photo

Tuesday, April 28, 2009

वर्ड प्रोसेसर्स 6 Jun 2008

' वर्ड प्रोसेसर'ला पर्याय आहेत; मात्र ते डाऊनलोड करून घेताना आवश्यक ती काळजी घ्यायलाच हवी. तशी ती घेतली नाही, तर कम्प्युटर क्रॅश होण्याचीच भीती जास्त असते...
......
आपला कम्प्युटर आपण कितीही काळजीपूर्वक वापरायचे ठरविले तरी नंतर आपण योग्य ती खबरदारी घेत नाही. मी हे काही अर्थांनी म्हणतोय. एक म्हणजे कम्प्युटरचा वाट्टेल ते पाहण्यासाठी दुरुपयोग केला जातो अथवा त्यावर नवनवे प्रोग्राम डाऊनलोड करून ते कसे आहेत ते पाहण्याची चटक लागते. तिसरी बाब म्हणजे तुम्ही रोज वापरत असलेल्या सॉफ्टवेअरला अधिक चांगला (आणि अर्थातच फुकटातला) पर्याय उपलब्ध आहे का याचा आपण सतत शोध घेत असतो. सध्या तरी आपण तिसऱ्या बाबीविषयी बोलू. तुम्ही सर्वजण कम्प्युटरवर काम करताना मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करत असणार. कारण जर तुम्ही विंडोज सिस्टिम वापरत असाल तर हे वर्ड मायक्रोसॉफ्ट ऑफिसबरोबर आपोआपच मिळते. या वर्डला आपण 'वर्ड प्रोसेसर' म्हणतो. म्हणजे त्यात मजकूर टाइप करता येतो, काही प्रमाणात त्याचे डिझायनिंग करता येते, अगदी माफक प्रमाणात नखरे करता येतात. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस फुकटात मिळत नाही. परंतु, आता नेटवर कितीतरी वर्ड प्रोसेसर उपलब्ध आहेत; ज्यात मायक्रोसॉफ्ट वर्डपेक्षा कितीतरी अधिक सुविधा आहेत आणि मुख्य म्हणजे त्यातील बरेचसे फुकट डाऊनलोड करता येतात.

स्टार ऑफिस आणि ओपन ऑफिस हे सध्याचे दोन उत्कृष्ट पर्याय आहेत. यातील ओपन ऑफिस संपूर्णपणे फुकट आहे आणि अतिशय चांगले आहे. यात मायक्रोसॉफ्ट वर्डसारख्याच सोयी असलेला 'रायटर' आहे. त्याचप्रमाणे स्प्रेडशीट, ड्रॉईंग, मॅथ्स वगैरेसाठी वेगळ्या सुविधा असलेला हा प्रोग्राम आहे. त्याचा साइझ मात्र तीनशे एमबीच्या आसपास असल्याने घरी ब्रॉडबँड इंटरनेट नसणाऱ्या लोकांना तो सहजपणे डाऊनलोड करता येणार नाही. ब्रॉडबँड नसल्यास त्यास खूप वेळ लागेल. पण ही त्रुुटी सोडली तर मायक्रोसॉफ्ट वर्डला हा सर्वात उत्तम पर्याय आहे. स्टार ऑफिसमध्ये अधिक सुविधा आहेत; पण त्या पॅकेजसाठी तुम्हाला स्वत:च्या खिशात हात घालावा लागेल. त्यामुळे सध्या तरी ओपन ऑफिसवर समाधान माना. याचा आणखी एक फायदा असा की ते मायक्रोसॉफ्ट वर्डशी कम्प्ॅाटिबल आहे. म्हणजे आधी तुम्ही वर्डच्या फाइल्स सेव्ह केलेल्या असतील तर त्या ओपन ऑफिसमध्येही ओपन होतील.

कोरल वर्डपरफेक्ट, लोटस वर्डप्रो, अॅपलर्वक्स, गोबी प्रॉडक्टिव, अॅबिलीटीराइट, वर्डएक्स्प्रेस अशांसारखे आणखी काही वर्ड प्रोसेसर्स उपलब्ध आहेत. पण ओपन ऑफिसची सर कोणालाच नाही. अॅबिवर्ड हा प्रोग्राम मात्र मर्यादित सुविधांसह का असेना, पण चांगला आहे. यात वर्डइतक्या नाहीत, पण आपल्याला मजकूर ऑपरेट करायला ज्या किमान सुविधा लागतात त्या सर्व आहेत. त्याचा साइझही अत्यंत कमी आहे. त्यामुळे तो डाऊनलोड करणे हे अजिबात कष्टाचे काम नाही.

खुद्द मायक्रोसॉफ्ट आता 'थिंकफ्री' नावाने काढलेल्या सॉफ्टवेअरकडे वळते आहे. ते फुकटात मिळत नाही. वाषिर्क वर्गणी भरावी लागते. पण यात केलेली डॉक्युमेंट्स जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलात तरी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. कारण ते डॉक्युमेंट मायक्रोसॉफ्टच्या र्सव्हरवर सेव्ह होते. ती लिंक सतत मिळत असल्याने घरच्या पीसीवर केलेले डॉक्युमेंट ऑफिसमध्ये सहज उघडता येईल. अर्थात याही बाबतीत गूगल पुढे आहे. त्यांनी 'गूगल डॉक्स' नावाचे सॉफ्टवेअर आधीच आणले आहे. यात अशी डॉक्युमेंट्स ऑनलाइन साठवायची सोय आहे. त्यातही गूगलने आपले वैविध्य कायम राखले आहे. गुगल डॉक्स वापरायला तुमचा जीमेलवर अकाऊंट असावा लागतो. जीमेलवर अकाऊंट नाही असा इमेलधारक फारच विरळा असेल. पण तुमचे अकाऊंट नसलेच तर गूगलडॉक्स ओपन केल्यावर तिथे अकाऊंट ओपन करायची सोय आहे.

मी इथे सांगितलेल्या अथवा तुम्ही इंटरनेटवर 'वर्ड प्रोसेसर्स' असा सर्च देऊन मिळालेल्या वर्ड प्रोसेसरबद्दल एक काळजी मात्र घ्या. ती ही की तो वर्ड प्रोसेसर कम्प्युटरच्या कोणत्या सिस्टिमशी कम्पॅटिबल आहे ते तपासून घ्या. बहुतेक प्रोसेसर विंडोजमध्ये चालतात; पण काही अॅपल अथवा मॅकसाठीच तयार झालेले आहेत. जो विंडोजसाठी चालत नाही तो डाऊनलोड करायच्या भानगडीत पडू नका. कारण मग ते सॉफ्टवेअर वापरायला लागल्यावर कम्प्युटर क्रॅश होण्याची शक्यता असते. मी वेगळ्या संदर्भात अशी चूक केली होती. मी सफारी ब्राऊझर डाऊनलोड केला. तो चालविल्यावर मशीन बंद पडत असे. हा ब्राऊझर विंडोज सिस्टिमशी कम्पॅटिबल आहे असे सांगण्यात येत असले तरी माझा अनुभव वेगळा होता. मग मी तो ब्राऊझर लगेचच काढून टाकला.

या वर्ड प्रोसेसरमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन असे प्रकार आहेत. जी डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठूनही ओपन करता येतील, ती ऑनलाईन. मशीनमधले मायक्रोसॉफ्ट वर्डमधले डॉक्युमेंट तुम्ही मेलने पाठविल्याशिवाय अथवा पेनड्राइव्हने दुसरीकडे नेल्याशिवाय दुसरीकडे ओपन होणार नाही. ऑनलाईन प्रोसेसरमध्ये साठवता येणाऱ्या मजकुराचा साइझ वेगवेगळा असतो; पण साधारणत: एक जीबी मजकूर साठवता येतो. मी उल्लेख केलेल्या वर्ड प्रोसेसरशिवाय आणखी काही प्रोसेसरही आहेत. त्याची यादी खाली देत आहे.

No comments: