्प्युटर बंद पडून आपोआप पुन्हा सुरू होत असे. यावर काहीच उपाय लागू होईना. वर्ड करप्ट झाले असेल असे समजून ते पूर्णपणे नव्याने इन्स्टॉल करून घेतले तरी प्रश्न कायम राहिला. मराठी सॉफ्टवेअर करप्ट झाले असेल असे वाटून तेही आधी काढून टाकून पुन्हा इन्स्टॉल केले. प्रश्न कायम. शेवटी पूर्ण कम्प्युटर फॉरमॅट करून घेतला व जुने सॉफ्टवेअर पुन्हा लोड केले. तरी प्रश्न तसाच. सर्व प्रकारचे मायक्रोसॉफ्ट अपडेट्स केल्यावरही गुंता सुटत नव्हता. अखेर कुठेतरी वाचल्यावरून त्याने डिफॉल्ट फाँट बदलला. त्यानंतर त्याचे मशीन असे बंद होणे थांबले. त्यावरून त्याने असा अर्थ काढला की एक विशिष्ट फाँट मशीनमधील कुठल्यातरी सॉफ्टवेअरला त्रासदायक ठरत होता आणि तो बदलल्याबरोबर प्रश्न सुटला. पुन्हा त्याच विशिष्ट फाँटमध्ये काम केल्यास पुन्हा कम्प्युटर बंद पडतो. याचा अर्थ फाँट खराब आहे वा तो इतर सॉफ्टवेअरला चालत नाही असा अर्थ त्याने काढला.

हा नियम प्रत्येकाला लागू करता येईलच असे नाही. कारण प्रत्येकाच्या मशीनमधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असते. पण असा प्रश्न कोणाला येत असेल, तर हा मार्ग स्वीकारून पाहायला हरकत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या पॅकेजमधील एखादाच फाँट करप्ट होऊ शकतो. त्या सॉफ्टवेअरची मूळ सीडी तुमच्याकडे असली तर तो पुन्हा लोड करा. मात्र त्याआधी तो फाँट पूर्णपणे अनइन्स्टॉल करायला हवा. नाही तर तो लोडच होणार नाही. चुकून झालाच तरी तोही करप्टच होईल.

No comments: