photo

Sunday, May 3, 2009

फाईल कन्व्हर्जन 4 Apr 2008,

फाइल्स कन्व्हर्ट कशा करायच्या हा प्रश्ान् अनेकांना सतावत असतो. परंतु त्यानं कावून जाण्याचं कारण नाही. असं कन्व्हर्जन करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ते कोणते, त्याचाच वेध...

.....

पीडीएफ फाइलमधला मजकूर काढून डॉक फाइलमध्ये कन्व्हर्ट करता येईल का, असे एका वाचकाने विचारले आहे. त्याच्या कार्यालयात त्याला पीडीएफ फाइलमधला मजकूर वर्डमध्ये उतरवून काढण्याचे काम दिले होते. साहजिकच त्याला खूप वेळ लागत असे. एवढा वेळ घालविण्यापेक्षा हे काम पटकन होईल का असा त्याचा सवाल होता. त्याचे उत्तर होय असे आहे. असे पीडीएफ कन्व्हर्टर इंटरनेटवरून फुकटात किंवा काही पैसे मोजून डाऊनलोड करता येतात. इंटरनेटवर 'पीडीएफ कन्व्हर्टर' असा सर्च दिला की ही साधने क्षणार्धात तुमच्या पुढे हजर होतात. मी स्वत: काही फाइल्स अशा करून पाहिल्या. त्या व्यवस्थित झाल्या.

पीडीएफचाच विषय आहे तर एका चांगल्या पीडीएफ प्रोग्रामचा उल्लेख करायला हवा. अडोब रिडरमध्ये पीडीएफ बनते, पण बऱ्याच वेळेस ती ओपन होत नाही. किंवा होताना कम्प्युटर हँग होतो, मग दोनचार मिनिटांनी कम्प्युटर चालायला लागतो. मी अडोब रिडर माझ्या कम्प्युटरमधून काढून टाकला आणि फॉक्सिट रिडर लोड केला. पीडीएफच्या कोणत्याही फाइल्स या फॉक्सीटमध्ये पटकन ओपन होतात. इंटरनेटवर जाऊन 'फॉक्सिट रिडर' असा सर्च द्या. तुमच्यापुढे फॉक्सिट सॉफ्टवेअरचे पान ओपन होईल. सध्या २.२ क्रमांकाची व्हर्जन उपलब्ध आहे. त्यातील पहिल्याच परिच्छेदातील 'डाऊनलोड' या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला चार पर्याय दिले जातील. त्यातील कोणत्याही एका लिंकवर क्लिक करा. सुमारे २.१३ एमबी ते ३.५६ एमबीपर्यंतची ही फाईल (वेगवेगळ्या लिंकवरून वेगवगळ्या साइझची पॅकेजेस असतात) डेस्कटॉपवर डाऊनलोड करा. नंतर त्यावर डबलक्लिक करून फॉक्सिट मशीनवर स्थिरस्थावर होऊ द्या. तुमच्या मशीनमधली कोणतीही पीडीएफ फाइल कशी पटकन उघडेल ते पाहा.

याच लिंकवर तुम्हाला काही झिप फाइल्स दिसतील. या काय किंवा अन्य झिप फाइल्स म्हणजे काय? कपड्यांनी भरलेली बॅग नजरेपुढे आणा. तशीच अनेक सुट्या फाइल्स एका मोठ्या फाइलमध्ये बंद केल्यावर होते ती झिप फाइल असे समजा. झिप फाइलचे विशिष्ट चिन्ह असते. ती फाइल उघडून त्यातील फाइली सुट्या करायला काही प्राोग्राम्स उपलब्ध आहेत. विनझिप, विनरार वगैरे. काही पैसे भरून; तर काही फुकटात. त्यातील एखादा प्रोग्राम तुम्हाला आधी डाऊनलोड करावा लागेल. मग केव्हाही कोणतीही झिप फाइल तुम्ही उलगडू शकाल. मग मेलवरून कोणी अशी फाईल पाठवली तर काय करायचे असा प्रश्ान् पडणार नाही. ती फाइल सिलेक्ट करून राइट क्लिक करा. वरच्या भागातच 'ओपन विथ विनझिप' (किंवा तुम्ही जो प्रोग्राम डाऊनलोड केला असेल तो) असे दिसेल. त्यावर क्लिक करा. मग त्या झिपच्या अंतरंगात काय दडलंय ते तुम्हाला दिसेल. समजा त्यात दहा फाइल्स आहेत. त्या सगळ्या एकदम सिलेक्ट करा. वरती एक्स्ट्रॅक्ट नावाचे बटण असेल. त्यावर क्लिक करा. या दहा फाइल्स तुम्हाला कुठे सेव्ह करायच्या आहेत असे तुम्हाला विचारण्यात येईल. मग आवश्यकतेनुसार फाइल सेव्ह करा. तुम्हाला दहापैकी चार फाइल एका फोल्डरमध्ये व बाकीच्या दुसऱ्यात असेही करता येईल.

झिप फाइलचा उलट्या मार्गानेही उपयोग असतो. दोन तीन फाइलची मिळून एक झिप फाइल करायची असेल, तर सगळ्या फाइल सिलेक्ट करा, राइट क्लिक करून 'सेंड टू'वर जा व पुढे 'कम्प्रेस्ड फोल्डर' असे म्हणा; की सगळ्या फाइलची एकच झिप फाइल तयार होईल. यात महत्त्वाचा भाग असा की मूळ फाइल्सपेक्षा झिप फाइलचा आकार छोटा असतो. त्यामुळे अशा स्वतंत्र फाइल्स मेलवरून पाठवत बसण्यापेक्षा एकच झिप फाइल पाठवणे सोपे जाते.

सध्याचा जमाना मोबाइलचा आहे. नुसते फोन करणे वा एसएमएस करणे एवढ्यापुरता हा मोबाइल मर्यादित राहिलेला नाही. त्यात पहिली सुधारणा म्हणजे एफएम रेडिओ आला. आता तर एकदोन जीबीचे मेमरी कार्ड टाकले की भरपूर गाणी ऐकता येतात. रेल्वे डब्यातून असे अनेक मोबाइल एकाचवेळी वेगवेगळी गाणी म्हणत असलेले तुमच्या लक्षात येतच असतील. तुमच्याकडे सीडीमध्ये सेव्ह केलेली गाणी हजारोंच्या संख्येत असतील; पण ती मोबाइलमध्ये कशी लोड करणार? गाणी आधी कम्प्युटरमध्ये लोड करून मग डाटा केबलने मोबाइलमध्ये, असे याचे उत्तर आहे का? होय आणि नाहीही!. याचे कारण सीडीमधून मोबाइलमध्ये गाणी एमपी३ फॉरमॅटमध्ये टाकावी लागतात. सीडीतली गाणी त्या फॉरमॅटमध्ये नसली तर? काळजी करू नका. इंटरनेटवरून आयट्यून्स हा प्रोग्राम डाऊनलोड करा. तो वजनदार म्हणजे सुमारे ५५ एमबीचा आहे. ब्रॉडबँड नसले तर तो डाऊनलोड करायला बराच वेळ लागेल. पण झाला की गंमत येईल.

तुमच्या सीडीवरची गाणी (कोणत्याही फॉरमॅटची असली तरी) कम्प्युटरवर एका फोल्डरवर सेव्ह करा. मग आयट्यून्स ओपन करा. 'फाइल'मध्ये जाऊन खाली 'इम्पोर्ट'वर क्लिक करा. सीडीवरची गाणी जेथे सेव्ह केली आहेत तेथे जा. ताबडतोब प्रत्येक गाणे एमपी३ वा एमपी४ फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट होईल. मग ती कन्व्हर्ट झालेली गाणी मोबाइलच्या डाटाकेबलच्या मदतीने मोबाइलमध्ये घाला. झाले काम!

No comments: