photo

Tuesday, April 28, 2009

मोबाइल रिमाइंडर 8 Aug 2008,

कार्यक्रमांची आठवण करून देण्यासाठी किंवा आपण ठरवत असलेल्या समारंभाची निमंत्रणे पाठविण्यासाठी सर्वांनाच सेक्रेटरी असते असे नाही. पण म्हणून नाउमेद होऊ नका. आता गूगलच ती भूमिका बजावणार आहे...
.........
तुम्हाला आठवड्याभरानंतरची कोणाची तरी अपॉईंटमेंट आहे असे समजा. ज्याला भेटायचे असते त्याला अगदी तोंड भरून आश्वासन देता की आपली भेट पक्की! तुम्ही तुमच्या डायरीतही लिहून ठेवता. पण 'त्या' दिवशी तुम्ही सकाळीच कामानिमित्त बाहेर गेलात आणि डायरी बघायची राहिली तर तुमची अपॉईंटमेंट मिस होऊ शकते. मग त्या मित्राचे वा मैत्रिणीचे खडे बोल ऐकायचे नशिबी येते. अशा वेळी तुम्हाला कोणी आठवण करून दिली तर? यासाठी सेक्रेटरी असते. पण ते 'भाग्य' सर्वांनाच मिळते असे नाही. मग काय करणार? यावेळी तुमच्या मदतीला धावते गूगल कॅलेंडर. अर्थात ज्यांना इंटरनेटची सोय उपलब्ध आहे त्यांनाच या सुविधेचा वापर करता येतो.

नेटवर कॅलेंडरमध्ये त्या-त्या तारखेला आणि वेळेला अपॉईंटमेंटची नोंद केली तरी पुरेसे नसते. कारण सतत कॅलेंडर ओपन करून आपल्या काय अपॉईंटमेंट्स आहेत हे कोण बघत राहणार? म्हणूनच गूगलने एसएमएसद्वारे मोबाइलवर रिमाईंडर पाठवायची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नेट ओपन करून गूगल डॉट कॉम टाइप करा. डाव्या बाजूला उपलब्ध सेवा दिसतील. त्यातील 'मोअर'वर क्लिक करून मग कॅलेंडरवर क्लिक करा. ते ओपन होईल. त्यातील ज्या तारखेला तुम्हाला काही नोंद करायची आहे, त्या तारखेवर क्लिक करा. आणि अपॉईंटमेंटची नोंद करा. पण एवढेच करून मोबाइलवर अॅलर्ट कसा मिळेल? त्यासाठी तुमच्या मोबाइलची माहिती तेथे द्यावी लागेल. म्हणून गूगल कॅलेंडरमध्येच उजवीकडे वरच्या बाजूला 'सेटिंग्ज' असे दिसेल. त्यावर जा. तेथे तीन भाग दिसतील. तुम्हाला हे कॅलेंडर कशा प्रकारे दिसायला हवे (दिवसाचे, आठवड्याचे, की महिन्याचे वगैरे), त्यात हवामानासारख्या अतिरिक्त सोयी हव्यात का हे सारे पहिल्या टॅबमध्ये ठरविता येईल.

दुसऱ्या टॅबमध्ये आणखी काही कॅलेंडर वा इव्हेंट अॅड करता येतात. आता उरतो तिसरा टॅब. तोच आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो टॅब आहे 'मोबाइल सेटअप'चा. त्यावर क्लिक करा. देशाच्या जागी स्क्रोल करून भारताचे नाव आणा. खालच्या टॅबमध्ये तुमचा मोबाइल नंबर टाइप करा. तो दिल्यावर 'सेंड व्हेरिफिकेशन कोड'वर क्लिक करा. काही सेकंदातच तुमच्या मोबाइलवर हा कोड नंबर येईल. तो 'व्हेरिफिकेशन कोड'मध्ये टाइप करा आणि 'फिनीश सेटअप' म्हणा व नंतर 'सेव्ह' म्हणा. आता तुमच्या मोबाइलची नोंदणी झाली. आता ऑप्शन्समध्ये जाऊन रिमाईंडर इमेलने हवा की एसएमएसने हवा ते ठरवा. दुसरा पर्याय निवडा. संबंधित रिमाईंडर नियोजित वेळेआधी कधी यायला हवा ते ठरवा. म्हणजे तुमचे ऑफिस अंधेरीला असेल आणि अपॉईंटमेंट चर्चगेटला असेल तर किमान तासभर आधी तुम्हाला रिमाईंडर यायला हवा, अशा बेताने सेटअप करा. मात्र हा सेटअप सर्व रिमाईंडरना लागू होत असल्याने सर्वच रिमाईंडर तासभर आधी मिळतील. (काय हरकत आहे?)

गूगल ही सेवा फुकटात पुरवते. काही मोबाइल कंपन्या त्यासाठी नेहमीचा एसएमएसचा चार्ज आकारतात. पण एखादी महत्त्वाची मीटिंग चुकवायची नसेल तर तो चार्ज द्यायला काहीच हरकत नसावी.

तुमच्या मायक्रोसॉफ्ट आऊटलूकमध्येही असे रिमाईंडर सेट करता येतात. पण तो सेटअप गूगलच्या तुलनेने क्लिष्ट आहे आणि त्याचे रिमाईंडर मोबाइलवर नव्हे तर ऑनलाईनच मिळत असल्याने गूगल रिमाईंडरइतका त्याचा फायदा होत नाही. तुम्ही नेटवर 'कॅलेंडर रिमाईंडर' असा सर्च दिलात की काही 'फ्री रिमाईंडर' तुम्हाला दिसतील. त्यात व्हायरस नाही ना हे चेक करून त्यातला एखादा तुम्ही डाऊनलोड करू शकता. मात्र हे सारे रिमाईंडर तुम्हाला ऑनलाइनच आठवण करतील. (हेही नसे थोडके).

गूगल कॅलेंडरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एखाद्या इव्हेंटला जायचे असेल व त्याचे निमंत्रण आपल्या मित्रमंडळींनाही मिळावे असे वाटत असेल तर प्रत्येकाला वेगळे पाठवण्याची गरज नाही अथवा त्यासाठी तुमचा इमेल उघडण्याचीही गरज नाही. वर सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही अपॉईंटमेंटची नोंद कराल तेव्हाच बाजूला 'गेस्ट' असा कॉलम तुम्हाला दिसेल. संबंधित अपॉईंटमेंट वा कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित राहण्याची गरज असेल त्यांचे इमेल पत्ते इथे टाइप करा. (तुम्ही जीमेल वापरत असाल आणि या लोकांचे पत्ते जीमेलमध्ये असतील तर ते आपोआप तुम्हाला मिळतील). ओके म्हटल्यावर या गेस्टनाही निमंत्रण पाठवायचे आहे का असे विचारले जाईल. तेव्हा 'येस' म्हणून ओके करा. म्हणजे साऱ्या पाहुण्यांना ताबडतोब निमंत्रणे मिळतील. पण एवढ्यावर गूगल थांबत नाही. संबंधित माणसाला तो मेसेज त्याच्या कॅलेंडरवर आणि जीमेलवर अशा दोन्ही ठिकाणी मिळतो. तेव्हा या कार्यक्रमाला येणे शक्य आहे की नाही असे त्याला विचारले जाते. काही कारणामुळे त्याने नकार दिला की तो नकार आमंत्रण पाठविणाऱ्याला कळतो. म्हणजे नेमके कोण येणार आहेत त्याचा अंदाज येतो.

तेव्हा ओपन करा गूगल कॅलेंडर आणि सेव्ह करा अपाईंटमेंट्स. अर्थात पुढे जाऊन (एकदाच) मोबाइल सेटअप करायला विसरू नका. नाहीतर एकही रिमाईंडर मोबाइलवर येणार नाही.

No comments: