photo

Tuesday, April 28, 2009

ब्राऊझरमधला 'क्रोम' 5 Sep 2008

गूगलने आणलेल्या 'क्रोम' या ब्राऊझरमध्येे काही सोयी अशा आहेत की ज्या अन्य ब्राऊझरमध्ये नाहीत वा अंशत: आहेत. काय आहेत या सोयी आणि त्यांचे नेमके काय आणि कसे फायदे होतात?
........
इंटरनेट ब्राऊझर्सच्या युद्धात आता गूगलच्या 'क्रोम' या अतिशय हलक्याफुलक्या ब्राऊझरची भर पडली आहे. मंगळवारी गूगलने हा ब्राऊझर वापरासाठी उपलब्ध केला, त्याबरोबर त्यावर नेटकरांच्या उड्या पडल्या. याचे कारण गूगल जे काही देईल ते चांगलेच असेल अशी भावना इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये आहे. हा 'क्रोम' घाईगदीर्ने डाऊनलोड केला गेलाही. पण त्याच्या वापरानंतर संमिश्र भावना मनामध्ये आल्या. चांगली बाजू अशी की एकतर ब्राऊझर अतिशय हलका आहे. पटकन ओपन होतो, दिसण्यातही साधेपणा आहे. रिकामी चौकट ओपन झाली आहे का असे वाटते. अन्य ब्राऊझर्सच्या तुलनेत तो खूपच सुटसुटीत दिसतो. इतरत्र दिसणारी 'फाइल', 'ओपन', 'हिस्ट्री', 'हेल्प' अशी अगदी वरती दिसणारी बटन्स इथे नाहीत. इथे थेट बुकमार्क बार दिसतो. त्याच्या वरती अॅड्रेस बार आहे. तिथे अॅड्रेस टाइप केला की पान क्षणार्धात उघडते. उजव्या बाजूलाही बटनांची गदीर् नाही. त्यामुळे हा ब्राऊझर 'नटलेला, सजलेला' वाटत नाही. काहीच सोयी नाहीत, मग तो वापरायचा कसा असा प्रश्ान् मनात येतो. बुकमार्क बारवर तुमचे बुकमार्क आणून ठेवायला सुरुवात केलीत की तो किती फास्ट आहे ते कळते.

या 'क्रोम'मध्ये काही सोयी अशा आहेत की ज्या अन्य ब्राऊझरमध्ये नाहीत वा अंशत: आहेत. ब्राऊझर स्लो झाला आहे असे वाटले तर किती अॅप्लिकेशन्स त्यात ओपन आहेत हे पाहण्यासाठी शिफ्ट व एस्केप की दाबा. लगेच टास्क मॅनेजर ओपन होईल. त्यात कोणकोणती अॅप्लिकेशन्स चालू आहेत ते त्यांच्या साइझसह कळेल. एखादे अनावश्यक अॅप्लिकेशन असेल तर ते 'एंड प्रोसेस'वर क्लिक करून थांबवू शकता. तसेच मेमरीबाबतही करता येईल. अबाऊट : मेमरी असे अॅड्रेसबारमध्ये टाइप करा की कोणते अॅप्लिकेशन किती मेमरी खात आहे ते कळेल. नको ते अॅप्लिकेशन बंद करता येईल. क्रोमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जसजसे नवीन टॅब उघडले जातील तसतशी आधीच्या टॅबची मेमरी डिलिट होते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर जो टॅब वापरात असेल त्यावरच ब्राऊझरची सारी शक्ती एकवटली जाते व काम वेगाने होते. तुम्ही एखादा टॅब चुकून बंद केलात तरी घाबरायचे कारण नाही. कंट्रोल टी करा की आधी बंद केलेल्या सर्व टॅबची चित्रे दिसतील. जो हवा तो ठेवून बाकी बंद करू शकता.

ब्राऊझरवर हिस्ट्रीचे बटन नाही असे मी वरती म्हटले आहे. मग आधी पाहिलेली पाने कशी उघडायची? त्यासाठी कंट्रोल एच करा. हिस्टरी ब्लॉक उघडतो. तुम्ही पाहिलेल्या साइटची जंत्री येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक साइटचे चित्रही दिसते. म्हणजे नेमके काय पाहिले ते कळते. हिस्ट्रीबरोबरच सर्च अशीही वेगळी सोय उपलब्ध नाही. मग काय करायचे? ती महत्त्वाची सोय म्हणजे अॅड्रेस बारमध्ये त्यांनी करून दिली आहे. या बारमधून तुम्ही सर्च करू शकता. उदा. सर्च डॉट महाराष्ट्र डॉट कॉम असे म्हटले की महाराष्ट्राविषयी सारे काही तुमच्या समोर उलगडेल. वेगळ्या सर्चबारची गरज नाही. तेवढी जागा त्यांनी वाचवली आहे.

तरीही मंगळवारी 'क्रोम' आला आणि वादातही सापडला. कारण गूगलने आधुनिकतेची कास धरत हा ब्राऊझर आणला असला तरी तो तयार करण्यासाठी 'वेबकिट' नावाची जुनी ओपन सोर्स ब्राऊझर टेक्नॉलॉजी वापरली आहे. हा ब्राऊझर विंडोज सिस्टिम ज्यांच्याकडे आहे त्यांनाच डाऊनलोड करता येईल. मॅक अथवा अॅपलसाठी तो नंतर बाजारात येईल. पण विंडोजची आधुनिकता लक्षात न घेता हा 'क्रोम' आणण्यात आला आहे का याचे उत्तर तज्ज्ञच देऊ शकतील. कारण तो डाऊनलोड केल्यावर काही वेळाने क्रॅश होण्याची शक्यता आहे. अॅपलचा 'सफारी' ब्राऊझरही याच तंत्रावर आधारित आहे. त्यामुळे तो मी डाऊनलोड केल्यावर काही वेळातच क्रॅश झाला होता. तेव्हा माझा कम्प्युटर 'सफारी'साठी योग्य नाही, असे वाटले होते. 'क्रोम'ही काहीवेळा असाच क्रॅश झाला, काही वेळा चांगला चालला. त्यात 'महाराष्ट्र टाइम्स'ची वेबसाइटही अतिशय उत्तम दिसते. इंटरनेट एक्स्प्लोरर वगळता अन्य ब्राऊझरमध्ये ती इतकी चांगली दिसत नाही. पण 'क्रोम' का क्रॅश झाला यावर वेगवेगळी उत्तरे मिळत आहेत. तो हॅक करायला सोपा आहे किंवा त्यात अशा काही त्रुटी आहेत की त्याद्वारे हॅकर्सना तुमच्या कम्प्युटरमध्ये घुसायची संधी मिळते अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात तथ्य किती हे आताच सांगता येणार नाही.

कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना त्या सॉफ्टवेअर निमिर्ती करणाऱ्या कंपनीच्या काही अटी असतात. त्याला 'लायसन्स अॅग्रीमेंट' म्हणतात. हे आपण सहसा वाचायच्या भानगडीत पडत नाही. पटापट एखादे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतो. पण 'क्रोम'चे लायसन्स अॅग्रीमेंट काही लोकांनी वाचले आणि त्याबद्दलचे आक्षेपही लगेचच नोंदविले. नव्या ब्राऊझरमध्ये नेटचा वापर करणाऱ्या माणसांनी जे जे काही पाहिले असेल वा लोड केले असेल वा स्वत:ची माहिती दिली असेल त्यावर गूगलचा शंभर टक्के हक्क राहील, असे या अॅग्रीमेंटमध्ये म्हटले होते. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या ब्लॉगवर, अथवा ऑर्कुट, मायस्पेससारख्या सोशल साइटवर जे जे 'लिहाल' त्यावर 'क्रोम'चा अधिकार असेल आणि तुम्हाला एक पैसाही न देता गूगल ते वापरू शकेल. लोकांच्या आक्षेपानंतर हा भाग बदलण्यात आला. यापासून आपल्याला एक धडा घ्यायला हवा. कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करताना 'लायसन्स अॅग्रीमेंट' वाचणे आवश्यक असते. तो भाग किचकट असला तरी काळजीपूर्वक वाचायला हवा.

' क्रोम'मुळे ब्राऊझर वॉर चांगलेच तापणार आहे. इंटरनेट एक्स्प्लोरर ७ (आयई ७) येऊन दोनच वषेर् झाली आहेत. लगेचच मायक्रोसॉफ्ट आयई ८ आणत आहे. त्याची बेटा व्हर्जन दोन उपलब्ध आहे. ज्या फायरफॉक्सने आयईच्या अनभिषिक्त सत्तेला खिंडार पाडायचा प्रयत्न केला (त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले) त्याची म्हणजेच 'फायरफॉक्स ३'ची बेटा व्हर्जन पाच आली आहे. ऑपेरा ब्राऊझरनेही ९.५ ही लेटेस्ट व्हर्जन आणली आहे. अतिशय फास्ट अशा 'अवंत' ब्राऊझरचीही सध्या ११.६.२० ही व्हर्जन बाजारात आणली आहे. सारेचजण सज्ज झाले आहेत. अशा वेळेस 'क्रोम' किती यश मिळवितो आणि 'क्रोम'मुळे अन्य ब्राऊझरमध्ये किती बदल घडून येतात ते लवकरच कळेल. तेव्हा, 'हॅपी क्रोम'...

No comments: