photo

Saturday, April 25, 2009

काही 'शॉर्टकट्स!' 23 Jan 2009, 0018 hrs IST

फोल्डरमधल्या काही मोजक्याच फाइल डीलिट करायच्या आहेत; काय करायचे? नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम्स डेस्कटॉपऐवजी कुठे ठेवणे सोईचे असते? काही फोल्डर्स 'गुप्त' ठेवायचे असले तर...? तर काय करायचे या प्रश्नांची केलेली उकल...
....
नवख्या मंडळींना कम्प्युटर चालवताना काही सोप्या गोष्टीही कठीण वाटू शकतात. याचे कारण कम्प्युटर तंत्रज्ञानाबद्दल असलेली अनभिज्ञता. ही माहिती किमान मूलभूत तरी असलीच पाहिजे. काही शॉर्टकट्स, काही सोप्या युक्त्या वगैरे माहीत पाहिजेत. अशाच काही युक्त्या आपण माहीत करून घेऊ या.

समजा तुम्हाला तुमच्या फोल्डरमधल्या काही फाइल्स डीलिट करायच्या आहेत. अन्य फाइल्स घालवायच्या नाहीत. एकएक फाइल सिलेक्ट करून डीलिट करायला वेळ लागेल. अशा वेळेस एका हाताने 'कंट्रोल'चे बटन दाबून ठेवून तुम्हाला डीलिट करायच्या असतील त्या साऱ्या फाइल्स सिलेक्ट करा. उदाहरणार्थ पहिली, सातवी, दहावी अशा फाइल्स सिलेक्ट करा. सगळ्या सिलेक्ट झाल्या की 'कंट्रोल' बटनावरचा हात सोडा व एकदाच डीलिटचे बटन दाबा. त्या एकदमच डीलिट होतील व डेस्कटॉपवरच्या 'रिसायकल बिन'मध्ये जाऊन पडतील. त्या या कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडाव्यात असे वाटत नसेल व थेट कम्प्युटरमधून डीलिट व्हाव्यात असे वाटत असेल तर डीलिट करताना 'शिफ्ट'चे बटन दाबून मग डीलिटचे बटन दाबा. त्या फाइल्स रिसायकल बिनमध्ये न जाता नाहीशाच होतील. पण माझ्या मते फाइल बिनमध्येच गेलेली बरी. कारण एखादी फाइल आपण चुकून डीलिट केली असे वाटले तर ती पुन्हा रिकव्हर करता येते. बिनमध्ये असलेल्या फाइलवर राइट क्लिक करा व 'रिस्टोअर फाइल' म्हणा. ती मूळ फोल्डरमध्ये जाऊन बसेल.

काही सतत वापरले जाणारे प्रोगाम्स आयकॉनच्या स्वरूपात डेस्कटॉपवर आणून ठेवले तर सुरू करायला सोपे जाते हा भाग आहेच. परंतु, डेस्कटॉपवर जास्त आयकॉन आणल्यास तो फार हेवी होतो. त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डेस्कटॉपऐवजी स्टार्ट मेन्यूवर ते आणून ठेवावेत. त्यासाठी डेस्कटॉपवरच्या 'स्टार्ट' बटनावर राइट क्लिक करा. मग 'प्रॉपटीज'वर क्लिक करा. जी ऑप्शन्स दिसतील त्यातील 'स्टार्ट मेन्यू' सिलेक्ट करा व नंतर ओके म्हणा. आता पुन्हा स्टार्ट बटनावर क्लिक करा. नंतर 'ऑल प्रोग्राम्स'वर क्लिक करा. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये असलेले सगळे प्रोग्राम्स दिसतील. त्यातील जो प्रोग्राम तुम्हाला 'स्टार्ट मेन्यू'मध्ये हवा आहे त्यावर राइट क्लिक करा. तुम्हाला 'पिन टू स्टार्ट मेन्यू' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता जेव्हा केव्हा हा प्रोग्राम ओपन करायचा असेल तेव्हा स्टार्ट बटनावर क्लिक केलेत की उभ्या डाव्या पट्टीत तो दिसेल. त्यावर क्लिक करा की झाले काम.

पुढची टिपही अनेकांना उपयोगी पडेल. समजा तुमचा कम्प्युटर ऑफिसमध्ये वा घरात एकापेक्षा अधिक माणसे वापरतात. अशावेळेस तुम्ही तयार केलेले काही फोल्डर्स अन्य लोकांनी पाहू नयेत वा पाहिले तर त्यात काही बदल कोणीही करू नये असे तुम्हाला वाटत असेल. मग त्यावर काय करायचे? त्यासाठी थोडी किचकट प्रोसेस आहे. तुमचे मशीन रिस्टार्ट करा आणि ताबडतोब कीबोर्डवरचे 'एफ ८' हे बटन सतत दाबत राहा. काही वेळाने कम्प्युटर 'सेफ मोड'मध्ये सुरू होईल. नेहमीच्या स्क्रीनपेक्षा अगदीच वेगळा व मोठ्या अक्षरातला हा स्क्रीन दिसेल. तिथे तुमच्या युजरनेमने लॉगीन करा. मग तुम्ही जो फोल्डर प्रायव्हेट करू इच्छिता तो शोधा. (तो 'सी' ड्राइव्हमध्ये आहे का 'डी'मध्ये वगैरे) त्या फोल्डरवर राइट क्लिक करून 'प्रॉपटीज'वर जा. नंतर 'सिक्युरिटी' टॅबवर जा. दोन भागांतला स्क्रीन दिसेल. वरच्या भागात ग्रूप ऑर युजर नेम अशा हेडखाली मशीनमध्ये ज्यांच्या ज्यांच्या नावाने मशीनला लॉगीन होऊ शकते त्याची यादी असेल. त्यातील प्रत्येक नाव आळीपाळीने सिलेक्ट करा आणि नंतर खालच्या भागात कोणते राइट्स कोणाला द्यायचे ते सिलेक्ट करा. तुमचे लॉगीन सोडून बाकी सर्वांना राइट्स 'डिनाय' म्हणजेच नाकारू शकता अथवा बाकीच्यांना फोल्डर दिसेल पण त्यात बदल करू शकणार नाही अशी सोय करायची असेल तर 'अलाऊ' सेक्शनखाली हवे तेच राइट्स द्या. दुसऱ्या व्यक्तीला 'फुल कंट्रोल' व 'मॉडीफाय'वर क्लिक करू नका. म्हणजे इतर लोक फोल्डरमध्ये काही बदल करू शकणार नाहीत. तुमच्या स्वत:च्या लॉगीनला मात्र सवं काही 'अलाऊ' हवे हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर तुम्हालाच काही बदल करता येणार नाहीत. मग मशीन रिस्टार्ट करा.

समजा तुम्हाला एक फोल्डर वारंवार वापरावा लागतो. तोे समजा 'सी' ड्राइव्ह - डाटा- वर्ड फाइल्स- पर्सनल फोल्डर- हवा असलेला फोल्डर इतक्या लांब असेल तर प्रत्येक वेळेला तो शोधणे कठीण जाते. तोे कायम डेस्कटॉपवर आणून ठेवला तर किती काम सोपे होईल? त्यासाठी डेस्कटॉपवर राइट क्लिक करा. मग 'न्यू' आणि मग 'शॉर्टकट'वर क्लिक करा. नंतर ब्राऊज बटनावर क्लिक करून तुम्हाला हव्या त्या फोल्डरची लिंक द्या. नंतर 'नेक्स्ट'वर क्लिक करा व त्या शॉर्टकटला काहीही नाव द्या. ओके म्हणा की तो फोल्डर डेस्कटॉपवर हजर झालाच पाहिजे.

No comments: