photo

Sunday, May 3, 2009

सर्च इंजिनचा शोध 12 Nov 2007

सर्च इंजिन्स अनेक आहेत . त्या प्रत्येकाचा प्राधान्यक्रम निराळा आहे . त्यामुळे कोणते इंजिन वापरावयाचे , ते अनुभवातूनच नक्की करता येते ...
...
तुम्ही एखादा ब्राऊझर डाऊनलोड केलात की तो तुम्हाला एक प्रश्न विचारतो : हा ब्राऊझर तुमचा डिफॉल्ट ब्राऊझर करायचा आहे का ? तुम्ही एखादाच ब्राऊझर डाउनलोड केला असेल तर प्रश्नच नाही . पण जेव्हा इंटरनेट एक्स्प्लोरर ७ , फायरफॉक्स , नेटस्केप नेव्हिगेटर , सफारी , अवंत आणि सीमंकी हे सगळे ब्राऊझर डाऊनलोड केले असतील तर त्यातला एखादा डिफॉल्ट करावा . म्हणजे आपोआप सगळ्या लिंक्स त्याच ब्राऊझरमध्ये ओपन होतील . आणखी एक डिफॉल्ट गोष्ट विचारली जाते , ती सर्च इंजिनची . गूगलचे बरेचसे सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना ' तुम्हाला गूगल सर्च इंजिन डिफॉल्ट करायचे आहे का ', असे हमखास विचारले जाते . याचा अर्थ कोणत्याही बाबीचा सर्च करायचा असेल तर तो गूगलमधूनच व्हावा असे तुम्हाला वाटते का ? इंटरनेटचे जाळे एकच आहे ; मग गूगलमधून सर्च केला काय आणि अन्य सर्च इंजिनमधून केला काय , ते सारखेच असा विचार मनात येऊ देऊ नका . कारण गूगलबरोबरच बरीच सर्च इंजिन्स तुमच्या सेवेला हजर असली , तरी ते प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या पद्धतीने काम करते . प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य देते . ती सगळी एकदा वापरून पाहा ; मग तुम्हाला जे योग्य वाटेल त्यात नियमित सर्च करू शकता .

गूगल सर्च चांगला आहेच . त्यात आर्काइव्हज सर्च अशी नवी श्रेणी आल्यापासून तर तो अधिकच आवश्यक बनला आहे . पण गूगल सर्चबाबत पुन्हा कधीतरी लिहिता येईल . गूगलशिवाय अनेक सर्च इंजिन्स उपलब्ध आहेत . त्यातल्या काहींची ही तोंडओळख . मी मुद्दाम वेगवेगळ्या इंजिन्समध्ये जाऊन केवळ ' सचिन तेंडुलकर ' असा सर्च दिला . प्रत्येक इंजिनने मोठ्या फरकाने रिझल्ट दिले . उदा . एओएल डॉट कॉमवर त्याच्या एक लाख २९ हजार लिंक्स आल्या . पण अल्टाव्हिस्टा डॉट कॉमवर गेल्यावर तब्बल एक कोटी तीन लाख लिंक्स मिळाल्या . एक्साइट डॉट कॉमवर सचिनची ४३ पाने येतात , आस्क डॉट कॉममध्ये पाच लाख एक हजार ९०० लिंक्स , अलेक्सा डॉट कॉमवर दोन लाख २२ हजार लिंक्स येतात . माणूस एकच ; पण रिझल्टमध्ये एवढा फरक कसा असा प्रश्न पडेल . त्याचे सोपे उत्तर म्हणजे प्रत्येक इंजिनची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे . अल्टाव्हिस्टात सगळ्याच लिंक मिळतात ; पण एक कोटीवर असलेल्या या लिंकमधून तुम्हाला नेमके हवे आहे ते कसे शोधून काढणार ? या अर्थाने असे म्हणता येईल की भरपूर लिंक्स आल्या म्हणजे ते सर्च इंजिन चांगले असे नाही . तो सर्च किती सुसूत्रपणे होतो , हे महत्त्वाचे . म्हणूनच गुगलवर सचिनच्या ' फक्त ' १४ लाख ६० हजार लिंक येतात , एमएसएनवर तर केवळ ९४ , ७०३ लिंक येतात . हा शोध अधिक अचूक करत आणला तर कमी पण नेमक्या लिंक मिळतात .

सर्च इंजिनचा शोध घेत असताना मला कार्टू डॉट कॉम (kartoo.com) नावाची साइट मिळाली . आपल्याला हवे असलेले रिझल्ट ती ग्राफिक्सच्या स्वरूपात देते . त्यामुळे हवे ते शोधणे सोपे जाते . सचिनचाच सर्च दिला तर त्याची शतके , त्याच्यावरचे लेख , फोटो अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज दिसतात . हवे ते शोधायला सोपे जाते .

तुम्हाला केवळ बातम्या वा लेखांचाच सर्च करता येतो असे नाही . तुुम्ही फोटोही शोधू शकता . फक्त हे फोटो मोठ्या साइझमध्ये मिळणार नाहीत . कारण एवढ्या मोठ्या संख्येने फोटो साठवायचे म्हणजे र्सव्हरवर बरीच जागा लागते . ती देणे सर्वांना शक्य होतेच असे नाही . अगदी गूगलवरही एका मर्यादेपर्यंतच फोटो मोठे होऊ शकतात . तुम्हाला एमपी३ फाइल्स हव्या असतील तर त्याही मिळू शकतील , व्हीडिओ हवे असतील तर ते मिळतील , ब्लॉगचा सर्च हवा असेल तर तोही मिळेल . मात्र त्यासाठी महत्त्व आहे ते तुमच्या सर्चवर्डला . तो अधिकाधिक नेमका हवा . सचिनच्या सेंच्युरीज हव्या असतील तर ' सचिन तेंडुलकर सेंच्युरीज ' असे नेमके टाइप करा . फक्त सचिन वा फक्त तेंडुलकर देऊन भागणार नाही . पण सचिनची २५वी सेंच्युरी कधी व कोणाविरूद्ध झाली एवढीच माहिती हवी असली तर ? मग गूगलमध्ये जा आणि ' सचिन तेंडुलकर्स २५ सेंच्युरी इन इयर ' असे टाइप करून पुढे स्टारचे चिन्ह दाबा ( कीबोर्डवर नंबर लॉकच्या बटणाच्या रांगेतच हे बटन असते , पण कीबोर्डच्या रचनेनुसार ते बदलू शकते ) आणि सर्च म्हणा . तुमच्यापुढे नेमकीच माहिती सादर होईल .

आणखी काही सर्च इंजिन्सबद्दल पुढच्या वेळेस . काही सर्च इंजिन ट्राय करून पाहा आणि काय रिझल्ट येतात आणि तुम्हाला ( गूगल वगळून ) कोणते सर्च इंजिन आवडले ते मला कळवा .

No comments: