photo

Sunday, May 3, 2009

क्लिक-अनक्लिक 29 Nov 2007,

आपण मायक्रोसॉफ्ट वर्डवर काम करताना वर्डचे सेटिंग काय करत आहोत यावर काम कसे चालते हे ठरते. बऱ्याच वाचकांनी मराठी सॉफ्टवेअर वापरताना 'ठ'च्या जागी दुसरे अक्षर उमटते, स्पेसबार मारल्यावर आधी मारलेले अक्षर बदलते, परिच्छेद नीट होत नाहीत, सतत कोणत्या ना कोणत्या सूचना पॉपअप होत राहतात अशा प्रकारच्या त्रुटी नजरेस आणल्या आहेत. हे सगळे आपल्याला दुरुस्त करता येते. त्यासाठी कोणा तंत्रज्ञाची गरज नाही. फाइल, एडिट, व्ह्यूच्या रांगेत टूल्स नावाचे अत्यंत महत्त्वाचे नाव दिसेल. यात ही सारी गुपिते दडलेली आहेत. याचा वापर करताना काळजीपूर्वक करायला हवा. पण एकदा ते कळले की तुम्ही सुलभतेने मराठी सॉफ्टवेअर वापरू शकाल.

प्रथम टूल्सवर जाऊन सर्वात तळाच्या ऑप्शन्सवर क्लिक करा. व्ह्यू, जनरल, एडिट, प्रिंट, सिक्युरिटी असे अनेक विभाग असणारी विंडो ओपन होईल. यातील 'व्ह्यू'वर क्लिक करा. कदाचित बाय डिफॉल्ट तुम्हाला हीच विंडो दिसेल. यातला पहिलाच 'शो' हा विभाग महत्त्वाचा आहे. वर्ड सुरू केल्यावर काय काय दिसावे हे यात ठरवता येते. 'स्टार्ट अप पेन'वर क्लिक असल्यास वर्डमध्ये उजव्या बाजूला एक विंडो ओपन होईल. त्यात तुम्ही आधी कोणत्या कोणत्या फाइल्सवर काम केले आहे ते दिसेल. साधारणपणे शेवटच्या पाच (हा आकडा तुम्ही ठरवू शकता) फाइल्स दिसतील. त्यातली कोणतीही ओपन करू शकता. हायलाइट, बुकमार्क यांची आपल्याला साधारणपणे काहीच गरज नसते. त्यावर क्लिक नसले तरी चालेल. स्टेटस बार, स्क्रीन टिप्स उपयोगी असतात. त्यामुळे त्या क्लिक हव्यात. स्मार्ट टॅग्जवर अजिबात क्लिक नसावी. 'ठ'च्या जागी दुसरे शब्द येण्याला कारणीभूत असलेला हा पर्याय आहे. या स्मार्ट टॅग्जचीच लिंक टुल्स - ऑटो करेक्ट ऑप्शन्समध्ये आहे. त्यातील स्मार्ट टॅग्जवर क्लिक केल्यास लेबल टेक्स्ट विथ स्मार्ट टॅग्ज असे ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करू नका. म्हणजे त्या बॉक्समधली सगळी ऑप्शन्स अनक्लिक होतील. या ऑटो करेक्ट ऑप्शन्समध्ये अन्य सोयीही आहेत. पण तूर्तास टुल्स-ऑप्शन्स यातील सोयी पाहू या.

यातील व्ह्यू - शोमध्ये स्मार्ट टॅग्जच्या खाली फारतर व्हटिर्कल रूलरवर क्लिक करा. अन्य कशाहीवर क्लिक करण्याची गरज नाही. या 'शो'च्या खाली फॉरमॅटिंग मार्कस् असे ऑप्शन असेल. त्यातील एकाही ऑप्शनवर क्लिक नको. अन्यथा मजकूर टाइप करताना आपल्याला वेगवेगळी चिन्हे दिसतील. परिच्छेद करताना, टॅब मारल्यास, स्पेस दिल्यास शब्दांच्या मध्ये वेगवेगळी चिन्हे दिसतील. ती फार त्रासदायक दिसतात. आपण कोणतीही वेगळी की दाबली नाही तरी ही चिन्हे कोठून आली हे कळत नाही आणि अक्षरश: वेड लागायची पाळी येते. म्हणून फॉरमॅटिंग मार्कस्वर क्लिक नको. नंतर प्रिंट ऑप्शन्स, वेब लेआऊट अशी ऑप्शन्स दिसतील. त्यातील कशावर क्लिक करायचे ते गरजेनुसार ठरवा. यात 'रॅप टू विंडो' असे ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केल्यास मजकूर पानाच्या सर्व बाजूंना लागून येतो.

टूल्स - ऑप्शन्स - जनरलवर क्लिक केल्यास त्यावरची ऑप्शन्सही गरजेनुसार क्लिक करता येतात. मजकूर ऑपरेट करताना व्हाइट बॅकग्राऊंडवर काळ्या अक्षरात टाइप करायचे की गर्द निळ्या बॅकग्राऊंडवर पांढऱ्या अक्षरात टाइप करायचे ते आवडीनुसार ठरवा. निळी बॅकग्राऊंड हवी असेल तर 'ब्लू बॅकग्राऊंड, व्हाइट टेक्स्ट'वर क्लिक करा. पण डोळ्याला त्रास होत असेल तर मात्र हे अनक्लिकच असलेले चांगले. यातच रिसेंटली यूज्ड फाइल लिस्ट असे ऑप्शन आहे. त्यासमोर आधीच्या किती फाइल्स दिसाव्यात त्याचा आकडा ठरविता येईल. हा आकडा दहा असू शकतो वा तीनही. ते गरजेनुसार ठरवा. समजा सहा आकडा दिलात तर 'फाइल'वर क्लिक केल्यास तळाला वर्डमध्ये ऑपरेट करत असलेल्या फाइलसह आधी ऑपरेट केलेल्या सहा फाइल्स दिसतील. गंमत म्हणजे एकावर एक अशा सगळ्या फाइल्स तुम्ही ओपन करू शकता. तसे करताना तुमची ताजी फाइल सुरक्षित राहाते. आधीच्या एखाद्या फाइलमधून मजकूर कॉपी-पेस्ट करायचा असेल तर ते फायदेशीर ठरते. 'जनरल'मध्ये अन्य कोणत्याही बाबीवर क्लिक नसेल तर फारसे काही बिघडत नाही.

हे क्लिक-अनक्लिक झाल्यावर मायक्रोसॉफ्ट वर्ड क्लोज करून नव्याने सुरू करावे लागेल. अन्यथा एखाद्या ऑप्शनवर क्लिक केल्यास ताबडतोब तसा बदल होणार नाही. म्हणून एकदा सर्व ऑप्शन्स क्लिक वा अनक्लिक करून घ्यावीत आणि मगच वर्ड नव्याने ओपन करावे.

No comments: