photo

Tuesday, April 28, 2009

सेव्ह करावे कुठे? 11 Apr 2008,

फाइल्स सेव्ह करण्याच्या सुरक्षित आणि सोईस्कर पद्धती आहेत. तसंच घुसखोर व्हायरसचा बंदोबस्त करण्याचेही मार्ग आहेत. त्यांचाच सोदाहरण घेतलेला वेध...

...........


Where To Save (in Marathi)
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अथवा कोणत्याही अॅप्लिकेशनमध्ये मजकूर ऑपरेट केल्यावर तो कसा सेव्ह करावा याच्या काही पद्धती आहेत. ' म. टा. ' चे एक वाचक राजन रानडे यांनी याविषयी बरेच प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नांचा आशय असा : ते वेगवेगळ्या विषयांवर फाइल्स तयार करतात , त्या फाइल्सच्या समूहाचे वेगवेगळे फोल्डर तयार करतात आणि या सगळ्या फोल्डरचा पुन्हा एक मोठा फोल्डर तयार करतात. हा मोठा फोल्डर ते सीडीवर सेव्ह करतात. इथपर्यंत ठीक आहे. पण कम्प्युटरमधली एखादी फाइल तुम्ही अपडेट केलीत , तर त्याचे काय करायचे ? कारण सीडीतला डाटा जुना झाला असा त्याचा अर्थ आहे. मग तोही अपडेट कसा करायचा असा प्रश्न आहे.

याचे उत्तर सोपे आहे. कम्प्युटरमधली फाइल अपडेट झाली की तिचे फाइल नेम न बदलता सीडीत सेव्ह करायची. पण सीडीत त्याच नावाची दुसरी फाइल असल्याने तुम्हाला ' डू यू वाँट टू रिप्लेस धिस फाइल विथ न्यू फाइल ?' असे विचारले जाईल. तेव्हा तुम्ही हो म्हणा. काम झाले. सारा मजकूर एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करावा का , या त्यांच्या प्रश्नावर उत्तर नकाराथीर्च द्यावे लागेल. वेगवेगळे फोल्डर करून तशी वर्गवारी असलेले मोठे फोल्डर करणे केव्हाही चांगले. म्हणजे एखादा फोल्डर व्हायरसमुळे करप्ट झाला , तर बाकीचे सुरक्षित राहू शकतात. सीडीमध्ये फोल्डर सेव्ह करताना त्याची झिप फाइल करणे केव्हाही चांगले. म्हणजे थोड्या जागेत जास्त फाइल मावू शकतात.

आजकाल कम्प्युटरच्या बाहेरून लावता येतील अशा हार्ड डिस्क बऱ्याच मिळतात. दोन हजार रुपयांपासून आठ हजार रुपयांपर्यंत व चार जीबीच्या पेन ड्राइव्हपासून ते १६० जीबीच्या हार्ड डिस्कपर्यंत बरेचसे पर्याय उपलब्ध आहे. ज्यांना फार मोठ्या फाइल्स करायच्या नसतात , त्यांना चार वा आठ जीबीच्या पेन ड्राइव्हचा मोठा आधार आहे. हे पेन ड्राइव्ह शर्टाच्या वरच्या खिशात राहणारे अगदी लहान असतात. साध्या वर्ड फाइल्स असतील तर त्यात काही हजार फाइल्स राहू शकतात. घरगुती काम करणाऱ्याला ते पुरेसे आहे. शिवाय खिशात घालून कोठेही नेता येत असल्याने इंटरनेटशिवाय आपण कोणत्याही फाइल्स कोठेही नेऊ शकतो.

महत्त्वाच्या फाइल सेव्ह करण्याचा माझा स्वत:चा मार्ग वेगळा आहे. समजा दहा लेखांची मालिका लिहून झाली की त्यांच्या फाइल्सची मिळून एक झिप फाइल तयार करायची आणि ती स्वत:च्याच मेलवर अटॅचमेंट म्हणून पाठवून द्यायची. एकदा इंटरनेटवरच्या तुमच्या पर्सनल मेलबॉक्समध्ये ती फाइल सेव्ह झाली की प्रश्न संपला. तुमचा कम्प्युटर जळून खाक झाला तरी फाइल्स नेटवर सुरक्षित राहतात. मेलवरच्या या फाइल्स मेलवरच वेगळा फोल्डर बनवून सेव्ह करा , नियमित ' इनबॉक्स ' मध्ये ठेवू नका. नाही तर अनवधानाने त्या डीलिट होण्याचा धोका असतो.

रानडे यांनीच आणखी एक प्रश्न विचारला आहे. त्यांना अनोळखी माणसांकडून ई-मेल येतात. ते ओपन करावेत का असा हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर नाही असेच आहे. विशेषत: अटॅचमेंट असलेले मेल ओपन करायच्या भानगडीतच पडायचे नाही. ते थेट डीलिट करावेत. इंटरनेटवर मेलमध्ये व्हायरस आहेत का , हे चेक करण्यासाठी बरेच अँटीव्हायरस उपलब्ध आहेत. त्यापैकी एखादा फुकटातला डाऊनलोड केलात , तर प्रश्न सुटेल. मेलवरचा प्रत्येक मेसेज स्कॅन होईल. या अँटीव्हायरसबद्दल पुन्हा केव्हा तरी.

दुसरे एक वाचक अनिल भिसे यांनी एका व्हायरसबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यांनी एव्हीजी अँटिव्हायरस बसवला आहे. हा फुकटात डाऊनलोड करता येतो आणि चांगलाही आहे. तो त्यांच्या मशीनमधला व्हायरस काढून टाकतो ; पण पुन्हा मशीन सुरू केल्यावर व्हायरस परत येतो. हेच चक्र चालू राहते. यावर उपाय असा की मशीन ' सेफ मोड ' मध्ये चालवा. म्हणजे मशीन रिस्टार्ट करा व लगेचच (स्क्रीनवर काहीही नसतानाच) कीबोर्डवरची एफ८ ही की सतत दाबत राहा. काही सेकंदांनी मशीन ' सेफ मोड ' मध्ये सुरू होईल. तिथे तुम्हाला ऑप्शन दिली जातील. तेव्हा ' सेफ मोड विथ नेटवकीर्ंग ' असे ऑप्शन निवडा. मशीन त्या मोडमध्ये जाईल. मग तुमच्या मशीनमधला अँटिव्हायरस चालवा. ' स्मार्ट स्कॅन ' नव्हे तर ' फूल सिस्टिम स्कॅन ' करा. तो व्हायरस काढून टाकला जाईल. मग मशीन पुन्हा सुरू करा , पण यावेळी एफ८ अजिबात दाबू नका. तो नेहमीसारखा सुरू होऊ द्या. मग तो व्हायरस पुन्हा येणार नाही. असे का होते ? कारण काही व्हायरस हे मूळ सिस्टिममध्ये गेलेले असतात. ते सेफ मोडमध्येच काढले जातात. अर्थात तरीही तो व्हायरस गेला नाही तर काय करायचे ? मग अधिक शक्तिशाली अँटिव्हायरस मशीनमध्ये बसवावा लागेल.

आणखी काही वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे पुढील आठवड्यात.

No comments: