photo

Friday, April 24, 2009

इंटरनेटच्या जगाची रोमांचक सफर 6 Sep 2008, 0500 hrs IST

एकविसाव्या शतकाचा मंत्र काय? चाणाक्ष माणूस लागलीच उत्तर देईल, संदेशवहन. याच संदेशवहनानं गेल्या पंधराएक वर्षांमध्ये जगाचा चेहरामोहरा बदलून टाकायला सुरुवात केली. मायक्रोसॉफ्ट र्वल्ड, नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोअरर, गूगल आणि अलीकडच्या काळातली यूट्यूब, मायस्पेस आणि फेसबुक या साऱ्यांनीच सामान्य माणसाच्या माहितीच्या कक्षा बदलल्या. मनोरंजनाची क्षितिजं विस्तारली. कुतूहल सतत जागतं ठेवलं. जिज्ञासा जिवंत राखली. एका मर्यादित अर्थानं ज्ञानाचं भांडार समाजाच्या सर्वच वर्गांसाठी खुलं केलं. त्यामुळं ज्ञानाच्या मक्तेदारीला सुरुंग लागू लागला. ही सारी किमया संदेशवहनाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या क्रांतीची! याच क्रांतीमधील महत्त्वाच्या टप्प्यांचा धांडोळा 'डाऊनलोड : दी ट्रू स्टोरी ऑफ दी इंटरनेट' ही मालिका घेणार आहे. डिस्कव्हरी चॅनेलनेच हा धांडोळा घेतला आहे आणि तो येत्या सोमवारपासून म्हणजे आठ सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता दाखवण्यात येणार आहे.

नेटस्केप आणि इंटरनेट एक्सप्लोअरर यांच्यातील संघर्षापासून सुरू होणारी ही मालिका मायक्रोसॉफ्ट आणि त्याचा निर्माता बिल गेट्स यांच्या उदयाचा वेध घेते. गेट्सनं या जगाचा चेहरा मोहरा बदलण्यात मोठाच वाटा उचलला, यात शंका नाही. त्यामुळंच त्याचा घेतलेला वेध हा अनेकांच्या उत्कंठेचाच विषय आहे. मायक्रोसॉफ्टप्रमाणंच गूगल या सर्च इंजिननंसुद्धा माहितीच्या क्षेत्रामध्ये मोठीच क्रांती घडवून आणली. विज्ञान-तंत्रज्ञान असो की साहित्य, राजकारण असो की समाजकारण, नाट्यक्षेत्र असो की चित्रपट, हवामान असो की भूगोल, अर्थकारण असो की आंतरराष्ट्रीय परिषद या सर्वच यच्चयावत गोष्टींची माहिती हमखास आणि तीसुद्धा हाताच्या बोटाच्या अंतरावर मिळण्याची मोठीच सोय गूगलमुळे झाली. दहा वर्षांपूवीर् गूगल नव्हतं आणि त्याहीअगोदर पाच वर्षं म्हणजे आजपासून पंधरा वर्षांपूवीर् इंटरनेट नव्हतं, तेव्हा माहितीसाठी किती आणि कसं चाचपडायला लागायचं, याची आता आठवणसुद्धा पुसट होऊन गेली आहे, इतका गूगलने आपला प्रभाव इंटरनेट वापरणाऱ्यांवर पाडला आहे. त्याचा वेध या मालिकेमध्ये घेतलेला आहेच.

इंटरनेटमुळे माहिती उपलब्ध होऊ लागलीच, पण आणखी एक फायदाही झाला. बाजारहाट करणं अगदीच सोपं होऊन गेलं. पुस्तक विकत घेण्यासाठी पुस्तकाच्या दुकानात जाणं, ते रॅकवरून शोधणं, त्याचं बिल करणं वगैरे सोपस्कार करायची गरजच उरली नाही. ई-कॉमर्समुळे पुस्तकंच नाही तर एकंदरच खरेदी आणि विक्री या गोष्टी सोप्या होऊन गेल्या. हे सारे कसे घडले त्याचीही झलक या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. या मालिकेतही 'डिस्कव्हरी' पडद्यामागे डोकावली आहे आणि यूट्यूब, मायस्पेस, फेसबुक या कंपन्यांच्या निर्मात्यांशी त्यांनी आपली भेट घडवून आणली आहे. थोडक्यात काय, तर माहितीच्या क्षेत्रामध्ये एक मोठी झेप घेणाऱ्या जगाची धावती पण रोमांचक झलकच या चार भागांच्या मालिकेमध्ये दिसणार आहे

No comments: