photo

Saturday, April 25, 2009

आणखी काही शॉर्टकट्स! 20 Feb 2009, 0052 hrs IST

आपला कम्प्युटर सुरक्षित आहे का? नको असलेले प्रोग्राम सुरू झाले तर काय करायचे? कम्प्युटर अपडेट कसा करायचा? अशा अनेक प्रश्नांनी आपण गोंधळून जातो. अशावेळी काय करायचे असते त्याचा वेध...
.......
आपण कम्प्युटर सुरू करतो तेव्हा अनेक प्रोग्राम्स आपोआप सुरू होतात. काही प्रोग्राम्स सुरू झालेले आपल्याला दिसतात, काही दिसत नाहीत. कारण ते पडद्याआड सुरू असतात. ते बऱ्याचदा आवश्यक नसतात. उदा. 'विंडोज मेसेंजर' हा कम्प्युटर सुरू होतानाच पडद्याआड चालू असतो. अशा नको असलेल्या प्रोग्राममुळे कम्प्युटर स्लो होतो. हा मेसेंजर सुरू झालाय हेच कळत नसल्याने तो बंद केला जात नाही. तो आपोआप सुरू व्हावा अशी यंत्रणा विंडोज प्रणालीतच असते. ती आपण डिसेबल करू शकतो. त्यासाठी तुमच्या 'सी' ड्राइव्हमधल्या प्रोग्राम्स फोल्डरवर क्लिक करा. त्यातील मेसेंजर फोल्डर उघडा. तिथे mmsgs.exe फाइल असेल. त्यावर डबल क्लिक करा. मेसेंजर ओपन होईल. त्यातील 'प्रेफरन्सेस' टॅबवर क्लिक करा. सुरुवातीलाच दोन ऑप्शन्स दिसतील. 'रन विंडोज मेसेंजर व्हेन विंडोज स्टार्ट' आणि त्याखाली 'अलाऊ विंडोज मेसेंजर टू रन इन द बॅकग्राऊंड' अशा दोन ऑप्शन्सवर क्लिक केलेले असेल. ते अनक्लिक करा. ओके म्हणा व मशीन रिस्टार्ट करा. आता मेसेंजर आपोआप सुरू होणार नाही. तुम्हाला हवा असेल तेव्हाच तो सुरू करता येईल. उगाचच तो चालणार नसल्याने कम्प्युटरची तेवढी मेमरी सेव्ह होईल. असे अनेक प्रोग्राम्स बंद करता येतात. पण कोणते प्रोग्राम्स आवश्यक आहेत आणि कोणते नाहीत याची नीट माहिती असल्याशिवाय ते करू नका.

***

आपण आपला कम्प्युटर सुरक्षित राहावा म्हणून अँटीव्हायरस व अँटीस्पायवेअर लोड करतो. एकाने भागेल का अशी शंका आल्यास आणखी एखादा असा अँटीव्हायरस आपण लोड करतो. तरीही आपला कम्प्युटर खरोखरच सुरक्षित आहे का हे आपल्याला कसे कळेल? तुमच्या कम्प्युटरवर विंडोज एक्सपी सव्हिर्स पॅक दोन अथवा व्हिस्ता लोड केलेले असेल, तर ते पाहणे सोपे आहे. त्यासाठी 'स्टार्ट' बटनवर क्लिक करा. मग 'कंट्रोल पॅनल'वर जा. तिथून 'सिक्युरिटी सेंटर'वर जा. तिथे प्रामुख्याने 'फायरवॉल', 'ऑटोमेटिक अपडेट्स' आणि 'व्हायरस प्रोटेक्शन' अशी तीन ऑप्शन्स दिसतील. ती तीनही हिरव्या रंगात 'ऑन' असा स्टेटस दाखवत असतील, तर तुमचा कम्प्युटर व्हायरस व स्पायवेअरशी मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे, असे समजा. यातील एखादी गोष्ट जरी 'ऑफ' असली तरी ती धोक्याची घंटा असते. 'ऑफ' असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही तिथेच दिलेल्या असतात. त्या पाळा आणि कम्प्युटर सुरक्षित बनवा.

तुमचा कम्प्युटर आऊटडेटेड झालाय; तो अपडेट करायचाय असे तुम्हाला वाटत असते. तुम्ही तुमच्या कम्प्युटर मेंटेन करणाऱ्या माणसाकडे जाता आणि अपडेट करायचे असल्याचे सांगता. तो तुम्हाला मशीनमध्ये सध्या काय काय लोड केलेले आहे ते विचारतो. काहीजण प्रोग्राम्सची नावे सांगू शकतील; पण त्याचे कुठले व्हर्जन लोड आहे हे त्यांना सांगता येईलच असे नाही. किंबहुना हा तांत्रिकपणा बहुतेकांना माहीत नसतोच. या गोष्टी स्वत:लाच माहीत हव्यात असे नाही वाटत? त्यासाठी 'स्टार्ट' बटनावर क्लिक करा व नंतर 'रन'वर क्लिक करा. खाली डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्यात msinfo32 असे टाइप करा व ओके म्हणा. तुमच्या कम्प्युटरमधल्या प्रत्येक 'अवयवा'ची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल.

तुम्ही एखाद्या वेळेस कम्प्युटर पूर्णपणे स्कॅन करता. या स्कॅनिंगला पंधरा मिनिटांपासून दीड तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. कम्प्युटरमध्ये फाइल्स किती आहेत, 'कम्प्लिट स्कॅन' करताय की 'स्मार्ट स्कॅन' त्यावर हा वेळ अवलंबून असतो. मग बऱ्याच वेळेस तुम्ही इतर काही काम करू शकत नाही. कम्प्युटर स्कॅनिंगला टाकून तुम्ही तुमची अन्य कामे आटोपता. पण या दीड तासात कम्प्युटर किती वीज खाईल या कल्पनेने तुम्ही घाबरत असाल. सध्या सर्वच कंपन्यांची वीजबिले ज्या झपाट्याने आकाशाकडे झेपावत आहेत, ते पाहता ही भीती रास्तच आहे. कम्प्युटर तर चालू ठेवायचाय; पण वीजही वाचवायची आहे असे करायचे असेल तर काय कराल? नुसतेच स्कॅनिंग करायचे असेल तर ते सुरू करून मॉनिटर स्वीचऑफ करू शकता. सीपीयू चालू राहील आणि मशीनचे स्कॅनिंगही होत राहील. किंवा ठराविक वेळेने मॉनिटर 'ऑफ' व्हावा अशीही सोय करता येईल. त्यासाठी स्टार्ट - कंट्रोल पॅनल - पॉवर ऑप्शन्स या मार्गाने जा. तिथे 'पॉवर स्किम्स' या पहिल्याच ऑप्शनमध्ये 'टर्न ऑफ मॉनिटर' असे दिलेले असेल व त्याखाली वेळ दिलेली असेल. '२० मिनिटांनंतर' वगैरे. ती बदलून तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे सेट करू शकता. अगदी एक मिनिटांपासून ते पाच तासांपर्यंत सेटिंग करता येते. बॅकग्राऊंडला स्कॅनिंग चालूच राहील अथवा तुम्ही जी फाइल ओपन केली असेल तीही ओपनच राहील; पण मॉनिटर ऑफ असल्याने दिसणार मात्र नाही. यामुळे विजेची बचत होईल हे महत्त्वाचे

No comments: