photo

Friday, April 24, 2009

इंग्लिश लँग्वेज टिचिंग

इंग्रजीकडे वेगाने सक्षमीकरण करणारी, जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धात्मक ठरणारी भाषा म्हणून पाहिलं जातं. इंग्रजी समाजजीवनात सर्वांना समपातळीवर आणणारी लेव्हलर भाषा झालीय. भारताकडे 'इंग्लिश लँग्वेज टिचिंग' म्हणजे ईएलटी या व्यापक बाजारपेठेकडे अनेक कंपन्यांची नजर वळलीय. त्यामुळे या क्षेत्रात इंग्लिश लँग्वेज टीचर म्हणून पदार्पण करता येतील.

.....

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी ब्रिटिश संसदेपुढे दिलेलं इंग्रजी भाषण उपस्थित सदस्य त्यांचं इंग्रजीवर प्रभुत्व पाहून हतबद्ध झाले होते. रानडे, गोखले, टिळक यासारख्यांनी इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व मिळवलं होतं. आजही असंख्य मराठी भाषकांचं इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आहे. कॉमेण्ट्रेटर हर्षा भोगले, मोस्ट अवेकन जर्नलिस्ट राजदीप सरदेसाई, एफएम आरजे मंत्रा, यंग पॉलिटिशन सुप्रिया सुळे, अपकमिंग मॉडेल कम अॅक्ट्रेस मुग्धा गोडसे, मिस वर्ल्ड अमृता पत्की अशी विविध क्षेत्रातली बहुतांशी मराठी नावं फ्ल्युएण्ट आणि कम्युनिकेटिव इंग्रजी बोलत असल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेतच.
महाराष्ट्र आणि बंगाल इंग्रजी भाषा कौशल्यात आघाडीवर होते. तत्कालीन समाजसुधारकांनाही इंग्रजी भाषेचं महत्त्व समजलं. इंग्रज 'राज' संपलं तरीही भाषिक संबंध संपला नाहीच. इंग्रजीचं सर्व क्षेत्रात, सर्व स्तरावरील महत्त्व वाढतच गेलं. इंग्रजी ज्ञानभाषा असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादभाषा झाली. मात्र आजही 'इंग्लिश आहे रे आणि इंग्लिश नाही रे' अशी एक विभागणी वाटावी, अशी काहीशी स्थिती आहे. भारतात इंग्रजी 'लिंक लँग्वेज-लायब्ररी लँग्वेज' अशा स्वरूपात राष्ट्रभाषा आणि स्थानिक भाषा म्हणून वेगाने पुढे येण्याची अपेक्षा होती ती फलदूप झाली नाही. दक्षिणेकडील राज्यांनी 'जगाकडे उघडणारी हिंदीपेक्षा मोठी खिडकी इंग्रजी आहे,' असं म्हणून इंग्रजीची कास धरली. हा हा म्हणता जेमतेम दोन-तीन टक्क्यांवरून आता कोट्यवधी लोकांना इंग्रजी आपलीशी वाटू लागली आहे. ब्रिटिश गेले, तरीही भाषा मागे राहिली. एवढंच नव्हे तर उलट 'द राज इज स्ट्रायकिंग बॅक' असं म्हणायची ग्रेट ब्रिटनवर वेळ आली आहे. भारतावरील ब्रिटिश सत्ता टिकवण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या चचीर्लच्या नातवा-पणतूंच्या नोकऱ्या भारतातल्या मंुबई, पुण्यासह बंगळुरूसारख्या शहरातल्या लोकांच्या नातवा-पुतण्यांनी हिसकावून घ्यायला सुरुवातच नव्हे, तर घेतल्याच आहेत. चार्ल्स ग्राण्ट आणि मॅकोलेंनी स्थानिकांना इंग्रजी माध्यमात शिकवलं पाहिजे असा जो आग्रह धरला होता त्याची परिणती अशी काही होईल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसणार. लंडनमधे नोकरी केलेला ब्रिटिश माणूस 'आय अॅम बँग्लोर्ड' असा शब्दप्रयोग करतो. 'हिंदुस्तानावर राज्य करून आपण जर कोणती मोठी घोडचूक केली असेल, तर ती म्हणजे आपण भारतीयांना इंग्रजी शिकवलं ही होय' असे एका ब्रिटिश मुत्सद्द्याने म्हटलं ते खरं ठरतंय. इंग्रजीच्या सार्मथ्यावर आपले भारतीय जगभर कर्तृत्व गाजवताहेत.

आजच्या ज्ञानाधिष्ठित युगात इंग्रजीचं महत्त्व नव्याने सांगायला नको. भारतासारख्या देशाला इंग्रजी भाषा कौशल्यकुशल मनुष्यबळाचा मोठाच फायदा होत आहे. जगभर भारतीयांचा आयटी क्षेत्रात चौफेर डंका वाजतोय त्यामागे त्यांची हुषारी आणि इंग्रजीवरील प्रभुत्व कारणीभूत आहेच. नवनवे, अत्याधुनिक जागतिक स्तरावरचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या क्षमतेसाठी भारतीयांचं इंग्रजीचं ज्ञान कळीचं ठरलंय. खरंतर चीनसारख्या देशांच्या तुलनेने भारतीयांचं इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे देशाचं एक मौलिक, निणार्यक स्पर्धामूल्य -कॉम्पिटिटिव अॅडवाण्टिज- झालं आहे. अर्थात हे लक्षात घेऊन चीनने युद्धपातळीवर इंग्रजी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. भारतातून इंग्रजी शिक्षक नेण्याचाही चीनचा प्रयत्न असतो. मात्र मोठ्या वेगाने चिनी लोक इंग्रजी भाषा शिकत असल्याने इंग्रजीकुशल मनुष्यबळ हा भारताचा स्पर्धात्मक वरचढपणा फार काळ टिकणार नसल्याचं अनेक मान्यवरांचं मत आहे.

इंग्लिश स्पिकिंग'चं महत्त्व

इंग्रजी भाषेकडे वेगाने सक्षमीकरण करणारी, जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धात्मक ठरणारी भाषा म्हणून पाहिलं जातं. इंग्रजी समाजजीवनात सर्वांना समपातळीवर आणणारी लेवलर भाषा झालीय. जातिव्यवस्थेच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी दलितांनी उत्तम इंग्रजी शिकून शहरांकडे यावं, असं

काम्बा इलायासारखे विचारवंत सुचवू लागलेत. 'इंग्रजीला उशीर म्हणजे भविष्याला उशीर,' असा सूर आहे. जगभर इंग्रजीचं महात्म्य आहे. इंग्रजी फ्रेंच भाषेप्रमाणे सोवळ्यात राहणारी भाषा नसल्याने ती वेगाने वाढतेय. एका केस स्टडीनुसार इंग्रजीतले मूळचे जेमतेम १५ टक्केच शब्द राहिले असून विविध भाषांतले शब्द इंग्रजीत आलेत. मोठ्या प्रमाणात इंग्रजीचं स्थानिकीकरण होऊन स्थानिक भाषांशी सरमिसळ सुरू आहे. प्रसिद्ध इंग्रजी भाषातज्ज्ञ डॉ. डेविड क्रिस्टलच्या मते, इंग्रजी ही इंग्रजांचीच भाषा राहिली नसून ती जगभराची भाषा झाली आहे. संख्याबळाचा आधार देत त्यांनी स्पष्ट केलं आहे, की इंग्रजीचं भवितव्य खरंतर भारतीयांच्या हाती आहे. भारतात आपण हिंग्लिश, बाँग्लिश, तामिग्लिश, मिंग्लिश वगैरे अनेक प्रकारची इंग्रजी उत्क्रांत करत आपसूक घडवल्या आहेत. 'बंबय्या इंग्लिश' ही एक 'वेगळी चटणी' तयार झाली आहे. भरत दाभोळकरांच्या इंग्रजी नाटकांतच नव्हे तर विविध जाहिरातीतही -अब नही रोना धोना ओव्हर फेक सोना...- बंबय्या-हिंग्लिश सर्रास रुळली आहे. प्रा. क्रिस्टल यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे लवकरच भारतातल्या हिंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या ३५० दशलक्ष म्हणजे मूळच्या इंग्रजी भाषिकांच्या संख्येहून अधिक होईल. एसएमएस, ईमेलसारख्या तंत्रज्ञानाने तर इंग्रजीचं स्पेलिंग आणि व्याकरणही चमत्कारिकरीत्या बदललंय.

चांगली, व्याकरणशुद्ध, समृद्ध इंग्रजी अवगत असायला हवी याविषयी दुमत नाही. पण यासाठी मातृभाषेचा बळी देण्याची किंवा मातृभाषेला दुय्यम लेखण्याची आवश्यकता नाहीय. सर्वत्र इंग्रजीचं आणि इंग्रजी माध्यमाचा शाळेचे पेव फुटलंय. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकायला हवं, हा तद्दन चुकीचा समज दूर करून 'इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी भाषेत शिकणं' यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. मात्र इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यात हयगय नको, या जाणिवेने राज्य सरकारने आणि इतर राज्यांनी पहिलीपासून इंग्रजी शिकवायला सुरुवात केली आहे. लवकरच भारतातील राज्या-राज्यात इंग्रजीकुशल मनुष्यबळाच्या जोरावर स्पर्धा होण्याचीही शक्यता आहे. गुजराथ राज्याने इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी अत्याधुनिक शिक्षण तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे.

इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी उत्तम असतं किंवा मराठी माध्यमात शिकलेल्यांचं मराठी उत्तम असतं, असंही म्हणता येणार नाही. कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी आणि पद्धतशीर प्रशिक्षण देणाऱ्या योग्य प्रशिक्षकांची आणि फ्लुएण्ट आणि कम्युनिकेटिव इंग्रजी शिकवणाऱ्या कोर्सची गरज असते. भाषाकौशल्य आत्मसात करण्यात झटपट वगैरे प्रकार नसतात. अशा प्रयत्नांनी भाषाप्रभुत्व म्हणजे नक्की काय शिकायचं, इथपासून प्रश्न येतात. आपल्या पदवीधरांनाच नव्हे, तर एमबीएसारख्या व्यावसायिक उच्च पदव्या मिळवणाऱ्यांनाही इंग्रजी संभाषण कौशल्याअभावी महत्त्वाच्या करिअरविषयक संधी गमावाव्या लागतात.

इंग्रजी प्रभुत्वाअभावी सर्वत्र एक मारक न्यूनगंड आणि भयगंड निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतं. भाषा येणं, म्हणजे ती मुख्यत्वे बोलता येणं. भाषा शिक्षण म्हटलं, की श्रवण, संभाषण लेखन आणि वाचन ही चारही कौशल्यं येतात. अनेक पिढ्यांना इंग्रजी शिकवणाऱ्या वसईच्या तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेचा भर हा वाचन-लेखन कौशल्यावर अधिक होता, संभाषणावर फारसा नव्हता असं जाणकारांना वाटतं. आजही किमान बारावीपर्यंत इंग्रजी शिकूनही इंग्रजीत संभाषण जमत नाही, ही बहुसंख्य विद्यार्थ्यांची स्थिती आहे. एक विषय म्हणून आशयधिष्ठित भाषा शिक्षणापलीकडे जायला हवं. एकूण बारावीनंतर, पदवी, पदव्युत्तर शिक्षणानंतर इंग्रजी आत्मविश्वासाने बोलता न येणं हे वास्तव दिसून येतंय.
करिअर संधी

आज सर्वत्र इंग्लिश स्पिकिंग शिकवणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येतो. इंग्लिश लँग्वेज टिचिंग इण्डस्ट्री ही एक नवी इण्डस्ट्री आकाराला आलीय. इंग्रजीचं साम्राज्य असणाऱ्या नोकऱ्या मिळवणाऱ्या भारतीयांची संख्याही कमी नाही. भारताकडे इंग्लिश लँग्वेज टिचिंग म्हणजे ईएलटी या व्यापक बाजारपेठेकडे अनेक कंपन्यांची नजर वळलीय. भारतातील मोठ्या प्रमाणावर युवावर्गाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणं गरजेचं वाटू लागलंय. विविध तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही कोर्सच्या जोडीने सॉफ्ट स्किल डेल्हलपमेण्टमधे इंग्रजी संभाषणाचे प्रशिक्षण वर्ग घेतात. मात्र अजूनही चांगले इंग्रजी भाषा प्रशिक्षक दुमिर्ळच आहेत. त्यामुळे अगदी इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेल्यांनीच नव्हे, तर अनेक क्षेत्रात उच्चपदावर काम करणाऱ्या तसंच सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त घेतलेल्यांना उत्तम इंग्रजी संभाषण कौशल्य अवगत असल्यास इंग्लिशफाऊण्टिन, इण्डोअमेरिकन सोसायटी, स्पिकवेल इंग्लिश अशा संस्थांमधे शिरकाव करता येईल. उत्तम वातावरण, प्रतिष्ठापूर्ण काम आणि कायम अर्थार्जनाची संधी या जमेच्या बाजू लक्षात घेता, या क्षेत्रात पदार्पण करून इंग्रजी भाषा प्रशिक्षण केंदही सुरू करता येईल.

No comments: