photo

Sunday, May 3, 2009

बातम्यांचे जग 12 Nov 2007,

इंटरनेटवर जाऊन पेपर वाचण्याचा ट्रेंड आता निर्माण झाला आहे . वाचकांच्या गरजेतून निर्माण झालेल्या या ट्रेंडचे भान अनेक वर्तमानपत्रांनाही आले आणि त्यांनी आपल्या इंटरनेट एडिशन अधिक रिडर्स फ्रेंडली केल्या .
.....
इंटरनेट हे माहितीचे महाजाल आहे असे म्हटले जाते ते खरेच आहे . यातला बराचसा स्त्रोत हा सर्च इंजिन हाच असतो . एखादी माहिती नेमकी कोणत्या साइटवरून मिळवायची हे माहीत नसले की सर्च इंजिनचा आधार घ्यावा . आपोआप तुम्हाला त्या लिंकवर नेण्यात येते . पण थेट मूळ लिंकवर जायची सवय लावलीत तर आपला सर्च अधिक सोपा व वेगाने होतो .

तुम्हाला बातम्यांसाठी सर्च द्यायचा असेल , तर सर्च इंजिनचा वापर करण्याऐवजी त्या त्या वर्तमानपत्राच्या साइटवर जाऊन शोध घेतला तर अधिक चांगले होईल . हातात पेपर धरून तो वाचणे यातला आनंद काही वेगळाच असतो हे खरे ; पण नेटवरच पेपर वाचण्याचा ट्रेंड गरजेतून निर्माण झाला आहे . गरज अशा अर्थाने की जादा पेपर घरात घेऊन ते वाचत बसायला कोणालाही वेळ नसतो . अशावेळी सवडीने नेटवर आवश्यक तेवढ्याच बातम्या वाचण्याकडे लोकांचा कल असतो . भारताबाहेरचे मराठीजन महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे मराठी पेपर आवडीने वाचत असतात . त्यांना दुसरा पर्याय नसतो हे एक कारण झाले ; पण ते एकावेळी असंख्य पेपर वाचू शकतात , महत्त्वाचे तेवढेच पाहतात हेही कारण आहे . म्हणूनच वर्तमानपत्रांच्या साइट माहीत असणे आवश्यक आहे . ' महाराष्ट्र टाइम्स ' चीही साइट आहे . तिचा पत्ता : maharashtratimes.com असा आहे . रोज ती साइट काही लाख लोक पाहत असतात , महाराष्ट्रातील वा एकंदरितच देशातील प्रमुख घडामोडींशी आपला संबंध राहील हे पाहात असतात . ही साइट पाहण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत . भारतातल्या कोणत्याच पेपरने वाचकांकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला नाही .

' टाइम्स ऑफ इंडिया ' सह काही भारतीय पेपरनी ' ई - पेपर ' नावाने सुविधा सुरू केली आहे . त्यात आपल्याला पेपरची पाने जशीच्यातशी दिसतात . ती जणू हातातच पेपर आहे अशा पद्धतीने वाचताही येतात . चेन्नई मुख्य केंद असणाऱ्या ' हिंदू ' दैनिकाने ई - पेपरसाठी पैसे आकारणे सुरू केले आहे . पण बाकीचे ई - पेपर फुकटात वाचायला मिळतात .

परदेशांतील काही वर्तमानपत्रांनी वाचकांना पैसे आकारून साइटला अॅक्सेस ठेवला होता . पैसे न भरणाऱ्या वाचकांना काही बातम्या वाचता येत ; पण महत्त्वाच्या बातम्या अथवा विश्लेषणात्मक लेख मात्र वाचता येत नसत . ' इंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यून ' आणि ' द न्यूयॉर्क टाइम्स ' या दोन पेपरनी वाचकांकडून वर्षाला २०२८ रुपये घेऊन पूर्ण साइट उपलब्ध करून दिली होती . बाकीच्या वाचकांना ती अंशत : उपलब्ध होती . रोज ' न्यूयॉर्क टाइम्स ' सुमारे आठ लाख लोक पाहतात . त्यापैकी सव्वादोन लाख लोक पैसे भरतात . त्यातून त्यांना सुमारे ४० कोटी रुपये मिळतात . पण गेल्या आठवड्यात त्यांनी या पैशांवर पाणी सोडण्याचे ठरविले आणि साइट वाचकांसाठी फुकटात उपलब्ध करून दिली . अर्थात यातून झालेला तोटा ते साइटवरील जाहिरातींतून भरून काढतील . हा निर्णय त्यांनी का घेतला ? त्यांना असे आढळले की साइट फुकट नसल्याने बरेचसे वाचक थेट या साइटवर येत नाहीत . ते सर्च इंजिनचाच आधार घेतात . तिथून वाचक पेपरची लिंक घेतात . ती लिंक महत्त्वाची असली व फुकटात उपलब्ध नसली तर वाचक त्या पेपरकडे पुन्हा जात नाहीत . म्हणून साइटच मोफत करण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला .

अन्य काही वृत्तपत्रांनी मात्र हा ' फुकट ' चा मार्ग अवलंबलेला नाही . ' द वॉल स्ट्रीट जर्नल ' हे दैनिक नुकतेच रूपर्ट मरडॉक यांनी विकत घेतले आहे . त्यांना वाचकांकडून सुमारे २७५ कोटी रुपये मिळतात . पण आता ते वाचकांना ही साइट मोफत उपलब्ध करून द्यावी का , याचा विचार करताहेत . ' द फिनॅन्शिअल टाइम्स ' हा आथिर्क घडामोडींवरचा पेपर महत्त्वाच्या बातम्यांसाठी वाचकांकडून पैसे घेतो . बाकी बातम्या कोणालाही उपलब्ध असतात . ' द लॉस इंजेलिस टाइम्स ' चे उदाहरण महत्त्वाचे आहे . त्यांनी २००५पासून वाचकांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली . त्याबरोबर वाचक इतक्या कमी वेळा साइटवर जायला लागले की त्यांनी ताबडतोब ही योजना बंद करून साइट सर्वांसाठी उपलब्ध करून दिली .

अर्थात या सर्व पेपरची साईट माहीत असणाऱ्यांच्या गोष्टी . पेपरची साइट माहीत नसेल तर एकदा सर्च इंजिनमध्ये जाऊन सर्च द्या . ती साइट मिळाली की तिचा बुकमार्क करून ठेवा . साधारणपणे पेपरचे नाव व पुढे डॉट कॉम अशी ती साइट असते . पेपरचे नाव मोठे असल्यास त्याचा शॉर्टकट केला जातो . उदाहरणार्थ , आधी उल्लेख केलेल्या इंंटरनॅशनल हेरॉल्ड ट्रिब्यूनच्या साइटचे नाव iht.com असे आहे . लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या टाइम्स वृत्तपत्राची साइट आहे www.timesonline.co.uk/tol/global/

परदेशांतले हे पेपर वाचून असंख्य नव्या गोष्टी आणि त्या - त्या देशातली विचार करण्याची पद्धत कळते . मुख्य म्हणजे आपल्याकडे एखादी बातमी ज्या पद्धतीने प्रसिद्ध होते , तीच बातमी परदेशांत कशा पद्धतीने दिली जाते हे वाचणे मनोरंजक ठरते . या साइटवरून ' न्यूजलेटर्स ' नावाची अत्यंत उपयुक्त सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे . तेथे तुमचा ई - मेल रजिस्टर केला की रोजच्या रोज महत्त्वाच्या बातम्या तुमच्या इनबॉक्समध्ये येऊन पडतील . मग त्या पेपरच्या साइटवर मुद्दाम जाण्याची गरज भासणार नाही .

एका साइटचे नाव देतो . तेथे रोज सुमारे ४५० वर्तमानपत्रांची पहिली पाने पाहाता येतील . अगदी फुकटात . www.newseum.org इथे जाऊन पाहा आणि बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पुढे येतात ते . निदान जगभरात पहिले पान किती वेगवेगळ्या प्रकारे तयार होते ते तरी कळेल .

No comments: