photo

Tuesday, April 28, 2009

गर्जतो मराठी! 23 May 2008

गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठीमध्ये दोन चांगल्या वेबसाइट तयार झाल्या आहेत. त्यांचा घेतलेला वेध...
......
इंटरनेटला भाषा नसते. आपण म्हणू त्या भाषेत ते आपल्यासमोर सादर होते असे म्हणतात. तरीही नेटवरील मराठी भाषेबद्दल आपल्यासाठी योग्य ती सुविधा निर्माण झालेली नाही. म्हणूनच इंटरनेटवर मराठीतून टाइप कसे करावे, आपल्याकडे एक फाँट असेल पण दुसऱ्याकडे तो नसला तर आपला मजकूर त्याला दिसेल का वगैरेसारखे प्रश्न निर्माण होतात. यावर तोडगा म्हणून युनिकोड पद्धती अवलंबिण्यात आली. म्हणजे तुमच्या मशीनमध्ये अमुक एक मराठी फाँट उपलब्ध आहे की नाही हा प्रश्नच नाही. युनिकोडची साइट मशीनवर दिसणारच.

मराठीत गेल्या दोन महिन्यांत चांगल्या वेबसाइट तयार झाल्या आहेत. त्यातली एक म्हणजे 'सहजच.कॉम'. ही साइट वाटते तेवढ्या सहजतेने निर्माण झालेली नाही. सचिन पिळणकर या अतिशय जिद्दी तरुणाने नवशिक्या अथवा त्यापेक्षा थोडेसे जास्त ज्ञान असणाऱ्या व्यक्तींसाठी ही साइट तयार केली आहे. कम्प्युटर ऑपरेट करताना काही मूलभूत अडचणी निर्माण होतात. प्रश्न साधे वाटतात; पण त्यावरची उत्तरे कशी व कुठे शोधायची ते कळत नाही. अशा नवोदितांसाठी पिळणकरांनी ही साइट गेल्याच महिन्यात पाडव्यापासून सुरू केली आहे. यात वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागावर क्लिक करा म्हणजे त्याचे अंतरंग उघडत जाईल. बहुसंख्य वाचक मला ज्या शंका विचारतात, त्यांचे निरसन या साइटवर केलेले आढळेल. विंडोज ९८वर मात्र ही साइट ओपन होणार नाही. विंडोज एक्सपी व विंडोज व्हिस्ता यावर ही साइट दिसेल.

साइट ओपन केल्यावर 'मला शिकायचंय', 'मला थोडंफार येतंय', 'मी हुशार आहे', 'मला भरपूर येते', मी एक्सपर्ट आहे' यांसारखे विभाग येतात. कम्प्युटर वापरणाऱ्यांच्या हुशारीच्या श्रेणीनुसार ते बनविण्यात आले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. तुमच्या मनात शंका आहे पण त्याचे उत्तर साइटवर नाही असे होऊ शकते. पण म्हणून ती शंका विचारण्याची सोयही साइटवर आहे. या साइटच्या होमपेजवर 'आमची ओळख' या सदरात गेलात तर सचिन पिळणकर ही काय चीज आहे ते लक्षात येईल. या साइटमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. जसजसा या साइटला प्रतिसाद मिळेल तसतशी ती सुधारणा होत जाईल यात शंका नाही.

याच आठवड्यात सुरू झालेली एक वेगळी साइट म्हणजे 'जयमहाराष्ट्र.कॉम'. विविध वृत्तपत्रांमधील बातम्यांचे एकत्रित संकलन म्हणजे ही साइट असे म्हटले तर ती ओळख अपुरी ठरेल. ताज्या घडामोडी, भावलेलं...आवडलेलं, आजची शिफारस, महाराष्ट्रातल्या विविध शहरांतल्या ताज्या बातम्या हे याचे वैशिष्ट्य आहेच, पण शासन, गुंतवणूक, उद्योगव्यवसाय, पर्यटन, खुचीर् (राजकारण), आरोग्य, नियतकालिके आदि विविध विभाग तयार करून त्या क्षेत्राबद्दलची माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या साइटमध्येही मल्टिमीडियाच्या क्षेत्रातील बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घरोघरी दोन मराठी वृत्तपत्रेे घेण्याचा कल आता वाढत असला तरी सर्व मराठी वृत्तपत्रेे, नियतकालिके, ब्लॉग्ज आदिंची एकत्रित माहिती मिळण्याची सोय या जयमहाराष्ट्र.कॉमवर झाली आहे.

अशाच प्रकारची एक साइट इंग्रजीमध्ये सुरू झाली आहे. ती म्हणजे 'न्यूजदॅटमॅटर्स.इन'. यात आरोग्य, उद्योग, म्युच्युअल फंड, हॉस्पिटॅलिटी वगैरेसारखे विभाग सुरू करून त्या-त्या विभागातल्या ताज्या बातम्या देण्याची योजना आहे. काही प्रमाणात या बातम्या मोफत पाहायला मिळतात. पण जर तुमच्या मेलवरील इनबॉक्समध्ये या बातम्या रोज यायला हव्या असतील, तर मात्र त्यासाठी पैसे मोजावे लागतील; तेही प्रत्येक सेक्टरसाठी दहा हजार रुपये. हे पैसे सामान्य वाचकाच्या आवाक्यातले नाहीत. अशा प्रकारची साइट चालविण्याचे काम खचिर्क असते हे मान्य; पण वाचक आपल्याला किती पैसे द्यावे लागतात याचा विचार करणारच. प्रामुख्याने ही साइट व्यावसायिकांसाठीच आहे असे म्हणावे लागेल. रोजच्या रोज साइटवर जाऊन मर्यादित बातम्या पाहायच्या असतील तर मात्र सारे चकटफु आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके व तत्सम २०० सोर्स, ५० वेबसाइट्स आणि दहा भाषा यांतून सारा मालमसाला जमा केला जातो. साइट वाचनीय आहे यात शंका नाही.

मागे एका वाचकाने इंटरनेटवर इंग्रजी-मराठी डिक्शनरी आहे का, असे विचारले होते. त्याचे उत्तर होकाराथीर् आहे. तुम्ही खांडबहाले.कॉम ( khandbahale.com ) टाइप करा आणि समोरच वरच्या बाजूला इंग्लिश-मराठी ऑनलाइन डिक्शनरीवर क्लिक करा. ज्या इंग्रजी शब्दाचा अर्थ हवा आहे तो शब्द टाइप करा व 'लुकअप'वर क्लिक करा. क्षणार्धात त्याचा मराठी अर्थ तुमच्यासमोर येईल. जर मराठीतून दिसला नाही तर या साइटवरचा मराठी फाँट डाऊनलोड करावा तो फाँट्स फोल्डरमध्ये इन्स्टॉल करावा लागेल. पुन्हा ब्राऊझर सुरू करा म्हणजे मराठीतून अर्थ दिसायला लागतील.

ता. क. : तुम्ही विंडोज एक्सपी वापरत असाल आणि सव्हिर्स पॅक २ डाऊनलोड केलेले असेल तर यापुढचा व शेवटचा सव्हिर्सपॅक ३ डाऊनलोड करायला हरकत नाही. इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये जाऊन विंडोज अपडेटवर जा, पुढच्या सूचनांचे पालन करा आणि सव्हिर्स पॅक ३ डाऊनलोड करा. यामुळे तुमचे मशीन अधिक सुरक्षित होईल का वा अधिक वेगाने पळेल का, या प्रश्ानंवर कामात फारसा फरक पडणार नाही असेच उत्तर द्यावे लागेल.

No comments: