photo

Friday, April 24, 2009

साहित्याची आवड असलेल्यांसाठी पुस्तकंचकरिअरचं ऑप्शन ठरू शकेल. आपली आवड जपत करिअर करणं यापेक्षा चांगला पर्याय काय असेल?

......

सुशीलला लहानपणापासूनच गोष्टी आणि कवितांची आवड. म्हणून दहावीनंतर त्याने आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला, तेव्हा याला मित्र, शेजारचे नेहमी विचारायचे, 'आर्ट्सला जाऊन काय करणार तू? त्यात तू घेतलायस मराठी विषय! तो घेऊन काय स्कोप आहे करिअरला?'

शेवटच्या वर्षाला संपूर्ण मराठी घेऊन बीए आणि नंतर एमए झाला. पूवीर् त्यानंतर त्याने संपादनाचा कोर्स केला. आज तो एका प्रकाशन संस्थेत संपादकाच्या पदावर आहे. सगळ्या प्रश्नांना कृतीतून उत्तर मिळालंय.

करिअर म्हटलं, की आपल्याला आठवतं ते फक्त डॉक्टर, इंजिनीअर किंवा एमबीए. परंतु याही पलीकडे अनेक करिअर ऑप्शन्स असतात हे अनेकांना माहीतही नसतं. असा एक हटके पर्याय म्हणजे प्रकाशन व्यवसाय क्षेत्राचा.

मराठीत 'मौज', 'मॅजेस्टिक', 'देशमुख अॅण्ड कंपनी' यासारख्या अनेक मान्यवर प्रकाशनसंस्था गेली अनेक वर्षं काम करताहेत. ग्लोबलायझेशननंतर त्यात 'राजहंस', 'ग्रंथाली', 'ग्रंथायन'सारख्या अनेक संस्थांची भर पडली आहे. त्यामुळे या व्यवसायात करिअर करण्यासाठी स्कोप वाढला आहे.

याबाबत 'ग्रंथायन'चे एमडी पंकज कुरूलकर सांगतात, 'प्रकाशन क्षेत्रात तरुणांनी यायला हवं. आम्हाला उप-संपादक, मुदितशोधक, पुस्तकांची जाण असलेले सेल्समन, आटिर्स्ट, चित्रकार, अनुवादक इत्यादी कामांसाठी माणसं हवी असतात. या जॉब्ससाठी महत्त्वाचा निकष एकच पुस्तकांची आवड! याशिवाय संपादन, चित्रकला यांसारखेही गुण लागतात. अनुवादित पुस्तकांची मागणी वाढल्याने अनेक प्रकाशन संस्थांना चांगल्या अनुवादकांची गरज असते. तसंच ग्लोबलायझेशनमुळे अनेक प्रकाशन संस्थांनी परदेशातल्या संस्थांशी करार केल्याने या क्षेत्रात परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते'.

पंकज कुरूलकर स्वत: मराठीतले एक नावाजलेले लेखक असून त्यांची आयटीबेस कंपनी होती. भारत, अमेरिका आणि कुवेतला तिच्या शाखा होत्या. परंतु त्यांनी ती कंपनी बंद करून 'ग्रंथायन' नावाचं फिरतं बुकस्टोअर आणि प्रकाशन संस्था सुरू केली. तीन महिन्यांत एक लाखाहून अधिक पुस्तक विक्री करून विक्रम केला आहे. तसंच 'ग्रंथायन'चे हार्पर अॅण्ड कॉलिन्ससारख्या प्रकाशन संस्थांशी करार झाले आहेत.

तरुणांना या क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी 'ग्रंथायन'तफेर् सेमिनार आयोजित केली जातात. तसंच बीए, एमए झालेल्या, लायब्ररीयनचा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इण्टरव्यूही घेतले जातात. 'ग्रंथायन'चं पुस्तक विक्रीसाठी स्वत:चं कॉल सेण्टर आहे. त्याच्या कामासाठी त्यांना तरुणांची आवश्यकता असते.

पंकज सांगतात, 'मी परदेशातल्या अनेक प्रकाशन संस्थांना भेटी दिल्या तेव्हा तिथे २०० उपसंपादक काम करत असल्याचं पाहून मी थक्क झालं. अजून मराठीत असं वातावरण नसलं तरी ते तयार करण्यासाठी मराठीत अनेक प्रकाशन संस्था निघायला हव्यात. यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि इंजिनीअर किंवा डॉक्टरी पेशाप्रमाणे बीए, एमए झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठाही आपोआपच मिळेल!' असं असलं तरी पुस्तकांची आवड असलेले तरुण मिळतच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

संपर्क-वेबसाइट : www.granthayan.com

No comments: