photo

Tuesday, April 28, 2009

बहुगुणी टास्कबार 27 Jun 2008

टास्कबार म्हणजे काय, त्याचा उपयोग करून आपली कामे कशी आणि का सोपी होतात, टास्कबारवरील सोई कोणत्या आदी बाबींचा आढावा...
........
आपला कम्प्युटर फास्ट चालावा असे कोणालाही वाटेल. प्रत्यक्षात तो का गोगलगायीसारखा चालतो याची कारणे बरीच आहेत. त्याविषयी आधीच्या लेखांत माहिती येऊन गेली आहे. अनावश्यक फाइल्स काढून टाकणे, अँटिव्हायरस चालवून मशीन निरोगी करणे, डिफ्रॅगमेंटेशन करून सगळ्या फाइल्स एकत्रित आणणे या व अशा पद्धतीच्या कामांनी कम्प्युटर फास्ट चालवता येतो. पण हे सारे केले, कम्प्युटर वेगातही चालला तरी काही गोष्टी अशा करता येतील की कम्प्युटर चालवताना त्या उपयोगी पडतील. समजा कम्प्युटरमधला एखादा फोल्डर वा त्यातली फाइल तुम्हाला सतत लागते. तुम्ही वर्डमध्ये काम करताहात आणि ते करतानाच दुसऱ्या एखाद्या फाइलमधला रेफरन्स तुम्हाला हवा आहे तर प्रत्येकवेळी मूळ वर्ड फाइल क्लोज करण्याची गरज नाही. एकाचवेळेस दोन वा अधिक वर्ड फाइल ओपन राहू शकतात. एकातून दुसऱ्यात जाण्यासाठी वरच्या मेन्यूमधील 'विंडो'वर क्लिक केले की सगळ्या ओपन फाइल दिसतील. मग तुम्ही हवी ती ओपन ठेवू शकता. शिवाय याच फाइल्स 'अल्ट व टॅब' ही बटन्स एकाचवेळेस दाबूनही तुम्ही हवी ती फाइल ओपन करू शकता. परंतु एखाद्या फोल्डरमधल्या फाइल्स सतत लागत असतील तर?

यासाठी टास्कबारचा उपयोग करू शकता. टास्कबार म्हणजे 'स्टार्ट' बटनाच्या ओळीतला बार. त्यावर या फोल्डरचा शॉर्टकट केला जातो. त्यासाठी टास्कबारच्या रिकाम्या जागेत राइट क्लिक करा, मग 'न्यू टूलबार'वर जा. तिथून हव्या असलेल्या फोल्डरवर जा. ओके म्हणा. की झाला शॉर्टकट तयार. टास्कबारच्या अगदी उजवीकडे तो दिसेल. कोणत्याही फाइलवर काम करताना या फोल्डर वा फाइलमधला मजकूर तुम्ही पटकन उघडू शकाल.

' क्विकलाँच' हा असाच एक सोईचा प्रकार असतो. याच टास्कबारवर क्लिक करून पुन्हा 'टूलबार'वर क्लिक करा आणि 'न्यू टूलबार'च्या वरती असलेल्या 'क्विकलाँचवर' जा. आता तुम्हाला दोन टास्कबार दिसायला लागतील. यात डेस्कटॉपवरचा कोणताही आयकॉन पकडून आणून 'क्विकलाँच'च्या जागेत सोडून द्या. तो आयकॉन तिथेच राहील आणि तुम्ही काम करत असलेली फाइल क्लोज न करता या आयकॉनवर क्लिक करून तो प्रोग्राम सुरू करता येईल. पण या पद्धतीचा तोटाही आहे. यात तुम्ही जितके जास्त आयकॉन आणाल तितकी मशीनची मेमरी जास्त वापरली जाईल. त्यामुळे आवश्यक तेच प्रोग्राम्स तुम्ही आणा.

तुम्ही जे प्रोग्राम्स ओपन करता ते नंतर पटकन ओपन करता येतील का? शेवटचे सहा प्रोग्राम्स आपल्याला पटकन दिसू शकतात. तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक केले की 'ऑल प्रोग्राम्स'च्या वरती तुम्ही आधी वापरलेले प्रोग्राम्स दिसतील. साधारणपणे तेथे सहा प्रोग्राम्स दिसतात. ते वाढवून दहा-बाराही करता येतात. त्यासाठी 'स्टार्ट'वर राइट क्लिक करा, मग 'प्रॉपटीर्ज' व नंतर 'कस्टमाइज' बटनवर जा. जी विंडो येईल त्यातल्या मधल्या 'प्रोग्राम्स'वर जा. त्यातला आकडा तुम्हाला हवा तसा सेट करा. जितका आकडा सेट कराल तितके प्रोग्राम्स तुम्हाला दिसतील. तरीही दहा प्रोग्राम्स पुष्कळ झाले. मशीन सुरू होताना 'स्टार्ट अप'मधले प्रोग्राम्स व 'स्टार्ट' बटनावर क्लिक केल्यावर दिसणारे आधीचे दहा प्रोग्राम्स याची गल्लत करू नका. यांचा एकमेकांशी संबंध नाही.

तुम्हाला एकाच वेळेस बऱ्याच फाइल्स ओपन करण्याची सवय असली तर 'टास्कबार'वर फाइलची गदीर् होते. यावर उपाय म्हणजे एकाच प्रकारच्या फाइल्सचा गट करणे. म्हणजे फाइल्स दहा ओपन असल्या तरी टास्कबारवर तीनच गट दिसतात असे होऊ शकते. म्हणजेच ओपन असलेल्या वर्ड फाइल्स एका गटात, एक्सेल फाइल्स दुसऱ्यात अशा दिसू शकतील. मग वर्ड फाइलच्या गटावर क्लिक करून हवी ती वर्ड फाइल ओपन करू शकता. त्यासाठी टास्क-बारमधील रिकाम्या जागेवर राइट क्लिक करा, मग प्रॉपटीर्जवर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात टास्कबार हेडिंगखाली 'ग्रूप सिमीलर टास्कबार बटन्स'वर क्लिक करा व ओके म्हणा. याच विंडोमध्ये इतर ऑप्शन्सही दिसतील. आवश्यकते-ेप्रमाणे क्लिक वा अनक्लिक करा.

याच विंडोत अगदी तळाला 'हाइड इनअॅक्टिव आयकॉन्स' असे एक ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर काय होईल? 'स्टार्ट' बटनाच्या ओळीत शेवटी घड्याळातली वेळ व इतर आयकॉन्स दिसतात. यातला प्रत्येक आयकॉन वापरला जातोच असे नाही. जो प्रोग्राम बराच काळ वापरला जात नाही, तो स्क्रीन-वरून नाहीसा होतो. नेहमी वापरले जाणारे आयकॉन्सच दिसतात. पुन्हा ते प्रोग्राम ओपन करायची वेळ आली तर? याच आयकॉनच्या बाजूला अॅरो दिसेल. त्यावर क्लिक करा. की तोच आयकॉन पुन्हा सेवेला हजर.

या टास्कबारवर आणखी एक महत्त्वाची सोय आहे. ती म्हणजे टास्क मॅनेजरची. टास्कबारवर राइट क्लिक करून 'टास्क मॅनेजर'वर क्लिक करा. एक विंडो ओपन होईल. त्यात मशीन चालू असताना कोणकोणते प्रोग्राम्स सुरू आहेत त्याची यादी दिसेल. जितके जास्त प्रोग्राम्स सुरू, तितके मशीन हळू चालेल. त्यामुळे नको असलेला प्रोग्राम सिलेक्ट करून खालील 'एंड टास्क' बटनावर क्लिक करा की तो बंद होईल. एखादा प्रोग्राम हँग झाला तरीही हीच युक्ती वापरून तो बंद करता येईल. या टास्कबारवर राइट क्लिक करून आणखी काही सुविधा मिळतात. त्या स्वत:च करून पाहायला हरकत नाही.

No comments: