photo

Sunday, May 3, 2009

जमाना ब्लॉगचा 12 Nov 2007

ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार वेबलॉग याचा अर्थ काय आहे, हे तपासत बघण्यापेक्षा वेबलॉगचा अनुभव घेणे अधिक रोमांचकारक आ
हे. संवादाचा हा अभिनव मार्ग १९९७मध्ये सुरू झाला.

इंटरनेटवरून मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी मेसेंजर हा प्रकार आहेच. तो कमालीचा लोकप्रिय आहे, पण सुसंवादाचे दुसरे नाव 'ब्लॉग' असेही आहे. फक्त मेसेंजरसारखा लाइव्ह चॅट यात होत नाही; तर यावरून मतांची देवाण-घेवाण करता येते, आपले अनुभव शेअर करता येतात, दुसऱ्याच्या सुख-दु:खात सहभागी होता येतं. हा ब्लॉग हा प्रकार नेमका काय आहे ? तो वेबलॉग या शब्दावरून तयार झालेला आहे. थोडक्यात, ही तुमची इंटरनेटवरची डायरी असते. फरक एवढाच की ती तुमच्यापुरती मर्यादित राहात नाही. आम जनतेला ती खुली होतेे. तुुम्ही तुमचे अनुभव लिहीत जाता अथवा एखाद्या ज्वलंत विषयावरची मते मांडत जाता आणि अवघं पब्लिक त्या चचेर्त सहभागी होतं.

हा प्रकार नेमका कोणी सुरू केला हे सांगणे कठीण आहे; पण सर्वसाधारणपणे असे मानले जाते की जोर्न बार्जर यांनी हा प्रकार १९९७मध्ये सुरू केला. म्हणजेच या वर्षी या ब्लॉगने एक दशक पूर्ण केले आहे. बार्जर यांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'मी इंटरनेटवर सर्फिंग करत असताना मला अनेक चांगल्या उपयुक्त साइट्स सापडल्या. त्या सर्व इंटरनेटधारकांशी शेअर कराव्यात असे मला वाटले. म्हणून मी माझे स्वत:चे वेबपेज सुरू केले. त्यात या साइट्सची माहिती देण्यास सुरुवात केली.

या वेबब्लॉगचे रूपांतर ब्लॉग अशा सुटसुटीत शब्दांत नंतर कधीतरी झाले. बार्जर यांनी हा प्रकार सुरू केला, त्या आसपासच डेव्हिड विंटर (यांनी ब्लॉगवर फक्त बातम्या देणे सुरू केले) आणि कॅमेरून बॅरेट यांनी 'कॅमर्वल्ड' नावाने पेज सुरू केले. पण सर्वसाधारणपणे १९९७मध्ये ब्लॉगिंग खऱ्या अर्थाने सुरू झाले असे मानले जाते. हे बाल्यावस्थेतले ब्लॉग्ज आता 'वयात' आले आहेत. इंटरनेटचे मूलभूत ज्ञान असणारा माणूस स्वत:चे ब्लॉग सुरू करू शकतो. त्यांच्यापासून ते अगदी सर्वच क्षेत्रातले दिग्गज आज ब्लॉग्ज वापरतात. हे ब्लॉग सुरू करण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. अभिनेत्री मिया फॅरो हिने स्वत:च्या मुलीची समजूत काढण्यासाठी ब्लॉग सुरू केला. मुलीच्या शाळेचे एक वर्तमानपत्र निघायचे. त्याच्यासाठी मुलीने एक कविता दिली होती. ती प्रसिद्ध करण्यात आली नाही. त्यामुळे मुलीने घरी येऊन रडून गोंधळ घातला. शेवटी दुसऱ्या वर्तमानपत्रात का जायचे, आपण आपले स्वत:चे सुरू करूया अशी तिची समजूत घातली गेली आणि मिया फॅरोचा ब्लॉग सुरू झाला. तो अर्थातच शाळेच्या पेपरपेक्षा खूप जास्त लोकांपर्यंत पोचला. ती म्हणते : 'मी ४० चित्रपटांत काम केलेय, एक पुस्तक लिहिलंय, टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रं वा मासिकांना शेकडो मुलाखती दिल्या आहेत. पण मला जे मत मांडायचे आहे ते ब्लॉगमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडू शकते'.

साधारणपणे या ब्लॉगमधून खाजगी बाबी कोणी समोर मांडत नाही. कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ब्लॉग केले जातात. तरीही खाजगी बाबी नसतातच असे नाही. उदा. सध्या इराकमध्ये अमेरिकन सैन्य तैनात आहे. प्रदीर्घ काळ हे जवान घरापासून, कुटुंबीयांपासून दूर असतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा ते आपल्या ब्लॉगद्वारे घरच्यांशी संपर्क ठेवतात. रोजच्या संघर्षाची माहिती देतात. घरचे लोकही त्यांचे मनोधैर्य टिकविण्याचा प्रयत्न करत असतात. जवानांवर बंधन एकच असते. सुरक्षेच्या दृष्टीने सैन्याला हानी पोहोचेल अशी कोणतीही माहिती त्यात येता कामा नये. पण त्यामुळे हा ब्लॉग खराखुरा भावनात्मक आणि वैयक्तिक होतो.

भारतात अजून म्हणावे तसे हे ब्लॉगिंगचे वेड आलेले नाही. पण तरीही याचा वेगाने प्रसार होतो आहे. काही ब्लॉग्ज केवळ गंमत म्हणून असतात, काही विशिष्ट विषयाला वाहून घेतलेले असतात; तर काही 'आपण भंकस करूया' या स्वरूपाचे असतात. स्वत:चे पुस्तक काढायची अनेकांना इच्छा असते; पण ते शक्य होतेच असे नाही. मग अशा ब्लॉगवर त्यांना दुधाची तहान ताकावर भागवून नेता येते. पण काही काळानंतर दुधापेक्षा ताकच अधिक पौष्टिक आहे, असे वाटायला लागले तर नवल वाटायला नको.

शॉर्टकट : तुम्हाला कंट्रोल पॅनेलमधला अॅड ऑर रिमूव्ह प्रोग्राम्ससारखा एखादा प्रोग्रॅम सतत उघडावा लागतो का? मग प्रत्येक वेळेस स्टार्ट... कंट्रोल पॅनेल... अॅड ऑर रिमूव्ह प्रोग्राम्स या मार्गाने जाऊन वेळ घालविण्यापेक्षा त्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर करून ठेवा. एकदा वरील मार्गाने गेल्यावर अॅड ऑर रिमूव्हवर राइट क्लिक करा व क्रिएट शॉर्टकटवर क्लिक करा. तेव्हा डेस्कटॉपवर शॉर्टकट निर्माण करू का, अशी विचारणा होईल. तेव्हा 'यस' म्हटल्यावर डेस्कटॉपवर आयकॉन तयार होईल. थोडासा कठीण मार्गही आहे. कंट्रोल पॅनेलच्या सर्व फाइल्स .सीपीएल एक्स्टेन्शनच्या असतात. त्या विंडोज/सिस्टिम३२ या ठिकाणी असतात. तिथे गेल्यावर सगळ्या .सीपीएल फाइल ग्रूप करा. तुम्हाला समजा डिस्प्ले प्रॉपर्टीचा शॉर्टकट हवाय. तर डेस्क.सीपीएल फाइलवर राइट क्लिक करून क्रिएट शॉर्टकटवर क्लिक करा. तो शॉर्टकट तुमच्या सेवेला हजर होईल. असेच अन्य बाबींचेही शॉर्टकट होऊ शकतात.

No comments: