photo

Sunday, May 3, 2009

वर्डवरचा सुबक लेआऊट! 22 Feb 2008,

नियतकालिक आकर्षक करण्यासाठी अनेक सोयी उपलब्ध असतात. त्यांचा योग्य वापर करून आपण आपले काम नजर खिळवून ठेवणारे करू शकतो...

......

तुम्ही एखाद्या कंपनीचा अहवाल पाहिला असेल. एका पानावर फक्त हेडिंग, दुसऱ्या पानावर दोन कॉलमात चालविलेला मजकूर, लगेच पुढचे दोन परिच्छेद सिंगल कॉलमात नंतर एखादा बॉक्स आयटम अशा अनेक गमतीजमती त्यात केलेल्या असतात. हेतू हा की आकडेवारीचे खेळ असणाऱ्या या वाषिर्क अहवालात आकर्षकपणा यावा, तो चांगला दिसावा, आपल्याला ज्या गोष्टी जनतेपुढे आणायच्या आहेत त्याच पुढे याव्यात आणि ज्या लपवून ठेवायच्या आहेत पण कायद्याने देणे बंधनकारक आहे, अशा गोष्टी लहान टायपात द्याव्यात वगैरे गोष्टी फार सफाईने हाताळल्या जातात. हा गुळगुळीत कागदावरचा अहवाल पाहिल्यावर त्यासाठी कोणते महागडे सॉफ्टवेअर वापरण्यात आले असेल, ते आणणे आपल्याला जमणार नाही अशी तुमची समजूत झाली असेल. ती चुकीची आहे हेच मला सांगायचे आहे. काही वेळेस हायफाय चित्रे टाकण्यासाठी वा अधिक साइजचे ग्राफ टाकण्यासाठी वेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतोही. पण साधारणपणे कम्प्युटरवर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये काम करताना बरेच काही करता येते.

कंपनीचा अहवाल वगैरे फार पुढची बाब झाली. आपण शाळेचे मासिक पाहू या. मासिकाचे मुख्य नाव, पुढे अनुक्रमणिका, विषयवार लेख वा वर्गवार (तुकडीवार) लेख यांची मांडणी फार छान करता येते. काही शाळांमध्ये हस्तलिखितांची पद्धत असते. सुबक अक्षरात आणि चांगले नक्षीकाम करून मासिक सजविणे यात आनंद असतो खरा; पण कधीतरी कम्प्युटरची मदत घेऊन पाहा.

तुम्ही वर्डमध्ये एखादी गोष्ट टाइप करा. त्याला योग्य ते हेडिंग द्या. अशा प्रत्येक वर्गाच्या मुलांकडून अनेक गोष्टी आल्या असतील. त्याचा स्वतंत्र विभाग तुम्हाला करावासा वाटला तर पहिल्या कथेच्या सुरुवातीला 'कथा विभाग' असे टाइप करा. त्याचा पॉईंटसाइझ व फाँट तुमच्या आवडीनुसार निवडा. (अवंती बोल्ड फाँट कसा दिसेल?). हेडिंग टाइप केल्यावर ते पानाच्या बरोबर मध्ये (सेंटरला) आणा. त्यासाठी वर्डच्या टूलबारमध्ये बी, आय, यू अशा अक्षरांच्या नंतर असणाऱ्या आयकॉन्सनंतरच्या चिन्हांचा वापर करा. हेडिंग सेंटरला आल्यावर एंटर मारा. कर्सर हेडिंगच्या खाली मध्यभागी येईल.

पुन्हा वर्डच्या टूलबारमध्ये जा. 'इन्सर्ट' ऑप्शनवर क्लिक करून 'ब्रेक'वर क्लिक करा. तेथे दोन विभाग असतील. 'ब्रेक टाइप्स' आणि 'सेक्शन ब्रेक टाइप्स'. यातला दुसरा निवडा. त्यातील पहिल्याच 'नेक्स्ट पेज'वर क्लिक करा आणि ओके म्हणा. हेडिंगखालचा सारा मजकूर पुढच्या पानावर जाईल. पहिल्या पानावर केवळ 'कथाविभाग' एवढेच हेडिंग राहील. तुम्हाला या हेडिंगखाली 'इयत्ता आठवी ते दहावी' वगैरे काही टाइप करायचे असेल तरी देऊ शकता. फक्त आता सांगितलेल्या क्रमात बदल एवढाच करायचा की हेडिंगऐवजी 'इयत्ता आठवी ते दहावी' या ओळीखाली कर्सर आणायचा व नंतर एंटर मारायचे. मग मुख्य हेडिंग व पूरक माहितीचे हेडिंग याचा फाँटसाइझ तुम्ही हवा तो द्या. वेगवेगळे फाँट द्या अथवा त्याखाली एखादे चित्र टाकायचे असेल तरी टाका.

चित्र टाकायचे असेल व ते वर्गातील मुलांचे लाइव्ह चित्रच हवे असेल तर ते आधी कम्प्युटरमध्ये लोड करावे लागेल. ते लोड असले तर वर्ड फाइलमध्ये पुन्हा 'इन्सर्ट'वर क्लिक करा, मग 'पिक्चर'वर क्लिक करा, नंतर 'फ्रॉम फाइल'वर जा. चित्र कुठे सेव्ह केले आहे तो फोल्डर उघडा व चित्राच्या फाइलवर क्लिक करा.

पहिले पान तर झाले. पुढच्या पानावर वेगवेगळ्या कॉलम साइझमध्ये मजकूर हवा असेल तर काय कराल? वेगवेगळ्या फाँटमध्ये, वेगवेगळ्या आकारात तो देणे सोपे आहे. पण मधलाच मजकूर वेगळ्या कॉलमात देता येईल? तेही सोपेच आहे. दुसऱ्या वा पुढच्या कोणत्याही पानावरचा मजकूर समजा दोन कॉलमात चालवला आहे, तो पानाच्या मध्येच तीन कॉलमांत हवा आहे, पण पुढचा परिच्छेद परत दोन कॉलमांत हवा आहे, तर? जो मजकूर वेगळ्या कॉलमसाइझमध्ये हवा आहे तो सिलेक्ट करा. टूलबारमधील 'फॉरमॅट'मध्ये जाऊन 'कॉलम'वर क्लिक करा. तुम्हाला तो परिच्छेद किती कॉलमात हवा आहे त्याप्रमाणे कॉलमसाइझ निवडा. आणि ओके म्हणा. झाला वेगळा कॉलमसाइझ. एकाच पानावर वेगवेगळ्या साइझमध्ये मजकूर पाहून गंमत वाटते.

No comments: