photo

Tuesday, April 28, 2009

वेगे वेगे धावू... 13 Jun 2008

आपला कम्प्युटर खूपच हळूबाई झाला आहे, असा अनुभव अनेकांना येतो. हा वेळखाऊपणा कसा काढून टाकायचा, असा त्यांना प्रश्नच पडतो. परंतु यावरही उपाय आहेत आणि ते सहजपणाने करता येण्यासारखेच आहेत...
..........
माझे मशीन खूप स्लो चालते, सुरू करतानाही खूप वेळ लागतो, अशावेळी काय करू असे विचारणारे अनेक वाचकांचे ईमेल गेल्या पंधरा दिवसांत आले आहेत. मशीन स्लो चालण्यामागे एकच कारण नसते. त्यात मशीन जुने झाल्यावरही अद्ययावत सॉफ्टवेअर भरत राहिल्याने त्रास होऊ शकतो. किंवा मशीन नवे असले आणि आपण 'स्टार्ट अप'मध्ये जरूरीपेक्षा जास्त प्रोग्राम टाकले तरी सुरुवातीलाच मशीन थंडावते. कधी मशीनमध्ये व्हायरस शिरलेला असतो तर कधी टेम्पररी फाइल्स डीलिट न केल्याने अनावश्यक कचरा साठून मशीन 'जड' होते व स्लो चालते. प्रत्येक मशीनच्या संदर्भात वेगवेगळे कारण असू शकेल.

नेमके कारण शोधून काढण्यासाठी यातील प्रत्येक उपाय स्वतंत्रपणे करावा लागेल. प्रथम 'स्टार्ट अप'मध्ये (स्टार्टवर क्लिक करा, नंतर ऑल प्रोग्राम्स व नंतर स्टार्ट अप) कोणकोणते प्रोग्राम्स आहेत ते पाहा. त्यातील अत्यावश्यक तेवढेच ठेवा व बाकीचे काढून टाका. या यादीत प्रोग्रामचे नाव नाही, पण तरीही तो मशीन सुरू होताना आपोआप सुरू होत राहातो व भरपूर वेळ घेतोय असे दिसले तर काय कराल? 'स्टार्ट'वर क्लिक करून 'रन'वर क्लिक करा. मग एमएसकॉन्फिग (msconfig) असे टाइप करा. मग एक बॉक्स तुमच्यासमोर येईल. त्यातील वरच्या टॅबपैकी स्टार्टअपवर क्लिक करा. मशीन सुरू होताना नेमके कोणते प्रोग्राम्स लोड होतात ते दिसेल. त्यातील नको असतील ते अनक्लिक करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. बरेच प्रोग्राम सिलेक्ट केलेले असतील तर ते सगळे एकदम अनसिलेक्ट करू नका. तसे केल्यास तुमची विंडोज सिस्टिम मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा व्हॅलिडेट करावी लागेल. एकएक प्रोग्राम सिलेक्ट वा अनसिलेक्ट करा. मशीन पुन्हा सुरू करा. यावेळेला तुम्हाला बराच फरक पडलेला दिसेल.

एवढे करूनही मशीन सुधारले नाही तर? एक शक्यता अशी की मशीनमध्ये व्हायरस शिरलेला असू शकेल. त्यासाठी चालू असलेले सर्व प्रोग्राम्स बंद करून अपडेट केलेला अँटिव्हायरस चालवून 'फूल स्कॅन' करा. व्हायरस निघून गेल्यावर पुन्हा मशीन रिस्टार्ट करा. या दोन बाबी केल्यावर साधारणपणे मशीन शहाण्यासारखे सरळ येते. तरीही काही गोष्टी आवश्यक आहेत. वर म्हटल्याप्रमाणे अनावश्यक फाइल्स प्रमाणाबाहेर साठल्या असल्या तरी मशीन थंडावते. त्यासाठी पूवीर्च्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे सीक्लिनर (ccleaner) हा प्रोग्राम इंटरनेटवरून डाऊनलोड करा. तो चालविल्यावर अनावश्यक फाइल्स आपोआप डीलिट होतील. यात तुमच्या महत्त्वाच्या फाइल्स डीलिट झाल्या तर, अशी भीती बाळगू नका. त्या जात नाहीत. प्रामुख्याने टेम्पररी फाइल्सच जातात. आणखी एक चांगला प्रोग्राम म्हणजे डबलकिलर (Doublekiller) मशीनमध्ये एकाच नावाच्या फाइल्स एकापेक्षा जास्त झाल्या असतील तर त्या हा प्रोग्राम काढून टाकतो. तो ही क्रिया आपोआप करत नाही. एकच नाव असलेल्या फाइल्स तो तुमच्यासमोर आणतो. मग खरोखरच ज्या फाइल्स नको आहेत त्या तुम्ही काढून टाकू शकता. वेगवेगळ्या ड्राइव्हमध्ये तुम्ही एकाच नावाची फाइल तयार केलेली असू शकते व त्यात मजकूरही वेगवेगळा असेल. मग केवळ नाव सारखे म्हणून फाइल आपोआप डीलिट करण्याचे काहीच कारण नाही. उलट अधिक सावधानता बाळगायला हवी.

मशीनचे डिफ्रॅगमेंटेशन करणे हा आणखी एक उपाय तुम्हाला करता येईल. स्टार्ट-ऑल प्रोग्राम्स-अॅक्सेसरीज- सिस्टिम टुल्स-डिस्क डिफ्रॅगमेंटर या मार्गाने गेल्यावर तुम्हाला मशीन डिफ्रॅग करता येईल. या डिफ्रॅगमेंटेशनवर मी याच कॉलममध्ये स्वतंत्र लेख लिहिला होता. आपण काम करताना अनेक फाइल्स तयार करतो, आधीच्या नको असलेल्या काढून टाकतो. मग डिस्कवर अशी स्थिती निर्माण होते की सलग दोन फाइल्सच्या मधल्या फाइल्स डीलिट केल्याने फाइलना पुढची लिंक लगेच मिळत नाही व त्या ओपन व्हायला वेळ लागतो. रिकामे स्लॉट काढून टाकून सगळ्या फाइल्सची एकजूट करण्याचे काम हे डिफ्रॅगमेंटेशन करते.

खूप मोठ्या साइझचे प्रोग्राम विनाकारण लोड करून ठेवणे, गाणी ऐकण्याचा सोस असल्यास हार्डडिस्कची क्षमता लक्षात न घेता भरपूर गाणी लोड करून ठेवणे, व्हीडिओ पाहण्यासाठी पुरेशी क्षमता नसतानाही तसे प्रोग्राम लोड करणे ही आणखी काही कारणे मशीन स्लो होण्यामागे असू शकतील. आपल्याकडे विंडोज एक्सपी आहे, पण त्याचा लूक विंडोज व्हिस्तासारखा दिसला पाहिजे या मोहापायी वेगवेगळे प्रोग्राम्स लोड केले जातात आणि मशीन स्लो होण्यास मदत केली जाते.

थोडक्यात आपण स्वत:वर नियंत्रण ठेवले तर मशीन फास्ट चालायला मदतच होईल.

No comments: