photo

Saturday, April 25, 2009

फोल्डरचा फिटनेस! 6 Mar 2009, 0106 hrs IST

आपल्याला नको असलेल्या किंवा आता अनावश्यक ठरत असलेल्या फाईल्स काढून तरी कशा टाकायच्या? आपला कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे हे कसे जाणून घ्यायचे, फोल्डरची साइज कशी समजून घ्यायची याबाबतचे काही मार्ग. त्यांचा अवलंब केला की अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात...
........
तुम्हाला तुमचा कम्प्युटर कासवगतीने चालतो असे वाटते का? मग अनावश्यक फाइल्स काढून टाकण्याचे काही मार्ग आहेत. त्याबद्दल मी मागे सविस्तरपणे लिहिलेच आहे. त्यातच काही उपायांची भर टाकत आहे. काही वेळेला या अनावश्यक फाइल्स कुठे आहेत ते कळत नाही. किंवा कोणता फोल्डर 'हेवी' झाला आहे ते लक्षात येत नाही. प्रत्येक फोल्डरवर राइट क्लिक करून प्रॉपटीजवर जायचे आणि फाइल फोल्डरचा साइझ पाहात राहायचा ही बाब फारच कंटाळवाणी आणि वेळखाऊ असते. अशावेळेस मशीनमधल्या सगळ्या फोल्डरचे साइझ एकाच दृष्टिक्षेपात दिसले तर? त्यासाठी 'फोल्डर साइझ' हा प्रोग्राम डाऊनलोड करा. सध्या याची २.४ व्हर्जन उपलब्ध आहे. गूगलवर 'फोल्डर साइझ २.४' असा सर्च द्या. तिथून 'फोल्डरसाइझ२.४.एमएसआय' ही फाइल डेस्कटॉपवर डाऊनलोड करा. डाऊनलोड संपले की त्या फाइलवर डबलक्लिक करा. मग 'रन'वर क्लिक करा. पुढील सूचना पाळा की 'फोल्डर साइझ' मशीनमध्ये लोड होईल.

आता तुमच्या डेस्कटॉपवरच्या 'माय कम्प्युटर' आयकॉनवर क्लिक करा. सगळे ड्राइव्ह दिसतील. त्यातल्या कोणत्याही ड्राइव्हवर क्लिक करा. उदा. 'सी' ड्राइव्हवर क्लिक केल्यावर त्यामधले सगळे फोल्डर दिसतील. ते फोल्डरचे आयकॉन असतील. त्यात फोल्डर साइझ दिसणार नाही. मग वरती 'व्ह्यू'वर क्लिक करून खाली 'डिटेल्स'वर क्लिक करा. आता सगळे फोल्डर एकाखाली एक दिसतील व प्रत्येक फोल्डरची पूर्ण माहिती त्यासमोर दिसेल. पण एवढे करूनही 'फोल्डर साइझ' दिसत नाही हे कसे? त्यासाठी पुन्हा 'व्ह्यू'वर जा, खाली 'चूज डिटेल्स'वर क्लिक करा. तुम्हाला अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यातच 'फोल्डर साइझ'चे ऑप्शन दिसेल. (नुसते 'साइझ' नाही. त्यावर क्लिक असेलच) या 'फोल्डर साइझ'वर क्लिक करा. मग 'फोल्डर साइझ' शब्दावर क्लिक करून बाजूला 'मूव्ह अप' बटनावर जा. हे ऑप्शन अगदी वरून दुसरे आणून ठेवा. ओके म्हणा की प्रत्येक फोल्डरचा साइझ दिसायला लागेल. ज्या फोल्डरमध्ये अधिकाधिक फाइल्स साठल्या असतील ते पटकन कळेल व त्या अनावश्यक असल्यास काढूनही टाकता येतील. गंमत अशी की तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे 'फोल्डर साइझ'वर जसे क्लिक करून साइझ जाणून घेऊ शकता, तसेच अन्य काही ऑप्शन्सवरही क्लिक करू शकता. उदा. फोल्डर क्रिएटेड, फोल्डर चिल्ड्रन (म्हणजे एका मुख्य फोल्डरमध्ये किती सबफोल्डर आहेत) वगैरे. याची आवश्यकता प्रत्येकाला असेलच असे नाही. पण गंमत म्हणून ही ऑप्शन्स क्लिक करून पाहा.

नको असलेल्या फाइल्स काढताना टेम्पररी फाइल्स काढणे वगैरे उपाय आहेतच. परंतु, आणखी एक उपाय आहे. 'माय कम्प्युटर'वर क्लिक करा. मग 'सी' ड्राइव्हवर राइट क्लिक करा. नंतर प्रॉपटीर्जवर जा. पहिल्याच 'जनरल' टॅबमध्ये 'डिस्क क्लीनअप' वर क्लिक करा. प्रथम एक छोटा बॉक्स दिसेल आणि त्यानंतर आपोआप मोठा बॉक्स दिसेल. त्यातील 'मोअर ऑप्शन्स'वर जा. त्यात सर्वात खाली 'सिस्टिम रिस्टोअर' ग्रूपमध्ये 'क्लीनअप' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा व ओके म्हणा. हार्ड डिस्कमधील सगळ्या अनावश्यक फाइल्स नाहीशा होतील. 'सिस्टिम रिस्टोअर' साफ करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे कम्प्युटरमध्ये विविध कारणांनी हा पॉईंट तयार होत असतो. मशीन ज्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यात जे प्रोग्राम्स आहेत, त्याची नोंद असलेला हा पॉईंट असतो. त्याचा साइझ खूप मोठा असतो. आपण सर्वात ताजा 'रिस्टोअर पॉईंट' ठेवून आधीचे सर्व डिलीट करायचे की मशीन हलके होते.

काही महिन्यांत 'विंडोज ७' ही प्रणाली येईल आणि बऱ्याचशा प्रमाणात अपयशी ठरलेल्या व्हिस्ताचे आयुष्य अकाली संपेल. ज्यांनी व्हिस्ता घेतलेले नाही आणि एक्सपीवरच प्रेम केले, त्यांनाही व्हिस्ताचे आकर्षण नाही असे नाही. प्रणाली एक्सपीचीच, पण दिसायला व्हिस्ता अशी इच्छा कोणाच्या मनात बळावली तर आश्चर्य वाटायला नको. मायक्रोसॉफ्टने ती इच्छा पूर्ण केली आहे. तसेच काही खाजगी कंपन्यांचे सॉफ्टवेअरही नेटवर उपलब्ध आहे. 'व्हिस्तामायझर' हे असेच एक सॉफ्टवेअर आहे. गूगलला सर्च देऊन ते डाऊनलोड करून घ्या आणि त्या फाइलवर डबलक्लिक करून ती 'रन' करा. तुम्हाला मशीन रिस्टार्ट करावे लागेल. रिस्टार्ट होतानाच मशीनचा लूक बदललेला दिसेल. नवा लूक अधिक आल्हाददायक असेल. 'व्हिस्ता स्टार्ट मेन्यू २.९२' हेही वेगळे सॉफ्टवेअर आहे. ते डाऊनलोड करा आणि आपल्या मशीनवरच्या 'स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि बघा मेन्यू कसा दिसतो ते. हे प्रोग्राम्स नको असतील तर मायक्रोसॉफ्टने असंख्य ऑप्शन्स उपलब्ध करून दिली आहेत. गूगलवर सर्च केल्यास ते कळू शकेल.

No comments: