photo

Friday, April 24, 2009

अ..... ऑनलाइनचा

ऑनलाइनच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण आज एकाचवेळी ब-याच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन शिक्षणाला भरपूर मागणी येणार आहे.

..........

दिल्लीमध्ये बसून मुंबईत चाललेलं एमबीएचं लेक्चर अजित अटेण्ड करतोय! तेवढंच नाही तर सरांना प्रश्नसुद्धा विचारतोय... याच क्लासरूममधली त्याची मैत्रीण सुहानी, मुंबईला राहणारी आहे. तीही सरांचं लेक्चर मन लावून ऐकत्येय... अजित, सुहानी सारखे कितीतरी जण भारतातल्या विविध शहरांतून हे लेक्चर एकाचवेळी अटेण्ड करताहेत. सध्या त्यांची चर्चा मॅनेजमेण्टमधल्या फण्डाबद्दल सुरू आहे... असं शक्य होऊ शकतं का? हो, आजच्या टेक्नोयुगाने हे शक्य केलं आहे. येत्या वर्षांत ऑनलाइन शिक्षण घेणं शक्य होणार आहे. कारण वांदे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमइटी) या मॅनेशमेण्ट संस्थेने सुरू असलेले सगळे अभ्यासक्रम ऑनलाइन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे या अभ्यासक्रमाचा भर केवळ थिअरीवरच नसून त्याबरोबर प्रॅक्टिकल ज्ञानावरही भर देण्यात येणार आहे.

मुंबई एमइटीने एसएनडीटीच्या सहकार्याने सेण्टर ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीची स्थापना केली असून याबद्दल एमइटीचे व्हाइस चेअरमन सुनील कर्वे म्हणाले, 'पारंपारिक शिक्षण पद्धतीत पाठांतरावर जास्त भर असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला एखादा नियम पाठ झाला तरी त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान नसतं. सेण्टरमार्फत आम्ही विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून एमइटीत सुरू असलेल्या सगळ्या अभ्यासक्रमांचं स्डॅण्डर्डडायझेशन करणार आहोत. या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ज्ञान देण्यावर आमचा भर असेल. तसंच विशिष्ट अभ्यासक्रम शिकवायला किती वेळ असावा, तो किती भागात शिकवावा, त्याचे कसे विभाग करावेत इत्यादी मुद्यांवर विचार होऊन त्यानुसार नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते ऑनलाइन होतील. एवढ्यातच सरकारने उच्च शिक्षणाचा प्रसार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे नवी कॉलेजेस्, मनुष्यबळ आणि इतर सोयी-सुविधा लागणार आहेत. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून हे शिक्षण एकाचवेळी कितीतरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल.'

हा अभ्यासक्रम अधिकाधिक रंजक व्हावा आणि त्यात विद्यार्थ्यांना सहभागी होता यावं यासाठी काही खास पद्धतींचा अवलंब करण्यात येणार असल्याचं कर्वे म्हणाले. शिक्षक वर्गात येतात शिकवतात आणि निघून जातात. पण विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं शिकवणं पोहोचलंय का नाही, याचा विचार ते करत नाहीत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही वेगवेगळे सेमिनार, वर्कशॉप्स या अभ्यासाला पूरक असणाऱ्या गोष्टींचं आयोजन करणार आहोत. त्यात रंजक खेळांचा समावेश असेल. त्याशिवाय इण्डस्ट्रीत वापरण्यात येणारी नवी आयटी-टुल्सही त्यांना शिकवणार असल्याची माहिती कवेर् यांनी दिली.

या सर्व प्रकल्पाला साधारणत: दोन ते तीन वर्षं लागतील. एमइटी सेण्टरचं काम सुरू झालं असून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तो ऑनलाइन करण्यात येणार आहे. या अभ्याक्रमात व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून लेक्चर अटेण्ड करता येतील. वर्गात विद्यार्थी हात वर करून प्रश्न विचारतो अगदी त्याच प्रमाणे हा ऑनलाइन वर्ग घेतले जातील.

याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळेल का, यावर कर्वे म्हणाले, की यात विद्यार्थ्यांचाच फायदा असून नोकरी करून त्यांना घरबसल्या अभ्यास करता येईल. म्हणूनच भविष्यात ऑनलाइन शिक्षणाला खूप मागणी असेल असं चित्र आज स्पष्ट दिसत आहे.

No comments: