photo

Sunday, May 3, 2009

विंडोज एक्सपीची बाजी 12 Nov 2007,

विंडोज सिस्टिम विकसित करण्याचा कालावधी तीन ते
चार वर्षांचा असतो . व्हिस्ताने मात्र पाच वर्षांहून अधिक काळ घेतला . दरम्यानच्या काळात एक्सपीचा ' सव्हिर्स पॅक दोन ' ही आला आणि त्यानी एक्सपी अधिक सुलभ करून टाकले ...

..............

कम्प्युटर घरी आणताना त्यात कोणती प्रणाली असावी , याचा विचार ग्राहकाला करावा लागतो . बहुतांशपणे विंडोज सिस्टिमच बसविली जाते . नाही म्हणायला याला पर्यायी लिनक्स सिस्टिम उपलब्ध आहे ; पण ती अजून म्हणावी तशी लोकप्रिय नाही . सध्या विंडोज एक्सपी ही सर्वात चांगली समजली जाते . मायक्रोसॉफ्टने ती पाच वर्षांपूर्वी बाजारात आणली . ती लगेचच लोकप्रिय झाली . याचे मुख्य कारण ती ' यूजर फ्रेंडली ' आहे . कम्प्युटरचे कमी ज्ञान असणाऱ्यालाही ती उत्तम मार्गदर्शक ठरते . या एक्सपीनंतर मायक्रोसॉफ्टने बराच गाजावाजा करून आणि कोट्यवधी डॉलर खर्चून विंडोज व्हिस्ता ही प्रणाली बाजारात आणली आहे . पण तिचा जेवढा ढोल वाजवला गेला , तेवढा आवाज झाला नाही आणि काहींच्या मते हा बार फुसकाच ठरला आहे . जेवढा प्रतिसाद व्हिस्ताला मिळेल असे वाटत होते , तेवढा अजिबात मिळाला नाही . उलट व्हिस्ता निवडलेल्या काही लोकांनी एकंदर परिस्थिती पाहून पुन्हा एक्सपी लोड करून घेतले .

प्रणाली कोणतीही असो ; ते ओरिजनल सॉफ्टवेअर आहे याची खात्री करून घ्यायलाच हवी . जी कोणती विंडोज सिस्टिम तुम्ही निवडाल , ती ओरिजिनलच बसवायला हवी . अन्यथा तुमचा कम्प्युटर सुरक्षित राहण्याची शक्यता फार कमी असते किंवा जवळपास नसतेच . पण बऱ्याचदा याची माहिती नसल्यामुळे म्हणा किंवा थोडेसे पैसे वाचविण्यासाठी म्हणा , अस्सल विंडोजची कॉपी करून नकली विंडोज बसवून घेण्यात येते . याचा परिणाम व्हायचा तोच होतो . सिक्युरिटी अपडेट्स मिळत नाहीत अथवा कोणत्याच घटकांचे अपडेट्स मिळत नाहीत . व्हायरस आणि अन्य ' कम्प्युटरविघातक ' बाबींचे आक्रमण अशा वेळेस अधिक वेगाने होते व तुम्ही कितीही अँटिव्हायरस अथवा अँटिस्पायवेअर वापरलेत तरी कम्प्युटर कधीही अचनक क्रॅश होऊ शकतो . त्यामुळे कम्प्युटर विकत घेताना त्याच्या खर्चात ओरिजिनल विंडोजचा खर्च समाविष्ट करायलाच हवा .

विंडोज सिस्टिम विकसित करण्याचा कालावधी तीन ते चार वर्षांचा असतो . व्हिस्ताने मात्र पाच वर्षांहून अधिक काळ घेतला . दरम्यानच्या काळात एक्सपीचा ' सव्हिर्स पॅक दोन ' ही आला आणि त्यानी एक्सपी अधिक सुलभ करून टाकले . व्हिस्ता आल्यावर एक्सपी देणे टप्प्याटप्प्याने बंद करावे , असा मायक्रोसॉफ्टचा विचार होता . पण व्हिस्ताचे मर्यादित यश पाहून त्यांनी विचार बदलला आहे , हे त्यांच्याच अधिकृत अहवालावरून दिसते . २००८मध्ये त्यांनी १००पैकी ८५ कम्प्युटरमध्ये व्हिस्ता देण्याचे ठरविले होते व उरलेल्या १५मध्ये एक्सपी बसविणार होते . आता हाच आकडा अनुक्रमे ७८ व २२ असा असेल . म्हणजेच त्यांनी व्हिस्ताचे प्रमाण कमी केले आहे . व्हिस्ता आल्यावरही एक्सपीच्या वाढत्या लोकप्रियतेचेच हे लक्षण आहे . एक्सपीच्या ग्राहकांसाठी आणखी एक खुशखबर आहे . मायक्रोसॉफ्ट एक्सपीसाठी ' सव्हिर्स पॅक तीन ' पुढील वर्षाच्या सुरुवातीला बाजारात आणणार आहे . यामुळे एक्सपी अधिक वेगाने व अधिक सुलभतेने चालेल . एक्सपी प्रणालीसाठी जे अपडेट्स लागतात , ते दोन प्रकारचे असतात . एक प्रत्येक घटकाचे अपडेट्स आणि दुसरे फक्त अत्यावश्यक अपडेट्स . यापैकी पहिले अपडेट्स देणे हळूहळू थांबविण्यात येईल , दुसऱ्या प्रकारचे अपडेट्स २०१४ सालापर्यंत मिळत राहतील आणि नंतर विंडोज एक्सपीचे आयुष्यमान संपेल असा अंदाज आहे . म्हणजे सध्याच्या एक्सपीधारकांना आणखी काही वर्षे निर्धास्त राहायला हरकत नाही . अर्थात याचे अधिकृत धोरण मायक्रोसॉफ्टने जाहीर केलेले नाही .

विंडोज ९५ , मग ९८ , मग २००० , विंडोज मी , नंतर एक्सपी , आता व्हिस्ता अशी ही वाटचाल आहे . पण या कुटुंबातला नवा सदस्य २०१०पर्यंत जन्माला येण्याची शक्यता आहे . त्याचे नाव आहे ' विंडोज सेव्हन '. व्हिस्तानंतर अवघ्या साडेतीन वर्षांनंतर तो लाँच होईल . याचाच अर्थ व्हिस्ताच्या मर्यादा मायक्रोसॉफ्टला कळल्या आहेत . ही प्रत्येक प्रणाली विकसित करत असताना सुरुवातीच्या काळात त्याला एक टोपण नाव दिले जाते . उदा . एक्सपीला ' व्हिस्लर ' नावाने संबोधले जायचे . व्हिस्ताला ' लाँगहॉर्न ' म्हटले जाई आणि आगामी विंडोज सेव्हनला ' ब्लॅककोंब ' नावाने ओळखले जाते .

व्हिस्ता अपेक्षेला उतरली नसली , तर एक्सपीमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत . कम्प्युटर जुना असला तर व्हिस्ता त्यात लोड करता येत नाही . कारण त्यासाठी कम्प्युटरची क्षमता खूप जास्त असावी लागते . तरीही तुमच्या कम्प्युटरमध्ये सध्या एक्सपी आहे व तुम्हाला व्हिस्ता हवा आहे का ? तुमचा कम्प्युटर व्हिस्तायोग्य आहे का हे पाहण्यासाठी कोणा इंजिनीअरला बोलवायची गरज नाही . तुम्ही स्वत : च ते पाहू शकता . त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या साइटवर जाऊन ' विंडोज व्हिस्ता अपग्रेड अॅडव्हायझर १ . ० ' ही फाइल डाउनलोड करा . ६ . ६ एमबीची ती फाइल आहे . डाऊनलोड पूर्ण झाल्यावर ती ' रन ' करा . तुमचा कम्प्युटर जरी नवीन असला , तरी तो व्हिस्तायोग्य आहे का याची तपासणी ही फाइल करते व शेवटी व्हिस्तासाठी कायकाय अपडेट करावे लागेल याची यादी देते . तेवढ्या गोष्टी लोड केल्या की कम्प्युटर व्हिस्तायोग्य होतो . प्रत्यक्ष व्हिस्ता मात्र विकत घ्यावे लागते आणि तज्ज्ञ इंजिनीअरकडून बसवावे लागते .

No comments: