photo

Saturday, May 2, 2009

स्पॅम मेलचा राक्षस 12 Nov 2007

मेलबॉक्समध्ये येणारे ८० टक्के मेल 'स्पॅम' या प्रकारात मोडतात. विविध प्रकारच्या फसवणुकी करणारे हे मेल रोखणारी यंत्रणा देणारे प
्रोग्रॅम्स माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे...
....................
मला ब्रिटन, अमेरिका आणि आफिक्रेतून आतापर्यंत कोट्यवधी डॉलर वा पौंडांचे बक्षीस मिळाले आहे. ते मिळाल्याने मी केव्हाच अब्जाधीश झालो आहे. मला जगात दर आठवड्याला कोठे ना कोठे तरी लॉटरी लागते आणि माझ्या पैशांत भर पडत जाते. फरक एवढाच की हे पैसे मी प्रत्यक्षात कधीच घेतलेले नाहीत. कारण उघड आहे. ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. माझ्या ई-मेलमध्ये येणारे हे मेल बोगस असतात. अशा लॉटऱ्यांबरोबरच मला असंख्य नामांकित कंपन्यांची उत्पादने जवळपास फुकटात मिळतात. याशिवाय असंख्य प्रलोभने या मेलमधून येत असतात. मी यातल्या कोणालाच बळी पडत नाही, हा भाग वेगळा.

या मेलना 'स्पॅम मेल' म्हणजेच कम्प्युटरधारकाच्या परवानगीविना आणि त्याची फसवणूक करण्याच्या उद्देशाने पाठविलेला मेल म्हणतात. ही फसवणूक कोणत्याही प्रकारची असू शकते. आथिर्क फसवणूकही होण्याची शक्यता असते. अशा अर्थाने की मेलमधील जाहिरातीला भुलून काहीजण ताबडतोब खरेदी करतात आणि ते करताना क्रेडिट कार्डाचा वापर करतात. त्याबरोबर मेल पाठविणाऱ्याचे काम होते. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि पासवर्ड काढून घेण्याचे काम पूर्ण होते. नंतर तुमच्या नंबरवर बरीच खरेदी केली जाते. कार्डाचे स्टेटमेंट हातात आल्यावर आपले डोळे पांढरे होतात. फसवणुकीचा दुसरा मार्ग तितकाच धोक्याचा आहे. स्पॅम मेल उघडल्यास एखादे स्पायवेअर अथवा व्हायरस कम्प्युटरमध्ये शिरण्याचा धोका असतो. एकदा व्हायरस शिरला की कम्प्युटरचा नाश करायला तो मागेपुढे पाहत नाही. स्पायवेअर अधिक धोक्याचे असते. तेे कम्प्युटरमध्ये डाऊनलोड झाले आहे याचा पत्ताच तुम्हाला लागत नाही. एकदा ते कम्प्युटरमध्ये घुसले की तुमचा डाटा कॉपी करून अथवा प्रसंगी त्याचा नाश करून टाकते. तुमच्या लक्षात येते, तेव्हा फार उशीर झालेला असतो.

यावरचा सोपा उपाय म्हणजे अशा मेल न उघडणे. तसे होत नाही. याचे कारण फुकटात अथवा अत्यल्प किमतीत काही मिळत असेल, तर ते घेण्याचा मानवी स्वभाव असतो. याचाच फायदा स्पॅम मेल पाठविणारे घेतात. प्रत्येक मेल ओपन करण्याचा कम्प्युटरधारकाच्या प्रवृत्तीचाही फायदा स्पॅम मेल पाठविणारे लोक घेतात. ही प्रवृत्ती वाढल्याने स्पॅम मेलमध्येही वाढ झाली आहे. ही वाढ किती प्रचंड आहे पाहा. १९७८मध्ये पहिल्यांदा स्पॅम मेल पाठविण्यात आला, असे मानले जाते. तो ६०० लोकांना पाठविण्यात आला. १९९४मध्ये प्रथमच खूप मोठ्या प्रमाणावर हे मेल पाठविण्यास सुरुवात झाली. लाखो लोकांना त्याचा फटका बसला. नंतर हे प्रमाण एवढे वाढले की २००५च्या जूनमध्ये रोज ३० अब्ज मेल पाठविले गेले. २००६च्या डिसेंबरमध्ये हे प्रमाण ८५ अब्ज मेल झाले आणि यंदाच्या फेब्रुवारीत तर ९० अब्जापर्यंत गेले आहे. आता जुलैत त्याने शंभरी गाठली असली तर नवल नाही.

मेलबॉक्समध्ये येणारे ८० टक्के मेल हे या सदरात मोडतात. आऊटलूकसारख्या प्रोग्रॅममध्ये अँटिस्पॅम यंत्रणा बसविलेली असते. जवळपास सर्वच ई-मेलमध्ये अशा जंक मेल बाजूला काढून त्या 'जंक मेल फोल्डर'मध्ये जातील याची व्यवस्था केलेली असते. पण या यंत्रणांवरही मात करण्याची ताकद स्पॅम मेल पाठविणाऱ्याकडे असते. या यंत्रणा नेमक्या कशा असतात? एखादा विशिष्ट शब्द मेलमध्ये असल्यास अथवा विशिष्ट पत्त्यावरून मेल आल्यास तो मेल स्पॅम मेल आहे असे समजून त्यावर बंदी घातली जाते. मग स्पॅम मेल पाठविणारे यातून पळवाटा काढतात. समजा अशोकपानवलकर याच्याकडून स्पॅम मेल आल्याने तो शब्द ब्लॅकलिस्टमध्ये गेला तर मेल पाठविताना अशोक-पानवलकर असे शब्द टाकून तो मेल येतो. मग ई-मेल यंत्रणा काहीच करू शकत नाही. एका डॅशचा फरक सामान्य माणसाच्या लगेच लक्षात येत नाही. त्याची फसवणूक होते आणि तो मेल उघडला जातो.

साधारणपणे तीन विषयांबाबत हा स्पॅममेल अधिक पाठवला जातो. पैसे, अमली पदार्थ आणि सेक्स हे ते तीन विषय आहे. प्रत्यक्षात मेलचा विषय साधा दिला जातो; पण तो ओपन केल्यावर एखादी पॉर्न साइट ओपन होते आणि कम्प्युटरचा सत्यानाश करते. आधी म्हटल्याप्रमाणे हे स्पॅम मेल रोखण्यासाठी बऱ्याच ई-मेल कंपन्यांनी स्वत:च सॉफ्टवेअर बसविलेले आहे. त्याचे जंक मेल नावाचे फोल्डरच तयार असतात. तेथे हे मेल जाऊन पडतात. आता हा फोल्डर ओपन करून ते मेल पाहण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तर भाग वेगळा. ई-मेलमधल्या अँटिस्पॅम यंत्रणेशिवाय तुम्हाला स्वत:ची यंत्रणा बसवायची असेल तर इंटरनेटवरून तुम्हीही वेगळे सॉफ्टवेअर लोड करू शकता.

No comments: