photo

Sunday, May 3, 2009

गोष्टी युक्तीच्या चार! 14 Mar 2008,

फाइल उघडणं किंवा फाँट पाठवणं या व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. त्या कशा करायच्या याचं इंगित समजलं की अनेक गोष्टी सोप्या होतात...

...

मध्यंतरी काही वाचकांनी मेल पाठवून विशिष्ट प्रकारच्या फाइल्स ओपन होत नाहीत, त्या कोणत्या प्रकारच्या आहेत तेही कळत नाहीत, असे कळविले आहे. फाइलच्या एक्स्टेन्शनबद्दल मी मागे लिहिले होते. आपली फाइल कोणती आहे आणि ती आपल्या कम्प्युटरवर असलेल्या कोणत्या प्रोग्राममध्ये उघडेल याची माहिती असली की हा प्रश्न येणार नाही. उदा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये कोणती फाइल ओपन होईल यावर काही निर्बंध आहेत. तिथे फोटोशॉपची फाइल कशी ओपन होईल? तेच चित्राचे. कोणती फाइल कोठे ओपन होईल याचे काही नियम आहेत. एका वाचकाने मेलवर आलेल्या फाइल्स सेव्ह होतात पण ओपन होत नाहीत असे का, असे विचारले होते. याचे कारण ज्या प्रोग्राममध्ये ती फाइल तयार करण्यात आली होती तो प्रोग्राम या वाचकाच्या कम्प्युटरमध्ये लोड केलेला नव्हता. म्हणून ती फाइल उघडली गेली नाही.

फाइल कोणत्या पद्धतीची आहे वा कोणत्या प्रोग्राममध्ये तयार करण्यात आली आहे ते फाइलनेमवर सिंगल क्लिक करून समजू शकते. वर्डमध्ये केलेल्या फाइल असतात त्यांचे एक्स्टेन्शन (फाइलनेमनंतर डॉट दिल्यावर पुढे जे शब्द असतात ते. उदा. आयफेल.आरटीएफ) दिसते. इथे आरटीएफ म्हणजेच 'रिच टेक्स्ट फॉरमॅट' हे एक्स्टेन्शन आहे. ते 'डॉक' असू शकते, टेक्स्ट असू शकते, वेबपेज म्हणूनही ते सेव्ह करता येते. या सगळ्या फाइल्स फक्त वर्डमध्येच उघडू शकतात. त्याचे एक्स्टेन्शन क्यूएक्सडी असेल तर ती क्वार्क एक्स्प्रेस प्रोग्राममधली फाइल आहे, ती वर्डमध्ये ओपन होणार नाही. त्याचप्रमाणे वर्डची फाइल क्वार्कमध्ये ओपन होणार नाही. म्हणूनच आपल्याला कोणती फाइल मेलवरून आली आहे ते तपासून पाहाणे गरजेचे ठरते. तो प्रोग्राम तुमच्याकडे नसला तर ती फाईल ओपन करण्यात वेळ घालवू नका.

नाशिकहून एका वाचकाने फाँटचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांना मित्रांना कम्प्युटरवरून पत्रे पाठविण्याची आवड आहे. पण त्या मित्राकडे त्यांचा फाँट नसला तर त्याला ते वाचताच येत नाही. अशा वेळेस काय करावे असे त्यांनी विचारले आहे. जर ठराविक लोकांना तो मजकूर पाठविला जात असेल तर त्या पत्राबरोबर एकदा तो ज्या फाँटमध्ये आहे तो फाँटही पाठवून देता येईल. मित्राने त्याच्या मशीनमध्ये फाँट लोड केला की त्या फाँटमधला कोणताही मजकूर त्याला वाचता येईल. पण हे झाले मित्राच्या घरच्या कम्प्युटरचे. त्यावर तो ते पत्र वाचू शकेल. पण तो बाहेरगावी गेला आणि तिथे मेल ओपन केला तर तिथे कसा वाचता येईल? म्हणूनच त्या पत्राची इपीएस वा जेपीजी फाइल करणे हा उपाय ठरतो. त्या पत्राचे चित्रात रूपांतर होते आणि ते जगातल्या कोणत्याही कम्प्युटरवर ओपन केले तरी वाचता येते. परंतु, इपीएस वा जेपीजी बनविण्यासाठी फोटोशॉपची गरज लागते. ते बहुतेकांकडे नसते. त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही.

या मजकुराची पीडीएफ फाइल बनवायची हा तिसरा उपाय आहे. त्यासाठी नेटवर बरेच प्रोग्राम्स उपलब्ध आहेत. ते पारखून डाऊनलोड करायला हरकत नाही. पण मला वाटतं (मी चुकत असलो तर चूक दुरुस्त करा) मराठी मजकुराची पीडीएफ करताना फाँट बदलतात व मजकूर अजिबात वाचता येत नाही. हा प्रश्न इंग्रजी फाँटमध्ये येत नाही. त्याच्या फाइल्स तुम्ही सहज घरच्या घरी पीडीएफमध्ये कन्व्हर्ट करू शकता. थोडक्यात, मित्राला एकदा स्वत:चा फाँट पाठवणे हा सोपा व सर्वांना जमणारा मार्ग त्यावर आहे.

हा फाँट लोड कसा करायचा? तुमच्या मशीनमध्ये 'फाँट्स' नावाचा फोल्डर असतो. (त्यासाठी 'स्टार्ट'वर क्किक करा, नंतर कंट्रोल पॅनलवर आणि नंतर फाँटस् फोल्डरवर). त्या फोल्डरमध्ये फाँट सेव्ह केला की झाले असे वाटेल. बरोबर आहे पण तो वेगळ्या मार्गाने लोड करावा लागतो. मेलवरून आलेला फाँट तुम्ही कुठे सेव्ह केलाय ते लक्षात ठेवा. मग फाँट्स फोल्डर ओपन करा. 'फाइल'वर क्लिक करून 'इन्स्टॉल न्यू फाँट'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. तिथे नेटवर्कच्या बाजूला 'ड्राइव्हज' असे शब्द दिसतील. त्याखालील बॉक्समध्ये, तुम्ही ज्या फोल्डरमध्ये फाँट सेव्ह केला असेल ती लिंक आणा. (उदा. सी ड्राइव्हमध्ये माय डॉक्युमेंट फोल्डर आणि त्यात पर्सनल फोल्डरमध्ये सेव्ह केलेला फाँट) ती आणली की तो फाँट वरच्या रिकाम्या बॉक्समध्ये दिसायला लागेल. तो वा ते फाँट दिसायला लागल्यावर बाजूला 'सिलेक्ट ऑल'वर क्लिक करा व मग ओके म्हणा. तो फाँट तुमच्या मशीनमध्ये कायमच्या वस्तीसाठी आला असं समजा.

काहीवेळेस एखादा फाँट 'करप्ट' होतो, वापरण्याजोगा राहात नाही. तो वापरला तर मशीन बंद पडते वा विचित्र चालते. अशावेळा तो फाँट पुन्हा याच फोल्डरमध्ये लोड करायला लागतो. पण त्यापूवीर् जुना फाँट पूर्णपणे डीलीट करावा लागतो. तसे केल्यावर मशीन पुन्हा सुरू करा आणि मगच नव्याने फाँट लोड करा. मग तो नीट शहाण्या मुलसारखा चालेल.

No comments: