photo

Tuesday, April 28, 2009

फायरवॉल! 19 Sep 2008,

तुमचा कम्प्युटर आणि बाहेरचे जग यांच्यात एक भिंत असतेच. तिला म्हणतात 'फायरवॉल'. ही भिंत सर्वात महत्त्वाची असते. कुठे असते ही फायरवॉल?
.........
तुमचा कम्प्युटर अगदी शहाण्या मुलासारखा नीट चालला आहे, तरी त्यात काहीतरी गडबड आहे असे म्हटले तर हा विरोधाभास वाटेल. परंतु, वरवर हे मशीन चांगले चालत असल्याचे वाटले तरी प्रत्यक्षात अत्यंत असुरक्षित असू शकते. गेल्या काही महिन्यांत भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांआधी जो ई-मेल पाठविण्यात आला तो वायफाय तंत्रज्ञान वापरताना झालेल्या मानवी उणिवा शोधून पाठविण्यात आला होता. ही उणीव म्हणजे आपला लॅपटॉप पूर्णपणे सुरक्षित आहे व तो बाहेरून कोणी अॅक्सेस करू शकत नाही याची खात्री संबंधितांनी केली नव्हती. ही खरी गंमतच आहे. आपल्याला इंटरनेटद्वारे सारे जग आपल्याजवळ आणायचे आहे. ब्रॉडबँड घरी असले तर मग अधिक वेगाने हे जग जवळ येऊ शकते. त्याच वेळेला, आपल्या कम्प्युटरमध्ये काय दडलेय ते बाहेरच्यांना कळता कामा नये, अशा प्रकारचा अट्टाहास आपण धरायचा. हा प्रकार एकतफीर् वाटला तरी सध्याच्या परिस्थितीत तो फारच महत्त्वाचा आहे.

तुमच्या कम्प्युटरमध्ये अशी सोय हवी की बाहेरचे जग आपल्या मजीर्प्रमाणे पाहता येईल, पण आपल्या कम्प्युटरमध्ये काय आहे ते अन्य जगाला पाहता येणार नाही. म्हणजेच तुमचा कम्प्युटर आणि बाहेरचे जग यांच्यात एक भिंत उभी करावी लागेल. प्रत्येक कम्प्युटरमध्ये अशी भिंत असतेच. तिला म्हणतात 'फायरवॉल'. ही भिंत सर्वात महत्त्वाची असते.

कोणत्याही कम्प्युटरमधली फायरवॉल 'ऑन' असली पाहिजे. याचा अर्थ बाहेरून येणारी प्रत्येक फाइल तपासून ती सुरक्षित असेल तरच तिला कम्प्युटरमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. हेच काम तुमचा अँटिव्हायरस व अँटिस्पायवेअर करतो; मग फायरवॉलची गरज काय, असा प्रश्न येईल. पण प्रत्येक वेळेस व्हायरस वा स्पायवेअरच मशीनमध्ये शिरेल असे नाही. तुमचे मशीन कोणी 'हॅक' केले म्हणजेच मशीनचा बाहेरून अॅक्सेस घेऊन मशीनवर ताबा मिळविला तर तुमची सगळी गोपनीय माहिती बाहेरच्या माणसाला मिळू शकते. तुम्ही बँक अकाऊंटवर लॉगिन करून काही व्यवहार केलेत तर ते हॅकरला कळू शकतील. म्हणून फायरवॉल नेहमी ऑन असायला हवी. कुठे असते ही फायरवॉल?

त्यासाठी 'स्टार्ट' बटनवर क्लिक करा, नंतर 'कंट्रोल पॅनेल'वर जा. तिथे 'विंडोज फायरवॉल' दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तीन ऑप्शनचे टॅब दिसतील. जनरल, एक्सेप्शन्स आणि अॅडव्हान्स्ड. पहिल्याच टॅबमध्ये फायरवॉल ऑन ठेवण्याच्या सूचना असतील. (ऑन - रिकमेंडेड). त्यावर क्लिक करा. खाली 'डोंट अलाऊ एक्सेप्शन्स' याच्यावरही क्लिक करा. तिसरे ऑप्शन असेल ते 'ऑफ - नॉट रिकमेंडेड' असे असेल. ती आज्ञा निमूटपणे पाळा व त्यावर क्लिक करू नका. तीन टॅबपैकी बाकी दोन टॅबना शक्यतो हात लावू नका; कारण ती सेटिंग्ज जाणकाराकडूनच ओके करून घ्यायला हवीत. पण या एक्सेप्शन्सचा अर्थ असा की फायरवॉलला न जुमानता कोणत्या सुविधा इंटरनेटवर मिळत राहाव्यात त्याची यादी इथे दिलेली असते. त्यातील काय हवेनको पाहून त्यावर क्लिकअनक्लिक करू शकता.

अर्थात ही फायरवॉल ऑन केली की कम्प्युटरला काहीही धोका नाही असे समजण्याचे कारण नाही. कारण काही व्हायरस वा स्पायवेअर वेगवेगळ्या वेषात तुमच्या कम्प्युटरमध्ये शिरायचा प्रयत्न करतच असतात. म्हणजे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर मजबूत हवेच. मशीनचे स्कॅनिंग आठवड्यातून एकदा तरी पूर्ण झाले पाहिजे. म्हणजेच केवळ फायरवॉल ऑन असून चालत नाही. अन्य सॉफ्टवेअरचीही मदत घ्यावी लागते. म्हणूनच इंटरनेटवरून फायरवॉल डाऊनलोड करून घेता येतात. काही लोकप्रिय फायरवॉलची यादी इथे देत आहे. त्यातील कोणतीही डाऊनलोड करू शकता. झोनअलार्म ( zonealarm याची बेसिक व्हर्जन फुकटात मिळेल, पण अधिक सुरक्षा हवी असेल तर अंदाजे १६०० ते २५०० रुपये दर वर्षाला मोजावे लागतील.) Comodo, Agnitum, PCtools, Ashampoo यापैकी कोणतीही फायरवॉल मशीनमध्ये आल्यावर मूळ फायरवॉलचे सेटिंग काय राहील हे पाहावे लागेल. ती ऑनच राहायला हवी. प्रत्येकाची सेटिंग्ज वेगवेगळी असतात. ती एकदा जाणून घेतलीत की मग तुम्ही निर्धास्त राहायला मोकळे! कारण शेवटी डबल प्रोटेक्शन केव्हाही चांगलेच. काही वेळेला एखादा प्रोग्राम डाऊनलोड केलेला असतो. पण तो चालत नाही. अशावेळी वेड लागायची पाळी येते. प्रोग्राममध्ये कोणताही व्हायरस नाही, तो अधिकृत ठिकाणाहून तो डाऊनलोड केलेला आहे, कम्प्युटरच्या सेटिंगमध्ये गडबड नाही तरी प्रोग्राम चालत नाही. अशा वेळी तुमच्या अँटिव्हायरसने अथवा फायरवॉलने तो प्रोग्राम ब्लॉक केलेला असू शकतो. हा अनुभव मी घेतला आहे. मी जरी फायरफॉक्स ब्राऊझर वापरत असलो तरी इंटरनेट एक्स्प्लोरर मायक्रोसॉफ्ट अपडेटसाठी वापरावे लागते. हा आयई सुरूच होईना. एकदा अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल केला, तरीही काही उपयोग नाही. मग अँटिव्हायरसचे सेटिंग तपासले तेव्हा हा प्रोग्राम ब्लॉक केलेला आढळला. तो अनब्लॉक केला आणि आयई पुन्हा सुरू झाला. अशीच अवस्था तुमची झाली, तर अँटिव्हायरस आणि फायरवॉल दोन्ही तपासून पाहायला विसरू नका.

या फायरवॉल कशा अस्तित्वात आल्या, त्याच्याआधी काय सुविधा होत्या, त्याचे रूपांतर आजच्या सुरक्षाकवचात कसे झाले याची झलक वाचायची असेल तर पुढील लिंकवर जा : http://en.wikipedia.org/wiki/Firewall

No comments: