photo

Sunday, May 3, 2009

'अॅलर्ट' राहा! 12 Nov 2007,

वेबसाइट सतत अपडेट होत असते . त्यामुळेच चोखंदळ वाचक हाती पेपर किंवा साप्ताहिक असूनही वेबसाइट बघतातच . ज्यांना विशिष्ट विषयावरील बातम्यांतच रस आहे , त्यांच्यासाठीसुद्धा वेबसाइटवर एक सोय असतेच .
......
मागच्या वेळेस आपण बातम्यांच्या जगाची झलक पाहिली . ' वॉल स्ट्रीट जर्नल ' आणि ' न्यूयॉर्क टाइम्स ' ने वाचकांसाठी आपली वेबसाइट खुली करून दिल्याचे आपण पाहिले . त्यांनी हे पाऊल उचलले , मग त्यांचे प्रतिस्पर्धी मागे कसे राहतील ? म्हणूनच या पावलावर पाऊल टाकून ' फायनॅन्शिअल टाइम्स ' नेही आपली वेबसाइट अंशत : फुकट करून देण्याचे ठरविले आहे . आथिर्क विषयातील सर्वात महत्त्वाची साइट म्हणून ही ओळखली जाते . सध्या त्यांचे एक लाख एक हजार सभासद आहेत . वाचकांकडून पैसे घेण्याची प्रथा त्यांनी २००२पासून सुरू केली . अमेरिकेतील वाचकांकडून वर्षाला ११० डॉलर ( सुमारे ४४०० रुपये ) व युरोपीय देशांतील वाचकांकडून १७० ( सुमारे ६८०० रुपये ) डॉलर घेतले जातात . आता वाचकांना काही प्रमाणात फुकटात वेबसाइट पाहता येईल . वाचकाने साइटवरच्या पाच बातम्यांवर क्लिक केले की त्याला नाव रजिस्टर करायला सांगण्यात येईल . मग तो पुढे ३० दिवसांत आणखी २५ बातम्या वा लेख फुकटात वाचू शकेल . नंतर मात्र त्याला पैसे भरावे लागतील . ते भरायचे नसतील तर पहिली बातमी पाहिली तेव्हापासून ३० दिवस थांबावे लागेल . ते पूर्ण झाले की पुन्हा ३० बातम्या वा लेख फुकटात वाचता येतील . हे वाचकांसाठी पूर्ण समाधानकारक नाही हे मान्य . पण अगदी काहीच वाचायला मिळत नव्हते , मग एवढेतरी असे म्हणून वाचक दुधाची तहान ताकावर भागवून नेतील . या ३० क्लिक्स नेमक्या कशावर करायच्या ते काळजीपूर्वक पाहिले की याचा बऱ्यापैकी लाभ उठविता येईल .

आथिर्क व राजकीय विषयाला वाहिलेले ' इकॉनॉमिस्ट ' हे साप्ताहिक मात्र पूर्ण मोफत उपलब्ध नाही . पण बरेचसे लेख पैसे न भरता वाचायला मिळतात . या साप्ताहिकाची वर्गणी भरली की वेबसाइट फुकटात पाहता येते . भारतातल्या काही साप्ताहिकांनी हीच रीत अवलंबली आहे . वेबसाइटवर साप्ताहिकाचा वर्गणीदार क्रमांक दिल्यावर साइट फुकटात वाचता येते . साप्ताहिक हातात असल्यावर वाचक वेबसाइट का पाहतात असा प्रश्न उपस्थित होईल . त्याचे उत्तर असे की वेबसाइटवर अतिरिक्त लेख व बातम्या वाचायला मिळतात . साप्ताहिक अपडेट होत नसते , एकदा अंक आला की पुढच्या अंकाची वाट पाहावी लागते . वेबसाइट कोणत्याही क्षणी अपडेट करता येते . म्हणूनच साप्ताहिकांमध्ये ' वेब ओन्ली आटिर्कल ' अशा नावाने जाहिरातीही असतात . दुसरे असे की अंकात एखादा लेख वा मुलाखत संक्षिप्त स्वरूपात असेल तर वेबसाइटवर तो पूर्ण स्वरूपात वाचता येतो .

वेबसाइटना मिळणाऱ्या जाहिरातींत गेल्या तीन वर्षांत कमालीची वाढ झाली आहे हे या साइट फुकट उपलब्ध करून देण्यामागील उघड गुपित आहे . वेबसाइट ' पेड ' असेल तर वाचक तिकडे वळत नाहीत , असा सर्वसाधारण अनुभव आहे . मग कितीही चांगली वेबसाइट केली तरी त्याचा फायदा होत नाही . जाहिराती कमी होत्या , तेव्हा वाचकांकडून पैसे घेण्यात मतलब होता . आता परिस्थिती बदलल्याने साइटसाठी पैसे घेण्याची प्रथा सगळ्यांनाच बंद करावी लागेल .

ज्यांना जगातल्या सर्वच बातम्यांमध्ये रस असेल त्यांना विविध वर्तमानपत्रांच्या साइटचा उपयोग होतो . पण एखाद्याला अशा कोणत्याही वेबसाइटवर जायचे नसेल पण बातम्या नियमितपणे पाहायच्या असतील तर ? आणि सगळ्या विषयांत जाण्याऐवजी एखाद्याच विषयात रस असेल आणि त्यांच्याच बातम्या वाचण्यात रस असेल तर ? मग या वर्तमानपत्रांची न्यूजलेटर्स आपल्या इनबॉक्समध्ये मागवायची . त्यासाठी रजिस्टर करताना आपल्याला नेमक्या कोणत्या बातम्या हव्या आहेत त्यावर क्लिक करायचे . म्हणजे हव्या त्याच बातम्या वाचायला मिळतील व बातम्यांच्या ढिगाऱ्यातून नेमकी हवी असलेली बातमी शोधण्यात वेळ जाणार नाही . पण काही वृत्तपत्रांच्या न्यूजलेटरमध्ये अधिक चॉईस नाही . ते ज्या बातम्यांची पॅकेजेस देतील , त्याच बातम्या वाचायला लागतात . यावर उपाय काय ?

अशावेळी गूगल आपल्या मदतीला धावून येते . गुगल डॉट कॉम ही साइट ओपन करा . त्यातील न्यूज या लिंकवर क्लिक करा . तुम्हाला ज्या विषयाचा सर्च करायचा असेल , ते टाइप करा . हवे असलेले सर्व रिझल्ट तुमच्यासमोर येतील . पण हे झाले तोपर्यंत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वा लेखांचे . तुम्हाला रोज याच विषयावरील ताज्या बातम्या हव्या असतील तर ? रोज सर्चमध्ये जाण्याची गरज नाही . मगाशी न्यूजवर क्लिक केल्यावर जे रिझल्ट आले असतील त्याच्या सर्वात शेवटी ' गेट द लेटेस्ट न्यूज ऑन ( तुमचा सर्चचा विषय ) गूगल अॅलर्ट ' असा मेसेज येईल . त्यावर क्लिक करा . दुसरी विंडो ओपन होईल . तिथे आवश्यक ते तपशील भरा . सर्चचा विषय , टाइप ( म्हणजे तुम्हाला या विषयावरच्या बातम्याच हव्यात , व्हीडिओच हवाय अथवा ब्लॉगच हवेत . सर्व हवे असले तर ' कॉम्प्रिहेन्सिव्हवर ' क्लिक करा ), हे अॅलर्ट रोज हवेत , संबंधित घटना घडल्यावर हवेत की आठवड्यातून एकदाच हवेत ते स्पष्ट करा , नंतर तुमचा ई - मेल पत्ता द्या . क्रिएट अॅलर्टवर क्लिक करा आणि निर्धास्त राहा . तुम्हाला हव्या असलेल्या बातम्या रोज ( अथवा तुम्हाला आठवड्यातून एकदा हव्या असल्यास तशा ) तुमच्या मेलच्या इनबॉक्समध्ये येउन पडतील . याचा जादा फायदा असा की या विषयावरच्या विविध वर्तमानपत्रांच्या बातम्या तुम्हाला एकत्रित स्वरूपात वाचायला मिळतील . त्यासाठी वेगवेगळे पेपर वाचायला नकोत .

अर्थात हे जग बातम्यांपुरते मर्यादित राहात नाही . ब्लॉग हवे असतील तर ते मिळतात . अक्षरश : काहीही मिळते . म्हणूनच या अॅलर्टना रजिस्टर करून ठेवले की आपले बरेचसे काम होते . सर्चचा विषय वेगवेगळ्या माणसांची प्रोफाइल्स असा असेल तर रोज जगभरात प्रसिद्ध होणारी प्रोफाइल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येउन पडतील . मग रोज नाना विषयातील विविध स्वभावाच्या माणसांची आवश्यक ती माहिती वाचता येईल .

No comments: