photo

Tuesday, April 28, 2009

शॉर्टकट्स! 11 Jul 2008

कम्प्युटरवर वेगाने काम करावयाचे असेल, तर त्याच्या अनेक युक्त्या आहेत. 'शॉर्टकट्स' ही त्यातील सर्वात महत्त्वाची. काही शॉर्टकट तुम्हाला नेटवर सापडतील. हे शॉर्टकट माणसाला आळशी बनवतात, हे खरे असले तरी काम वेगाने व्हायला हवे असेल तर हे शॉर्टकट वापरायलाच हवेत.
......
गेल्या वेळेस आपण टास्कबारच्या काही करामती पाहिल्या. आता आणखी काही सोप्या पण खूप उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. कम्प्युटर फास्ट चालावा म्हणून कायकाय करावे लागते ते आपण याआधीच्या लेखांत पाहिले. आता आणखी एक युक्ती. कम्प्युटर चालू असला की त्याचे इंडेक्सिंगचे काम सतत चालू असते. इंडेक्सिंग म्हणजे कम्प्युटरमधल्या सगळ्या फाइल्स नीट एकामागोमाग एक लावून ठेवणे. हार्ड डिस्कमध्ये बरोबर त्या बसवल्या जातात. ज्यांच्या घरातील कम्प्युटरमध्ये हजारो फाइल्स आहेत आणि प्रत्येक वेळेस एखादी फाइल ज्यांना शोधावी लागते, त्यांना सर्च केल्यावर ती फाइल पटकन मिळावी यासाठी हे फंक्शन आहे. पण त्यामुळे कम्प्युटर किंचित स्लो होतो. ज्यांच्याकडे जास्त फाइल्स नाहीत किंवा वारंवार सर्च करायला लागत नाहीत त्यांनी हे इंडेक्सिंग बंद केले तरी चालेल. त्यामुळे मशीन थोडे फास्ट चालेल. त्यांनी डेस्कटॉपवरील 'माय कम्प्युटर'वर राइट क्लिक करावे. नंतर 'सी' ड्राइव्ह निवडा, 'प्रॉपटीर्ज'वर क्लिक करा. तेथे तळाला 'अलाऊ इंडेक्सिंग' असे एक ऑप्शन असेल. ते अनटिक करा. मग मशीन पुन्हा सुरू करा.

तुम्ही कम्प्युटर अपडेट ठेवत असालच. 'ऑटोमॅटिक अपडेट' ऑन ठेवले असेल तर उत्तमच, पण हे ऑप्शन ऑन न ठेवता तुम्हाला तुमच्या सोयीनुसारच अपडेट्स डाऊनलोड करायचे असतील तर? त्यासाठी इंटरनेट एक्स्प्लोरर ओपन करून विंडोज अपडेटवर जाण्याची गरज नाही. डेस्कटॉपवर एक शॉर्टकट करून ठेवा. त्यावर डबल क्लिक केले की झाले काम. डेस्कटॉपवरच्या मोकळ्या जागेत राइट क्लिक करा मग न्यू - शॉर्टकट या मार्गाने जा. तिथे डब्लूडब्लूडब्लू डॉट विंडोजअपडेट असे टाइप करा व नेक्स्ट म्हणा. नंतर आणखी एक बॉक्स येईल. तेथे 'अपडेट शॉर्टकट' असे म्हणा व ओके करा. जेव्हा केव्हा अपडेट करायचे असेल तेव्हा त्यावर डबलक्लिक करा. झाले अपडेट सुरू. (मात्र तुमचा डिफॉल्ट ब्राऊझर इंटरनेट एक्स्प्लोरर हवा.)

तुम्हाला कम्प्युटर सुरू करताना तुमचे यूजरनेम आणि पासवर्ड नेहमी विचारला जातो का? प्रत्येकवेळेस घरच्या कम्प्युटरवर पासवर्ड देणे कटकटीचे वाटू शकते. कम्प्युटर सुरू केल्यावर तो थेट सुरू व्हायला हवा असेच वाटते ना? पासवर्ड विचारला जाणे नको असेल तर एक काम करा. आधी 'स्टार्ट' व नंतर 'रन'वर क्लिक करा. तिथे कंट्रोल युजरपासवर्डस्२ असे टाइप करा. एक विंडो ओपन होईल. मशीनमध्ये ज्यांचे ज्यांचे अकाऊंट्स आहेत ते तिथे दिसेल. समजा घरचा कम्प्युटर असेल तर कदाचित अॅडमिनिस्ट्रेटर आणि तुमच्या नावाचे अशी दोनच अकाऊंट दिसतील. त्यातल्या तुमच्या नावावर क्लिक करा. वरच्या बाजूला 'युजर्स मस्ट एंटर अ यूजर नेम अँड पासवर्ड टू यूज धिस कम्प्युटर' असे दिसेल. ते टिक केलेले असेल तर अनटिक करा. पुन्हा एक बॉक्स येईल व तुम्हाला पासवर्ड विचारेल. तो टाइप करून ओके म्हणा. मशीन रिस्टार्ट करा. आता पासवर्ड विचारला जाणार नाही व थेट मशीन सुरू होईल.

तुमच्या मशीनच्या कीबोर्डवर एक विंडोजची की दिसेल. माझ्या कीबोर्डवर एकदम तळाच्या ओळीत कंट्रोल बटनाच्या शेजारी आहे. आता नवनवीन कीबोर्ड येत असल्याने ती कुठे असेल ते पाहावे लागेल. पण ही विंडोज की जादुई आहे. ती की व अन्य काही अक्षरे एकदम दाबली की भराभर काही अॅप्लिकेशन्स ओपन होतात. उदा विंडोज व एम दाबा. कितीही फाइल्स ओपन असल्या तरी तुम्हाला डेस्कटॉप लगेच दिसेल. विंडोज व इ एकदम दाबली की विंडोज एक्स्प्लोरर सुरू होईल. विंडोज व आर की दाबली की 'रन' बॉक्स सुरू होईल. विंडोज व एफ दाबल्यावर सर्चचा बॉक्स ओपन होईल. विंडोज एम म्हटले की ज्या फाइल्स ओपन असतील त्या साऱ्या मिनिमाइज होतील. असेच काही शॉर्टकट तुम्हाला नेटवर सापडतील. हे शॉर्टकट माणसाला आळशी बनवतात हे खरे असले तरी काम अधिक वेगाने व्हायला हवे असेल तर हे शॉर्टकट वापरायलाच हवेत. समजा तुम्हाला काही काम करताना कॅलक्युलेटरची गरज भासली तर तो मशीनमध्ये कुठे आहे ते शोधत बसण्यापेक्षा विंडोज आर दाबा, तेथे सीएएलसी असे टाइप करा की झाला कॅलक्युलेटर हजर. टास्कबारवरच्या क्विकलाँचमध्ये तो आणून ठेवणे हा अधिक सोपा मार्ग झाला. तरी क्विकलाँच तुमच्या मशीनला स्लो बनवितो. त्यामुळे अत्यावश्यक दोनतीन प्रोग्राम्सच या क्विकलाँचमध्ये असावेत, असे माझे मत आहे.

No comments: