photo

Sunday, May 3, 2009

सोपे एक्सेल 29 Feb 2008,

आपल्या कामाचे नेमके स्वरूप आणि गरजा लक्षात घेऊन करावयाच्या गोष्टी अधिकाधिक सोप्या आणि आकर्षक करता येतात. तशा सोई कम्प्युटरमध्ये असतात. त्या जाणून घेतल्या की 'रंग बरसे' अशीच अवस्था होते...

मायक्रोसॉफ्ट वर्डइतकेच दुसरे लोकप्रिय साधन म्हणजे 'मायक्रोसॉफ्ट एक्सेल'. वेगवेगळे चार्ट बनवायला याचा फार उपयोग होतो. पण यात इतरही गमतीजमती करता येतात. मागे एका वाचकाने यात मराठी टाइप करता येते का असे विचारले होते. याचे उत्तर होकाराथीर् आहे. जे फाँट तुम्ही कम्प्युटरमध्ये लोड केलेले असतील, त्या फाँटमध्ये तुम्हाला एक्सेलमध्ये मजकूर टाइप करता येईल. एकाच फाइलमध्ये वेगवेगळ्या फाँटमध्ये मजकूर हवा असेल तर यात अधिकच गंमत करता येईल.

मायक्रोसॉफ्ट एक्सेलची ब्लँक फाइल ओपन करा. तुम्हाला समजा एखाद्या वर्गातील मुलांना प्रत्येक विषयात किती गुण मिळाले आहेत त्याचे टेबल करायचे आहे. पहिल्या उभ्या कॉलमात मुलाचे नाव लिहा. पहिल्या आडव्या कॉलमात विषय लिहा. प्रत्येक मुलाचे विषयवार मार्क लिहिणे सोपे जाईल व एकाच दृष्टिक्षेपात सर्वांचे मार्क दिसतील. कोणती मुले मागे पडत आहेत व कोणाला चांगले मार्क आहेत तेही कळेल. हे अर्थात तुमच्या मुलाची पहिलीपासूनची शैक्षणिक प्रगती लिहिण्यासाठीही तुमच्या उपयोगी पडू शकेल.

पहिला उभा कॉलम सिलेक्ट करा. अगदी वर 'फॉरमॅट'वर क्लिक करा. नंतर फाँटवर क्लिक करा. तुमच्या कम्प्युटरमध्ये जे फाँट लोड केलेले आहेत, ते दिसतील. त्यातील कोणता मराठी फाँट हवा आहे तो निवडा. बाजूच्या कॉलमात फाँट स्टाइल निवडा. म्हणजे फाँट साधा हवा, इटॅलिक हवा, बोल्ड हवा की बोल्ड आणि इटॅलिक दोन्ही हवा ते निवडा. ते निवडून झाल्यावर फाँट किती आकाराचा हवा ते निवडा. समजा मुलांची नावे मराठीत, पण पुढचे मार्कांचे आकडे इंग्रजीत लिहायचे असले तर? हरकत नाही. मार्कांचा उभा सेल म्हणजे ओळ निवडा आणि पुन्हा हीच पद्धत अवलंबून फाँट निवडा आणि ओके करा.

असे एकाच फाइलमध्ये वेगवेगळे फाँट असले तर मजकूर टाइप करायला अडचण होते. म्हणून एका फाँटचा मजकूर एकदाच ऑपरेट करावा. म्हणजेच एकदा सगळ्या मुलांची नावे मराठीतून टाइप करून घेतली की मग दुसऱ्या सेलमध्ये इंग्रजीतून मार्क टाइप करावेत. नापास झालेल्या मुलांच्या मार्कांना लाल रंग देण्याचीही यात सोय आहे. फॉरमॅटमध्ये फाँट साइझच्या खालीच कलर अशी सोय आहे. तीत हा रंग बदलू शकता.

या रंगाचा वापर आणखी वेगळ्या पद्धतीनेही करता येईल. समजा तुम्हाला पहिल्या उभ्या ओळीला अथवा एकाच उभ्या वा आडव्या ओळीला पूर्ण रंग द्यायचा असेल तर? उदा. एखाद्या मुलाच्या मार्कांची बेरीज ज्या कॉलमात असेल, तो कॉलम रंगीत केला तर सोपे जाईल. त्यासाठी जो कॉलम रंगीत करायचा आहे, तो सिलेक्ट करा. पुन्हा फॉरमॅट सेल्समध्ये जा. तेथे पॅटर्नवर क्लिक करा. तुमच्यासमोर रंगांचे पॅलेट दिसेल. त्यातला आवश्यक रंग निवडा. ओके म्हणा. संपूर्ण कागदावर एकच रंग हवा असेल, तर सगळा मजकूर एकदम सिलेक्ट करा. पण वेगवेगळ्या ओळींना वेगवेगळा रंग हवा असेल तर? तसेही करू शकता. ते दिसायला कसे दिसेल ते पाहून मग ठरवा.

समजा एका आडव्या सेलला हिरवा, दुसऱ्या आडव्या सेलला पिवळा, परत खालच्या सेलला हिरवा मग पिवळा असे रंग द्यायचे असतील तर? प्रत्येक ओळ वेगवेगळी रंगवत बसण्यापेक्षा पहिली ओळ सिलेक्ट करा. मग कीबोर्डवरची 'कंट्रोल'ची की दाबून ठेवा व तिसरी, पाचवी, सातवी अशा ओळी सिलेक्ट करा. मग फॉरमॅट सेलमध्ये जाऊन योग्य तो रंग एकदाच द्या. आपोआप सगळ्या ओळी त्या रंगात होतील. हेच पिवळ्या रंगासाठी करा. या रंगाचा पॅटर्न कोणता हवा तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करता येईल.

सगळ्या वर्गाचे मार्क तर मांडून झाले; आता प्रत्येकाची टोटल करत बसणार की काय? तुम्हाला ज्या ओळीतील मार्कांची बेरीज हवी असेल ती निवडा. फाइलच्या वरती फाइल, एडिट, व्ह्यूच्याच ओळीच्या खाली वेगवेगळ्या चिन्हांचा टूलबार असतो. त्यातल्या इंग्रजी 'इ' आकाराच्या चिन्हावर क्लिक करा. बेरीज क्षणार्धात तुमच्या समोर हजर होते.

कम्प्युटर माणसाला आळशी बनवतो ते असे!

No comments: